"हं, कशी वाटली मिसळ हणम्या? अंमळ सपक लागली म्हणतोस? अरे, तुला तिखट खाल्लेलं चालेल आता. मला इतकं तिखट खाऊन कसं चालेल? कालच माझा 'मिडलाईफ क्रायसिस ' सुरु झाला ना! असो, पुढच्या वेळी मला सांग, आपण तुझ्यासाठी जरा वेगळी तर्री मागवून घेऊ. चल, चल बघू आता पुढे.
हे बघ, चेहर्यावर अष्टसात्विकतेचे भाव घेतलेले एक ओरिजीनल काका. एकदम ओरिजीनल हो, इमिटेसन नाय.सात्विकता हा या काकांचा यु एस पी आहे बरं का! ते जे काही करतात, त्यातून सतत सात्विकता सांडत असते. प्रत्यक्ष परमेश्वरासारखेच म्हण ना. हे तसे बहुप्रसवा आहेत बरं का! आपल्या आविष्कारांची शतके, द्विशतके साजरी करणे या प्रथेचा आद्य मान त्यांच्याकडे जातो. तुझ्या हातातलं कवितांचं पुस्तक जरा लपवून ठेव, नाहीतर त्यातल्या कवितांना चाली लावून दाखवतील ते तुला. मग बघ बुवा, तू आणि तुझं नशीब. अभंग? अभंग कुठला आठवला आता तुला त्यांच्याकडे बघून? कान्होपात्रेचा? काय? 'प्राण हा सर्वथा जाऊ पाहे?' हणम्या, हणम्या, तुला कुठे घेऊन जायचं म्हणजे....चूप बघू अगदी. काकांच्या हातातली काठी दिसली की नाही तुला? नाठाळपणा करशील तर हाणतील लेका तुला धरुन.काय?
आता हे या हॉटेलातले आणखी एक भूषणस्थळ बघ. काय? काय म्हणालास? हे असे ताठ, पुतळ्यासारखे का उभे आहेत? अरे, काय आहे, यांच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात म्हणे. त्यामुळे बिचार्यांचे जरा बळच हरपल्यासारखे झाले आहे. म्हणून जरा ताठ उभे राहाण्याची प्रॅक्टीस करताहेत झाले! पण माणूस विद्वान बरे का! एकेक प्रतिसाद वाच त्यांचे. काय व्यासंग आहे! रटाळ? हणम्या, अरे, तुला व्यासंग आणि रटाळ या दोन्ही शब्दांमधला फरक तरी कळतो का लेका? पानीकम कटिंग प्यायचीही लायकी नसलेला तू... तुला ही कुरुंदवाडची मलईदार बासुंदी कशी पचणार? रटाळ म्हणायचं नसतं हणम्या त्याला! विद्वत्ताप्रचुर, अभ्यासू म्हणतात त्याला! बघ, बघ, लोक त्यांच्या प्रतिसादांचे कसे प्रिंटाऊट काढून घेताहेत ते! काय म्हणालास? त्या लोकांमध्ये निद्रानाशाची तक्रार असलेलेच अधिक दिसताहेत? छे, फारच शंकेखोर मन हो तुझे, हणम्या! चल, चल पुढे.
