पोकळवाडीत चमत्कार

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जनातलं, मनातलं
19 Apr 2010 - 10:08 pm

पोकळवाडी...मराठी मातीतलं असंच एक गाव! फार नाही, शे-दिडशे उंबरा, पण गाव मात्र अस्सल बेरकी. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या, भांडणतंटे, भाऊबंदकी सगळं सगळं अगदी पार पोचलेलं. चार गावात असतो तसाच इथंही गावगन्ना! मग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतलं राजकारण, त्यात गावाचे पडलेले तट, हाणामार्‍या, गटबाजी सगळं सगळं कसं आखीव रेखीव चित्रासारखं जागच्याजागी!

इथं शेतात कंबर कसुन खपणारे सरळमार्गी लोक, तसेच रिकामटेकडेही पुष्कळ. पण तसा गावाला कुणाचा काही त्रास असा काही नाही. तान्या-भैर्‍यासारख्या उडाणटप्पू जाड्या-रड्याच्या जोडीनं गावात रोजच डोंबारीमदार्‍यासारख्या खेळ करुन जणु सगळ्यांच्या मनोरंजनाचा मक्ताच घेतलेला. रोज आपापली कामं आटपली की मंडळी बंड्या धायगुड्याच्या पारावर येऊन बसायची. मग गप्पांचा फड असा काही रंगायचा, की काही विचारता सोय नाही. तिथं शाळा उरकुन भुरकेमास्तर येऊन बसायचे, जन्या लव्हार भट्टी थंडावली की धायगुड्याच्या पाराचा रस्ता धरायचा, सुताराचा आजिनाथ कुठं दुसर्‍या गावात कामाला गेला आसला तर येता येता करवती कानस घेऊन तिथंच ठिय्या मारुन बसायचा, तान्या गावभर उकीरडे फुंकुन कंटाळला की पाराकडं निघायचा,भैर्‍या तालमीत पोरांना लाल मातीत माखवुन झालं की खुराक हाणुन धायगुड्याच्या घराकडचाच रस्ता धरायचा. दिवसभराच्या घडामोडी, सरपंचाच्या कुटाळक्या, कधी भुरकेमास्तरानं आणलेल्या पेपरातल्या बातमीवर जोरदार चर्चा...जोडीला पान आणि तंबाखुचे बार...दिवाबत्ती होऊन घराघरात भाकर्‍या कालवणं कधी शिजली ह्याचं भानच रहायचं नाही मंडळीना! मग एकेकाची पोरंसोरं आपापल्या बापसाला शोधत यायची, अन, "आन्ना, मायनं सांगावा धाडालाय, ज्येवाय चला" असं म्हणायची खरं, आणि बापासोबत तिथंच रेंगाळायची...पारावर बापमंडळी गप्पांचा फड रंगवुन बसलेली, तर बापाला बोलवायला आलेली चिल्लीपिल्ली खाली दंगामस्ती करत बसलेली..असा रोजचा सुखाचा दिवस चाललेला असायचा.

एक दिवस असंच नेहमीप्रमाणं फड रंगात आल्येला, मुख्यमंत्र्यांच्या नव्या शेतीच्या धोरणांवर जोरजोरात चर्चा झाली, नेहमीप्रमाणं ती सरपंचावर घसरली, त्याला चार शिव्या घालुन झाल्या, मग मध्येच तान्याचं आन भैर्‍याचं टेकायला बसण्यावरुन भांडण निघालं..तान्या तसा निव्वळ मरतुकडा..पण त्याचं तोंड म्हणजे काय विचारायची सोय नाही! नुस्ता बोलुनच समोरच्याला निम्मा करणार! बरं, भैर्‍या पडला पैलवानगडी, त्याची अक्कल मुठीत! दोघांची दोस्ती असली तरी भैर्‍याचा तान्या करपाट बोलुन आब्रु काडतो म्हणुन राग तर तान्याचा चारचौघात रट्टे घालुन भैर्‍या अपमान करतो म्हणून त्याच्यावर डुख! आज पारावरच्या मंडळींना पुन्हा एका नविन भांडणाची मजा बघायचा चान्स घावला. दोघांची चांगली जुंपलेली बघुन सगळी मंडळी खुसुखुसु हासत बसलेली, तेव्हढ्यात भैरुनं शेवट्चं हत्यार काढलं आणि तान्याला पारावरनं ढकलुन जागा बळकावली..पारावर हसण्याचा एकच गलका उडाला!! कुणाची तंबाखु सदर्‍यावर सांडली, कुणाच्या तोंडातल्या पानानं समोरच्यावर फुरकी मारली..सगळा नुसता धुमाकुळच उडला. हसता हसता जन्या लव्हारानं डोळ्यातलं पाणी पुसत बंड्यापुढं टाळीसाठी हात केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, आज बंड्या काही बोलतच नाही. त्याचं ह्या दंग्याकडं लक्षच नव्हतं. धोतराच्या टोकात काडी गुंडाळुन त्याची सुरळी करुन कान खाजवत तो कुठंतरी बघतच बसलेला!
"अऽऽय बंड्या..आरं आज ध्यान कुटंय तुझं? मगाधरनं पघतोय, आज निस्ता गप गप का रं? काय वैनी म्हायारी चाल्लीय का उद्या?" जन्यानं धायगुड्याला डिवचलं.
सगळ्यांनी आता धायगुड्या काहीतरी फर्मास उत्तर देइल म्हणुन त्याच्याकडं ध्यान लावलं, तर कसनुसं हसत बंड्या म्हणाला, "कुटं काय? काय न्हाय की!"
"आरं बोल की मर्दा, काय आडचन हाय का?" मास्तरानं धायगुड्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.
"आरं दोस्तांना सांगायचं न्हाई तर कुनाला रं? दोस्तच तर मदतीला येत्यात न्हवं का? क्काय?" आज्या सुतार शेवटचा क्काय भैर्‍याच्या मांडीवर थाप मारत म्हणाला..
--------------------------------------------------------------------------------
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

19 Apr 2010 - 10:12 pm | टारझन

व्हाट शाल आय से ... :)
गावराण मेवा आहे ही कथा ...

- धमेश पोकळवाडी

मुक्तसुनीत's picture

19 Apr 2010 - 10:19 pm | मुक्तसुनीत

हेच बोल्तो !

प्रभो's picture

19 Apr 2010 - 10:13 pm | प्रभो

च्यायला क्रमशः आहेच का इथेपण...????
धम्या लवकर टाक बे पुढचा भाग.

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 10:15 pm | इनोबा म्हणे

ह्ये टिव्ही सिरीयलवानी का केलंस बे? इंटरेस्टींग पार्टवरच क्रमशः ? असो.
हि सिरीज वाचलीच नव्हती. लिव्हा आता पटापटा.
गावाचं वर्णन तर झ्याक जमलंय. आता टवाळक्या चालू व्हायची वाट बघतूय.

राजेश घासकडवी's picture

19 Apr 2010 - 10:42 pm | राजेश घासकडवी

मस्त जमतंय...लवकर पुढचे भाग येऊ द्यात. क्काय?

भाग्येश's picture

20 Apr 2010 - 1:48 pm | भाग्येश

खुपच छान!
पुढचे लवकर येऊद्या..
अकशी गावच्या पारावर बसल्यावांनी वाटतय.. वाह!!

-भाग्येश
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ||
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः ||

दिपक's picture

20 Apr 2010 - 1:54 pm | दिपक

आरं तिच्या हा चमत्कार कसा बघायचा राहिला राव... टाका पुढचे भाग पटापट..

डावखुरा's picture

20 Apr 2010 - 2:41 pm | डावखुरा

पुढ्चा भाग लवकर येउ द्या... गड्या बर्‍याच दिवसांनी चांगले वाचायला मिळाले....

"राजे!"

विंजिनेर's picture

20 Apr 2010 - 3:13 pm | विंजिनेर

धमुला... फुडं??

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Apr 2010 - 4:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढचा भाग आल्याशिवाय प्रतिक्रिया देणार नाही.

अदिती

वाटाड्या...'s picture

20 Apr 2010 - 7:19 pm | वाटाड्या...

मला वाटलं का तु बाबा चिमित्कारची ग्वाष्टं सांगतुयास...

येउ दे पुढचं न काय..

धमाल मुलगा's picture

20 Apr 2010 - 7:54 pm | धमाल मुलगा

ग्रामिण बाजाच्या कथालेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. (जसं काही इतर कथाप्रकारांमध्ये आम्ही सम्राटच आहोत असा आव वाटतोय, नाही का? ;) )
माझ्या आजवरच्या वाचनातुन संस्करण झालेल्या ग्रामीण कथाकारांच्या शैलीचा, पठडीचा प्रभाव कथेमधुन नक्कीच जाणवत असेल. पण चुकत माकत काहीतरी लिहितोय, ते मायबाप वाचक स्विकारताहेत हेच माझ्यासाठी खूप आहे. :)

चुकलं माकलं सांभाळुन घ्या द्येवा म्हाराजा!

लवकरच टाकतोय पुढचा भाग. तो गोड मानुन घ्यावा ही णम्र इनंती.

आनंदयात्री's picture

20 Apr 2010 - 11:43 pm | आनंदयात्री

मालक तुमची शैली अप्रतिम आहे.
वाचण्यास मजा येतेय.
ही लेखमाला शेवटी इथेच पुर्ण व्हायची होती हेच प्राक्तन .. असो .. लेखमाले लेखमाले पे लिख्खा है संस्थळ का नाम !!

इनोबा म्हणे's picture

20 Apr 2010 - 11:47 pm | इनोबा म्हणे

सहमत आहे. :)

चित्रा's picture

21 Apr 2010 - 12:37 am | चित्रा

छान - वाचते आहे.

मी-सौरभ's picture

21 Apr 2010 - 12:40 am | मी-सौरभ

ध.मु.

आपण हा ग्रामीण बाज बर्यापैकी पकड्लायत असे वाटते, पण अजून लिखाण आल्याशिवाय प्रतिक्रिया नाही
(जसं काही समीक्शणात आम्ही सम्राटच आहोत असा आव वाटतोय, नाही का?)

-----
सौरभ :)