सरसेनापती नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हणत असत हे सर्वांना माहीत आहे परंतू प्रति तानाजी आणि प्रति बाजिप्रभू फारसे कोणाला माहीत नाहीत म्हणून हा खटाटोप!
तानाजी मालूसरे यांनी रात्रीच्या अंधारात कडा चढून जाऊन किल्ले सिंहगड सर केला होता त्याचप्रमाणे कानोजी (का कान्होजी) यांनी किल्ले पन्हाळा सर केला होता. आनंदराव मकाजी आणि कानोजी हे दोघे पन्हाळा सर करावयाला गेले होते. सिद्दी जोहर ला पन्हाळा द्यावा लागला हे शल्य शिवरायांना सारखे सलत होते! त्यामूळे ही मोहीम हाती घेण्यात आली होती. आधी ठरल्याप्रमाणे कानोजीने कडा चढून जायाचे आणि आनंदराव मकाजी यांनी खालून ह्ल्ला चढवायचा व गड सर करायचा असा बेत ठरला होता. परंतू कानोजी ने ती वेळच येऊ दिली नाहि. फक्त ६० लोकांना घेऊन कानोजी कडा चढून वर गेले, आणि किल्ल्यावर चहूकडे पसरले, चहुबाजूने एकदम कर्णे वाजवून त्यांनी "हर हर महादेव" अशी गर्जना करून एकच हल्ला बोल केला. गडावर त्यावेळी जवळ जवळ १५०० अदिलशाही शिबंन्दी होती. परंतू ते इतके गोंधळून गेले की फक्त ६० लोकांना ते सरळ शरण आले! ६० मावळ्यातील एकही मावळा दगावला नाही! ६० लोकांनी १५०० च्या फौजेचा पराभव केला!
बाजिप्रभूंनी ज्याप्रमाणे ३/४ तास पावनखिंड अडवून ठेवली होती त्याप्रमाणे रामजी पांगारा यांनी चांभारगडाजवळ दिलेरखानाला अडवून ठेवले होते! प्रतापराव गुजर आणि मोरोपंत साल्हेर गडाला वेढा घालून बसले होते. साल्हेर हा बागलाणातील अत्यंत महत्वाचा किल्ला होता. मोठी फौज वेढा घालून बसली होती, दिलेरखानाला ही गोष्ट कळल्यावर तो बर्हाणपूर हून मोठी फौज घेऊन वेढा मोडून काढण्यासाठी निघाला. वाटेत त्याला दुसरा मुरारबाजी भेटला! रामजी पांगारा तेंव्हा चांभारगडाचे किल्लेदार होते, गडावरील ६०० मावळे दिलेरखानाला अडवायला गडाजवळील खिंडीत दबा धरून बसले! दिलेरखानाला त्यांनी तसूभरही पूढे सरकू दिले नाही! सर्व ६०० मावळे कामी आले!
प्रतिक्रिया
14 Mar 2010 - 11:48 am | आशिष सुर्वे
माझ्या वाचनात कधीही न आलेली माहिती.. आपले शतश: धन्यवाद..
.. वाचूनच अंगावर काटा आला! आणि स्वराज्यासाठी प्राणाचे मोल देणार्या मावळ्यांबद्दल आदर आणि अभिमान उरी दाटून आला.
======================
विंदांना भावांजली..
14 Mar 2010 - 12:00 pm | अमोल खरे
असेच म्हणतो. अशा अनेक कथा कुठेतरी गडप होतात. काही महिन्यांपुर्वी मिपाच्या ठाणे कट्ट्याला सर्वसाक्षी आले होते तेव्हा त्यांच्याकडुन अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या कथा ऐकल्या होत्या. त्या कथा इतिहासाच्या पुस्तकात नाहीत. हरवुन गेल्या कुठेतरी. पानिपतचेही असेच. इतके मराठी लोक गमावले.........मला तर वाटते की जर पानिपत आपण जिंकले असते तर आज असली सॉलिड पोजिशन असती मराठी लोकांची........असो.
एक चांगली घटना सांगितल्याबद्दल लेखकाचे आभार.
14 Mar 2010 - 12:40 pm | II विकास II
>>मला तर वाटते की जर पानिपत आपण जिंकले असते तर आज असली सॉलिड पोजिशन असती मराठी लोकांची........असो.
असे म्हणणे जरा पुर्णपणे खरे होणार नाही.
जेव्हा सैन्य लढाईचे काम सोडुन यात्रेकरुसारखे होउ लागते, तेव्हा हे असले विजय अति-आत्मविश्वास देउ शकतात. त्यामुळे नुकसान नक्कीच होणार.
पानिपतच्या पराभवाने नुकसान तर झालेच आहे. पण मला वाटते की थोरल्या माधवराव पेशव्यांच्या अकाली मृत्युने जास्त नुकसान केले आहे.
>>त्या कथा इतिहासाच्या पुस्तकात नाहीत.
ह्या सगळ्या कथा लिखित रुपात आल्या चांगलेच होईल.
(लेखनाबरोबर, ह्या सगळ्या कथांचे संदर्भ मिळु मिळु शकतील काय?)
14 Mar 2010 - 12:43 pm | नितिनकरमरकर
भरभरून लिहायचे होते पण लिखाणाची सवय नाही! प्रोत्साहनासाठी धन्यवाद!
14 Mar 2010 - 11:54 am | विसोबा खेचर
राजांना आणि जिवाला जीव देणार्या त्यांच्या सवंगड्यांना मानाचा मुजरा..!
तात्या.
14 Mar 2010 - 1:52 pm | क्लिंटन
छान माहिती. लिहायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा आपोआप सवय होईल. मराठ्यांच्या इतिहासावर अजून लेख येऊ देत.
बाकी मी वाचन केल्याप्रमाणे पन्हाळा किल्ला कोंडाजी फर्जंदने ६० मावळ्यांना बरोबर घेऊन जिंकला कानोजीने नाही. याच कोंडाजीला हाताशी धरून पुढे संभाजीराजांनी जंजिरा जिंकायचा धाडसी प्रयत्न केला होता. पण त्यात कोंडाजी फर्जंदांना सिद्दीने मारले आणि तो डाव फिसकटला.
असो.या आणि अशा ज्ञात-अज्ञात असंख्य वीरांना शतश: नमन.
14 Mar 2010 - 10:22 pm | अर्धवटराव
माझ्याही वाचनात असचं आलय की कोंडाजी फर्झंद ने पन्हाळा सर केला. त्यावेळी अनाजी दत्तो त्याच्या मदतीला गडाखाली दबा धरुन बसले होते, पण त्यांना मैदानात उतरायची गरजच पडली नाही. हा कोंडाजी हिरोजी फर्झंदचा भाउ होता. आग्र्याहून महाराज निसटले तेव्हा हीरोजी त्यांच्या जागी पलंगावर झोपून राहीला आणी महाराजांना एका रात्रीची दौड मारता आली. पण दुर्दैव बघा, हेच हीरोजी आणी अनाजी दत्तो संभाजीराज्यांशी एकनीष्ठ नाही राहीले... त्यांना संभाजीने म्रुत्युदंड दीला :(
(शहाजी-शीवाजी-संभाजी या भोसले त्रयींचा भक्त) अर्धवटराव
रेडि टु थिंक
14 Mar 2010 - 2:53 pm | Pain
या दोन्हि गोश्टी तसेच बहिर्जी नाईक यान्ची गोष्ट छोट्या पुस्तकान्मधुन वाचल्या आहेत. (प्रत्येकी १, एका पुस्तकात)
14 Mar 2010 - 2:55 pm | Pain
@ लेखक
तुम्हि जपानमध्ये आहात / होता का ?
16 Mar 2010 - 8:35 am | नितिनकरमरकर
होय २००५ पर्यंत, सध्या इंडोनेशियात आहे
14 Mar 2010 - 10:56 pm | राघव
माझ्या माहितीप्रमाणे केवळ ६० लोकांनीशी पन्हाळा सर करणारे वीर कोंडाजी फर्जंद होत. हे तेच, जे शंभूराजांच्या काळात जंजीरा सर करण्याच्या प्रयत्नात कामी आलेत. या लढाईच्या अगोदर मिर्झाराजांच्या वेळच्या तहानंतर खुद्द महाराजांनी पन्हाळ्यावर चढाई केलेली पण त्यांना यश आले नाही. याचनंतर नेताजींचा अन् महाराजांचा कथित बेबनाव झाला अन् नेताजी नंतर मुघलांना जाऊन मिळालेत.
रामजी पांगारा नव्हेत, रामाजी पांगारे. एकंदर जवळपास ७०० मावळे उभे होतेत. दिलेरखान जवळ-जवळ १५००० फौजेनिशी येत होता. पण या लढाईचा अंत काय झाला ते ठाऊक नाही. श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या उल्लेखानुसार, "दिलेरखान पळून गेलेला असण्यास वाव आहे!"
पण बाकी काहीही असो, हे लोक असे लढलेले ऐकले की त्यांना लोटांगणे घालाविशी वाटतात, त्यांच्यावरून जीव ओवाळावासा वाटतो. अहो, १५००० सैन्यापुढे केवळ ७०० आहोत हा आकडा या लोकांनी कधी ध्यानात घेतलेलाच वाटत नाही. शत्रू कुणीही अन् कितीही असो, फोडून काढायचे; एवढेच या लोकांना कळत असावे! खात्रीने सांगतो ते सर्व सुलतानी सैन्य पार वेडं होत असणार..!!
राघव
16 Mar 2010 - 8:38 am | नितिनकरमरकर
बरोबर आहे, चुक दाखवल्याबद्दल आभार
15 Mar 2010 - 8:01 am | प्रभो
सुंदर माहिती...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी