चिपाड

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
18 Jan 2010 - 12:30 am

साडेबारा पाउण झाला असावा. रखरखीत उन्हात एखादे दुसरे तुरळक वाहन फुफाट्यातुन जातांना धुळीचे लोट उडवत होते. त्या आडबाजुच्या गावातल्या यष्टी ष्टांड्याजवळ असलेली ही रसवंती. रसापेक्षा पेक्षा पाणी पिणारीच लोक जास्त. चरकाला बांधलेल्या घुंगरांचा एकसारख्या खुळ्ळ-खुळ्ळ .. खुळ्ळ-खुळ्ळ आवाजात रघ्या तात्पुरत्या टाकलेल्या मंडपाच्या खांबाला टेकुन पुरता भान हरवुन उभा होता. त्याची नजर चरकाच्या चाकांवर स्थिर होती. त्याला वाटले आपल्या सारख्या माणसाचे आयुष्य पण त्या उसाचा कांडासारखेच सारखेच असावे, रसरशीत तारुण्य कामाच्या बोज्यात पिळुन निघावे अन मग उतरत्या वयानुसार उरलेसुरेली चिपाडं पण एकानंतर एक परत परत सारखी सारखी चरकातुन पिळुन काढली जावीत. कोरडी ठाक झाल्यावर चरकाच्या अगदी मागच्या बाजुला ठेवलेल्या पोत्यात अश्याच अनेक चोथा झालेल्या चिपाडांबरोबर नंतर बेमालुम मिसळुन जाणारी.

नारायणगाव पुणे यस्टी भस्सकन ष्ट्यांडात घुसली आणी थांबली तशी लोकं एकच घाई करुन उतरली ..
त्याला आठवले .. हो तीच ती ... किती बदलली होती. कुठे ढगळ ढगळ पंजाबी ड्रेस मधल, पाठीवरची बॅग समोर धरुन चालणारी, चापुन चोपुन बसवलेल्या लांब केसांची ती .. अन कुठे आताची. पाठीच्या खालचा बराचसा गुबगुबीत भाग दाखणारी ती जिन्स, बारबालेला शोभावा असा चमचमीत पट्टा .. अन तो टिशर्ट पाहुन तर रघ्याच ओशाळला .. थरथरत्या हाताने त्याने रसवंतीचा खटका ओढला. त्याच्या कानात घुमणारी खळ्ळ-खळ्ळ-खळ्ळ थांबली. त्याने मागे वळुन पाहिले, तिच्या कंबरेच्या पट्ट्याच्या आरश्यावरुन उन चमकले .. लख्ख्कन त्याच्या डोळ्यात. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. डोळे गच्च मिटुन त्याने चाचपडतच खिशात हात घातला. बंडलातुन एक बिडी काढुन तिचा चपटा भाग जिभेवर ठेवला आणी तित जराशे दात रुतवुन त्याने काडी ओढली. दोन झुरके घेउन त्याने परत मागे वळुन पाहिले. ती बहुदा रिक्षेची वाट पहात असावी.

मागच्या खिशात पाकिट काढायला हात घातला तो कंगवा खिशातल्या छिद्रात अडकलेला. त्याने कचकच्चुन शिवी घातली अन पाकिट जवळपास ओढुनच काढले. मागच्या वर्षीच्या क्यालेंडरखाली बोटे सारुन त्याने घडी घातलेला कागद काढला. एकवार चापपला. त्यावर ते लिहले त्याकाळी उडवलेली चमकी आता राहिली नव्हती, घड्या दबुन तो फाटायला आला होता. वर्षानुवर्षे दाबलेली इच्छा अचानक उफाळुन आली. त्याला छातीत हलकीशी थरथर जाणवली, डोळ्याखाली जडपणा जाणवला. ते पत्र द्यावे म्हणुन तो पुढे झाला तो तीच वळुन पट्ट्कन म्हणाली .. "जरा एक रस देरे .. बिनाबर्फाचा."

