दत्तकविधान-१०

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
13 Mar 2010 - 12:45 am

मनस्वी त्याला कशी स्वीकारणार, हा आमच्यापुढे मोठा प्रश्‍न होता. तिची घरातली एकट्याची सद्दी संपेल, तिच्या कौतुकात, लाडांत वाटेकरी आल्यानं ती बिथरेल, टोकाची प्रतिक्रिया देईल अशी आम्हाला शंका होती. तिनं हा प्रश्‍न तिच्या निरागसपणानं आणि मनस्वितेनं चुटकीसरशी सोडवून टाकला आणि आम्हाला तोंडघशी पाडलं. आपल्याला भाऊ मिळाल्याचा केवढा आनंद झाला होता तिला! "त्याला आणायला आपण हॉस्पिटलमध्ये कसं गेलो नाही, आईला तिथे का ठेवावं लागलं नाही,' वगैरे कुठलेही प्रश्‍न तिला पडले नाहीत. किंबहुना, पडले असले, तरी तिला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. तिला खेळायला एक हक्काचं बाळ मिळालं होतं, बस्स! तिच्यासाठी तेवढं पुरेसं होतं. (आम्ही त्यासाठी करून ठेवलेली पूर्वतयारी आमच्यापाशीच राहिली.) त्याचं सगळं आता तिला करायचं होतं. त्याचे लंगोट बदलणं, त्याला दूध पाजणं, मांडीवर घेऊन खेळवणं, त्याला उचलून घेऊन घरभर मिरवणं...!
यातलं फक्त निम्मंच करायची आम्ही तिला परवानगी दिली होती. ती देखील आमच्या उपस्थितीत. तरीही, तो रडत असला, तरी दामटून त्याला मांडीवर घेऊन थोपटण्याची आणि पायांवर घेऊन दूध किंवा पाणी पाजण्याची हौस ती अधूनमधून भागवून घेतेच! त्यानं कितीही विरोध नोंदविला, तरी! त्याला अधूनमधून गोष्टीही सांगते आणि कधीकधी तर त्यानं अंगावर "शू' केल्यानंतर उदार मनानं त्याला माफ करते! आमच्या आधी ती त्याच्याशी एकरूप झाली! निरागसपणा कधीकधी जाणतेपणावरही मात करतो, तो असा!!
मनस्वीला लहानपणापासून आम्ही पाहिलं होतं, हाताळलं होतं. त्यामुळं तिचं दुखणंखुपणं माहित होतं. या बाळाचं सगळंच नवं होतं. त्याला दर तीन तासांनी खायला घालावं लागत होतं. रात्रीसुद्धा! त्यामुळे रात्री खाल्ल्यापासून बरोब्बर तीन तासांनी तो गजर लावल्यासारखा किंचाळून उठायचा आणि दूध गरम करून पुन्हा थंड करून आणेपर्यंत घर आणि सोसायटी डोक्‍यावर घ्यायचा. त्याची बाटलीच्या दुधाची सवय मोडायची होती. त्यासाठी जंगजंग पछाडावं लागलं. त्याच्या तोंडाला साजेसा चमचा मिळणं, तो हिरड्यांना, ओठाला न लागता त्याला व्यवस्थित दूध किंवा खाणं खायला घालता येणं, ही अग्निपरीक्षाच होती. त्यातून "बाटलीची माझी सवय मोडणारे तुम्ही कोण,' या अहमहमिकेनं तो जमेल त्या पद्धतीनं वाटी-चमच्याचा निषेध नोंदवायचा. डॉक्‍टरांनी आम्हाला सुपाचा चमचा वापरायचा सल्ला दिला, तो पथ्यावर पडला. सुपाच्या चमच्यानं तो छान दूध पिऊ लागला आणि त्याला होणारा त्रासही कमी झाला. पण हा प्रयोग फक्त दोन-तीन दिवसच करावा लागला. नंतर त्याला नेहमीच्या वाटीचमच्याची छान सवय झाली.
हळूहळू बेट्यानं उजव्या हाताचं दुसरं बोट तोंडात घालायची छान सवय लावून घेतली आणि रात्री दर तीन तासांनी किंचाळून उठणंही कमी झालं. फक्त त्याला गुंडाळून ठेवलेलं असेल आणि बराच आटापिटा करूनही हात बाहेर काढता आला नाही, तर तो आकाशपाताळ एक करायचा, तेवढंच. त्यामुळे कधीकधी तर बिचारा बोटं चोखण्याच्या नादात आपली भूकही मारून टाकायचा. मग कधीतरी अपरात्री त्याच्या बोटं चोखण्याच्या आवाजानंच जाग यायची आणि त्याला खायला घालण्याची तारांबळ उडायची.
त्याची किरकोळ आजारपणंही घरी आल्यावर बरी झाली आणि आम्ही सुटकेचा निःश्‍वास टाकला. आता निमिष आमच्या घरात छान रुळलाय. मनस्वी आणि त्याच्यात समतोल साधणं, दोघांना तेवढंच प्रेम देणं आणि दटावणं आणि छान पद्धतीनं वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. यश येईल, अशी अपेक्षा!

ता. क.
...एक सांगायचंच राहिलं. निमिषला सांभाळायला आता घरी एक बाईही येऊ लागल्या आहेत. हर्षदा थोड्याच दिवसांत ऑफिसला जॉइन होईल. त्यामुळं या बाईंचा घरी आधार. त्याची "बाटली'ची सवय आम्ही लहानपणीच सोडवली. आता "बाई'ची सवय लागल्यास आमचा नाइलाज आहे!
(समाप्त) (हुश्‍श!! वाचक सुटले एकदाचे!!!)

दत्तकविधान-9

manu n nimish1 017
आता ही बया मला काय भरवत्येय कुणास ठाऊक!

manu n nimish1 005
...आणि हा माझ्या आवडीचा सर्वांत धमाल मूड!!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

शुचि's picture

13 Mar 2010 - 12:55 am | शुचि

शेवटच्या या प्रकरणात .... बाळ रुळल्याचं वाचलं अन डोळ्यात पाणी आलं.....
अ-प्र-ति-म लेखमाला.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

मुक्तसुनीत's picture

18 Mar 2010 - 2:19 am | मुक्तसुनीत

शब्द संपले.

स्मिता चौगुले's picture

19 Feb 2013 - 11:20 am | स्मिता चौगुले

असेच झाले

समिधा's picture

13 Mar 2010 - 1:02 am | समिधा

खुपच छान आहेत दोघांचे फोटो. =D>
सगळे लेख आत्ताच वाचले ......... दोघांचा फोटो बघुन आनंदाने डोळ्यात पाणी आल..
तुमच्या कुटूंबाला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

समिधा

अभिज्ञ's picture

17 Mar 2010 - 11:40 pm | अभिज्ञ

अगदि हेच म्हणतो.
स्टॅंडींग ओव्हेशन टु अभिजीत,हर्षदा आणि मनस्वी.

अभिज्ञ.

piu's picture

13 Mar 2010 - 1:07 am | piu

सुरेख लेखमाला !! तुमचे व तुमच्या पत्निचे अभिनन्दन!!
मनस्वि व निमिश फारच भाग्यवान आहेत

मेघवेडा's picture

13 Mar 2010 - 1:09 am | मेघवेडा

सर्व लेख झाले की प्रतिसाद लिहिन असं ठरवलं होतं आणि आता लेखमाला पूर्ण झालिये तर 'आपण काय बोलणार' अशी भावना झालिये!

लेखमालेबद्दल दोनच शब्द..

केवळ अप्रतिम!

तुम्हा दोघांना सलाम!! मनस्वीचंही फार कौतुक वाटतं!! तिच्याकडूनही धडा घेण्यासारखा आहे!! तुमचं चौकोनी कुटुंब सदैव आनंदात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

.. आणि शेवटचा फोटो खासच आहे!!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

अस्मी's picture

15 Mar 2010 - 4:33 pm | अस्मी

सर्व लेख झाले की प्रतिसाद लिहिन असं ठरवलं होतं आणि आता लेखमाला पूर्ण झालिये तर 'आपण काय बोलणार' अशी भावना झालिये!

लेखमालेबद्दल दोनच शब्द..

केवळ अप्रतिम!

असेच म्हणते!!!

- मधुमती

चतुरंग's picture

13 Mar 2010 - 1:26 am | चतुरंग

गदिमांना शरण जातो

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार!

माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळशी सर्व पसारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार!

(साश्रू)चतुरंग

अनामिक's picture

13 Mar 2010 - 1:37 am | अनामिक

अगदी अगदी...

-(साश्रू) अनामिक

प्राजु's picture

13 Mar 2010 - 2:50 am | प्राजु

अगदी हेच आलं मनांत.
अभिजीत, तुझं, हर्षदा आणि मनस्वीचं मनापासून अभिनंदन.
फोटो सगळेच छान आले आहेत.
निमिष आणि मनस्वीचं बालपण खूप गोजिरं असेल... नक्कीच! आणि ते तुम्हा सर्वांना एका धाग्यात कायमचं बांधणारं ठरेल.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

स्वाती दिनेश's picture

13 Mar 2010 - 9:25 pm | स्वाती दिनेश

अभिजीत, तुझं, हर्षदा आणि मनस्वीचं मनापासून अभिनंदन.
फोटो सगळेच छान आले आहेत.
निमिष आणि मनस्वीचं बालपण खूप गोजिरं असेल... नक्कीच! आणि ते तुम्हा सर्वांना एका धाग्यात कायमचं बांधणारं ठरेल.
अगदी असेच..
स्वाती

मीनल's picture

13 Mar 2010 - 1:28 am | मीनल

शेवटाचा फोटो हा तूमची फलष्रुती म्हणायला हरकत नाही.
तूम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा.
मीनल.

रेवती's picture

13 Mar 2010 - 1:37 am | रेवती

मस्त, मस्त, मस्त!!!
ग्रेट लेखमाला!
आपल्या कुटुंबाला हार्दीक शुभेच्छा!

रेवती

अरुंधती's picture

13 Mar 2010 - 1:41 am | अरुंधती

केवळ अप्रतिम झाली आहे लेख-माला! आणि ती तुमच्या प्रत्यक्ष अनुभवातून साकारल्यामुळे त्याला अजून वेगळेच परिमाण लाभले आहे. तुम्ही घेतलेल्या व पूर्ण केलेल्या निर्णयाबद्दल तुमचे व तुमच्या सर्व परिवाराचे अभिनन्दन व हार्दिक शुभेच्छा! फोटोज बोलके आहेत! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

सखी's picture

13 Mar 2010 - 5:32 am | सखी

तुमचे व तुमच्या सर्व परिवाराचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा. यश नक्कीच मिळेल.

स्वप्निल..'s picture

13 Mar 2010 - 2:00 am | स्वप्निल..

सलाम तुम्हाला !!

तुमचे व तुमच्या सर्व परिवाराचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!

