काही बदल करून ही कविता पुन्हा प्रकाशित करत आहे. आधीची इथे आहे http://misalpav.com/node/11546
रस्ता ओलांडता
आठवते चतुर्थीला गणपतीच्या देवळात
आईचा हात धरून दर्शन घेताना
आठवते अजून तो भरगर्दीतला रस्ता
बाबांचा हात धरून ओलांडताना
आठवतं अंधुकसं पहिल्यांदा जेव्हा
आईनं शाळेत सोडलं होतं
आठवतं जेव्हा, माझ्या हट्टाखातर
बाबांनी खांद्यावर घेतलं होतं
देवळात असो वा रस्ता ओलांडता
किती सुरक्षित आहोत वाटायचे
खांद्यावर बसून बाबांच्या मला
आपण उंच झालो असे भासायचे
कित्येकसे रस्ते असे ओलांडत गेलो
उंचीने अन वयाने वाढत गेलो
पुस्तकातले, अनुभवाचे धडे गिरवत
सुसंस्कृत, सुशिक्षित, सुखवस्तू झालो
हाताला आधाराची नको झाली गरज
कसलेही भवताली नको झाले कडे
अन रस्ता पार करताना जाणवले कधी
कसे आपण एकटेच आलो आहोत पुढे
आई बाबा जसे होते तिथेच राहिले
रस्त्याच्या पलीकडे दुसरया बाजूला
मधेच कधीतरी आमच्यामधला तो
रस्ता मात्र काहीसा रुंद झाला
रूढी परंपरा जरी त्याच असल्या
तरी आचार-विचारांचा फरक पडला
घर, भिंती, खिडक्या त्याच असल्या
तरी पडदे व भिंतींचा रंग बदलला
कळत नाही दोष हा त्यांचा, माझा,
कि नियम जुना पिढ्यानपिढ्यांचा
वाऱ्यासोबत झाडापासून दूर कुठेसे
बियांनी मुळे नवीन धरण्याचा
कधी येतो प्रश्न माझ्या मनात
होईल का पुन्हा तो रस्ता अरुंद?
गडद निळ्या रंगाची एखादीतरी
शोभेल का घरातली खोली वा भिंत?
समोरचा दिवा मग हिरवा होतो
अन गाड्यांचा ओंढा पुढे वाहतो
आरशात मुलांना हसताना पाहत
मीही आपली गाडी चालवू लागतो
सुरेश नायर
प्रतिक्रिया
4 Apr 2010 - 7:23 pm | shaileh vasudeo...
मस्त ! आवडले.
शैलु.
4 Apr 2010 - 7:39 pm | पाषाणभेद
एकदम मस्त. पुर्ण आस्वाद घेतला.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
21 Jun 2010 - 5:06 am | sur_nair
Father's Day निमित्त ही कविता पुन्हा वर आणण्याचा प्रयत्न करत आहे.