सांजवेळ

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
22 Feb 2010 - 12:19 am

सावल्या लांब व्हायला लागल्या तशी सूर्याला आपल्या विश्रांतीची वेळ झाल्याची जाणीव होते. आपली मंदावलेली सोनसळी किरणं गोळा करुन तो निघतो. दूरवर हलकेच पैंजणांचा आवाज येतो....तो वळून बघतो. आपली पायघोळ काळी चंद्रकळा नेसून...यामिनी नखशिखान्त चांदणं लेवून.....आकाशाच्या दर्पणात आपलं प्रतिबिंब न्याहाळताना त्याला दिसते. तो कौतुकाने हसतो. रोज तितक्याच तल्लीनतेने तिचं त्या दर्पणात न्याहाळण्याचं त्याला कौतुक वाटतं. तो कित्येकदा ते बोलूनही दाखवतो. तीही दिलखुलासपणे ते मान्य करते. रोज पहाटे डोंगरमाथ्यावरुन हळूच डोकावताना आणि नंतर हळुहळु सगळ्या आसमंतावर अधिराज्य गाजवताना त्याला स्वत:बद्दलचा वाटणारा अभिमान !! रोज तेवढ्याच अभिमानानं त्याचं तिला आव्हान करणं !! हे ती सुद्धा तेवढ्याच उन्मेषाने स्विकारत असते....रोजच !! अर्थात तिच्या अथांग डोहात तो ही विरघळतोच.....रोज !! तिचं ते देखणं सावळेपण त्याला भुरळ पाडतं. अजूनही तिची ती जादू तशीच कायम आहे.

कधी तो वरचढ तर कधी ती सम्राज्ञी !! कधी त्याची सपशेल हार तर कधी ती दुबळी!! तिचं आरस्पानी, नितळ सौंदर्य...... त्याचं तेज, त्याची झळाळी ! दोघेही तोडीस तोड !

या दोघांच्या रागानुरागात सृष्टी मात्र बहरत असते. तिला दोघांचंही केवढं कौतुक !!

दिवसागणिक तिचं आणि रात्रीगणिक त्याचं प्रेम वाढतंच आहे. आज त्याने तिला एक नाजुकशी चंद्रकोर आणि ओंजळभरुन चांदण्या दिल्या होत्या. थोड्‌या चांदण्या तिने आपल्या कुरळ्या केसांमधे पसरल्या आणि उरलेल्या त्याच्या येण्याच्या वाटेवर विखुरल्या. त्याची वाट बघता बघताच तिचा हलका डोळा लागला.... आणि जाग आली तेव्हा उजाडलंच ! त्याच्या स्वागतासाठी विखुरलेल्या चांदण्या एकेक करुन उचलून नेताना मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं.... !! कधी भेट होणार आपली.... कधी होणार आपलं मीलन !! डोळ्‌यात प्राण आणून त्याची वाट बघायची पण तो येताच स्वत:चं अस्तित्व हरवायचं ! किती काळ अशी वाट बघायची....... किती युगं असं चालणार ..... !! तिचं ते हळवेपण धरतीवरल्या झाडांनी अलगद टिपलं आणि दवबिंदू म्हणून दिमाखानं मिरवलं !!

कधीतरी अशी सांजवेळ येईल..... जेव्हा तो आणि ती दोघेही एकमेकांना भेटतील....एकरुप होतील !!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

पक्या's picture

22 Feb 2010 - 12:22 am | पक्या

वा , काय छान लिहिलंत . आवडलं
प्रत्येक ओळ सुंदर.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

22 Feb 2010 - 4:37 am | शुचि

मन तरल होऊन वेगळ्याच जगात गेलं. या लहान जगापासून दूर ..... सृष्टीच्या भव्य तारांगणात. जिथे दिनमणी प्रियकर होता अन रजनी प्रिया....... खरच अप्रतिम लेख.
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मदनबाण's picture

22 Feb 2010 - 5:35 am | मदनबाण

मुक्तक आवडले... :)

मदनबाण.....

तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

रेवती's picture

22 Feb 2010 - 7:41 am | रेवती

थोड्‌या चांदण्या तिने आपल्या कुरळ्या केसांमधे पसरल्या आणि उरलेल्या त्याच्या येण्याच्या वाटेवर विखुरल्या.
अगदी वेगळी कल्पना!
रेवती

प्राजु's picture

22 Feb 2010 - 8:05 am | प्राजु

आईगं!!!!
व्वा! जयूताई.. हे मुक्तक आहे की कविता!!
फारच सुरेख!! काय कल्पना आहेत एकेक. अप्रतिम!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

जयवी's picture

22 Feb 2010 - 12:18 pm | जयवी

पक्या, शुचि, मदनबाण, रेवती, प्राजु........ तहे दिल से शुक्रिया !!

प्राजु....कविताच लिहायला सुरवात केली होती......पण मग कवितेत इतकं सगळं बांधता येईना..म्हणून मग हे मुक्तक :)