स्वप्निल

अश्विनीका's picture

13 Mar 2010 - 4:02 am | अश्विनीका

अप्रतिम लेखमाला. मूल दत्तक घेण्याचा आपला निर्णय खूप कौतुकास्पद आहे. आपले व आपल्या कुटुंबाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

दत्तक घेण्यासाठी लहान बाळांची मोठी वेट लिस्ट असली तरी मोठ्या मुलांची संख्या अशा संस्थेत लहान बाळांच्या तुलनेत बहुधा जास्त असावी असे वाटते.
आमच्या ओळखीत ४-५ वर्षापूर्वी एका जोडप्याने 'श्रीवत्स' मधून दोन अडिच वर्षाचा मुलगा दत्तक घेतला. ह्या जोडप्याने एका मुलाची निवड आधीच करून ठेवली होती पण मुलाला घरी आणण्यापूर्वी १ महिना (भावी) आईला रोज संस्थेत जाउन मुलाबरोबर काही तास घालवावे लागणार होते. तशी अटच होती. त्या सांगत असत की मी संस्थेत गेले की इतर मुले पण माझ्याभोवती जमा होत. ह्या आईने आपल्या बरोबर पण खेळावे , बोलावे असे सर्वच मुलांना वाटे . ह्या सर्व निरागस मुलांमधून फक्त एकाशीच जवळीक साधायची आणि त्याला एकट्यालाच घरी घेउन जायचे हा विचार त्यांच्यासाठी फार त्रासदायक होता. (जरी एक मूल घरात येणार हे सुखदायक असले तरी ..महिनाभर इतर मुलांचा ही लळा लागल्याने).
आता हा मुलगा ५-६ वर्षाचा मोठा झाला आहे आणि त्यांच्या घरात छान रूळला आहे.

- अश्विनी

संदीप चित्रे's picture

13 Mar 2010 - 9:42 am | संदीप चित्रे

तुझं, हर्षदाचे आणि सर्व कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन.
रोज मिपावर आलो की आधी तुझ्या ह्या लेखमालेचे पुढचे भाग आले आहेत का ते बघायचो. मनस्वी आणि निमिषच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !
---------
ता.क. -- तुझा ता.क.ही आवडला :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

श्रावण मोडक's picture

13 Mar 2010 - 9:46 am | श्रावण मोडक

छान रे. एका छोटेखानी पुस्तकाचं मटेरियल आहे याच्यात... :)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2010 - 10:17 am | बिपिन कार्यकर्ते

शेवट वाचे वाचे पर्यंत भरून / गलबलून आलं होतं... नंतर कळलं की मी एकटाच नाहीये... सलाम लेका... तुम्हा सगळ्यांनाच. मला हे जमेल की नाही याबद्दल खात्री नाही देता येणार.

बिपिन कार्यकर्ते

सुप्रिया's picture

13 Mar 2010 - 11:15 am | सुप्रिया

अप्रतिम लेखमाला. बस्स् इतकचं बोलू शकते.

झकासराव's picture

13 Mar 2010 - 11:25 am | झकासराव

सलाम मालक.
बास अजुन काय बोलु. :)

समंजस's picture

13 Mar 2010 - 2:14 pm | समंजस

अभिजितराव, एक धाडसी व कौतुकास्पद निर्णय घेउन तो यशस्वीरीत्या पुर्णत्त्वास आणल्यामुळे, तुमचं व तुमच्या पत्निचं अभिनंदन!!!
=D>

प्रभो's picture

13 Mar 2010 - 8:57 pm | प्रभो

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

विसोबा खेचर's picture

13 Mar 2010 - 3:44 pm | विसोबा खेचर

मिपाचा दर्जा खूप खूप उंचावला..

जियो अभिजितराव!

तात्या.

आपला अभिजित's picture

16 Mar 2010 - 11:03 am | आपला अभिजित

दत्तक मुलाचा निर्णय डिसेंबरमध्ये अमलात आला, तेव्हापासून त्याविषयी नक्की कधी लिहावं, याबद्दल साशंक होतो. निमिष आमच्या घरात रुळल्यावर आता लिहावं, असं ठरवलं.

कुठे, किती आणि कसं लिहावं, हे ठरत नव्हतं. पहिल्या लेखाची सुरवात केली, नि वाटलं छान रंगतेय कहाणी. दोन किंवा जास्तीत जास्त तीन भागांत संपेल, असं वाटलं होतं. पण रंगत वाढत गेली. वाचकांच्याही छान प्रतिक्रिया आल्या. माझ्या वैयक्तिक कहाणीत त्यांनाही खूप रस असल्याचं वाटलं, म्हणून थोडं आणखी फुलवून लिहिलं.

