"आरं दोस्तांना सांगायचं न्हाई तर कुनाला रं? दोस्तच तर मदतीला येत्यात न्हवं का? क्काय?" आज्या सुतार शेवटचा क्काय भैर्याच्या मांडीवर थाप मारत म्हणाला..
-------------------------------------------------------------------------------------------
मांडीवर थाप पडलेली पाहुन भैर्यानं टप्पू द्यायला हात उचलला तसं आज्या मास्तराकडं सरकुन सुरक्षित अंतरावर जाऊन बसला.
जन्या लव्हार पुन्हा धायगुड्याला ढोसत म्हणाला, "आरं आता बोल की मर्दा, का नव्या नवरीगत आढंयेढं घ्येतुयास.."
तसं बंड्यानं आधी एक उसासा टाकला आन घसा खाकरला. बोलु की नाही अशा विचारात जरा रेंगाळुन म्हणाला, "काय सांगायचं दोस्ताहो, आबाळच फाटलंया तितं कुटंकुटं शिवायचं ह्याचा इच्चार करत व्हतु"
आसं म्हणल्याबरोबर भैर्यानं बसल्याजागी जरा बुड सरकवुन, पाय पसरुन ऐसपैस बसुन घ्येतलं आन धोतराचा सोगा तोंडावर घेत म्हणाला, "हां..नटसम्राट, आता करा सुरु!"
"आपली शेवंता, परवाच्याला तिच्या सासुरवाडीस्नं सांगावा आला व्हता, तसं आज तिला बाळंतपनासाटी घरला घिऊन आलो. आता भैनीच्या सासुरवाडीला जायाचं म्हंजे काय रिकाम्या हातानं जाता येतं का? मंग सगळ्यांचा मानपान घ्यायला कालच तालुक्याला जाऊन आलो! काय म्हागाई तिच्यायला...ह्या मुख्यमंत्र्याच्या मायला.....हज्जारभराचा पार खुर्दा उडला गड्याहो." बंड्या तंबाखु मळत बोलता झाला.
"आरं बाबा, आता रीतभात कुनाला चुकलीय का? करावंच लागतं की त्येवडं." भुरकेमास्तरानं समजावलं.
"व्हय की जी, पर मास्तर, आपली परस्तिती काय, किती करायचं? तालुक्यास्नं येतायेता हैबत्याचा रस्त्यात पाय मुरगाळला, दारात जू उतरस्तवर बगतो तर हैबत्या-शिरमंत्या दोन्ही बैलांचं खांदं आल्यालं! आता उद्याच्याला गाडीची कायतर सोय बघाय पायजे म्हनुन फिरलो तवा धर्माप्पानं त्याची बैलं दिली आजच्यापावती, त्ये बी दिडशे रुप्पय भाडं लावुन.."
तान्याचा धर्माप्पावर जुना राग. ते करवदुन बोललं,"आयला ह्या धर्म्याच्या! सुक्कळीचं, कुनाच्या मयताला बी फुकटात चार पावलं टाकाया यायचं न्हाई!"
"तु गप रं तान्या, आरं बंड्या आता मुद्द्याव येतु का दिऊ दोन दनकं तुला?" भैर्या आता कावला!
"आन काय रं, तिकडं काय कोन वाकडंवंगाळ बोललं का तुला? सांग फकस्त, आपुन येकेकाला धोबीपछाडच टाकु बग."
"आरं नाय रं भैरुआन्ना, तसं काय न्हाय. मानसं चांगली हायती ती. मला काव आलाय त्यो दुसर्याच कारनान! मास्तर, पान बगु जरा." बंड्या समजावत म्हणाला.
"आज दुपारच्याला शेवंताला घरला घिऊन आल्याधरनं आमच्या म्हातारीचं डोस्कं पुन्यांदा भरमाटलंय. येताजाता शेवंतीचं कौतिक चालु है, आसु द्या, त्याचं न्हाई काय, पर आमच्या कारभारनीला टोमनं सुरु झाल्यात परत. सारकं आपलं शेवंताची आत्याबाय नशिबाची गं बाय! मांडीवर नातवंडं ख्येळवनार...आमी तसंच सरनावर चडनार का काय रं द्येवा.. आसलं कायबाय घालुनपाडुन बोलतीया.. कारभारीन आदीच निम्मी झालीया, त्यात म्हातारीची किरकीर सुरु! निस्ता काव आला पघा!"
"च्च..च्च.." मान हालवत रामा जाधवानं पाराखाली पिचकारी मारत सहानुभुती दाखवली.
मास्तर म्हणाला,"आरं पन तुला तालुक्याच्या डागदराचं नाव सांगिटलं व्हतं ना? येक डाव वैनीला दाखवुन घ्ये की त्याच्याकडं!"
"आवो मास्तर, जायाचं तर हैच्च की. पर हात कसं बांदलंयत पघताय न्हवं? सत्रा ठिकाणास्नं खर्चाला त्वांड फुटतंय, एक गिन्नी बी र्हाईना गाठीला!" धायगुडा करवदला.
