ऊर्जेची गणितं ३ : तापमानवाढ - एक पर्स्पेक्टीव्ह
गेल्या लेखात पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला सकारात्मक कृती काय करता येईल हे बघितलं. मी जी गणितं मांडली ती अनेकांनी पडताळून पाहिली. उदाहरणार्थ, धनंजय यांनी कॅलिफोर्नियात अशाच प्रकारचा अभ्यासाचा संदर्भ दिला. त्यात केवळ सावलीमुळे घरटी ४२ वॉटचा विजेचा वापर कमी होईल असं गणित मांडलेलं आहे. ती वीज उत्पन्नासाठी जो सुमारे पाचपट कोळसा जाळला जातो. त्या हिशोबाने घरटी सुमारे २०० वॉट इतकी ऊर्जा न जाळण्यासारखं आहे. हे गणित मी केलं त्याच्या सुमारे एक चतुर्थांश आहे. माझ्या गणितानंतर मी चुकीसाठी दहापटीची माया ठेवली होती, त्यामुळे त्यात हे बसतं. तेव्हा पहिला सोप्पा टेरावॉट ऐवजी पहिले सोप्पे अडिचशे गिगावॉट (फक्त!) हे नाव जास्त रास्त ठरलं असतं.
ही गणितं मांडताना अनेकांनी तापमानवाढीचे, कार्बन् वाढीचे आलेख मांडले, ते पाहून बरं वाटलं. एक चित्र हजार शब्दांची गोष्ट सांगतं (आणि त्यात माझा गेला लेख हजारेक शब्दांनी वाढला असंही मत पडलं - हलक्यानेच घ्या...) म्हणून मी या लेखात दोन आलेखांच्या अनुषंगानेच काही विधानं व गणितं मांडणार आहे. चित्राने हजार शब्दांचं काम होत असलं तरी कधीकधी ते संपूर्ण संदर्भासकट आले नाहीत तर त्या शब्दांनी चुकीचा अर्थ प्रतीत होतो, तारतम्य चुकतं. म्हणून अथपासून इतिपर्यंत गोष्ट काय आहे व त्या मोठ्या चौकटीत सध्याची गणितं कुठे बसतात हा पर्स्पेक्टीव्ह देण्याचा प्रयत्न.
मानव गेल्या काही हजार वर्षांत आपल्या पायावर उभा राहायला लागलेला आहे. पण पृथ्वी गेली साडेचार अब्ज वर्षं आहे. आपण किती कमी काळ व्यापला आहे हे् दाखवण्यासाठी खूप वेगवेगळी उदाहरणं आहेत. त्यातलं एक आवडतं सांगतो. आपण दोन हात पसरून एक वाव अंतर केलं असं समजू. डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या नखाच्या टोकाला पृथ्वीचा जन्म व उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या नखाच्या टोकाला आत्ताचा क्षण आहे असं धरलं. तर मनुष्यजातीची म्हणता येण्यासारखी पहिली खूण काही लाख वर्षांपूर्वीची. (ऑस्ट्रेलोपिथेकस ल्युसी बत्तीस लाख वर्षांपूर्वीची.) याचा अर्थ आपल्या नखाची काही दिवसांची वाढ इतकी जुनी. त्यात ज्ञात इतिहास काही हजार वर्षांपूर्वीचा. तो नख घासून फाईल करताना एका घासणीत जितका निघेल तेव्हढा कचरा. गेलं शतक म्हणजे काही मायक्रॉन... आपल्या संपूर्ण आयुष्यातल्या सुमारे एक मिनिटाइतकं. दहा श्वास. दहा श्वासांसाठी आपण खूप गोष्टी सहन करू शकतो. आता उपमा ताणून तुम्ही म्हणाल की त्यात सायनाईडच्या वाफा घेतल्या तर आपण मरू शकतो. मान्य. पण आत्ता जे चाललं आहे त्या सायनाईडच्या वाफा ठरणार आहेत की घरात भट्टी पेटवल्यावर येणाऱ्या गरम झळा आहेत हे पाहाण्यासाठी पूर्वी काय झालं हे पाहाणं उद्बोधक ठरेल.
