रस्ता ओलांडता

sur_nair's picture
sur_nair in जे न देखे रवी...
22 Mar 2010 - 7:05 am

रस्ता ओलांडता

आठवते चतुर्थीला गणपतीच्या देवळात
आईचा हात धरून दर्शन घेताना
आठवते अजून तो भरगर्दीतला रस्ता
बाबांचा हात धरून ओलांडताना

आठवतं अंधुकसं पहिल्यांदा जेव्हा
आईनं शाळेत सोडलं होतं
आठवतं जेव्हा, माझ्या हट्टाखातर
बाबांनी खांद्यावर घेतलं होतं

देवळात असो वा रस्ता ओलांडता
किती सुरक्षित आहोत वाटायचे
खांद्यावर बसून बाबांच्या मला
आपण उंच झालो असे भासायचे

पुढे वयाने मोठा, देहाने उंच झालो
शाळा- कोलेजात जाऊन सुशिक्षित झालो
अन रस्ता पार करता करता जाणवले
आपण एकटेच फक्त आता पुढे आलो

आई बाबा जसे होते तिथेच राहिले
रस्त्याच्या त्या दुसरया बाजूला
मधेच कधीतरी आमच्यामधला तो
रस्ता मात्र काहीसा रुंद झाला

रूढी परंपरा जरी त्याच असल्या
तरी आचार-विचारांचा फरक पडला
घर, भिंती, खिडक्या त्याच असल्या
तरी पडदे व भिंतींचा रंग मात्र बदलला

कधी येतो प्रश्न माझ्या मनात
होईल का पुन्हा तो रस्ता अरुंद?
गडद निळ्या रंगाची एखादीतरी
शोभेल का घरातली खोली वा भिंत?

समोरचा दिवा मग हिरवा होतो
अन गाड्यांचा ओंढा पुढे वाहतो
आरशात मुलांना हसताना पाहत
मीही आपली गाडी चालवू लागतो

सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/

करुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

निरन्जन वहालेकर's picture

22 Mar 2010 - 8:19 am | निरन्जन वहालेकर

आई बाबा जसे होते तिथेच राहिले
रस्त्याच्या त्या दुसरया बाजूला
मधेच कधीतरी आमच्यामधला तो
रस्ता मात्र काहीसा रुंद झाला

वा ! क्या बात है !Touching ! खुप आवडली.

राजेश घासकडवी's picture

22 Mar 2010 - 4:03 pm | राजेश घासकडवी

दोन पिढ्यांच्या मध्ये असणारा रस्ता (आई वडिलांनी ओलांडायला मदत केलेला व आता रुंद झालेला) हे सुंदर प्रतीक आहे. फक्त कवितेत ते प्रतीक आहे असं सांगणं जरा बाळबोध वाटलं.

राजेश

sur_nair's picture

22 Mar 2010 - 7:41 pm | sur_nair

राजेशजी,
तुमच्या 'प्रतिका' बद्दलच्या प्रतिक्रिया पाहून थोडा बदल केला आहे. वाचून पहा. धन्यवाद.

राजेश घासकडवी's picture

23 Mar 2010 - 4:09 am | राजेश घासकडवी

खूपच सुधारलेली आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Mar 2010 - 8:42 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री नायर, कविता चांगलीच झाली आहे.

रूढी परंपरा जरी त्याच असल्या
तरी आचार-विचारांचा फरक पडला
घर, भिंती, खिडक्या त्याच असल्या
तरी पडदे व भिंतींचा रंग मात्र बदलला

पण वरच्या ओळी अजुन सखोल हव्या आहेत. तो कवितेचा आत्मा आहे पण ओळींमध्ये आहे तितका सरळपणे पाहता येत नाही. सरळपणा नसला तरी याविषयीचे कुतूहल कवितेत अधिक सखोलपणे आले तर मजा येईल.