आधी स्वतःच्या ब्लॉगवर लिहायचं मनात होतं. पण ब्लॉगविश्वाला हल्ली फारच मर्यादा आलेय. मग `मिपा'च्या साम्राज्यातच आपली तुतारी फुंकावी असं निश्चित केलं. `नवरत्नां'ची कदर करणारी बरीच `नर (आणि नारी) रत्नं` इथे आहेत, याची खात्री होतीच!!

घरी लिहायचं, ऑफिसात जाऊन ते युनिकोडात टाकायचं नि मग मिपावर पोस्ट करायचं, असे उद्योग तीन दिवस करावे लागले. भलताच त्रास तो! :T पण हे सगळं करण्यात गंमत आली. वाचकांच्या उत्साही प्रतिसादामुळं या कष्टांचं चीजही झालं. प्रत्येकाचा नाव घेऊन उल्लेख शक्य नाही, पण सर्वांना धन्यवाद!! `मिपाचा दर्जा उंचावला' हा तात्यांचा प्रतिसाद ही या लेखमालेची सर्वांत मोठी पावती म्हणायला हवी.

ही मालिका ब्लॉगवर सुरू केली, पण शेवटचे भाग मिपावर आधी टाकले, यातच सर्व काही आलं!! :)

दहा भागांचा हा `छळ' मनापासून सहन करून प्रतिक्रियाही दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद! :)
...आणि भविष्यकाळातील `छळा'साठी शुभेच्छा!!! ;)

प्रमोद्_पुणे's picture

17 Mar 2010 - 6:42 pm | प्रमोद्_पुणे

तुमचे, मनस्वीचे आणि तुमच्या पत्निचे अभिनंदन...अप्रतिम लेखमाला..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2010 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिजीत .... छ्या, काही सुचत नाही आहे. निमिष आणि मनस्वी दोघं मोठे झाल्यावर लिहायला लागले तर कधी ना कधी "आमचे आई-बाबा" या विषयावर भरभरून लिहीतील ...

अदिती

शाहरुख's picture

18 Mar 2010 - 2:15 am | शाहरुख

=D> =D>

बॅटमॅन's picture

18 Feb 2013 - 6:42 pm | बॅटमॅन

_/\_

कपिलमुनी's picture

6 May 2013 - 1:19 am | कपिलमुनी

सुंदर लेखमाला..
सेंण्टी झालो यार !!

लॉरी टांगटूंगकर's picture

6 May 2013 - 7:30 pm | लॉरी टांगटूंगकर

सलाम घ्या देवा _/\_

नेमकं काय वाटतंय सांगायला शब्द नाहीयेत, निव्वळ अप्रतिम. सुरेख गाणं झालं की काहीच उरत नाही बोलायला तसं झालंय,

पूर्ण लेखमाला आज वाचली. १०-९-८ करत सगळे भाग उघडले नि सुरुवातीपासून वाचत आलो.
सातव्या आठव्या भागानंतर शब्दच दिसेनात. गलबलून आलं.

नि:शब्द.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 6:22 pm | ढालगज भवानी

समे हीअर!! गलबलून येते वाचताना.

कोमल's picture

6 May 2013 - 7:17 pm | कोमल

अगदी असेच झाले..

मुक्त विहारि's picture

6 May 2013 - 6:24 pm | मुक्त विहारि

झक्कास..

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2014 - 2:31 pm | पिलीयन रायडर

कित्ती सुंदर लिहीलय!! हा भाग तर संपुर्ण लेखमालेतील सर्वोत्तम लेख आहे.. त्यात बाळाचं वर्णन ऐकुन तर एकदम जुने दिवस आठवले.. धावपळ.. दुधाच्या बाटल्या.. लॅक्टोजेनचे डबे..!!

सध्या घरात ताई दत्तक बाळ घेत आहे. तिने ठरवल्यावर जेव्हा चौकशी केली तेव्हा ३-५ वर्षाचे वेटिंग सांगण्यात आले. मलाही इतका वेळ ऐकुन खुप धक्का बसला. पण गंमत म्हणजे जेव्हा ती संस्थेला भेटायला गेली तेव्हा एक सव्वा वर्षाची मुलगी केवळ काळी आहे म्हणुन कुणाकडे दत्तक जात नाहीये.. खरं तर ती अत्यंत निरोगी मुलगी आहे, डोळेही खुप सुंदर आहेत. पण "कॅलेंडर बेबी" नसल्याने (आणि त्यात काळी असल्याने..) कुणी तिला घेत नाही असे कळाले.. आम्ही ताबडतोब तिला पसंत केले! म्हण्लं आम्हाला हिच भाची हवी.. ताबडतोब प्रोसिजर सुरु झाली आहे.. कदचित येईलही ती ८-१० दिवसात!!! आम्ही धडाक्याने खरेदी सुरु केली आहेच..

भारीच! नव्या बाहुलीशी खेळा आता!

वा वा!!! अभिनंदन!!! तिच्याशी बॉन्डींग करण्याचा प्रयत्न आत्तापासूनच सुरु करा. माझ्या मुलीच्या शाळेत एक भारतीय मुलगी आहे जिला अमेरीकन पालकांनी दत्तक घेतलेले आहे.

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2014 - 1:09 pm | पिलीयन रायडर

हो.. तिच्या साठी खुप खेळणे , कपडे, पुस्तकं वगैरे घेत आहोतच..

पण ताई साठी "डोहाळजेवण" करावं अशीही इच्छा आहे. तिचे हे पहिलेच मुल. तिची हौस कधी पुर्ण होणार? म्हणुन आम्ही तिला एक दिवस खास बागेत नेऊन, तिच्या आवडिचे पदार्थ करणार आहोत.. तिला आणि तिच्या मिस्टरांना गिफ्ट्स देऊ. तिला बाळ होणार म्हणुन तिचं कौतुक करु!! एक दिवस खास तिचा!

वरच्या प्रतिसादात "कॅलेंडर बेबी नसल्याने" असा शब्दप्रयोग आलाय. याचा अर्थ काय?

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2014 - 4:29 pm | पिलीयन रायडर

म्हणजे कॅलेंडर मध्ये जशी सुंदर बाळं असतात.. गोरी गोरी.. गुबरी गुबरी.. एकदम गुग्लि वुग्ली वुश्श टाईप.. तशी..

लोकांना जनरली तशीच बाळं हवी असतात..

मेघना मन्दार's picture

22 Apr 2014 - 3:15 pm | मेघना मन्दार

सगळी लेखमाला एकदम वाचुन काढली. खुप च छान लिहिली आहे.. :-)

भाते's picture

6 Mar 2016 - 1:37 pm | भाते

१० पासुन १ पर्यंतचे सगळे धागे उघडुन पहिल्यापासुन सलग एकत्र वाचले. आधीच्या धाग्यांवरचे प्रतिसाद वाचले नाहीत.
अप्रतिम. छान लिहिलंय.

प्रियाजी's picture

7 Mar 2016 - 5:35 pm | प्रियाजी

अभिजित, हा भाग आत्ताच वाचला. फार आवडला. आत सवडीने सर्व भाग वाचणार आहे. भाते, हा धागा वर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

सविता००१'s picture

7 Mar 2016 - 5:57 pm | सविता००१

अप्रतिम लेखमाला.
सगळे धागे आजच वाचले. खरच, प्रियाजी यांच्यासारखंच म्हणते - भाते, हा धागा वर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद.