नुकत्याच झालेल्या अर्थ अवर साठी मीमराठी संकेतस्थळ बंद ठेवून वीज वाचवण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर अनेक 'स्तुत्य प्रयत्न' अश्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यावर मी 'याचा उपयोग काय?' असा प्रश्न उपस्थित करून खूप लोकांच्या प्रामाणिक सद्भावना दुखावल्या असं वाटलं. उद्देश अर्थातच भावनांची टिंगल करण्याचा नव्हता, तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचा फोलपणा दाखवण्याचा होता. त्यावरील प्रतिक्रियांत 'तुम्हीच एक लेखमाला लिहा' असा सल्ला आला. म्हणून माझे विचार थोड्या विस्ताराने मांडून सर्वांना विचार करण्यास उद्युक्त करणं हा या लेखमालेचा उद्देश आहे.
सर्वसाधारणपणे काय लिहायचं आहे हे ठरलेलं असलं तरी या लेखमालेचा आकार नक्की काय असेल यावर फारसा विचार केलेला नाही. सौरऊर्जा कशी वापरता येईल (बेसुमार खर्च न करता) याविषयीच्या काही कल्पना मांडायच्या, व त्यामागचं गणित लोकांपुढे ठेवायचं या अनुषंगाने एक (किंवा दोन) लेख निश्चितच लिहीन. गणित व भावना हा मी फरक करतो त्यामागची भूमिका व माझी निरीक्षणं मांडेन. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा प्रश्न सोडवण्यासाठी काही तांत्रिक मार्ग असतात. ते मार्ग डोळसपणे अवलंबण्याऐवजी 'म्या मूर्खाने हे प्रश्न निर्माण केले' असं म्हणून स्वत:ला शिव्या देण्याचं काम आपण (किंवा बरेच लोक) वैयक्तिक जीवनातही करतो. तेच आपण मनुष्यजातीच्या पातळीवर करतो आहोत का, हे त्यातून बघायचं आहे. प्रत्येकच पिढीत विचारवंत 'हा अमुकतमुक महाभयानक, अशक्य प्रश्न आहे, व त्यातून विनाश अटळ आहे' असं वेगवेगळ्या प्रश्नांविषयी म्हणत आलेले आहेत (माल्थस वगैरे). मनुष्यजात अविरत कष्ट करून, नवीन तांत्रिक क्लुप्त्या वापरून ते प्रश्न सोडवते. ते प्रश्न जिवंत असताना त्यांच्याविषयी जितका हलकल्लोळ होताना दिसते, तितक्या प्रमाणात ते सुटल्याचा आनंद कोणी साजरा करत नाही. ते सोडवणाऱ्यांचा उदोउदो फार कमी वेळा होताना दिसतो. लोक नव्या भेडसावणाऱ्या 'महाभयानक, अशक्य' प्रश्नाकडे वळताना दिसतात. याची काही उदाहरणं मांडता आली तर पाहीन. सर्वसाधारण कॅटेस्ट्रोफ प्रेडीक्शन या नावाखाली जी भंपक गणितं केली जातात (चुकीची नव्हे, भंपक गृहितकांसहित) त्याविषयी एक चविष्ट लेख लिहिण्याची खूप दिवसांची इच्छा आहेच. मनुष्याच्या आत्मकेंद्री स्वभावाची विचारप्रवाहामध्ये उत्क्रांती कशी झालेली दिसून येते यावरही थोडं लेखन करावंसं वाटतंय. या सर्व फापटपसाऱ्यामुळे ऊर्जेची गणितं हे नाव कितपत सार्थ आहे हे माहीत नाही. पण आपण सुरूवात ऊर्जेच्या संदर्भात करतोय म्हणून व मला दुसरं नाव सुचलं नाही म्हणून हेच ठेवतो आहे. कोणाला जर अधिक चांगलं नाव सुचलं तर सुचवावं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर याच विचारधारांच्या कक्षेमध्ये सामावू शकणारे विषय सुचले तर तेही सुचवावेत.
पण लेखनाचा सूर जरी टीकेचा झाला तरी ती टीका सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करेन. पर्यावरणाचा प्रश्न नाहीच अशी भूमिका माझी नाही. ग्लोबल वॉर्मिंग नाकारण्याचा हेतू नाही. त्यात काही अंशी मनुष्य जबाबदार हेही मान्य आहे. फक्त तो प्रश्न, त्याची व्याप्ती, त्याचे परिणाम व तो सोडवण्यासाठी येणाऱ्या खर्चातून मिळणारा फायदा हा इतर प्रश्नांच्या शेजारी ठेवून किती महत्त्वाचा आहे याचा विचार करायला लावण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे तोच खर्च इतर प्रश्नांवर करून जर जास्त फायदा मिळत असेल तर पर्यावरण विषयावर (आत्ता) तो खर्च करून आपण मानवजातीचं (व अंती पर्यावरणाचं) नुकसान करतो आहोत का, हा विचार मांडण्याचा प्रयत्न राहील. यात 'लोकहो, परिस्थिती तितकी वाईट नाही. पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे. आपण बरेच प्रश्न सोडवले आहेत, त्याचप्रमाणे हाही सोडवता येईल. चला आपण काही करूया.' असं सांगण्याचा प्रयत्न राहील. त्यात कदाचित काही वेळा, 'हा प्रश्न सोडवण्याआधी जर हे इतर प्रश्न सोडवले तर ते अधिक फायद्याचं ठरेल' असाही संदेश येईल.
सद्यपरिस्थितीत पर्यावरणाचा मुद्दा हा अमेरिकेत ज्याला 'थर्ड रेल' म्हणतात असा आहे. (इथल्या ट्रेन्सना वीज पुरवण्यासाठी हा तिसरा रूळ असतो. त्याला स्पर्श करणं धोक्याचं असतं. त्यावर मुतू तर नयेच...) शांतपणे सगळे करतात त्याप्रमाणे पर्यावरण देवाला नमस्कार करायचा, त्याच्या पुजाऱ्यांना मुकाट्याने दक्षिणा द्यायची आणि पुढे जायचं ही 'महाजनो येन गतेन' प्रथा आहे. मला या देवळाची पवित्रता नाकारायची नाही, पण त्याचं स्तोम प्रमाणाबाहेर माजणं हे कदाचित ग्लोबल वॉर्मिंगपेक्षा अधिक हानिकारक असू शकेल असा मुद्दा मांडायचा आहे. या देवळामुळे अनेक प्रश्न अस्पृश्यासारखे बाहेर राहिलेले आहेत. ही पुजाऱ्यांना मान व पैसा, व अस्पृश्यांना हीन वागणूक अशी तफावत कमी करावी असा विचार आहे. शेवटी सर्व माणसंच आहेत...
वाचक माझं म्हणणं विचारपूर्वक लक्षात घेऊन भावनिक प्रतिक्रिया देणार नाहीत अशी आशा करतो...
प्रतिक्रिया
30 Mar 2010 - 4:59 pm | युयुत्सु
सौर जलतापक आणि गांडूळ खत हे दोन्ही प्रकल्प माझ्यापुरते तरी फसले आहेत. साप निघू लागल्याने गांडूळ खत प्रकल्प आवरावा लागला. सौर जलतापक थंडीत काम करत नाही आणि उन्हाळ्यात त्याचा उपयोग नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
30 Mar 2010 - 7:28 pm | मेघना भुस्कुटे
इंट्रेष्टिंग. (पुढे लिहा, वाट पाहते - असे लिहिणे अगदी जिवावर आले आहे. पण काही अर्थपूर्ण प्रतिसादाची भर घालण्याची पात्रता तूर्तास तरी नसल्यामुळे आणि उत्सुकता + दाद + उत्तेजन यांचे प्रकटन करणे आवश्यक वाटल्यामुळे) कवितकाच्या लेखमालेसारखी ही मागे रेंगाळू नये, ही शुभेच्छा.
30 Mar 2010 - 7:51 pm | विकास
लेखमालेचे स्वागत आणि शुभेच्छा! लेख चालू झाले की शक्यतितका सहभागी होईनच...
नुकत्याच झालेल्या अर्थ अवर साठी....उद्देश अर्थातच भावनांची टिंगल करण्याचा नव्हता, तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचा फोलपणा दाखवण्याचा होता.