"आता पघा, ह्ये मानपानातच हजारभर रुप्पय उडलं. आजुन शेवंतीच्या बाळंतपनाला दोन म्हैनं हैत, तवर तिचं आवशदपानी, फळफळावळ बघाया पायजे. कालच तालुक्याला सर्कारी दवाखान्यात तिचं नाव टाकुन आलो, तितंबी काय कमी दमड्या लागत्यात का? नाव सर्कारी आन थाट झागिरदारी!"
"आरारारा..व्हईल रं..कायतर जुळणी व्हईल..तु नगं चिंता करु." जन्या समजावणीच्या सुरात बोलला.
पुन्हा बंड्या थोडावेळ घुटमळला..परत एकदा कान खाजवत जरा विचार केला आन म्हणाला,
"शेवंताचं बाळंतपन हुईल..त्याची कायतरी तजवीज लागलच. नायतर दोन शेरडं इकुन टाकू ढेकुळगावच्या बाजारात. त्याचं न्हाई काय! कारभारनीलाच जरा डागदरकडं दाखवायचं म्हंतोय, कुटं पाश्शेची जुळणी व्हईल का मंडळी?"
पैशाचा विषय निघाला तशी मंडळी दचकली. जन्या खाली खेळणार्या पोरावर वसकला, "भाड्या, मला बलवायला आलास आन हितंच खेळतुयास व्हय? तिकडं भाकर गार आन तुजी म्हातारी पेटली आसंल की! चल उठ.. येतो मंडळी, भेटु निवांत!..चल रं बंड्या, येतो. हुईल हुईल..कायतरी जुळणी हुईलच.. घाबरु नगंस." असं म्हणुन पटकुरं झटकुन जन्या निघालाच.
तान्या म्हणाला, "आयला धायगुड्या, म्याच भावाच्या जीवाव टुकडं मोडतुया, नायतर दोस्तासाठी आपली जान बी हजर हाय बग. दुसरी काय मदत लागली तर सांग दादा, आपुन हाय."
एकेक करत सगळेचजण कारणं देत सटकले. शेवटी भुरकेमास्तर उरले. "कसंय धायगुड्या, पाचपन्नास आसलं तर काय न्हाई, पन शेपाश्शेची बात जरा आवघडच की रं! वाईट नगं वाटुन घिऊ, पन आपल्यात काय कोन सावकार न्हाई. बग काय कुटं जमतंय का ते. धर्माप्पाला इचारलास का?" मास्तरांनी सुचवणी केली.
"चॅक्क! त्यो न्हाई देत. शेतीचा टुकडा लिव्हुन मागतो चारचव्वल मागिटलं तरी." धायगुडे हताशपणे म्हणाला.
"जाव द्या! हुईल काय व्हायचं त्ये. काडतो कायतरी युगत." असं म्हणुन तो परत कान खाजवत सुन्नपणे बसला.
-------------------------------------------
क्रमशः
प्रतिक्रिया
20 Apr 2010 - 10:26 pm | इनोबा म्हणे
वाचतोय मालक, अजून जरा मोठे भाग येऊ द्या.
तुमच्या चमत्काराची वाट बघतोय आता.
20 Apr 2010 - 10:33 pm | राजेश घासकडवी
अशे येकेक प्येग द्यऊन चडती व्हय? खंबा न्हाय झ्यपत म्हाईताय, निदान क्वार्टर तरी द्या...
24 Apr 2010 - 11:17 am | आनंदयात्री
मस्त रे धमु !!
हाही भाग मस्त जमलाय. पुढचा भाग येउद्या राव लवकर !!
25 Apr 2010 - 10:51 am | मस्त कलंदर
>>>पुढचा भाग येउद्या राव लवकर !!
वाट पाहतेय.... :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Apr 2010 - 1:59 pm | सुबक ठेंगणी
किती महिन्यांनी लिहिलंस! हा ही पो़कळवाडीतला एक चमत्कारंच म्हणायचा का?
पुढच्या कथेची वाट पहाते आहे! :)
24 Apr 2010 - 11:52 am | ऋषिकेश
हा भाग मस्त.. आता पुढ्ली प्रतिक्रीया कथा संप(व)ल्यावरच
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
24 Apr 2010 - 12:24 pm | डावखुरा
फर्मास गावरान तडका.....
उत्तम....
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत....!!!!
"राजे!"
24 Apr 2010 - 1:34 pm | दिपक
लै भारी ष्टोरी मालक. मोठं मोठं भाग टाका.
26 Apr 2010 - 12:32 am | बहुगुणी
"ग्रामीण बाजाच्या कथालेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे" असं म्हणता, पण तसं मुळीच वाटत नाही, लिखाण मस्त जमलंय.
उत्सुकता वाढलीये, लवकर लिहा पुढचा भाग.
26 Apr 2010 - 12:33 am | धमाल मुलगा
धन्यवाद मंडळी.
सर्व प्रतिसादक आणि वाचकांचे आभार.
थोड्याच वेळात पुढचा भाग टाकतो आहे. :)
आपला णम्र,
ध. :)