दुरावा!!
विमानतळावरचा आगमन लाऊंज माणसांनी अगदी फुलून गेला होता. नुकतीच मुंबईहून आलेली एअर इंडियाची फ्लाईट लागली होती. प्रवासी इमिग्रेशन, कस्टम्स आटोपून बंद दरवाजातून हळूहळू बाहेर येत होते. असेच एकदा दरवाजा ढकलून आजी आणि आजोबा बाहेर आले. आजोबा बॅगा लादलेली जड गाडी हळूहळू ढकलत होते. आजी संधिवातामुळे हळूहळू चालत होत्या. दोघांचेही चेहरे प्रवासाने दमलेले, किंचित बावरलेले. त्यांची ही पहिलीच विदेशवारी होती. भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती. इतक्यात आजोबांचा चेहरा फुलला,
"ती बघ, सुमा आलीय", ते आजींना म्हणाले.
आजींनी मान वर करून नजर स्थिर करेपर्यंत गर्दीतून वाट काढत सुमा त्यांच्यापर्यंत पोचलीच. हसतमुखाने तिने दोघांनाही मिठी मारली.
"दमलात ना! इथे बसा पाच मिनीटं, पाणी प्या."
पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर सुमाने सामानाची ढकलगाडी आपल्या ताब्यात घेतली.
"चला जाऊया! थोडं चालावं लागेल, गाडी समोरच्या पार्किंग लॉटमध्ये लावलीय", सुमा.
"अगं पण हे काय? जावई कुठायत?"
"तोच येणार होता तुम्हाला घ्यायला. पण त्याला ऐनवेळी महत्त्वाची मिटिंग लागली म्हणून मी आले."
पार्किंग लॉटमध्ये गाडीजवळ आल्यावर सुमाने बॅगा ट्रंकमध्ये टाकल्या, आजी-आजोबांना मागच्या सीटवर बसवलं आणि सराईतपणे ती ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली.
सायंकाळची वेळ होती. एअरपोर्ट मागे टाकून गाडी हायवेला लागली तशी सुमाच्या गप्पा सुरु झाल्या. आजीआजोबांच्या तब्येतीची चवकशी, इंडियातील इतर नातेवाईकांची चवकशी, मुंबईचं हवापाणी वगैरे वगैरे! आजीच प्रामुख्याने गप्पांत भाग घेत होत्या, आजोबा गप्प होते. विचारलेल्या प्रश्नांना एक-दोन शब्दांतच उत्तरं देत होते. त्यांची नजर गाडीतून बाहेर भिरभिरत होती. हायवे वरच्या बंदुकीच्या गोळ्यांसारख्या प्रचंड वेगाने जाण्यार्या वाहनांनी धास्तावत होती.
"काय हरामखोर जावई आहे आमचा! स्वतः यायचं सोडून हिला एकटीला या भयंकर रहदारीतून पाठवली. मला लग्नाआधीच याचं लक्षण कळलं होतं. मी सुमाला तसं म्हणालोही होतो पण कार्टी ऐकेल तर शपथ! ही प्रेमात पडली होती ना त्याच्या! आता भोगतेय आपल्या कर्माची फळं!" आजोबांच्या डोक्यात विचार गर्दी करत होते. त्यांनी एक-दोन वेळा सुमाला गाडीचा वेग कमी कर म्हणून सांगितलंही होतं. तिने अर्थातच त्याकडे काही न बोलता दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे त्यांचा संताप अजून वाढला होता. शेवटी ते चिडून काहितरी बोलणार इतक्यात सुमाने एक्झिट घेतला, गाडीचा वेग मंदावला.
"आता जवळ आलं आपलं घर", सुमा म्हणाली. आजोबांनी राग गिळला.
डौलदार वळण घेऊन गाडी एका बंगल्याच्या ड्राईव्हवे वर उभी राहिली. आजी-आजोबांनी पाहिलं, जावई दरवाजात उभे होते. आता जरा वयस्कर वाटत होते, केस जरा विरळ, कानशिलाशी किंचित पिकलेले, पोट जरासं सुटलेलं. त्यांच्या पायाला बिलगून एक लोकरीचा गुंडा उभा होता. कुतुहलाने या दोघा म्हातार्यांकडे पहात होता.
"या, या! प्रवासाचा खूप त्रास नाही ना झाला?" जावयांनी स्वागत केलं. गाडीतल्या बॅगा घरात आणून टाकल्या. सगळे आत घरात आले.
तो लोकरीचा गुंडा अजुनही या म्हातार्यांकडेच बघत होता.
"समीर, आजीआजोबांना नमस्कार कर!" सुमा म्हणाली. समीर तसाच उभा राहिला.
"अरे, दे आर युअर ग्रँडमा ऍन्ड ग्रँडपा!" जावई म्हणाले. त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
"असू दे!", आजीने त्याला जवळ घेतलं, "अरे किती मोठा झालास रे समीर! गेल्यावेळेला तुला मुंबईत पाहिला तेंव्हा दहा महिन्याचा होतास."
समीरला काही कळलं नाही पण आपलं कौतुक चाललंय हे समजलं. तो आजीच्या मांडीवर बसला.
"मी तुझी आजी आणि हे तुझे आजोबा! हे बघ आजोबांनी तुझ्यासाठी काय आणलंय!" आजीने एका बॅगेतून एक वस्तू काढली. आजोबांना आठवलं, जवळ जवळ वर्षभरापूर्वी पूर्वी ते आणि आजी एकदा अष्ट्विनायकाच्या यात्रेला गेले होते तेंव्हा त्यांनी एक लहानशी संगमरवरी गणपतीची मूर्ती विकत घेतली होती, समीरसाठी! छोट्या मुलासाठी अशी भेटवस्तू घेतल्याबद्दल आजींनी त्यांची थट्टाही केली होती. पण त्यांनी त्याकडे तेंव्हा दुर्लक्ष केलं होतं.
मूर्ती पाहिल्यावर समीरचा चेहरा फुलला. आजोबा आपल्या साडेचार वर्षांच्या नातवाकडे पहात होते.
"से थँक्यु, समीर!" जावई आपला ठेवणीतला आवाज काढत म्हणाले. आवाजातला फरक समीरने ओळखला.
थँक......यू..." एक एक अक्षर ओढत तो म्हणाला.
"नाऊ टेल देम युअर नेम"
"मनेम इज शमीऽऽऽऽऽ"
"डू यू नो हू वुई आर?" आजोबांनी प्रथमच त्याच्याच भाषेत संवाद करायचा प्रयत्न केला.
"युर ग्रँमा ऍन ग्रँफा" समीर म्हणाला आणि मूर्ती हातात घेऊन आत कुठेतरी पळून गेला.
थोडं पिठलंभात खाऊन झाल्यानंतर सुमाने आजीआजोबांना घर दाखवायला सुरवात केली. जावई जेवून त्यांच्या अभ्यासिकेत गेले होते. समीरही कुठे दिसत नव्हता. पुढलं अंगण, मागलं परसू आणि तळमजला बघूनच आजींचे पाय भरून आले.
"वरचा मजला उद्या बघू", सुमा समजूतदारपणे म्हणाली, "तुम्ही आता विश्रांती घ्या, दमला असाल इतक्या लांबच्या प्रवासाने. आईला संधिवात आहे, वर चढउतर सारखी करायला नको म्हणून तुमची व्यवस्था इथे तळमजल्यावरच्याच गेस्टरूममध्ये केली आहे, चालेल ना? शेजारीच बाथरूमही आहे आणि किचनही इथेच आहे. आमची बेडरूम वरती आहे. काही रात्री लागलं तर हे बटण दाबून हाक मारा, आम्हाला वर ऐकू येईल." सुमाने इंटरकॉमचं बटण दाखवलं.
"घरातल्या घरात फोन, काय एकेक थेरं आहेत", आजोबांचं विचारचक्र परत चालू झालं.
"अगं पण समीर कुठेय?" आजीने विचारलं
"तो झोपला त्याच्या खोलीत"
"इतक्या लहान मुलाला एकटा झोपवतां?" आजोबांचा प्रश्न
"इथे अशीच पद्धत आहे. हा तर साडेचार वर्षांचा आहे, इतर मुलांना तर एक वर्षापासून स्वतंत्र झोपवतात", सुमा
"अतिशहाणे आहांत", आजोबांचा राग, मनात.
गादीवर पडल्यावर आजोबांना झोप येईना. आजी पाच मिनिटातच झोपी गेल्या होत्या. आजोबा बिछान्यावर तळमळत विचार करत पडले होते. दिवसभरातले प्रसंग आठवत होते. कुठंतरी काहीतरी खटकत होतं. 'जावयांनी एअरपोर्टवर न येणं, सुमाचं भन्नाट ड्रायव्हिंग, इनमिन तीन माणसांसाठी असलेला तो बंगला. बंगला कसला प्रासाद! आजवर कुणाचं घर बघतांना कधी दमायला झालं नव्हतं!! ज्या नातवाला बघायला आलो त्याचं तुटक बोलणं. समीरने आपल्या पाया पडावं अशी त्यांची जुनाट अपेक्षा नव्हती पण आजोबांच्या जवळ येऊन पापा द्यायला काय हरकत होती? आता त्याला वेगळ्या खोलीत झोपवतात म्हणे. काय त्याची भाषा आणि काय त्याचे उच्चार! त्याच्यात भारतीय काहीच नाही, पूर्ण अमेरिकन झाला आहे. हेच बघायला आलो का आपण! छे, झक मारली आणि आपण बायकोचं ऐकलं. इथे आलो हेच चुकलं!!'
विचारांच्या चक्रात कधीतरी त्यांना झोप लागली. जाग आली तेंव्हा पहाट झाली होती. खिडकीतून बाहेर पाहिलं तर नुकतच उजाडत होतं. भिंतीवरच्या घड्याळात सहा वाजत होते. त्यांनी आजींकडे नजर टाकली. त्या गाढ झोपेत होत्या.
"झोपू दे, दमली असेल" असा विचार करून ते हळूच बाथरूमकडे गेले. दिवा लावल्यावर तिथला झगझगाट पाहून एकदम अवघडले.
"गरज काय इतका उजेड करायची? वीज किती खर्च होते? आम्हाला काय आमचे अवयव कुठे आहेत ते माहित नाही?" रात्रीचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले. कसेबसे प्रातर्विधी आटोपून ते दिवाणखान्यात आले. घरात सगळीकडे सामसूम होती. भलीमोठी खिडकी समोर असलेल्या एका सोफ्यावर जाऊन बसले. बाहेर सकाळ होत होती. रात्री थोडा पाऊस पडून गेला असावा. बाहेर एक काळशार रस्ता दूरवर जात होता. रस्त्याच्या दोन्ही कडांना झाडं होती, त्यामागे ओळीत मांडल्यासारखी घरं! पण एक गोष्ट विचित्र होती. उजाडलं तरी त्या रस्त्यावर एकही चिटपाखरूही नव्हतं. काही तासांपूर्वीच मुंबईच्या कोलाहलातून आलेल्या आजोबांना ती शांतता सहन होईना. बातम्या तरी बघाव्यात म्हणून ते टीव्हीकडे वळले पण तो अजस्त्र साठ इंची टिव्ही पाहिल्यावर त्याचे तंत्र आपल्याला जमणारे नाही याची खात्री पटून ते अजूनच वैतागले. शेवटी परत जाऊन ते सोफ्यावर बसले आणि डोळे मिटून आपले प्रातःस्तोत्र पुट्पुटू लागले.
असा किती वेळ गेला कोण जाणे. अचानक धड धड धड असा आवाज ऐकू आल्याने आजोबा भानावर आले. डोळे उघडून त्यांनी पाठीमागे वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. समीर त्याच्या खोलीतून धावत कुठेतरी निघून गेला. आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्तोत्राकडे मन केन्द्रित केलं. पुन्हा काही वेळाने धडधड आवाज आला. समीर कुठुनतरी परत आला होता. त्याच्या ओंजळीत काहीतरी होतं.
वैतागलेल्या आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते खिडकीबाहेर नजर लावून बसले. त्यांचा राग आता शिगेला पोचला होता. या कार्ट्याच्या एक ठेवून द्यावी असं त्यांना वाटत होतं. भारतात असते तर त्यांनी ते केलंही असतं. पण इथे अमेरिकेत त्यांनी कसंबसं स्वतःला आवरलं आणि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावली.
यावेळी समीर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत न जाता देवघरात घुसला होता. हा तिथे काय गोंधळ घालतोय हे न कळून आजोबा थोड्याशा अनिच्छेनेच त्याच्या मागोमाग गेले. आणि त्यांनी पाहिले....
देवघरातल्या चौरंगावर त्यांनी कालच दिलेली गजाननाची संगमरवरी मूर्ती ठेवेलेली होती. त्यावर समीरने नुकतीच बॅकयार्डमधून तोडून आणलेली फुले वाहीलेली होती. समीर त्यांच्याकडे पाठमोरा होउन उभा होता. हात जोडलेले, डोळे मिटलेले...
तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं...
"प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला,
अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला,
चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...."
आजोबा विस्फारलेल्या डोळ्यांनी तल्लीन झालेल्या त्या एव्हढीशी चड्डी घातलेल्या, गबदुल, पिटुकल्या ध्यानाकडे पहात राहिले.....
आणि पुढच्याच क्षणी त्यांनी गहिवरून धावत जाऊन नातवाला पोटाशी घेतले......
तो सुद्धा त्यांच्या कुशीत तोंड खुपसून त्यांना बिलगला......
कसला एव्हढा मोठा आवाज झाला म्हणून सुमा व जावई देवघराच्या दारात जमा झाले होते. पण आजोबांना त्याची पर्वा नव्हती....
आजोबांचे डोळे पाझरत होते.....
आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते....
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
स्पष्टीकरण : ही कथा यापूर्वी प्रस्तुत लेखकाच्या वैयक्तिक संकेतस्थळावर (ब्लॉग) प्रसिद्ध केली आहे. अर्थात मिपा सोडून आम्ही इतरत्र कुठल्याही सार्वजनिक स्थळावर लिहीत नाही. त्यामुळे ती प्रथम सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्याचा मान मिपाचाच!!
काही चुका असतील त गोड मानून घ्या!!
आपला,
पिवळा डांबिस
प्रतिक्रिया
19 Apr 2008 - 9:14 am | प्रमोद देव
अतिशय हृद्य वळण!
वातावरण निर्मिती अतिशय प्रभावी आणि झटका देखिल तितकाच प्रभावी.
जोरका झटका धीरेसे लगे.... सारखी अवस्था झाली.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
19 Apr 2008 - 9:49 am | धनंजय
हृद्य वळण +१
(आईवडलांना/आजीआजोबांना असे अवघडल्यासारखे होते, राग येतो, अशा कथा खूप लोकांकडून ऐकल्या आहेत.)
19 Apr 2008 - 11:22 am | नंदन
म्हणतो, प्रमोदकाकांशी सहमत. बाकी तुमच्या ब्लॉगचा पत्ता द्या की. वाचायला नक्कीच आवडेल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Apr 2008 - 9:41 am | विसोबा खेचर
आजोबांचे डोळे पाझरत होते.....
आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते....
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
क्या बात है डांबिसा! सुरेख कथा...!
अतिशय हृद्य वळण!
प्रमोदकाकांनी अतिशय योग्य शब्द वापरले आहेत!
अर्थात मिपा सोडून आम्ही इतरत्र कुठल्याही सार्वजनिक स्थळावर लिहीत नाही. त्यामुळे ती प्रथम सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्याचा मान मिपाचाच!!
अरे भाई, ये तो मिपाका सौभाग्य है! ;)
काही चुका असतील त गोड मानून घ्या!!
अरे मेल्या डाम्बिसा, चुका कसल्या? उत्तम लिहिलं आहेस!
औरभी लिख्खो...
आपला,
("प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला" हे वाचून त्या आजोबांइतकाच क्षणात हळवा झालेला!) तात्या.
19 Apr 2008 - 9:56 am | नीलकांत
आजोबांचे डोळे पाझरत होते.....
आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते....
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
खुप आवडलं हो... असंच येऊ द्या.
नीलकांत
19 Apr 2008 - 10:06 am | मदनबाण
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
व्वा..... जबरदस्तच !!!!!
(हिंदूस्थान प्रेमी)
मदनबाण
19 Apr 2008 - 10:37 am | इनोबा म्हणे
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
क्या बात है...डांबीसकाका.
कोण रे तो? डांबीसकाका वैचारीक लेखन करत नाही म्हणत होता... आणा त्याला समोर :)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
20 Apr 2008 - 8:49 pm | छोटा डॉन
आम्ही काय तुम्हाला उगाच आमचा "काका" मानतो काय ?
जबरदस्त .... लाजवाब .... ह्रुदयस्पर्शी .... तडाखेबाज !!!
बाकी विन्याच्या मताशी सहमत ...
अवांतर : आपल्या ब्लॉगचा पत्ता द्यावा ....
काय काय लिहले आहे ते वाचायची उत्सुकता आहे ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
19 Apr 2008 - 10:45 am | विद्याधर३१
म्हटल्यवर पुर्वी पिवळे सोनेरी द्रव्य आठवायचे....
आता वेगळ्या विषयावरचा ह लेख वाचून खूप छान वाटले.
विद्याधर
19 Apr 2008 - 11:04 am | प्राजु
आमच्या घरातलाच प्रसंग आहे असं वाटतंय . अमेरिकेतलं पोर म्हणजे त्याला देवाचे श्लोक किंवा आपल्या संस्कृतीशी काही ही देणंघेणं नाही असा एक समजच असतो भारतात राहणार्या नातेवाईकांचा.
आणि जेव्हा हीच अमेरिकेतली मुलं त्यांच्या अमेरिकन ऍसेंट मध्ये इंग्लिशमध्ये संवाद साधण्या बरोबरच , श्लोक म्हणतात, संस्कृती जपताना दिसतात तेव्हा एकतर अति कौतुक होतं किंवा तोंडात बोट घालण्याची वेळ येते.
पण असा गैरसमज करून घेण्यापूर्वी या नातेवाईकांनी स्वत:च विचार करावा की या मुलांना जन्म देणारे आई-बाप ही आपलीच मुलं आहेत.. आणि आपण त्यांच्यावरजे काय संस्कार केले तेच संस्कार ते त्यांच्यामुलांवरही नक्कीच करणार.. शेवटी जसं पेरावं तसचं उगवतं..
लेख आवडला हे सांगने न लागे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Apr 2008 - 11:42 am | स्वाती दिनेश
अतिशय हृद्य वळण!
प्रमोदकाकांशी एकदम सहमत,
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
वा..
गोष्ट आवडली.
स्वाती
19 Apr 2008 - 11:55 am | अनामिका
डांबिस!
अप्रतिम!.....................
या शिवाय दुसरा शब्द मला तरी सापडला नाही.
माझ्याच आयुष्यात घडलेला प्रसंग कुणीतरी शब्दबद्ध केलाय असेच वाटले .
फक्त स्थळाच फरक आहे इतकच्.परदेशात न घडता देशात घडलाय एव्हढाच काय तो फरक म्हणायचा..
आजोबांचे डोळे पाझरत होते.....
आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते....
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
वाचताना क्षणभर माझे देखिल डोळे पाझरले.
(किशोरदांच्या गाण्यातली)
"अनामिका"
19 Apr 2008 - 12:26 pm | जयवी
पिवळा डँबिस...... अहो काय सुंदर उतारलीये कथा !!
ते बोबड्या शब्दातलं "प्रालंबी विनती.." ऐकून पाणीच आलं डोळ्यात...... एकदम आतपर्यंत पोचली तुमची कथा.
19 Apr 2008 - 2:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डांबिसा,
मस्त उतरली कथा.
तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं...
"प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला,
अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला,
चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...."
काय लिहावे इथे, अप्रतिम प्रसंग, इथे आम्हीही जरा हळवे झालो ..............!!!
>>पायाला बिलगून एक लोकरीचा गुंडा उभा होता.
मस्त शब्दप्रयोग गोबर्यागुब-यासाठी !!!
अवांतर :) आपली वाटचाल पाहिल्यानंतर आपल्याकडून इतके सुंदर लेखन घडू शकते, या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही .
( ह. घ्या )
आपला,
डबल बॅरलवाला (उत्पल दत्त )
20 Apr 2008 - 9:03 pm | चित्रा
सुरेख कथा. खूप आवडली.
19 Apr 2008 - 3:56 pm | भडकमकर मास्तर
पिडाकाका,
बेष्ट.... नेमके प्रसंग आणि नेमक्या भावना पकडल्या आहेत ( उगीच मेलोड्रामा टाळलात ते फार बरे केलेत.... कारण त्याची फार भीती वाटते आम्हाला)...
19 Apr 2008 - 4:08 pm | ऋषिकेश
बंदुकींच्या गोळ्यांसारख्या गाड्या आणि लोकरीचा गुंडा हे शब्द प्रयोग प्रचंड आवडले!!!!
तुमच्या लेखनाला सलाम!
आणि शेवटचं वळण तर अतिशय भारी!!! कथा फार म्हणजे फारच आवडली.. खुप सुंदर!! आणखी काय लिहू..
अजून अश्या कथा वाचायला नक्की आवडतील
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 Apr 2008 - 4:52 pm | अभिज्ञ
अप्रतिमच.........
फार म्हणजे फारच सुरेख.
ह्रिदयाला भिडणारी कथा.अतिशय हृद्य .....
डांबिसकाका तुमचा हा लेख "नंबर वन "च.
+++१.
(भावनिक झालेला) अबब.
20 Apr 2008 - 2:33 am | शितल
दुरावा, हा एकमेका॑न पासुन भिन्न सा॑स्क्रुतीक देशात राहिल्यामुळे वर वर वाटणारा आहे, पण आजी- आजोबा॑चे प्रेम हे नातव्॑डावर कधीही जास्तच असते. माझ्या सासर्या॑ना तर नातु बरोबर असला की कशाची ही तमा नसते. आम्ही यु. एस.ला येताना त्या॑चे डोळ्याचे पाणी काही था॑बता था॑बत नव्ह्ते.
लेख खुप छानच आहे.
20 Apr 2008 - 9:59 pm | स्वाती राजेश
कथा अगदी मनाला भिडते.
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
खासच..
20 Apr 2008 - 10:20 pm | संजय अभ्यंकर
डांबिसराव, फार सुंदर लेखन!
कृपया आपल्या ब्लॉगचा पत्ता मिळु शकेल काय?
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
21 Apr 2008 - 5:59 am | चतुरंग
एकदम सुंदर!
दुराव्याच्या भिंती ह्या प्रथम मनात असतात आणि आपण ठरवलं तर त्या प्रत्यक्षात येत नाहीत हे खरं.
लहान मुले ही दोन पिढ्यातला दुवा असतात हे पक्कं माहीत असूनही मोठी माणसे त्यांच्याकडून का बरं लवकर काही शिकत नाहीत?
चतुरंग
21 Apr 2008 - 10:18 am | धमाल मुलगा
यू टूsssssssssss?
मस्त! एव्हढं छान लिहिता, तर मग येऊन नुसते गपचूप का हो बसता, आणि फक्त प्रतिक्रिया टाकता?
लिहा ना अजुन....आवडलं आपल्याला! एकदम बढियाँ !!!!!!!!
कसं एकदम 'रिऍलिस्टिक' वाटलं.
:-) उग्गाचच एक चिटुकलं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं... अर्थ...संदर्भ काहीही नसेल कदाचित...पण ते चार साडेचार वर्षांचं पिल्लू सोवळ्याची चड्डी घालून देवघरात एकटंच तल्लीन झालेलं नजरेसमोर तरळलं.
आता तिथे अमेरिकेत एव्हढ्या थंडी-गारठ्यात कोण सोवळ्याची चड्डी नेसणार असं नका बॉ विचारू!
जियो डांबिसकाका...मस्त लेख, आणखी येऊद्या!
आपला,
- (शमीss) ध मा ल.
21 Apr 2008 - 10:55 am | आनंदयात्री
एकदम प्रगल्भ ललित लेखन काका, खरच आवडले, अशाच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणार्या कथा तुमच्या शैलीत वाचायला आवडतील.
21 Apr 2008 - 10:36 am | मनस्वी
21 Apr 2008 - 8:08 pm | वरदा
शब्दच नाहीत्...अप्रतिम कथा...डोळ्यात पाणी आलं वाचताना....
23 Apr 2008 - 6:56 am | पिवळा डांबिस
मंडळी,
ज्या आपुलकीने आणि उत्साहाने माझ्या या कथेचं तुम्ही स्वागत केलंत ते पाहून मी अवाक झालो आहे. तुमचे आभार मानायला खरोखरच माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. आपल्या मिपावरच्याच एका जेष्ट आणि मला आदरणीय असलेल्या सभासदाकडून आग्रह झाला म्हणून मी भीतभीतच ही कथा इथे प्रकाशित केली. तिला असा प्रतिसाद मिळेल अशी बापजन्मीही कल्पना केली नव्हती. उलट मला वाटलं होतं की आता मेंबरं बहुतेक, "काय हा बेवडा डांबिस वेड्यासारखं लिहितोय" असं म्हणून तुटून पडतील व लिखाण झोडून काढतील!!:)) पण मिळालेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलोय.
तर मग येऊन नुसते गपचूप का हो बसता, आणि फक्त प्रतिक्रिया टाकता?...
कोण रे तो? डांबीसकाका वैचारीक लेखन करत नाही म्हणत होता...
धमाल्या, इनोबा, अगदी खरं आहे तुमचं! मिपावर येण्यामध्ये इथे लेखन करण्याचा माझा हेतू कधी नव्हता/नाहीच. कट्ट्यावर बसल्यागत इथे बसावं, टारगट्पणा-थट्टामस्करी करावी, इतरांकडून टोपी उडवून घ्यावी याच निखळ हेतूने इथलं सभासदत्व घेतलं होतं/ आहे. आमच्या प्रतिक्रियांमध्ये विद्वत्ता शोधून पहा, मिळणार नाही!!:)) अहो तसं लेखन करून लोकांचा अंत बघायचा असता तर "पिवळा डांबिस" हे नांव कशाला घेतलं असतं?:))
आम्ही काय तुम्हाला उगाच आमचा "काका" मानतो काय ?
हा तुमचा मोठेपणा आहे छोटा डॉनसाब! आम्ही तुमचं लिखाण वाचलं आहे. जबरा सरस आहे!!!