पहिला आलेख आहे तो गेल्या साडेचार अब्ज वर्षातल्या तापमानाच्या ढोबळ बदलाचा. (आलेख इथे मिळाले. इतर अनेक पाहाण्यासारखे आलेख आहेत. ही साईट पर्यावरणवादी विचारसरणी असलेल्यांचीच आहे.)
या आलेखात काळ खालून वर आलेला दाखवला आहे. आकडे दशलक्ष वर्षांचे आहेत. व काळाप्रमाणे तापमानातला बदल दाखवला आहे. साधारण मध्यभागावरची उभी रेषा म्हणजे सध्याचं तापमान. त्याच्या उजवीकडे म्हणजे अधिक गरम, तर डावीकडे म्हणजे थंड. अक्षावर प्रमाण दिलेलं नाही, पण इतर आलेखांवरून अंदाज बांधता येतो. जास्तीत जास्त तापमान मर्यादा सुमारे पंचेचाळीस अंश (सध्याचं + १५ ते १८) तर कमीतकमी सुमारे पंधरा (सध्याचं - ८ ते १०) अंश सेंटिग्रेड आहे. काळाचा अक्ष प्रमाणात नाही. तसंच नजीकच्या इतिहासात तापमान खूप बदलताना दिसतं, पण ते कदाचित अधिक विदा असल्यामुळे असावं. या आलेखातून तापमान डायनोसॉरच्या अस्तानंतर व सस्तनांच्या उदयानंतर (साडेसहा कोटी वर्षं) तापमान सुमारे सध्याचं + १२ ते सध्याचं - ६ इतक्या मोठ्या प्रमाणात बदललेलं दिसतं.
दुसऱ्या आलेखात अधिक नजीकच्या भूतकाळाचं, म्हणजे गेल्या दहा लाख वर्षांचं चित्र आहे. (म्हणजे आपल्या नखाची एक-दोन दिवसाची वाढ). पहिला आलेख गेल्या दहा लाख वर्षांचा, दुसरा गेलं दीड लाख वर्षांचा, पुढचा गेल्या सोळा हजार वर्षांचा, तर शेवटचा गेल्या दीड हजार वर्षांचा तापमानाचा इतिहास दाखवतो. चौथ्या चित्रात तापमानातला बदल थोडा मोठा करून दाखवला आहे, संपूर्ण बदल सुमारे १ अंशाचा आहे. तर इतर आलेखातले बदल सुमारे ५ अंशाचे आहेत हे लक्षात ठेवावं.
१. गेल्या दहा लाख वर्षांत तीन डिग्रींनी तापमान वाढण्याचे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत.
२. गेल्या दीड लाख वर्षांत पाच डिग्रींनी तापमान दोनदा वाढलेलं आहे. ते मागच्यावेळी अर्थात कमीही झालं. यावेळचं चक्र अद्याप संपलं नसावं.
३. गेल्या सोळा हजार वर्षात सर्वात तीव्र तापमान वाढीची घटना सुमारे १४६०० वर्षांपूर्वी झाली. (तिसरा आलेख, पहिला उंचवटा) तीत दोनशे वर्षांच्या आत तापमान सुमारे ३ डिग्रींनी वाढलं. त्यावेळी मानवजात होती. मानवांनी या तापमानवाढीत काही हातभार लावला नाही. या तापमानवाढीमुळे मानवजात नष्टही झाली नाही.
४. दुसरी तीव्र तापमान वाढीची घटना सुमारे ११६०० वर्षांपूर्वी झाली. (तिसरा आलेख, दुसरा चढ) तीत तापमान सुमारे दोन अंशाने सुमारे दीडशे वर्षांच्या आत वाढलं. यावेळीही अर्थातच मानवजात होती.
५. गेल्या पंधराशे वर्षांत सुमारे तीन चतुर्थांश अंशाने तापमान वाढलेलं आहे. गेल्या दोनशे वर्षात फारतर अर्धा अंश.
म्हणजे १४६०० वर्षांपूर्वी जे तापमान वाढलं, त्याचा दर आजच्या (गेल्या दोनशे वर्षातल्या) वाढीच्या दराच्या किमान सहापट अधिक होता, कदाचित तो दहापट असेल. ११६०० वर्षांपूर्वी तो किमान पाचपट होता. कदाचित तोही आठ ते दहापटही असेल. (मी क्ष अक्षाचा अंदाज बांधताना वर्षं थोडी जास्त धरलेली आहेत.)
आत्ता तापमान वाढ होते आहे याबाबत दुमत नाही. प्रश्न असा आहे या वाढीत मानवाचा किती हात आहे? ही चित्रं बघितली की सध्याची तापमान वाढ इतिहासाच्या संदर्भात ठेवता येते. मानव काही करत नसताना जर आजच्या सहापटीने तापमान वाढ होत असेल तर आत्ताच्या वाढीची पूर्ण जबाबदारी मानवाने घेण्यामागे काय तर्क आहे? अर्थातच थोडा वाटा आहे. पण मुद्दा असा आहे की पर्यावरणातल्या घटनांमागच्या शक्ती, ऊर्जा, इतक्या प्रचंड आहेत की आपण स्वत:ला जबाबदार समजण्यात मानवकेंद्रित अहंकार आहे की काय असं वाटतं. काही प्रतिसादांत 'हाच दर कायम राहिला तर पुढची पन्नास ते शंभर वर्षं आपण टिकू का' असा प्रश्न विचारला गेला होता. इतिहासात जे झालेलं आहे, त्यावरून ती भीती अवास्तव आहे असं वाटतं. याचा अर्थ आपण काहीच करायचं नाही असं नाही. हा प्रश्न जितक्या महत्त्वाचा आहे तितक्याच प्रमाणात त्याकडे लक्ष पुरवावं इतकंच. आणि तो किती महत्त्वाचा आहे हे डोळसपणे त्याकडे बघून व इतर प्रश्न त्याशेजारी ठेवून सापेक्ष तीव्रतेचा विचार करायला हवा.
या सापेक्ष महत्त्वाकडे आपण येत्या लेखांत पाहू. पण त्याआधी तापमान बदलाने येणाऱ्या संकटाचा बागुलबोवा उभा करणारी गणितं कशी केली जातात याचं उदाहरण बघू.
प्रतिक्रिया
13 Apr 2010 - 1:09 am | वाचक
सर्व प्रथम उत्तम लेखमाला
एक पटकन प्रश्न (quick question :) )
तपमानवाढीत मानवाचा सहभाग हा किरकोळ आहे हा मुद्दा मला मान्य आहे पण त्यामुळे काहीच फरक पडणार नाही हे थोडे 'सरळसोट गणित linear' होत नाही का ?
उदाहरणादाखल - गेल्या शतकात जेवढी प्रगती झाली तेवढी त्याच्या आधीच्या ५/६ शतकात झाली नाही, कारण एका शोधाने दुसरे शोध शक्य आणि सोपे बनवले. म्हणजे, हे गणित लिनिअर नाही मानता येणार. मग त्याच प्रमाणे तपमान वाढीची प्रक्रिया तशीच गृहित धरली तर ? म्हणजे मानवाच्या 'उपद्व्यापांमुळे' तापमान लगेच वाढणार नाही पण ते 'संप्रेरक' catalyst म्हणून कार्य करुन त्या वाढीचा वेग भरमसाठ वाढवू शकेल अशी शक्यता आहे का ?
"शक्यता नाही" असे मान्य केल्यामुळे काहीच न करता स्वस्थ बसायला बरे पण तसे नसेल तर ? :)
13 Apr 2010 - 1:55 am | राजेश घासकडवी
नॉन लिनिअर असण्याची शक्यता आहेच. पण ही सगळी गणितं, ती शक्यता वाढण्याची संभाव्यता नाकारता येत नाही,व त्यामुळे २०० ऐवजी हे १०० च वर्षात घडू शकेल अशा भाषेत होतात. जनसामान्यांपर्यंत पोचताना कुठेतरी ही फाईन प्रिंट गळून जात असावी...
इथे प्रश्न नाकारायचा नसून त्याची तीव्रता इतर प्रश्नांशेजारी ठेवायची आहे. मी एक कल्पित उदाहरण देतो. तापमान १०० वर्षात बेसुमार वाढण्याची समजा १०% शक्यता आहे, व तीमुळे पाच लाख (समजा) म्रुत्यु होऊ शकतील. याशेजारी पुढच्या वर्षी दहा लाख बालकं मरण्याची ९९.९% शक्यता असेल तर आपण काय करायचं हे उघड आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्षात हा फरक किती आहे. त्याचसाठी ही गणितं.
13 Apr 2010 - 3:00 am | पाषाणभेद
उत्तम लेखमाला. काहीतरी उगाचच भाष्य करून हसे करून घेण्यापेक्षा केवळ वाचन करतो अन समजून घेतो आहे.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
13 Apr 2010 - 4:30 am | अक्षय पुर्णपात्रे
तापमान वाढत आहे किंवा नाही, मानवनिर्मीत की नैसर्गिक, होऊ शकणारे नुकसान, मागील साडेचार अब्ज वर्षांचे दाखले आणि इतर विदाधारीत अंदाज याविषयी चर्चा अनेक शैक्षणिक व गैरशैक्षणिक व्यासपीठांवर सुरू आहे. अर्थातच दोन्ही बाजूंनी मते मांडली जात आहेत. आतापर्यंत 'ग्लोबल वॉर्मिंग' होत आहे म्हणून काहीतरी करायला हवे या विचाराला बर्यापैकी बळकटी आली आहे. पण प्रत्यक्षात फारशी हालचाल झालेली नाही. सामान्यांना जे उपाय सूचवले जात आहेत त्यातून फारसा आर्थिक फटका बसणार आहे असे दिसत नाही. इंधनाच्या किंमती जास्त झाल्यानंतरच इंधनाच्या दृष्टीकोनातून परिणामकारक गाड्यांचा खप वाढतो. वीजेच्या किंमती वाढू लागल्यानंतरच वीजेची बचत करणारे उपाय शोधले जातात. हे अर्थशास्त्र कुठेही तापमानवाढीसाठी उपायांनी बिघडलेले नाही. प्रदुषणविरोधक काही कायदे अस्तित्त्वात आहेत ज्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो पण तापमानवाढीची भिती निर्माण होण्याआधीही हे कायदे अस्तित्त्वात होते. सध्याच अमेरिकेत हेल्थ केअर बिल पारीत करण्यात आले. अमेरिकेत याआधी स्टिम्युलस पॅकेजसारखे मोठाले कायदे पारीत झाले आहेत. मधल्या काळात 'कॅप अॅंड ट्रेड' मागे पडलेले आहे. जगातील सर्व देशांमध्ये सर्व समस्यांविषयी प्राथमिकता 'जैसे थे' आहेत. काही देशांमध्ये जेथे खरोखर मोठे बदल घडण्याची शक्यता आहे, तेथे काही आर्थिक साधने तापमानवाढविरोधी धोरणांसाठी वापरले जात असावेत. तेव्हा तापमानवाढीने कुठल्या समस्येला दुय्यम स्थान दिले गेले आहे ते कळत नाही.
तुझा विरोध पर्यावरणासंदर्भात अंमलात येणार्या सर्व धोरणांना आहे का? तसे असल्यास ताकाला जाऊन भांडे लपवण्यात काय अर्थ आहे?
13 Apr 2010 - 5:52 am | राजेश घासकडवी
तर विचारवंत, मीडिआ यांचा माईंड शेअर व पांढरपेशा सामान्यांची पर्यावरणाच्या हानिविषयक असलेली काहीशी आंधळी खात्री. उदा. प्लास्टिक लँडफिलमध्ये जातं व रीसायकल होत नाही याबाबतची तक्रार. जमिनीतून काढलेलं जमिनीत जायला काय हरकत आहे? पण त्याबाबत प्रश्न विचारण्याची पद्धत नाही. आपल्या परीने ती गणितं व कारणपरंपरा तपासून बघणं हा हेतू आहे.
13 Apr 2010 - 6:53 am | चित्रा
प्रश्न विचारायला हवे हे बरोबर, पण मला तुम्ही करीत असलेल्या विरोधाचे स्वरूप पटत नाही आहे.
प्लास्टिक का रिसायकल करू नये याबद्दल काही सांगावे.
13 Apr 2010 - 7:05 am | अक्षय पुर्णपात्रे
काही लोकांमध्ये आंधळी खात्री असावी पण सर्वसामान्यपणे तशी परिस्थिती नाही. मी इंडियाना राज्यात राहतो. इथे रिसायक्लिंग वगैरेवर फारसा भर नाही. अजुनही पर्यावरणाचा मुद्दा घेऊन अमेरिकेत कोणी निवडून आल्याचे ऐकिवात नाही. (कुणी कुणी स्थानिक पातळीवर असू शकतील.) पर्यावरणवाद्यांना विरोध मोठ्या प्रमाणावर आहे.
आता जमिनीतले जमिनीत जाण्याविषयी. ज्यांना वाटते त्यांनी जमिनीतले जमिनीत घालावे. रिसायक्लिंग करा म्हणून सक्ती नाही. (भारतासारख्या देशात या प्लॅस्टिकच्या पिशव्या जमिनीत जात नाही. त्यामुळे दूसरे प्रश्न उद्भवतात.) तू नेहमी आकडेवारीचा पुरस्कार करतो. किती लोक रिसायकल करतात? प्लास्टिकच्या पिशव्यांचे किती नवीन उत्पादन कमी झाले आहे? (येथे काही आकडेवारी उपलब्ध आहे.) भारतात, चीनमध्ये कोळशावर वीजनिर्मीती करणारे प्रकल्प थांबले आहेत काय?
तू म्हणतो तशा लोकांमध्ये अनेक गोष्टींविषयी आंधळी खात्री आहे. मूल्ये ढासळत आहे, समाज र्हासाला लागला आहे, संस्कृतीचा नाश होतो आहे वगैरे. विचारवंत इतर अनेक (त्यांना) महत्त्वाच्या प्रश्नांवर भुमिका मांडत राहतात. दुसरी बाजू मांडणारेही विचारवंत आहेत. लोक जे योग्य वाटते ते करतात. टी पार्टीला जातात, मानवी हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात आणि काही पर्यावरणासाठी भांडतात. तू जेव्हा पर्यावरणाविषयी आंधळी खात्री वगैरे म्हणतो तेव्हा तुझ्या मनात जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के लोक आहेत? आणि त्या लोकांनी काहीच प्रश्न न विचारता आंधळेपणाने पर्यावरण जपण्याचे ठरवले आहे, हे थोडेसे कुत्सित गृहीतक नाही का? तू मागच्या लेखात काही आकडेवारी करून जो वीजेचा आकडा सांगितला, तो ढोबळमानाने बर्यापैकी चुकला होता. म्हणजे तुझे हे सर्व लिखाण कुठल्या आंधळ्या खात्रीतून येत आहे, असे ठरवणे योग्य ठरेल का?
13 Apr 2010 - 11:28 pm | राजेश घासकडवी
शेवटी कुठचीच विधानं पूर्ण आकडेवारीच्या आधारावर होत नाहीत. आणि आकडेवारीसकटच्या विधानांमागेही जो स्वर असतो त्यातून 'आतला आवाज' जाणवतो. वैचारिक लेखन करताना शक्यतो या आवाजाविरहित विधानं यावीत. किमान आपल्या आवाजाला दुजोरा देणारी आकडेवारी मांडावी. मी माझी भूमिका मांडतो आहे, व काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे हे आधीच सांगितलं आहे. जिथे माझे विचार बिनआधाराचे आहेत त्यासाठी आकडेवारी शोधणं व मांडणं हा या लेखमालेचा हेतू आहे.
आता मी रिसायकल करणं वाईट असं लिहिलं नाही, त्यात फायदा व तोटा शोधून काढून ते करावं की करू नये हे ठरवावं इतकंच म्हटलं. (तेही उदाहरण म्हणून दिलं होतं) तरीदेखील एक प्रतिक्रिया मी विरोध करतोय अशा स्वरूपाची आली ना? मुळात '१ तास' ला मी जी प्रतिक्रिया दिली तिलाही पंचाला हात घातल्यासारखे भावनिक प्रतिसाद आले. म्हणून हा लेखनप्रपंच. 'दात कशाला घासायचे' असा जर प्रश्न विचारला असता तर चेष्टा करण्यापलिकडे काहीतरी ठाम कारणं आली असती.
माझा मुद्दा, (माझा आतला आवाज) प्रश्नांचं तांत्रिक उत्तर शोधून काढणं विरुद्ध त्याविषयी भावनिक विचार करण्याची प्रथा याबाबत आहे. ते सिद्ध करणं खूप कठीण आहे. आता आणखीनच टोकाचं उदाहरण देतो. जुन्या काळी रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी, मैला हाताळणाऱ्याला, स्पर्श करणाऱ्याला स्वच्छ आंघोळ घालणं (करायला लावणं) हे तांत्रिक उत्तर होतं. पण त्या भीतीबाबत भावनिक विचार केला की स्पर्श केला की विटाळ होतो ही कल्पना रूढ होऊ शकते. (हे पुन्हा उदाहरण म्हणून बघावं. यातूनच अस्पृश्यता आली का याची चर्चा अनाठायी होईल...)
पण आतल्या आवाजाला दुजोरा देणारी 'आकडेवारी आहे का?' हा प्रश्न बरोबर आहे. ही आकडेवारी कशी द्यायची हे मला नीटसं माहीत नाही. त्यामुळे मी उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या आतल्या आवाजाच्या एका अंगाच्या (पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग) अनुरोधाने, मी मला दिसलेल्या लोकांमध्ये जो विचार आढळत नाही तो मांडतो आहे. त्यावरच्या चर्चांमधून कदाचित यावर अधिक प्रकाश पडेल. (इथले लोक हे मला नेहेमी दिसणाऱ्या प्रकारचेच आहेत हे गृहितक आहे.)
मुळात मी जो प्रश्न/विचार मांडतोय तोसुद्धा सर्व प्रश्नांच्या संदर्भात किती महत्त्वाचा याचा विचार करणंही योग्य ठरेल. ते कसं करायचं हेही माहीत नाही.
14 Apr 2010 - 6:11 am | चित्रा
"ती" प्रतिक्रिया माझीच आहे म्हणून येथे उत्तर देते!
पहिले म्हणजे विरोध मला दिसला, तो याला तुम्ही आंधळी प्रथा म्हणता त्यामुळे. म्हणजे जर अशी 'आंधळी प्रथा' एखादा पाळीत नसला, तर तो प्लास्टिक री-सायकल करीत नाही, असे मी समजते. हे मला सध्या असलेल्या ज्ञानाच्या विपरित आहे. जर माझे 'ज्ञान' योग्य नाही असे तुम्हाला वाटत असले तर त्याची कारणे तुम्ही द्यायला हवी.
समजा, मला सध्या प्लास्टिक रिसायकल करण्याची सवय आहे. समजा, ती मी किंवा माझ्यासारख्या लोकांनी बदलायला हवी किंवा प्रश्न विचारायला हवे असे तुम्हाला वाटते आहे. तर प्लास्टिक रिसायकल न केल्याने काय फायदा होईल हेही तुम्ही सांगायला हवे. प्लास्टिक रि-सायकल केल्याने पर्यावरणाची किंवा जागेची किती हानी होते ते पटवून देणे हेही तुमचे काम आहे. (ते पटणे न पटणे, माझ्या बुद्धीवर किंवा धारणेवर अवलंबून असेल).
आत्ता तापमान वाढ होते आहे याबाबत दुमत नाही. प्रश्न असा आहे या वाढीत मानवाचा किती हात आहे? ही चित्रं बघितली की सध्याची तापमान वाढ इतिहासाच्या संदर्भात ठेवता येते. मानव काही करत नसताना जर आजच्या सहापटीने तापमान वाढ होत असेल तर आत्ताच्या वाढीची पूर्ण जबाबदारी मानवाने घेण्यामागे काय तर्क आहे?
मानव काही करीत नसताना हे महत्त्वाचे आहे. आज माणसांमुळे होणार्या तापमानवाढीचे "लोकल" इफेक्ट (स्थानिक परिणाम) आपण पाहतो. उदा. गर्दीच्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांत हीट आयलंड तयार होणे. http://www.epa.gov/hiri/about/index.htm ग्लोबल परिणाम काही वेगळे असतील असे तुम्ही म्हणता म्हणून समजता येईल - आज मानवी समाज १०००० वर्षांपूर्वीपेक्षा संख्येने कित्येक पटीने वाढलेला आहे. म्हणून मानवांचे 'योगदान' हे पूर्वीच्या (म्हणजे हिस्टॉरिकल डेट्यावर -विद्यावर) अवलंबून ठेवता येऊ शकते का?
माझे याबाबतीतले मत अगदी सोपे आहे - तापमानवाढीबद्दलचे आपले मानवी 'योगदान' कमी व्हावे म्हणून मानवाने जमेल तितका हस्तक्षेप (इंटरव्हेन्शन) करावे असे मला वाटते. त्यासाठी काही रूढ पद्धती मी वापरते.
14 Apr 2010 - 7:00 am | राजेश घासकडवी
मी विरोध करणे व सर्वमान्य वागणुकीला प्रश्न करणारी भूमिका मांडणे यांच्या सीमारेषेवर चालत आहे. यात कोणाला अमुक एक करा वा करू नका हे सांगण्यापेक्षा ते करण्याआधी सर्व फायद्यातोट्याचा विचार करा असं सांगायचं होतं. संपूर्ण लेखमालेचा तोच उद्देश आहे.
मी रिसायकलिंग वाईट म्हणत नाही. जगाच्या प्रश्नांना असलेल्या तांत्रिक उत्तरांपैकी ते एक आहे. पण मुळात जेव्हा रिसायकलिंगची गरज पडली (युद्धकाळात) तितकी गरज सर्वच गोष्टींची राहिलेली नाही. उदा. अल्युमिनम रिसायकल करणं हे प्रचंड फायद्याचं आहे (जवळपास ९५% ऊर्जेत बचत). तर कागद व प्लास्टिक रिसायकल करणं हे सर्व घटक बघता(ते जमा करणं, सॉर्ट करणं, प्रोसेस करणं, वाटप करणं...) हे तितकं फायद्याचं ठरत नाही. काही बाबतीत तोट्याचंही ठरू शकतं. जर रिसायकल्ड प्लास्टिकची बाटली १० पैशाला असेल, आणि नवीन प्लास्टिकची बाटली ५ पैशाला व प्लास्टिक गाडून टाकण्याचा खर्च १ पैसा असेल, तर जुनं गाडून नवीन उत्पन्न करायला हवं. मग तीवर ३ पैसे टॅक्स लावून त्यातून पर्यावरण सुधारण्याचं विधायक कार्य केलं तर त्याचा फायदा जास्त होऊ शकेल. रिसायकलिंगमागे असलेली साधनसामग्री एफिशिअंटली वापरणं हा उद्देश आहे. जेव्हा तो साध्य होतो, तेव्हा जरूर करावं.
तापमान वाढीच्या दराबाबत - पहिलटकरणीला एखाद्या म्हातारीनं सांगावं, 'अगं, तेरा बाळंतपणं झाली माझी.' यात तिला जो आधार द्यायचा असतो, तसा देण्याचा इथे प्रयत्न आहे. पूर्वी दरवाढ जर दहापट राहिली असेल तर आत्ताची जास्त म्हणताना ती आधीच्याशी तुलना करून तेव्हा काय झालं हे पाहावं, एवढंच.
तुमचा हीट आयलंडचा दुवा पाहिला. पर्यावरणात उष्णता वाढण्याचा प्रश्न भौगोलिक विभाजनाने मांडलेला आहे. सुदैवाने मोठ्या शहरांची डाऊनटाऊनं पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या १ लक्षांश इतक्या आकाराचीही नसावीत असा ढोबळ अंदाज आहे. मनुष्याच्या घरांचंच क्षेत्रफळ १ टक्क्यापेक्षा कमी येतं... तेव्हा असा लोकल विचार फसवा ठरू शकतो. ग्लोबलच करणं रास्त आहे असं वाटतं. बाकी त्या दुव्यावर दिलेले उपाय हे मी माझ्या गेल्या लेखात मांडलेलेच आहेत.