हां, हां, पुढे चल, पण जरा जपून. या बाजूंनी साक्षात तेजाच्या लहरी येताहेत, जरा जपून पावले टाक. पायरी सोडशील तर त्या प्रज्ञेच्या आगीत जळून खाक होशील. या आंतरजालावरील सर्वज्ञ विदुषी. साक्षात जालावरच्या आत्मघोषित सुनीताबाई देशपांडेच म्हण की. कोण म्हणजे? त्या स्वतःच म्हणतात तसे! हे असले विचारायचे नसते हे मी गेल्या वेळीच सांगितले नाही का तुला? तर या करारी स्वामिनीपुढे थोडा नतमस्तक हो. पण फार जवळ जाऊ नको हो त्यांच्या. त्यांना म्हणे मठ्ठ माणसे आवडत नाहीत. त्यांच्या आसपास बघ, कशा रशियन, जपानी, युगोस्लावियन चित्रपटाच्या सीड्या, डीव्हीड्या विखरुन पडल्या आहेत! अरे, ते असेच असते बाळा! त्याशिवाय आपले वेगळेपण कसे कळणार लोकांना? चार लोकांना कळेल असे बोलणे म्हणजे न बोलण्यासारखेच नाही का? काय? झाला की नाही वरचा वर आणि खालचा खाली? श्वास रे! कुणाच्या हातात? त्यांच्या हातात? गोधडी? हणम्या, अरे काय म्हणावे तरी काय तुला? गोधडी का म्हणतात त्याला? च च च... अरे आपल्याला माहिती नसेल, तर कुणाला तरी विचारावं तरी. गोधडी नाही काही ती! गोधडी वगैरे म्हणशील तर आयुष्यभराचा पंगा घेतील हां त्या! त्या शेजारच्या काकांना विचार पाहिजे तर. ते रे, ते हातात पंचांग घेऊन वाचताहेत ते. काय? हे काका या तेजस्वामिनीशेजारी कसे काय? हम्म्म. तू जिंदगी अजून पाहिली नाहीस हणम्या! तुला अजून जगण्याचे कायदेकानू ठाऊक नाहीत. राजकारण म्हणतात बरे याला, राजकारण! बेरजेचं राजकारण! तुला कळायचं नाही ते इतक्यात. जरा मोठा झालास की बारामतीकरांची शिकवणी लावू हो!
कविता ना? मलाही ऐकू येत्येय की. काय बरे शब्द आहेत? ऐक बरे जरा..
माझ्या मनाचे घुबडपाखरु
अवसरीकरांच्या नाकपुड्यातून घुमतंय
मोनिका क्लिंटन मोनिका क्लिंटन
तिच्या रुट कॅनालचे बील होणार तरी किती?
पंच्चावन्न गेंड्यांच्या शिंगाइतके?
हिमवर्षावात त्याची उघडी मांडी
कंट्रोल अल्टर डिलीट कंट्रोल अल्टर डिलीट कंट्रोल अल्टर डिलीट
अरे, अरे ग्लोबल वॉर्मिंग होतंय
गुलाबजामुनाच्या रसासारखं
एकच धडकी, एकच अंतिम बोल
हरभजन,हरभजन,हरभजन....
या आणखी एक विदुषी बरे. हणम्या, त्यांच्या कवितेचे अर्थबिर्थ लावायला जाऊ नकोस हो! आयुष्यातून उठशील. काय म्हणालास? या विदुषी जराशा अस्पष्ट दिसताहेत? त्या जशा आहेत तशाच आहेत की नाहीत ते कळत नाही? बरं बरं.. त्याचं काय आहे हणम्या, तू अजून इथे नवीन आहेस. दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय यायचाय तुला अजून. असू दे, असू दे... मुरशील हळूहळू.
'जय जय रघुवीर समर्थ!' आलं का ऐकू हणम्या? ये पुढं. तुला एक अरभाट माणूस दाखवतो. याला म्हणतात प्रतिभा हणम्या. खरीखुरी ईश्वरदत्त प्रतिभा. गावठी पाकोळ्यांच्या समुदायापासून लांब उंच कड्यावर एकटाच बसलेला हा गरुड बघ हणम्या. शब्दांच्या बुडबुड्यांत गुरफटलेल्या आणि जोरबैठका काढून केलेल्या जबरदस्तीने प्रसूत केलेल्या केविलवाण्या प्रयत्नांत याचे जिवंत जळजळीत अनुभव कसे लखलखीतपणे उठून दिसतात बघ. त्याच्या शिव्याही ओढूनताणून आणलेल्या नाहीत, त्याच्या भाषेला अलंकारांची आणि उपमांची बेगडी आरास नाही. पण त्याचे लिहिणे चरचरुन डाग द्यावा तसे आहे. आयुष्य चारी अंगानी भोगलेल्या एका पूर्ण पुरुषाचे दर्शन घे, हणम्या. वाकून नमस्कार कर इथे.मिसळ सपक लागली म्हणून मगाशी तक्रार करत होतास ना? आता म्हणशील तसं?