या संदर्भात नक्की अर्थ अवरचा उद्देश काय होता हे फक्त एकदा येथे त्यांच्याच संकेतस्थळावरून सांगत आहे:
थोडक्यात याचा संबंध हा लोकशिक्षणाशी होता. १२५ देश, ४००० ठिकाणी, आयफेल टॉवर पासून ते अमेरिकेतील अनेक स्कायलाईन्स, राजकारण्यांची अधिकृत निवासस्थाने, आदी तसेच स्थानिक आणि राज्य सरकारे जेंव्हा यात भाग घेतात तेंव्हा ह्या समस्येबद्दल एकत्र काम करायचा संदेश जगातील सर्वच राजकारण्यांना स्वतःच्या कृतीतून देतात जो नुसते सह्यांच्या मोहीमेपेक्षा मोठा आहे. किमान राजकारण्यांना पत्र पाठवण्यासारखीच पण एक अधिक सक्रीय मोहीम आहे. (आणि मुखत्वे, त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहीतीत उर्जा किती वाचवली या पेक्षा किती लोकांपर्यंत ह्या प्रश्नाचे महत्व पोचले या बद्दलची माहीती आहे).
आता क्लायमेट चेंज कुणामुळे होतो हा मुद्दा जरी दोन बाजू मांडत असला तरी होतो आहे ह्या बाबत जास्त वाद नाही. "साक्षात" बुश साहेब तसेच अमेरिकेतील उजवे (राईटविंग) पण सुरवातीचा पवित्रा बदलून नंतर हे मानवनिर्मित आहे का नैसर्गिकचक्र आहे ह्याबद्दल वाद घालू लागले. इपिए आणि युएसजीएस च्या शास्त्रज्ञांवर बुश-चेनीच्या अधिकार्यांनी त्यांचा शास्त्रीय अहवाल बदलायचा दबाव आणला तो देखील याच कारणावर. तेंव्हा कुंपणाच्या कुठल्याही बाजूस असलो तरी हालचाली कराव्या लागणार आहेत हे वास्तव आहे असे वाटते. असो.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
30 Mar 2010 - 7:53 pm | शुचि
>> (इथल्या ट्रेन्सना वीज पुरवण्यासाठी हा तिसरा रूळ असतो. त्याला स्पर्श करणं धोक्याचं असतं. त्यावर मुतू तर नयेच...) >>
=)) =)) =))
"कॅटेस्ट्रोफ प्रेडीक्शन" वरच्या लेखाची वाट पाहतेय
सुरुवात आवडली....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
30 Mar 2010 - 8:05 pm | रेवती
उर्जा किती वाचवली या पेक्षा किती लोकांपर्यंत ह्या प्रश्नाचे महत्व पोचले या बद्दलची माहीती आहे
अगदी हाच विचार मनात आला.
लहान मुलांपर्यंत ही माहिती किती प्रभावीपणे पोहोचवली गेली हेही पहाण्यात आले. त्यांनी आधीच त्यांचे टीव्हीवरचे कार्यक्रम बघून घेतले किंवा तत्सम विनोदी वाटणार्या गोष्टी केल्या पण अर्थ अवर आहे म्हणून तरी हे केले गेले नाहीतर या मुद्द्याकडे लक्ष जात नाही. वीजवापराच्या मुद्द्यावर चर्चा मागच्या महिन्यात आमच्या घरी होण्याचे कारणही 'पॉवर आऊटेज' हेच होते. त्यावेळी कायकाय करावे वीज कशी वापरावी (अर्थात सगळ्यांनी.......त्यात आपणही असतो.;)) हे लहान मुलांना सांगण्याची वेळ फरच कमी येते म्हणून महत्वाचे वाटते.
बाकी ग्लोबलवॉर्मींगविषयी वाचण्यासाठी उत्सुक आहे.
ते प्रश्न जिवंत असताना त्यांच्याविषयी जितका हलकल्लोळ होताना दिसते, तितक्या प्रमाणात ते सुटल्याचा आनंद कोणी साजरा करत नाही.
फारच सहमत.बहुतेक त्या नव्या सोयीचा फायदा घेऊन सगळेजण आनंद साजरा करत असावेत.;)
रेवती
30 Mar 2010 - 10:03 pm | अक्षय पुर्णपात्रे
लेखमाला वाचण्यास उत्सुक आहे. सौरऊर्जा कमी खर्चात उत्पादन करता येण्याच्या गणितात घरगुती व औद्यिगिक वापर/ उत्पादन असा फरक जमल्यास करावा. तसेच सौरऊर्जेने निर्माण होणार्या वीजेस वाहून नेण्यासाठी जो खर्च (ट्रान्समिशन कॉस्ट) लागतो याचाही विचार करण्याचे सूचवू इच्छितो.