नको रातराणी नको पारीजात
-------------------------------------------
नको रातराणी नको पारीजात,असा गुंतलो मी तुझ्या कुंतलात.
जणु जाहला जीव वेडा भुकेला,असा नाहलो मी दुधी चांदण्यात.
विना उत्तरे ती मिटे प्रश्न सारे,असे मौन होते दुवा साधणारे.
जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात.
जणु गूढ झाले मधाने मधुर,जणु चातकाला मिळे चंद्रकोर.
उराशी मला तु लपेटुनि घेता,मला ऐकले मी तुझ्या स्पंदनात.
तुझा गंध येता पुन्हा मोगर्याला,तुझा रंग येता पुन्हा चांदण्याला.
जसा मेघ देई सुगंध मृत्तिकेला,तसा बरसलो मी तुझ्या अंगणात.
तप्त श्वास सारे,तृप्त भासणारे, पुन्हांद्या विझूनी पुन्हा पेटणारे
असा भास व्हावा चितेच्या धगीचा,फुलावा जणु मोगरा चंदनात.
सुटे गार वारा उगवताना पहाट,जणु येतसे तु न्हाऊनि दवात.
पुन्हा फूलवीशी चित्तवृत्ती अशी की,जणु लाविशी तु पुन्हा सांजवात.
प्रिये तूच झालीस माझाच श्वास,पुरे व्यापिले तु रिक्त अंतरास.
जसा जीव वेडा राहे शरीरी,तसा राहतो मी तुझ्या कुंकवात.
--------योगेश जोशी
प्रतिक्रिया
7 Apr 2010 - 8:41 pm | बहुगुणी
जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात.
उराशी मला तु लपेटुनि घेता,मला ऐकले मी तुझ्या स्पंदनात.
पुन्हा फूलवीशी चित्तवृत्ती अशी की,जणु लाविशी तु पुन्हा सांजवात.
जसा जीव वेडा राहे शरीरी,तसा राहतो मी तुझ्या कुंकवात.
..या ओळी सुंदरच.
7 Apr 2010 - 9:08 pm | शुचि
चांगली आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
7 Apr 2010 - 9:31 pm | प्राजु
विना उत्तरे ती मिटे प्रश्न सारे,असे मौन होते दुवा साधणारे.
जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात.
सुटे गार वारा उगवताना पहाट,जणु येतसे तु न्हाऊनि दवात.
पुन्हा फूलवीशी चित्तवृत्ती अशी की,जणु लाविशी तु पुन्हा सांजवात.
फार सुरेख आहेत या ओळी.
संपूर्ण कविताच जणू एक स्वप्न आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
7 Apr 2010 - 9:34 pm | जयंत कुलकर्णी
क्या बात है !
जयंत कुलकर्णी
7 Apr 2010 - 10:02 pm | मीनल
खूप आवडली कविता .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
8 Apr 2010 - 3:58 am | पाषाणभेद
एकदम मस्त. आवडली.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
8 Apr 2010 - 7:33 am | स्पंदना
मला ऐकले मी तुझ्या स्पंदनात.
आई ग ! ह्रुदयात कळ आली हे वाचुन!!
अतिशय सुन्दर
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
8 Apr 2010 - 11:40 am | कानडाऊ योगेशु
उत्साहवर्धक प्रतिक्रीयांबद्दल आभार.. :)
(उत्साहीत)योगेश.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
8 Apr 2010 - 1:18 pm | निरन्जन वहालेकर
सुटे गार वारा उगवताना पहाट,जणु येतसे तु न्हाऊनि दवात.
कुठल्या कुठल्या ओळी आवडल्या म्हणून सांगू ? सगळी कविताच अप्रतिम ! ! ! अत्ती- अत्ती-अत्तीशय आवडली ! ! !
8 Apr 2010 - 9:24 pm | जयंत कुलकर्णी
ही कविता मित्रांमधे तुला श्रेय देऊन वाचली तर चालेल का ?
खरे तर बाळासाहेबांनी याला चाल लावली तर एक अविस्मरणीय गाणे होईल. मला त्यांचा ई-मेल माहीत नाही नाहीतर मीच पाठवले असते.
सुंदर कविता. वाचावी तेवढी अधिकच उलगडत जाते.
करत रहा कविता !
जयंत कुलकर्णी.
10 Apr 2010 - 9:43 am | कानडाऊ योगेशु
@जयंतराव.....
तुमची प्रतिक्रिया लाखमोलाची आहे. :)
तुमचे गुणगुणणेही ऐकले.छान झाले आहे.
(कविता जिथे ऐकवण्यासारखी असेल तिथे जरूर ऐकवा.)
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
8 Apr 2010 - 10:30 pm | बेसनलाडू
कविता फार आवडली. बव्हंशी गेयही आहे. उत्तम प्रणयकाव्य वाटते. काही ठिकाणी मात्रांमध्ये गोंधळ झाल्यासारखे वाटते (गुणगुणताना जरा अडखळायला झाले). काही ठिकाणी कर्ता-कर्म-क्रियापद संबंधात किंचित गडबड झाल्यासारखे वाटते. कवितेतील शब्दरचनेचा एकंदर बाज लक्षात घेता 'पुन्यांदा' सारखे शब्द टाळता आल्यास बरे वाटेल.
पण एकंदर काव्य खूपच सुंदर असल्याने अशा किरकोळ चुका म्हणजे या कवितेला तीट लावल्यासारख्या आहेत, असे समजलो. शक्यतो अशा चुका टाळता आल्यास उत्तम!
(आस्वादक)बेसनलाडू
9 Apr 2010 - 5:45 pm | धनंजय
कविता कल्पक आहे. एखादे कडवे सोडले तर गेय आहे.
एखादे कडवे इतके भन्नाट सुंदर कल्पना सुरू करते -
अत्यंत मधुर, उत्कंठावर्धक. तुला मोगर्याचा वास नाही, तर मोगर्याला तुझा सुगंध आहे, इतके उत्कट भाव. जगाच्या सौंदर्याचा स्रोत प्रिया आहे. मग पुढे काय झाले?
याचा आदल्या ओळीतल्या उत्कट हळुवार भावनेशी संबंध काय आहे? तुला सुगंध आहे तो मी माझ्यामुळे आहे? ढगामुळे मातीला गंध असल्यासारखा?
मात्र बर्याच ठिकाणी गूढता मला पचली नाही.
कंकण म्हणजे काकण म्हणजे बांगडी-पाटलीसारखे काहीतरी ना? मौन हे गोल काकणासारखे दुवा साधते??? कंकणात गुंगलो म्हणजे प्रश्न-मौन-श्वासाच्या संदर्भात काय झाले?
होय, मला ठाऊक आहे, की प्रयत्न केल्यास काहीतरी प्रेमळ अर्थ लावता येईल. पण श्रम करायचे मन होत नाही.
अतिशय सुंदर होऊ शकणार्या कवितेचा कच्चा मसुदा कवीने माझ्यासमोर ठेवला आहे असे वाटते आहे. एखादी नववधू हळद माखलेली, मेंदीने बरबटलेली, केस विस्कटलेली बघतो आहे. तिचे नैसर्गिक नाकी-डोळी नीटस रूप दिसते आहे, तासाभराने ती किती मोहक दिसणार आहे, त्याची कल्पना करू शकतो. पण सध्या तिच्याकडे टक लावून बघत राहावेसे वाटत नाही.
9 Apr 2010 - 7:13 pm | राघव
बेला, धनंजय शी सहमत.
कविता छानच. आणिक छान होऊ शकेल. शंका नाही!
एखादी नववधू हळद माखलेली, मेंदीने बरबटलेली, केस विस्कटलेली बघतो आहे. तिचे नैसर्गिक नाकी-डोळी नीटस रूप दिसते आहे, तासाभराने ती किती मोहक दिसणार आहे, त्याची कल्पना करू शकतो. पण सध्या तिच्याकडे टक लावून बघत राहावेसे वाटत नाही.
धनंजयशेठची ही प्रतिक्रिया फार सुंदर व बोलकी आहे.
पु.ले.शु. :)
राघव
9 Apr 2010 - 9:43 pm | जयंत कुलकर्णी
केस विसकटलेल्या स्त्रियांच्या सौंदर्यापेक्षा काय सुंदर असते ? ती दागिन्यांनि मढवलेली, बटबटीत शालू नेसलेली वधू ? छे ! पटत नाही.
पाहिजे असेल तर सकाळी ज्यू. के जी च्या बाहेर थोडा वेळ उभे राहून बघा ! :-) आणि संध्याकाळी रस्त्यावर बघा.
असो.
विना उत्तरे ती मिटे प्रश्न सारे,असे मौन होते दुवा साधणारे.
जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात.
याचा अर्थ असा असावा.
कवी भारावून तिच्या सौंदर्याच्या प्रभावाखाली सारे जग विसरलाय. साहजिकच संभाषणाला वावच नाही. पण त्याने त्यांच्यात communication नाही म्हणता की काय ? तन मन एकच झाल्यामुळे एवढे delayed communicationची काय गरज ? एकमेकांचे उत्तेजित श्वास एकामेकात मिसळ्ल्यावर कांकणांचा आवाजाने त्याला त्रास असेल्/नअसेलही झाला पण तो त्या नादातही दंग झाला.
अर्थात हे माझे मत झाले. कदाचित आपल्या सुचना जास्त technical असतील आणि त्या त्याला निश्चितच उपयोगी पडतील. पण ही उस्फुर्त कविता भावणारी आहे. आणि तेच कवितेचे काम आहे.
जयंत कुलकर्णी.
9 Apr 2010 - 10:52 pm | धनंजय
कंकणाच्या अर्थग्रहणाबद्दल धन्यवाद. असाच काहीसा अर्थ असावा.
- - -
उपमेचे उद्धरण अर्धवट झाले आहे.
इतकेच काय, मुळीच काहीही नट्टाफट्टा न केलेला स्वच्छ चेहरासुद्धा सुंदर दिसतो. याच कवीची "...विश्वामित्र..." ही कविता त्या प्रकारची.
विस्कटलेले केस कधीकधी चांगले दिसतात खरे. विशेषतः एखाद्या सुखद रात्रीनंतर जागल्यावर समोर विस्कटलेले केस दिसले, तर मनाला फार हुरहुर लागते.
उपमा अर्धवट नटलेल्या-बरबटलेल्या-विस्कटलेल्या स्थितीची आहे. एखाद्याला मेंदीने-हळदीने बरबटलेले अंग उद्दीप्त करत असेलही. त्यात काही भयंकर नाही. पण उपमा त्यांना समजणार नाही.
8 Apr 2010 - 11:54 pm | जयंत कुलकर्णी
http://www.mediafire.com/download.php?mwrmendq5my
मजा आली.
जयंत कुलकर्णी.
9 Apr 2010 - 1:21 pm | मदनबाण
सुरेख...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
9 Apr 2010 - 10:16 pm | अरुंधती
व्वा! सुरेख! आणि गेयताही आहे हे तर छानच! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
10 Apr 2010 - 9:49 am | कानडाऊ योगेशु
एखादी नववधू हळद माखलेली, मेंदीने बरबटलेली, केस विस्कटलेली बघतो आहे. तिचे नैसर्गिक नाकी-डोळी नीटस रूप दिसते आहे, तासाभराने ती किती मोहक दिसणार आहे, त्याची कल्पना करू शकतो.
एकमेकांचे उत्तेजित श्वास एकामेकात मिसळ्ल्यावर कांकणांचा आवाजाने त्याला त्रास असेल्/नअसेलही झाला पण तो त्या नादातही दंग झाला.
विस्कटलेले केस कधीकधी चांगले दिसतात खरे. विशेषतः एखाद्या सुखद रात्रीनंतर जागल्यावर समोर विस्कटलेले केस दिसले, तर मनाला फार हुरहुर लागते.
उफ्फ!!!
कवितेपेक्षा त्यातील प्रतिक्रियांतील कल्पनाच जास्त काव्यात्मक आहेत.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
10 Apr 2010 - 7:13 pm | sur_nair
चांगली कविता आहे. महंमद रफीच्या " प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता" http://www.dishant.com/jukebox.php?songid=66239 या गाण्याच्या चालीवर हे चपखल बसते.
11 Apr 2010 - 11:44 am | कानडाऊ योगेशु
ही कविता तार्किकतेच्या दृष्टीकोनातुन वाचण्यापेक्षा प्रतिमाप्रकटनाच्या उद्देशाने वाचली तर जी काही गूढता वाटते ती कदाचित वाटु शकणार नाही.
अत्युच्च पातळीवरचे कुठलेही सुख/दु:ख अनुभवताना माणुस ट्रान्स मध्ये जातो आणि पुन्हा तो अनुभव आठवायचे म्हटले तर फक्त संदीग्ध असेच आठवत राहते पण अनुभवलेला परिणाम मात्र नक्की आठवत राह्तो.
हे म्हणजे एखादे चांगले स्वप्न पडावे.पहाटे पहाटे जाग यावी.पण स्वप्न काही केल्या आठवु नये.पण स्वप्नातला मूड मात्र कायम आठवत असावा.आणि आठवताना पण ते तुकड्या तुकड्यात आठवते तसे काहीसा प्रकार ह्या कवितेत झाला आहे.
त्यामुळे
तुझा गंध येता पुन्हा मोगर्याला,तुझा रंग येता पुन्हा चांदण्याला.
जसा मेघ देई सुगंध मृत्तिकेला,तसा बरसलो मी तुझ्या अंगणात.
वरील दोन ओळीत काही संबध जरी दिसत नसला तरी दोन्ही ओळी
"गंध/रंग/रुप सारे काही एकरूप होणे" ह्या अवस्थेला दर्शवितात.
कदाचित ही कविता अजुन सुस्पष्ट करताही आली असती.पण एरव्ही जरी "मी ओळी जुळविणारा कवी असलो "तरी ह्या कवितेच्या बाबती मात्र कवितेच्या ओळी ह्या हातात हात घेवुन फिरणार्या जुळ्या बहीणींसारख्या सुचत गेल्या.त्यामुळे प्रस्तुतिकरणासाठी आवश्यक थोडेफार संस्कार करुन ही कविता सादर केली.
बाकी सर्वांचेच प्रतिसाद उत्साहवर्धक आणि कवितेवरील चर्चाही वाचनीय.!
(प्रफुल्लित)योगेश
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
12 Apr 2010 - 1:18 am | जयवी
सुरेख लय आहे कवितेत.....!!
काही कल्पना पण अप्रतिम !!
21 Jul 2017 - 5:14 am | सत्यजित...
कवितेतील बहुतेक ओळी स्वतंत्ररित्या खूप आवडल्या!
सखी-मीलनाची विहंगम सूक्ष्म अनुभूती शब्दबद्ध करताना...एखाद्या गजगामिनीचा कुठेतरी हलकेच तोल ढळावा...अशीच काहिशी कवीमनाची अवस्था झाली असावी,असे वाटले!
धाग्यावरील ईतर प्रतिसादांंतून झालेली चर्चाही सुरेख तथा आशादायक आहे!