लहानपणापासून नव्वारी साडी म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड, गूढ आणि एकदम खानदानी प्रकरण असावं असा एक समज बसला होता डोक्यात. माझी आजी काही नव्वारी नेसत नाही. पण नव्वारी नेसणार्या लांबच्या आज्या घरी आल्या की मला खूप मस्त वाटायचं. आपल्या नात्यात पण हे अवघड आणि खानदानी प्रकरण आहे याचं समाधान वाटायचं. पण तरी कधी नव्वारी नेसून बघण्याचा प्रयत्न केला नव्हता.
'जाणता राजा' नाटकात मी सामील झाले मग नव्वारी नेसायला शिकणं, नेसणं, नेसवणं हे ओघानेच आलं. मग कधी जाणता राजामधे लावण्या नाचता नाचता दोन एन्ट्र्यांच्यामधे घड्याळ लावून पाच मिनिटात घुंगरू, नव्वारी शालू उतरवून परत दुसरा शालू नेसून घुंगरू बांधून परत नाचायला तयार इत्यादीची प्रॅक्टीसही गरजेप्रमाणे करून झाली. नव्वारीमधला अवघड आणि गूढ पणा संपला. पण खानदानी पणा रूजून राह्यला.
पुढे नाटकसिनेमातलं कापडचोपड हाताळायच्या धंद्यात उतरायचं ठरवलं तेव्हा सगळ्याच वस्त्राभूषणांचा अभ्यास डोळसपणे सुरू केला. आणि आपल्या म्हणजे भारताच्या वेशभूषेच्या प्रवासाने मोहवून टाकलं.
लांबलचक कापड अंगावर वेगळ्या वेगळ्या जागी गुंडाळायच्या, लपेटायच्या केवढ्या त्या तर्हा, त्यातली कला, त्यातलं सौंदर्य, त्यातली उपयुक्तता सगळंच अचंबित करणारं होतं.
तिथे कुठेतरी हे ही ठळकपणे जाणवलं की अरे नव्वार हे काही साडीचे, नेसायच्या पद्धतीचे नाव नाहीच्चेय. ते साडीचे माप आहे केवळ. आणि मग आपसूक नव्वारीचा बोली भाषेतला संधी फोडून नउवारी असं म्हणायला सुरूवात झाली.
पुढे अभ्यासत जाताना जगभरातल्या इतर प्राचीन संस्कृतींमधील वेशभूषा आणि भारतीय वेशभूषा यांची नकळत तुलना होत असायची. प्राचीन ग्रीक, रोमन, असिरीयन, इजिप्शियन, बॅबिलोनियन इत्यादी सगळ्याच वेशभूषा आणि भारतीय वेशभूषेत साम्यस्थळं पण अनेक आढळली. प्राचीन रोमन वेशभूषेमधे तरूण स्त्रियांच्या डोक्यावर ओढणीसारखं काही असे डोकं झाकण्यासाठी त्याला 'पल्ला' म्हणतात ज्याचा आपल्याकडे अर्थ पदर असा होतो अश्या काही गमती सापडल्या.
सगळ्या प्राचीन युरोपियन व पर्शियन वेशभूषांच्यात मात्र सापडली नाही ती एक गोष्ट म्हणजे 'कासोटा' किंवा कपड्याचे 'दुटांगीकरण'.
प्राचीन भारताच्या बाकी भागात हे 'दुटांगीकरण' प्रकर्षाने दिसून येतेच. पण प्राचीन भारताचा विस्तार आत्ताच्या अफगाणिस्तानपर्यंत म्हणजे तेव्हाच्या गांधार देशापर्यंत मानला जातो. या गांधार देशात सुद्धा कपड्याचे 'दुटांगीकरण' अस्तित्वात असल्याचे भरपूर पुरावे मिळतात. हे 'दुटांगीकरण' बहुतांशी धोतर नेसल्यासारखे, एक पदर मागे कासोटा म्हणून नेणे आणि दुसर्या पदराचा पुढे पंखा करणे किंवा खरंच पदर म्हणून वापरणे असं दिसतं. किंवा धोतरासारखे दुटांगीकरण आणि दुसरे वेगळे वस्त्र वरचे शरीर झाकायला असं दिसून येतं. स्त्रिया व पुरूष दोघांच्याही अंगावर याच प्रकारचे 'दुटांगीकरण' दिसून येते.
गुप्त काळात मात्र (early 4th cent to mid 8th cent AD) आपल्याला आपल्या ओळखीची दुटांगी साडी दिसून येते. हिचे दुटांगीकरण हे धोतरापेक्षा वेगळे आहे आणि तेच कापड सलगपणे पदरापर्यंत गेलेले आहे. तेही अजंठाच्या लेण्यात म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात. आता ही साडी खरोखरच नऊवारी होती की नाही ते मात्र सांगणं कठीण आहे. पण त्या गूढ, अवघड आणि खानदानी प्रकाराचा पहिला बिंदू हा धरायला हरकत नाही.
ही पद्धत नक्की कशी आहे याचं गूढ अनेकांना असेलच त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात म्हणजे आपल्या नेहमीच्या साडीसारखीच सुरूवात करायची. पण साडीची लांबी मोठी असल्याने ज्या भरपूर निर्या येतात त्यांचा मध्य काढून तो दोन पायांच्या मधून मागे नेऊन कमरेपाशी खोचायचा. झाली बेसिक पद्धत. कमरेशी खोचताना निर्यांची दिशा मात्र आपल्या नेहमीच्या साडीपेक्षा उलटी ठेवायची, पदराची एक कड उजव्या खांद्याच्याखालून तर दुसरी कड गुढघ्याच्या खालून डाव्या खांद्याकडे यायला हवी, पदर खूप मोठा काढायचा नाही, पदर मागे एका रेषेत असता कामा नये तर तो दोन खांद्यावर/ डोक्यावर घेतल्यावर मागे एक समान पातळीवर यायला हवा अशी काही महत्वाची पथ्य पाळायला शिकलं की बास.
याच साडीचा उजव्या पायावरचा घोळ उचलून डाव्या बाजूला कमरेपाशी खोचून पंखा तयार केला आणि पदर केवळ दोन्ही खांद्यावरूनच घेतला की झाली ब्राह्मणी नऊवारी.
दोन्ही पायांवर साडी चापूनचोपून घट्ट बसवली आणि मागच्या काष्ट्याला दोन्ही काठ एकाला एक लावून बसवले की झाली नाचकामाची साडी.
दोन्ही पायांवरून घोळ उचलून त्या त्या बाजूला कमरेपाशी खोचले आणि पदर डाव्या खांद्यावरून मग डोक्यावरून आणि मग उजव्या खांद्याच्या खालून नेऊन कमरेशी टोक खोचलं की झाली कामकरी, शेतकरी बाई.
एक मोठा वेढा साडीच्या आत घडी घालून घेऊन मग निर्या आणि काष्टा घालायचा, दोन्ही पायावरचा घोळ किंचितसा उचलून कमरेशी खोचायचा. क्युलॉटस सारखी पोटर्यांपर्यंत साडी नेसायची. ही झाली सिंधुदुर्गातल्या ख्रिश्चन बायांची साडी.
वेगवेगळ्या पद्धतीने पायावरचा घोळ आटवून त्याचे मोठ्ठे खिसे करायचे, साडी अगदीच शॉर्टस च्या उंचीची होते. ही झाली गोवा आणि सिंधुदुर्गातल्या भागातली कामकरी लोकांची भातलावणीच्या वेळी, डोंगरात काम करतेवेळी नेसायची साडी.
या सगळ्या नेसण्यांमधे समान आहे ते म्हणजे साडीच्या एका टोकापासून सुरूवात करणे, कमरेभोवती गाठ मारून त्यावर साडी तोलणे आणि निर्या दुंभगून दुटांगीकरण करणे.
पण याबरोबरच नऊवारच साडी पण निर्या, गाठी असं काही न करता एकावर एक बरेच वेढे घेऊन नेसायच्याही काही पद्धती आहेत. सुरूवातीलाच काष्ट्यासाठी चांगला लांबलचक भाग ठेऊन द्यायचा आणि खूप सारे वेढे घ्यायचे. सगळे वेढे घेऊन संपल्यावर सुरूवातीचा काष्ट्यासाठीचा म्हणून ठेवलेला भाग दोन पायांतून मागे नेऊन सगळ्या वेढ्यांच्या वरून मागे कमरेशी खोचायचा अशी साधारण पद्धत. पदरासकटचे आणि पदराशिवायचे असे दोन्ही प्रकार यात दिसतात. ठाणे जिल्ह्यातले वारली आदीवासी, रायगडातले कातकरी आणि ठाकर आदीवासी, मुंबईच्या कोळणी, मुंबईतलाच आगरी समाज, रत्नागिरीतला कुणबी समाज, सिंधुदुर्गातला आणि गोव्यातला धनगर समाज अश्यांच्या साडी नेसायच्या पद्धती या दुसर्या पद्धतीत येतात.
भारतातलं विशेषतः मध्यभारतापासून दक्षिणेकडे हवामान उष्ण त्यामुळे अंगावरचं कापड चोपड हे हवा खेळती राहील असं हवं. आणि एकावर एक थर नसलेलं हवं यातूनच मोठ्या कापडाची एकच साडी दुटांगी करून नेसायच्या पद्धतीने जन्म घेतला असणार. एका नऊवार कापडामधे संपूर्ण शरीर झाकलं जातं तरीही दुटांगीकरण केल्यामुळे कसंही वावरायला, बसाउठायला काहीच प्रॉब्लेम नाही, काष्टा हा सगळ्या वेढ्यांच्या/ थराच्या वर असतो त्यामुळे नैसर्गिक विधींच्यासाठीही संपूर्ण साडी सोडायची गरज नाही. आणि शरीर झाकलं तरी शरीराची सगळी वळणं बरोब्बर अधोरेखित केली जातात. त्यामुळे स्त्री शरीराची कमनीयता, सौंदर्यही दिसून येते.
तसंच त्या त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, कामधंदे इत्यादीचा विचारही त्या त्या नेसणीमधे दिसतो. कोकणामधे चिखल, पाणी जास्त त्यामुळे तिथल्या सगळ्याच पद्धतींमधे साड्या ह्या पायघोळ नाहीत. घोट्याच्या वरती किंवा क्वचित गुडघ्याच्या वरतीही जाणार्या पद्धती दिसतात. तसंच डोंगरदर्यांमधल्या बिकट वाटांशी दोन हात करत रोजचं जगणं जगायचं असल्याने कातकरी, धनगरी पद्धतींमधे कमरेभोवती बरेच वेढे घेऊन पाठीला आधार दिलेला दिसतो.
हे असं सगळं अभ्यासायला लागलं की पूर्वजांच्या बुद्धीबद्दलचा आदर वाढतो. त्यांचं निसर्गाशी समजून उमजून जगणं उलगडायला लागतं समोर. साड्या, त्यांचे तपशील हा एक भाग झाला पण निसर्गाशी पूर्वजांनी टिकवून ठेवलेलं नातं आपण जपायला पाहीजे असं कुठंतरी जाणवायला लागतं. काय म्हणता?
-नी
(६-७ महिन्यांपूर्वी लिहिलेला हा लेख आहे त्यामुळे अनेकांनी तो इतरत्र वाचलेला असण्याची शक्यता आहे.)
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 11:06 am | आनंदयात्री
छान.
दुटांगीकरणाची माहीती रोचक.
फिरंग्यांनी प्यांट हे दुटांगी वस्त्र कधी शोधुन काढले असावे ?
16 Feb 2010 - 11:16 am | नीधप
प्यांट हे वस्त्र जसं आहे तसं शोधून काढलेलं नाही.
मध्ययुगीन काळापासून वेगवेगळ्या ब्रीचेस, स्टरअप्स, पॅण्टलून्स अश्या स्थित्यंतरातून जात जात आज ज्याला पॅण्ट म्हणतात ते निर्माण झालेले आहे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
16 Feb 2010 - 11:20 am | आनंदयात्री
अच्छा .. धन्यवाद !
-
आ
16 Feb 2010 - 11:51 am | जयवी
मस्तच गं !!
16 Feb 2010 - 12:00 pm | शाहरुख
साडीची लांबी येवढी असण्याचे काही कारण ?
चुभुदेघे :-)
(लहानपणी आज्या-आत्यांची नऊवारी पातळं पांघरूण म्हणून वापरलेला) शाहरुख
16 Feb 2010 - 11:16 pm | नीधप
नउवार ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी लांबी.
नउवार इरकल साडी ही जेमतेम ८-८.५ वार असते. अकरावाराच्या साड्यांचे पण उल्लेख आहेत काही सरदार आणि राजघराण्यांच्यात.
नउवार ही लांबी बहुतेक त्या त्या काळाप्रमाणे नेसण पद्धतीमधली पुरेशी सभ्यता, हालचालींसाठी सुकर आणि तरीही दिसायला सुंदर, घोळदार अश्या सगळ्या दृष्टीने योग्य ठरत असावी त्यामुळे काळाच्या ओघात तीच लांबी रूढ झाली.
अर्थात हे केवळ कयासच.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
16 Feb 2010 - 12:32 pm | सुनील
छान, माहितीपूर्ण लेख.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Feb 2010 - 1:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त आणि माहितीपूर्ण! पण खरं सांगायचं तर निर्या, घोळ खोचणे यात मी थोडीशी अडकलेच. तुझ्याकडे किंवा इंटरनेटवर चित्रं असतील तर ती पण डकव ना लेखाबरोबरच.
(गोधडीतली गधडी) अदिती
6 Mar 2010 - 2:31 am | चित्रा
असेच म्हणते.
लेख आवडला. जरा मागे पडला होता वाचायचा.
चित्रे असली तर नक्की द्यावी.
अवांतर -कर्णभूषणांवरून काही वेगळे प्रश्न आहेत पण ते नंतर विचारीन.
16 Feb 2010 - 1:18 pm | शुचि
नेहेमी प्रमाणे आपला ऑफ्-बीट आणि मस्त लेख वाचला. छान वाटलं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
16 Feb 2010 - 1:27 pm | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेख आवडला, अदिती म्हणते तसं चित्रे डकवली तर अजून मस्त होईल.
स्वाती
16 Feb 2010 - 4:26 pm | नीधप
नेटावर आढळतात ती उपयोगाची नाहीत.
मग मला स्वतःलाच फोटो काढून ते टाकावे लागतील किंवा निदान स्केचिंग तरी करावे लागेल.
आत्ता खरंच तेवढा वेळ नाही. तेव्हा माफ करणे.. :)
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
17 Feb 2010 - 8:07 am | मीनल
फोटो टाकायला हवे होतेस ग,
मीनल.
17 Feb 2010 - 8:34 am | अक्षय पुर्णपात्रे
नीधपतै, वेगळ्या विषयावर मस्त लेख. धन्यवाद. खानदेशात (माझ्या मर्यादीत अनुभवावरून चूभूदेघे) साधारणत: नऊवारी साडी (साड्या नऊवारीच असतात पण दुटांगीकरण कमी) घालतांना स्त्रिया दिसत नाही. असेच रोचक लेख अजुन येऊ द्या.
17 Feb 2010 - 12:04 pm | नीधप
खानदेशातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच काही जाती जमातींमधे/ वर्गांमधे काष्टा न घालण्याची पद्धत आहे/ होती.
बाकी काष्ट्याच्या साड्या तश्याही कमीच झाल्यात आता.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
17 Feb 2010 - 12:18 pm | विसोबा खेचर
वेशभूषांच्या विविधतेच्या बाबतीतला एक अभ्यासपूर्ण सुंदर लेख...
जियो..!
तात्या.
क्या बात है!
(चट्टेरीपट्टेरी हाफ पॅन्ट ही वेशभूषा सर्वात प्रिय असलेला) तात्या.
17 Feb 2010 - 12:41 pm | शाहरुख
या पॅन्टला उत्तर भारतीय लोक 'कुलकर्णी बर्मुडा' म्हणतात असे एका फॉरवर्डेड ई-मेल मधे वाचले होते :-)
5 Mar 2010 - 2:28 pm | अरुंधती
माहितीपूर्ण व रोचक लेख! आवडला! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
5 Mar 2010 - 3:00 pm | साईली
छान आवड्ल मनापासुन ........
हे अगदी खरय की नऊवारी हा एकच असा पोषाख आहे की जो इतका ९ मीटराचा असूनही मध्ये कुठेच शिवण न करात नेसायचा असतो. एकदा मला एक ८० वर्षाची पणजी भेटली ती मला काकूच वाटत होती. मग कळले तिने साडी नेसली होती म्हणून ती काकू वाटत होती. मला आजी म्हंटल की नऊवार नेसलेली वृद्ध स्त्रिच डोळ्यासमोर येते. अर्थ चित्रपटात रोहीणी हंट्टगडी मोलकरीण असते. तिलाही नऊवारीच दाखवली आहे. कशी मस्त केली त्यांनी ती भुमिका.
लावणी नर्तिका पण साड्या तंग नेसत असल्या तरी, त्यांचे नेसु अंगभर असते.
नऊवारी साडी नेसुन, वावरणे, चालणे खुप सोपे असते. पाचवारी प्रमाणे चालताना अडथळा येत नाही. लांब पावले टाकता येतात. ( थांब लक्ष्मी कुंकु लावते या सिनेमात, जयश्री गडकर विहिरीत ऊडी मारतानाचा शॉट बघा. )
5 Mar 2010 - 3:32 pm | प्रकाश घाटपांडे
आमच्या मते गुंडाळलेल्या कापडाची कहाणी वल्कला पासुन चालु व्ह्यायला हवी. कवचाची गरज ही जेव्हा उन पाउस थंडी वारा वगैरेंपासून संरक्षण ही मुलतः होती त्यावेळी अरण्यातील झाडांच्या वाळलेल्या सालींपासुन वल्कल तयार झाली. त्याचा आकार खोडापासुन अलगद सुटल्याने गुंडाळलेला च असायचा.
ज्ञानस्त्रोत:- गावाकडे मारुतीच्या देवळात श्रावण मासात रामविजय ,हरिविजय, पांडवप्रताप पोथी वाचणारे तपस्वी गुरुजी
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
6 Mar 2010 - 8:53 pm | नीधप
खरंय.. त्यात धोतर, कटीवस्त्र, उत्तरीय, निवी, उष्णीश ते पगड्या-फेटे असं सगळंच काही यायला हवं.
पण मग तो भारतीय वेशभूषेचा इतिहास होईल काही हजार पानांचा किमान. त्यासाठी किमान १० वर्ष पूर्णवेळ केवळ याच संशोधनासाठी द्यावी लागतील.
मग ते इंटरनेटवर कसं टाकता येईल? :)
असो मुळात लेख लिहिताना नउवारी साडीपुरताच आढावा घ्यायचा ठरवला होता.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
6 Mar 2010 - 9:20 pm | प्रकाश घाटपांडे
नक्कीच असा कोष जर तयारझाला तर तो एक ऐतिहासिक दस्त ऐवज होईल. खुप मेहनतीच काम आहे. खरच कोषाला न्याय देण्यासाठी १० वर्षे लागतील. सातत्याने लिहित रहा. कोषाच काम त्यातुनच हलक होईल.
नाव घ्या कोषाचे
भारतीय वेशभुषेचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास
या वरुन सुचल
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
7 Mar 2010 - 8:23 pm | नीधप
प्राचीन मधे रोशन अल्काझी, जी एस घुर्ये आणि अनिल बिस्वास अश्या काही दिग्गजांनी भरपूर काम केलेले आहे.
अर्वाचीन मधेही रोशन अल्काझींचे बरेच काम आहे.
तेच संदर्भासाठी वापरते मी अनेकदा.
१० वर्ष पूर्ण वेळ हेच काम करणं मला तरी शक्य नाही पण.
आणि कोषापेक्षा सामान्य माणसाला पचेल इतपत तोंडओळख प्रकारचे लेख प्रत्येक प्रकारच्या कपड्यावर लिहावे असा मानस आहे. माझा आणि एका वृत्तपत्राच्या संपादिकेचा.
सध्या सगळ्यात मोठं लिखाण म्हणजे ही अशी पोस्टस केवळ.. इतपतच वेळ आहे तेव्हा....
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
5 Mar 2010 - 9:32 pm | सुधीर काळे
लेख आवडला. बरेच संशोधन केलेलं दिसलं. जय हो!
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
5 Mar 2010 - 11:30 pm | पक्या
कापडाची कहाणी रोचक आहे. आवडला लेख.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
7 Mar 2010 - 8:46 pm | चतुरंग
पूजेला बसताना नेसायचा कद/सोवळे हा एक प्रकार मला फार आवडतो. त्यातही असाच साडीसारखा कमरेभोवती गुंडाळून, निर्या काढून खोचणे हा प्रकार असतो. खाली पाटावर बसणे, चटकन उठणे सर्वांसाठी सोयीचा!
निसर्गाशी अनुकूल वस्त्रे नेसणे हे महत्त्वाचे हे खरेच.
चतुरंग
7 Mar 2010 - 10:52 pm | नीधप
हो पण त्याची गाठ कापडाच्या मध्यात असते एका टोकाला नाही.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
8 Mar 2010 - 10:04 pm | धनंजय
माहिती आवडली.
निर्या न काढता खूपदा लपेटून दुटांगीकरण! "इंजिनियरिंग"दृष्ट्या गडबड वाटते आहे. असे धोतर मी नेसले, तर घट्ट बोळाबुचका होईल, असे वाटते. पण ज्या अर्थी लोक वापरतात, त्या अर्थी काही खास पद्धत असली पाहिजे.
धोतराच्या रुंदीबाबत मला ही गोष्ट लक्षात आली आहे : (धोतराची रुंदी पाऊल ते कंबत इतकी पाहिजे, शिवाय खोचायला थोडी रुंदी लागते, ती लागतेच.) धोतराची पारंपरिक रुंदी आजकालच्या उंच मुलांना कमी पडते.
दुटांगी साडीबाबतही असेच दिसते का? उंच बायकांसाठी "डबल पान्या"च्या साड्या असतात काय?
10 Mar 2010 - 10:20 am | नीधप
>>निर्या न काढता खूपदा लपेटून दुटांगीकरण! "इंजिनियरिंग"दृष्ट्या गडबड वाटते आहे. असे धोतर मी नेसले, तर घट्ट बोळाबुचका होईल, असे वाटते. पण ज्या अर्थी लोक वापरतात, त्या अर्थी काही खास पद्धत असली पाहिजे.<<
हे खूपदा लपेटणे कमरेभोवती पट्ट्यासारखे होते मुख्यत्वेकरून. बाकी पायावर गुडघ्यापर्यंत एखादादुसराच लेयर आणि पंखा असतो.
>>धोतराच्या रुंदीबाबत मला ही गोष्ट लक्षात आली आहे : (धोतराची रुंदी पाऊल ते कंबत इतकी पाहिजे, शिवाय खोचायला थोडी रुंदी लागते, ती लागतेच.) धोतराची पारंपरिक रुंदी आजकालच्या उंच मुलांना कमी पडते.<<
धोतराची लांबी पुरेशी असेल तर जनरली रूंदीमधे कमी पडत नाही. हे कसे ते नेसूनच समजून घ्यावे लागेल. तसेच पारंपारीक रूंदी म्हणजे साधारण ४४ इंच ही नॉर्मल उंचीच्या माणसाच्या कमरेपासून जमिनीपर्यंत अशी येते. जो भाग खोचला जातो तिथे रूंदी याहून जास्त असेल तर घोळ पायात येऊन अडकून पडण्याचा संभव असतो.
तसेच पारंपारीक धोतर हे बूटलेग जीन्स सारखे पायघोळ असत नाही. घोट्याशीच संपते. पण नउवार, अकरावार धोतरे जी राजघराणी, सरदारघराणी यांच्यात वापरली जातात ती त्यांच्या लांबीमुळे घोळदार होतात. सिल्क किंवा उंची सुती कापड असल्याने धुतल्यावर आटणे नाही.
तसेच स्वस्तातली २०० रूपये जोडी प्रकारची धोतरे मिळतात ती मुळातच कमी पन्हा आणि कमी लांबीची असतात. परत धुतल्यावर आटतात सुद्धा. त्यामुळे साडेचार मीटर पेक्षा बरीच कमी होतात ती.
>>दुटांगी साडीबाबतही असेच दिसते का? उंच बायकांसाठी "डबल पान्या"च्या साड्या असतात काय?<<
हल्ली बहुतांशी साड्या मिलमधून येत असल्याने उंची-रूंदी मधे थोडे कांचम्-कोंचम असतेच. वायलच्या नउवारी या अंगकाठी बेताची किंवा छोटीशी असलेल्या आजीला व्यवस्थित बसतात. मुळात त्यांना इतका स्टार्च असतो की तो घालवायला १० वेळा धुवेपर्यंत त्या व्यवस्थित आटतात आणि उंच किंवा जाड बाईला बसत नाहीत. हातमागावरच्या साड्यांचा हा प्रॉब्लेम पूर्वी नसे. इरकली साड्याही नउवार नसून साडेआठवार येतात. केवळ रेशमी नउवार्या या चांगल्या अघळपघळ असतात.
परत हल्ली बायकांना नउवारी साड्या या सुद्धा गोल साड्यांप्रमाणे हिल्स झाकतील एवढ्या उंच हव्या असतात. ते पारंपारीक पद्धतीत शक्य नाही. मुळातल्या पद्धतीप्रमाणे पावलावर तरंगेल इतपतच साडीची उंची असायला हवी. ब्राह्मणी साडी असेल तर अजून एखादा इंच वरची म्हणजे घोट्याशी तरंगायला हवी. तसंच सगळ्यांना गोल प्रमाणे पदर खूप मोठ्ठा काढायचा असतो आणि तोही शेवट एकसमान एका उंचीत येईल असा. मुळात पारंपारीक पद्धतीत पदर हा हिप्स पर्यंतच असणे अपेक्षित आहे.
डबल पन्हा (पाना नव्हे) साड्यांमधे बुडून जायला होईल हो. :)
भरपूर अघळपघळ नेसता यायला हव्या असतील साड्या तर माझ्यासारख्या ऊंच आणि जाड बाया आतून एखाद मीटरचं कापड लावून लांबी वाढवतात आणि खोचायच्या निर्यांच्या भागात साधारण ५-६ इंच रूंदीची पट्टी जोडून घेतात (साडीचे फॉल्स तयार मिळतात ते.) जिजामाता, नारायण पेठ, इरकली यातल्या गोल साड्यांमधेही ही निर्यांपुरती उंची वाढवावी लागते आम्हाला.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
8 Mar 2010 - 10:18 pm | मेघवेडा
खरंच आपल्या पूर्वजांच्या बुद्धीबद्दल आदर वाटतो! प्रत्येक लहानसहान गोष्टही किती विचारपूर्वक केली गेलीये! वस्त्रांसोबत आणखी उदाहरणंही कित्येक सापडतील.. घरांची बांधकामं/ संरचना, शेतीचे प्रकार सुद्धा निसर्गाशी अनुकूल होते.
असो. सुरेख लेख नीरजातै..
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
10 Mar 2010 - 10:59 am | मंगेशपावसकर
पुरुषाच्या काळजाची कत्तल करण्यास स्त्रीला फक्त एक साडीच हवी असते.
स्लिम स्त्री जेवढी बोल्ड साडीत दिसते तेवढी मी पाहिलेल्या कुठल्याही तोकड्या कपड्यात दिसत नाही.
10 Mar 2010 - 11:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नीरजा, तुझ्या साडीचा आणि धोतराचा अगदी बोळा झालेला दिसतो आहे!
अदिती
10 Mar 2010 - 11:22 am | नीधप
अगदीच.. तरीच म्हणलं एकतरी विचकट कसा उगवला नाही अजून...
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/