प्रतिक्रिया
19 Feb 2010 - 1:57 pm | आनंद
रामदास स्वामीना माझाही नमस्कार!
19 Feb 2010 - 11:08 pm | धनंजय
असेच म्हणतो.
19 Feb 2010 - 2:03 pm | श्रावण मोडक
चव आली नाही.
19 Feb 2010 - 2:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रामदासकाकांचं वर्णन आवडलं! अर्थात यात त्यांचा (रामदासकाकांचा) स्वतःचा हात किती हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो.
अदिती
19 Feb 2010 - 2:16 pm | वाहीदा
माझ्या मनाचे घुबडपाखरु
अवसरीकरांच्या नाकपुड्यातून घुमतंय
मोनिका क्लिंटन मोनिका क्लिंटन
तिच्या रुट कॅनालचे बील होणार तरी किती?
पंच्चावन्न गेंड्यांच्या शिंगाइतके?
हिमवर्षावात त्याची उघडी मांडी
कंट्रोल अल्टर डिलीट कंट्रोल अल्टर डिलीट कंट्रोल अल्टर डिलीट
अरे, अरे ग्लोबल वॉर्मिंग होतंय
गुलाबजामुनाच्या रसासारखं
एकच धडकी, एकच अंतिम बोल
हरभजन,हरभजन,हरभजन....
या आणखी एक विदुषी बरे. हणम्या, त्यांच्या कवितेचे अर्थबिर्थ लावायला जाऊ नकोस हो! आयुष्यातून उठशील. काय म्हणालास? या विदुषी जराशा अस्पष्ट दिसताहेत? त्या जशा आहेत तशाच आहेत की नाहीत ते कळत नाही? बरं बरं.. त्याचं काय आहे हणम्या, तू अजून इथे नवीन आहेस. दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय यायचाय तुला अजून. असू दे, असू दे... मुरशील हळूहळू.
=)) =)) =)) =))
बाकी रामदासस्वमीं बध्द्ल आम्ही पामरांनी काय सांगावे ?
खरीखुरी ईश्वरदत्त प्रतिभा. गावठी पाकोळ्यांच्या समुदायापासून लांब उंच कड्यावर एकटाच बसलेला हा गरुड
बाकी वर्णने ही अप्रतिम !! ___ ^___
~ वाहीदा
19 Feb 2010 - 2:23 pm | विसोबा खेचर
छान आहे परंतु अजून थोडा खमंगपणा यायला हवा होता रावसाहेब!
तात्या, मिलिंद भांडारकर, नरेन्द्र गोळे, पोष्ट्या गजानन, बिरुटेसर, इत्यादी पात्र असतात तेव्हाच आपली लेखणी अधिक खमंगपणे प्रसवते! :)
असो,
पुभाप्र..
तात्या.
19 Feb 2010 - 3:39 pm | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ अहो त्या टायमाला त्यांची टंकनी पुर्णांकानी प्रतिक्षिप्त असतीया. रावांनी बी बेरजेचे राजकारन चालु केलय म्हना की! पन ह्यो यक चांगला उपक्रम हाय.नाई त मंग भुकेच्या टायमाला मिसळबी नाई आन पाव बी नाय आशी मनाची गत व्ह्यायची. मी मराठी तुमी मराठी आपुन सम्दे मराठी तरी बी मायबोलीला घोर लागुन र्हायला मंग मराठी येकजुट व्हनार कवा? मर्हाटी ईकास व्हनार कवा?अमृतमंथन चालुच र्हातय. सरकारला बी आता सांक्रुतिक धोरन ठरवन्याची गरज लागाय लाग्ली
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
19 Feb 2010 - 11:29 pm | विसोबा खेचर
राजकारण आणि ज्योतिष! दोन्ही विषयात हा प्रकाश घाटपांडे काही कळत नसताना कसा काय बोलतो देव जाणे! :)
तात्या.
19 Feb 2010 - 3:14 pm | शुचि
(|: (|: (|: I) I) I) I)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
20 Feb 2010 - 12:05 am | मुक्तसुनीत
शुक्रवारची पार्टी जोरदार झालेली दिसते आहे ! ;-)
लगे रहो !