विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच, 'काळ ही चौथी मिती आहे आणि ती सापेक्ष आहे' असे धक्कादायक प्रतिपादन करुन संपूर्ण जगाला हादरविणार्या महान वैज्ञानिकाचे, अल्बर्ट आईनस्टाइनचे १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन इस्पितळात निधन झाले आणि वैज्ञानिक जगतातला एक महान तारा चौथ्या मितीतून लुप्त झाला!
तो एक महान शास्त्रज्ञ तर होताच पण त्याबरोबरच तो मानवी आयुष्याचा साक्षेपाने वेध घेणारा विचारवंत, माणसाचे अस्तित्व नक्की कशासाठी आहे ह्याचा शोध घेणारा तत्वज्ञ, एक सहृदय मानवतावादीही होता.
शास्त्रातल्या अनेकविध शोधांप्रमाणेच विचारांचेही अनेक मौलिक स्फटिक त्याने त्याच्या आयुष्यात वेचले. "क्वोटेबल आईनस्टाइन" ह्या पुस्तकात त्याची अनेक अवतरणे संग्रहित करुन दिलेली आहेत. फारच वाचनीय आणि चिंतनीय अशा प्रकारचे हे लिखाण आहे. कित्येक अवतरणामधून तर त्याला असलेल्या विनोदाच्या उत्तम जाणिवेचं आपल्याला आकलन होतं आणि आपण चकित होतो!
एके ठिकाणी तो म्हणतो "तरुण असताना मला एकच गोष्ट आयुष्यात हवीशी वाटे ती म्हणजे, लोकांनी माझ्याकडे लक्ष देऊ नये, एखाद्या शांत कोपर्यात मी माझे काम विनाअडथळा करीत बसलेलो आहे. आणि आता इतक्या वर्षांनी माझे काय झाले आहे ते पहा!" ह्यातली खोच लक्षात घेतलीत की आपण डोलतो.
तो एक उत्तम व्हायोलिनवादकही होता. सॅटरडे ईवनिंग पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणून गेलाय "जर मी भौतिकशास्त्रज्ञ झालो नसतो तर मी बहुदा संगीतकार झालो असतो. मी बहुतेक वेळा संगीतातून माझे विचार करतो. माझी दिवास्वप्ने हे एक संगीतच असते. माझे आयुष्यच मी संगीताच्या स्वरुपात बघतो..मला माझ्या आयुष्यात खूप मोठा आनंद संगीतातून मिळतो."
अंतःप्रेरणेच्या अगम्य खेळातून विश्वाची वेगवेगळी रहस्ये उकलण्याची ताकद त्याला अशाप्रकारे संगीतातूनच मिळत असावी काय?
(गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने प्रकाशात होणार्या वक्रीभवनाचा त्याचा सिध्दांत खरा ठरला त्यावेळी त्याचा अमेरिकेत उदोउदो झाला. त्यावेळी तो म्हणाला होता "मी बरोबर आहे म्हणून आज ते मला अमेरिकन म्हणताहेत. जर मी चुकलो असतो तर ते मला जर्मन म्हणाले असते आणि जर्मनांनी हिणवलं असतं की हा तर ज्यू आहे!")
प्रिंस्टन विद्यापीठात त्याने काही काळ अध्यापन आणि संशोधनाचे काम केले. मी तिथे जाऊन त्याच्या काम करण्याच्या जागेचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आलोय. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार तिथे कोणतंही स्मारक वगैरे केलेलं नाही. त्याची खोली सध्याचे प्रोफेसर वापरत असतात. तिथे फक्त त्याच्या नावाची एक पाटी आहे. मला त्याजागी उगीचच भारल्यासारखं वाटलं. मनात विचार येऊन गेला की ह्याच खोलीत बसून परमतत्वाच्या त्या अंशानं जगाची काही कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. मानवाच्या कल्याणाबद्दल मौलिक विचार केला असेल.
मानवजातीबद्दल तो म्हणतो. "किरणोत्सारी पदार्थांचे गुणधर्म एकवेळ बदलता येतील पण मानवाच्या मधला आसुरशक्तीचा अंश काढून टाकणं महाकठिण!"
आज आपण त्याच प्रत्यंतर जगात ठायीठायी बघतो आहोत. तेव्हा आपल्यातली आसुरशक्ती थोडी का होईना कमी करणे हीच त्याला वंदना ठरेल.
चतुरंग
(ताजा कलम - उपरोल्लेखित तिरप्या अक्षरात दिलेल्या अवतरणात बदल - सामान्य सापेक्षता सिध्दांत मांडल्यानंतर फ्रान्समधे बोलताना तो म्हणाला होता "माझा सिध्दांत बरोबर आला तर जर्मन मला त्यांचा नागरिक म्हणतील. फ्रान्स घोषित करेल की मी जगाचा नागरिक आहे. आणि मी चुकलो तर फ्रेंच म्हणतील की मी जर्मन आहे आणि जर्मन्स म्हणतील की हा तर ज्यू!")
आधी दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल क्षमस्व.
प्रतिक्रिया
18 Apr 2008 - 11:15 am | नीलकांत
या नवीन युगाच्या महान शास्त्रज्ञाला माझे अभिवादन.
नीलकांत
18 Apr 2008 - 11:21 am | आनंदयात्री
म्हणतो. माझे पण अभिवादन, असे शास्त्रज्ञ झाले नसते तर आज फार वेगळे असले असते.
18 Apr 2008 - 11:23 am | मनस्वी
या महान वैज्ञानिकाला माझा प्रणाम.
आईनस्टाइनची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चतुरंग. बर्याच नवीन गोष्टी माहित झाल्या.
18 Apr 2008 - 11:34 am | मदनबाण
मानवजातीबद्दल तो म्हणतो. "किरणोत्सारी पदार्थांचे गुणधर्म एकवेळ बदलता येतील पण मानवाच्या मधला आसुरशक्तीचा अंश काढून टाकणं महाकठिण!"
१००% सत्य बोलला आहे हा शास्त्रज्ञ.....
(महर्षि कणाद प्रेमी)
मदनबाण
18 Apr 2008 - 11:40 am | स्वाती दिनेश
मी तिथे जाऊन त्याच्या काम करण्याच्या जागेचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आलोय. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार तिथे कोणतंही स्मारक वगैरे केलेलं नाही. त्याची खोली सध्याचे प्रोफेसर वापरत असतात. तिथे फक्त त्याच्या नावाची एक पाटी आहे. मला त्याजागी उगीचच भारल्यासारखं वाटलं.
हीच तर तीर्थक्षेत्रे!
आइनस्टाईनवरचा लेख आवडला हे वेसांनल.
स्वाती
18 Apr 2008 - 2:55 pm | विसोबा खेचर
थोडक्यात परंतु छान लिहिलं आहेस रे रंगा!
आईन्स्टाईनसाहेबांना माझाही सलाम!
तात्या.
18 Apr 2008 - 6:33 pm | सुवर्णमयी
लेख आवडला.
धन्यवाद
18 Apr 2008 - 6:45 pm | व्यंकट
म्हणतो.
व्यंकट
18 Apr 2008 - 7:16 pm | विकास
चांगला लेख आणि माहीती. प्रिन्स्टन विद्यापिठात जाऊन ती खोली आवर्जून पाहील्याचे वाचून चांगले वाटले.
18 Apr 2008 - 7:32 pm | मैत्र
धन्यवाद! अशी वेगळी माहिती इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्याबद्द्ल... अशा महान लोकांमुळे जग बदललं पण त्याने लिहील्याप्रमाणे वृत्ती बदलणं शक्य नाही... सापेक्षतावाद सोडला तर हे चांगले विचार सामान्य लोकांपर्यंत पोचत नाहीत..
त्यासाठी पुन्हा एकदा भार...
18 Apr 2008 - 10:33 pm | धनंजय
भौतिकाच्या अभ्यासाचे तत्त्वज्ञान बदलणार्या गुरूला प्रणाम.
जगात शांततेसाठी झटणार्याला प्रणाम.
आइनस्टाईनच्या दोन आवडत्या व्हायोलिन गाण्यांची यूट्यूब फीत.
http://www.youtube.com/watch?v=JpkIKYfwkkg
19 Apr 2008 - 12:03 am | चतुरंग
ऐकून वाचून धन्य झालो. दुव्याबद्दल दुवा धनंजय!:)
चतुरंग
18 Apr 2008 - 10:36 pm | ऋषिकेश
हीच तर तीर्थक्षेत्रे!
काय बोललात चतुरंगराव! खूपच सुंदर लेख!
आईनस्टाईन यांना सलाम!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
18 Apr 2008 - 11:31 pm | भाग्यश्री
मागच्याच आठ्वड्यात आईनस्टाईनची बायोग्रफी आणली होती.. व्हायोलिनबद्दल वाचून मजा वाटली होती मला.. माझ्या दुर्दैवाने मी त्या पुस्तकामधलं फिजिक्स फार काळ सहन नाही करू शकले, म्हणून अर्धवट सोडुन दिले पुस्तक.. आता हळहळ वाटतीय.. असो..
लेख मस्तच लिहीलाय... प्रिंस्टन विद्यापिठातली ती खोली अजुन प्राध्यापक वापरतात हे भारीच.. काय वाटत असेल ना त्या लोकांना.. :)
20 Apr 2008 - 11:16 am | सुधीर कांदळकर
पेटंटच्या कार्यालयातील कारकून हा. सरकारी खात्यातील नीरस वातावरणांत देखील याची स्वप्ने पाहाण्याची वृत्ती जिवंत राहिली. सापेक्षतावादाची कल्पना सुचल्यावर हा कमालीचा बेचैन झाला. कारण त्याला याचे गणिती स्पष्टिकरण पाहिजे जर्मन शास्त्रज्ञ गॉस (की मॅक्सवेल? नक्की आठवत नाही) याने त्याला मदत केली व एकदाचा याने पेपर लिहिला. ही हकीकत मनोज्ञ आहे.
याला शाळेतून हाकलले होते. क? तर याने शिक्षिकेला विचारले की आपण जर प्रकाशाच्या वेगाने प्रवास करीत असलो तर आपल्याला बाजूने जाणारी प्रकाशशलाका कशी दिसेल?
परंतु तारे जमी पे या चित्रपटात म्हटल्याप्रमाणे याला डिसलेक्सिया होता असे माझ्या वाचनात नाही.
सुधीर कांदळकर.
21 Apr 2008 - 12:31 am | भाग्यश्री
डिसलेक्सीया नव्हता.. पण भाषा या प्रकारात फार इंतरेस्ट किंवा गती नव्हती असे मी वाचले..
शिवाय त्याला शाळेतून काढून टाकले होते वगैरे ऐकिवात होते ते सुद्धा चुकीचे आहे असं वाटते.. त्याला लष्करी शिस्तीची शाळा आवडत नव्हती व ठराविक वय झाल्यावर लष्करात भरती व्हावे लागत असे, त्यामुळे त्याने ती शाळा सोडली.. व दुसर्या राज्यातल्या शाळेत गेला..
21 Apr 2008 - 5:11 am | चतुरंग
डिस्लेक्शिया किंवा लर्निंग डिफिकल्टी नव्हती. शाळेतून काढल्याचे वगैरे ऐकिवात नाही. विषयाची मूलतत्त्वे समजून न घेता फक्त पाठांतरावर जोर देणार्या शिक्षणाचा मात्र त्याला तिटकारा होता.
(अवांतर - अरेरे, कसे होणार आपल्याकडील १० वी आणि १२ वीच्या मेरिट लिस्टमधे येण्यासाठी मुलांना इतके क्लासेस लावणार्यांचे;))
गणित आणि भौतिकीमध्ये उत्तम गुण मिळवूनही 'फेडरल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', झूरिक, ह्यांची प्रवेशपरीक्षा मात्र तो उत्तीर्ण होऊ शकला नव्हता!
तुम्ही म्हणता आहात तो प्रकाशकिरणाच्या बरोबर प्रवास करण्याचा 'वैचारिक प्रयोग' (थॉट एक्सपेरिमेंट) त्याने वयाच्या १६ व्या वर्षी केला - ज्यातून त्याला सापेक्षतावादाकडे जाता आले.
चतुरंग
20 Apr 2008 - 11:18 am | सुधीर कांदळकर
थोर व्यक्तीचे स्मरण करून दिल्याबद्दल चतुरंग्जींना धन्यवाद.
सुधीर कांदळकर.
20 Apr 2008 - 11:26 am | प्रमोद देव
आईन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला... ह्यापलीकडे मला फारसे काही माहीत नव्हते. (बिच्चारा आस्टा)
चतुरंगांच्या लेखनामुळे थोडी ज्ञानात भर पडली. हा लेख योग्य प्रसंगी लिहिल्यामुळे औचित्यही साधले गेले आहे असे वाटते.
ह्या थोर शास्त्रज्ञाला माझी विनम्र आदरांजली.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
20 Apr 2008 - 10:14 pm | स्वाती राजेश
थोडक्यात छान लेख लिहिला आहे.