आपली वाटचाल पाहिल्यानंतर आपल्याकडून लेखन घडू शकते, या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही .
एकदम राखी सावंतने पांढरी साडी नेसून "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" आळवायला सुरवात केल्यासारखं वाटलं असेल नाही!!:)))) त्याचं असं आहे दिलीपराव, अहो आपण उगाचच माणसाच्या लिहिण्या-बोलण्यावरून त्याच्या व्यक्तिमत्वाबाबतीत कल्पना मांडतो. अहो एका माणसामध्ये देखील वेगवेगळी रूपे नांदत असतात. आणि इथे तर पिवळा डांबिस ही एक पूर्णपणे टोपणनांवी व्यक्तिरेखा!!:))) आमच्याबद्द्ल म्हणाल तर आम्हाला आमचे मानसगुरू कविवर्य बाकीबाब बोरकरांनी केलेले वर्णन यथार्थ लागू पडते,
"रसलंपट मी, तरीमज अवचित गोसावीपण भेटे"
अहो एका हातात स्कॉचचा ग्लास आणि दुसर्या हातात तळलेल्या कोलंबीची डिश घेऊन बसणाराही पिवळा डांबिसच असतो आणि आपल्या अभ्यासिकेत बसून उत्तररात्री बोरकरांच्याच,
"रात्री समईशी वाचावी, ज्ञानेशाची अमृतओवी,
कविता-स्नेहे वात जळावी, उजळीत मनाचा द्वैतपणा"
या काव्यपंक्तींवर जीव ओवाळून टाकणाराही पिवळा डांबिसच असतो.....
आणि कधीकधी या दोन्ही क्रिया तो मल्टायटास्क सुद्धा करतो!:))
आता तिथे अमेरिकेत एव्हढ्या थंडी-गारठ्यात कोण सोवळ्याची चड्डी नेसणार असं नका बॉ विचारू!
अरे गैरसमज आहे तुझा धमाल्या!! इथे बाहेर थंडी असली तरी घरांना आतून हीटर्स असतात. माझा मुलगा लहान असतांना अस्साच टिचभर चड्डी घालून बागडायचा!! किंबहुना अजूनही त्याला (आणि त्याच्या बापाला!!) अंगभर कपडे घालायला भाग पाडणे हे त्याच्या आईपुढलं दैनिक आव्हान असतं!!!:))))))
तर मंडळी, असाच लोभ ठेवा!!
आपला,
पिवळा डांबिस
23 Apr 2008 - 8:17 am | विसोबा खेचर
कट्ट्यावर बसल्यागत इथे बसावं, टारगट्पणा-थट्टामस्करी करावी, इतरांकडून टोपी उडवून घ्यावी याच निखळ हेतूने इथलं सभासदत्व घेतलं होतं/ आहे.
असाच विचार जर प्रत्येकाने केला असता तर तुझ्या इतक्या छान कथेला इतके उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले असते का हा विचार कर डांबिसा!
टारगटपणा-थट्टामस्करी-टोपी उडावाउडवी तर अवश्य करावीच, परंतु त्याचसोबत कुणी काही चांगलं लिहिलं असेल तर त्याला मनमोकळी दाद देण्याचीही मिपाकरांची पद्धत आहे हे तू लक्षात घ्यावंस डांबिसा..!
तात्या.
23 Apr 2008 - 11:54 am | विजुभाऊ
डांबीस काका तुमचा लेख आणि तुमचे मिपाकरांना निवेदन एकदम निखळ मनाला डायरेक्ट हात घालतं.
खूप दिवसानी असं भिडणारे काहीतरी वाचायला मिळाले
तुम्ही असेच लिहिते रहा. ही इच्छा मी तुमच्या वाढदिवशी सुद्धा व्यक्त करेन
:::आपला लेख वाचुन काहीतरी शब्दात न मावण्यासारखा वाटलेला विजुभाऊ