राजेश
13 Apr 2010 - 2:52 pm | आप्पा
गेल्या सोळा हजार वर्षात सर्वात तीव्र तापमान वाढीची घटना सुमारे १४६०० वर्षांपूर्वी झाली. (तिसरा आलेख, पहिला उंचवटा)
दुसरी तीव्र तापमान वाढीची घटना सुमारे ११६०० वर्षांपूर्वी झाली. (तिसरा आलेख, दुसरा चढ)
या काळात रामायण महाभारत युध्द झाले असावे.
आप्पा
14 Apr 2010 - 3:46 am | शेखर काळे
मला वाटतं की अजून नीट माहिती नाहीत.
तपमान वाढ मानवामुळे होते आहे की नाही हे ही नक्की नाही. ही वाढ सायक्लि़क आहे का या प्रश्नाचे उत्तरही नीट माहिती नाही - असे असताना केवळ खूप लोक असे म्हणतात, म्हणून तापमानात वाढ होते आहे - ती हाताबाहेर जाणार आहे, यावर कसा विश्वास ठेवावा ?
आकडेवारी तर दोन्हीकडून पाहता येते.
हां, आता वस्तू नुसत्याच टाकून न देता त्यांचा पुनर्वापर करावा, ही गोष्ट मनाला पटते - ती मी आचरणातही आणतो. यामुळे, मुलतत्वांची, इंधनाची बचत होऊ शकते, हेही मान्य आहे. पण त्याचा तपमान वाढीशी काय संबंध ?
7 Feb 2013 - 9:53 am | नगरीनिरंजन
7 Feb 2013 - 10:33 am | अनुराधा१९८०
भरमसाठ वाढलेली लोकसंख्या हे प्रदुषण आणि सर्वच issues च्या मागचे मुळ कारण आहे. पण त्या विषयी कोणी पर्यावरण तज्ञ बोलत नाही, कारण त्यांनी थाटलेले दुकान बंद होइल ना.
global warming हे एक थोतांड आहे असे माझे मत झाले आहे. तसे ही अजुन काही दशकांनंतर तेल आणि कोळसा पण संपेल त्यामुळे प्रदुषण आपोआप च थांबेल.
8 Feb 2013 - 7:43 am | नगरीनिरंजन
१. मानवजात तापमानवाढीने नष्ट होणार नाही हे सत्य असले तरी काही कोटी लोकांना मरण येऊ शकते. अर्थात ते स्वीकारार्ह असेल तर प्रश्न मिटला.
२. वरील आलेख फक्त भूतकाळातली तापमानवाढ दाखवतो. EPA च्या वेबसाईटवर खालील तापमान व हवेतील CO2च्या प्रमाणाचे correlation दाखवणारा आलेख मिळाला. CO2 च्या प्रमाणातल्या बदलासाठी तेव्हा मानव कारणीभूत नव्हता तर इतर काही नैसर्गिक कारणे होती (उदा. ज्वालामुखीचा स्फोट).
CO2 चे प्रमाण १८० PPM ते ३०० PPM या दोन पातळ्यांमध्ये कमीजास्त होईल तसे तापमान कमीजास्त होते असे दिसते.
या आलेखात गेल्या शतकाच्या आधीपर्यंतचाच विदा आहे.
गेल्या शतकात मात्र CO2 चे प्रमाण ३८० PPM पर्यंत गेले आहे आणि त्यासाठी कोणत्याही नैसर्गिक घटनांचा आधार नाही.
त्याच बरोबर सूर्याची ऊर्जाही नेहमीचेच चक्र दाखवत असताना तापमान मात्र वाढते आहे.
फक्त तापमानवाढच नाही तर समुद्राचे आम्लीकरण, समुद्रात फायटोप्लँक्टनपेक्षा जास्त असलेले प्लॅस्टिक, पृथ्वीवरच्या जवळजवळ प्रत्येक जीवसंस्थेचा आणि जैवविविधतेचा र्हास या सगळ्याला मानव कारणीभूत आहे.
एक दशलक्ष प्रजातींसाठी असलेल्या सूर्याच्या Net Primary Product पैकी ४०% मानव वापरतो तरीही आपण पृथ्वीपुढे क्षुद्र आहोत असे सोयीस्कररीत्या म्हणायचे?