तिच्या आवाजातला परकेपणा त्याच्या मनात विंचवाच्या नांगीसारखा रुतला. तसेच मागे फिरुन त्याने दोन उसाची कांडकी काड्ड्कन घुडघ्यावर मोडली अन खटका ओढुन चरकात ती सारली तेच त्याची बोटे एका हिसड्याने चरकात पिळली गेली. टपाटपा रक्ताच्या धारेने रसाचे भांडे भरायला लागले होते. रघ्या ग्लानीत जातांना त्याला डॉळ्यासमोर नविन चकचकीत कागद दिसत होता, चमकी दिसत होती आणी ती दिसत होती .. ढगळ पंजाबी ड्रेसमधे, बॅग छातीशी घेउन चालणारी. तो आपल्याकडे पहातोय हे समजुन लाजणारी ..

कथा

प्रतिक्रिया

गणपा's picture

18 Jan 2010 - 3:10 am | गणपा

आंद्याशेठ छोटेखानी कथा, दुपारचा तो अख्खा प्रसंग डोळ्या जिवंत केलायत पण शेवट मनाला चटका लावुन गेला.

टुकुल's picture

18 Jan 2010 - 7:11 am | टुकुल

आंद्या, काय लिहिलयस.. एकदम झक्कास..
सगळा प्रसंग डोळ्यासमोर झाल्यासारखे वाटत आहे.
तु छोटे लिहितोस, पण जबरा लिहितोस.

--टुकुल

अनिल हटेला's picture

18 Jan 2010 - 7:39 pm | अनिल हटेला

अगदी अगदी सहमत...
:-)

बैलोबा चायनीजकर !!!
© 2006-2010. All rights reserved.

सहज's picture

18 Jan 2010 - 8:54 am | सहज

चित्रदर्शी लेखन. एका मोठ्या कथेतला एक छोटा तुकडा वाटु शकेल असा. लिहा, मोठी कथा लिहा आनंदयात्रीजी.

श्रावण मोडक's picture

18 Jan 2010 - 12:28 pm | श्रावण मोडक

हेच... असेच!

फ्रॅक्चर बंड्या's picture

18 Jan 2010 - 9:18 am | फ्रॅक्चर बंड्या

भारी आहे...

binarybandya™

चेतन's picture

18 Jan 2010 - 9:56 am | चेतन

मस्त लिहलयसं (पण चटका लावणार)

पुलेशु

चेतन

हर्षद आनंदी's picture

18 Jan 2010 - 10:18 am | हर्षद आनंदी

काय लिवलय, क्षणभर स्वतःची बोटं चरख्यात पिळुन निघावी अश्या वेदना झाल्या...

१ नंबर...

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

संजय अभ्यंकर's picture

18 Jan 2010 - 12:03 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विजुभाऊ's picture

18 Jan 2010 - 12:13 pm | विजुभाऊ

का रे लिहितोस. तू अगदी वैट्ट आहेस
शान्त असलेला जीव उगाच ढवळला जातो. अन कामातले लक्ष विरून जाते.

प्रभो's picture

18 Jan 2010 - 12:37 pm | प्रभो

मस्त....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

मेघवेडा's picture

18 Jan 2010 - 3:13 pm | मेघवेडा

चटका लागला जीवाला.. !!

--

मेघवेडा

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Jan 2010 - 3:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

..................

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jan 2010 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार

सुटसुटीत आणी छान कथा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

स्वाती२'s picture

18 Jan 2010 - 5:08 pm | स्वाती२

आई ग! कसलं जबरदस्त लिहिलयं.

jaypal's picture

18 Jan 2010 - 5:49 pm | jaypal

आनंदराव वाचताना सुरातीला अस होतं बगा

शेवटाल रघ्याची बोट अन माझ काळीज....न्हाइ... न्हाइ ...या म्होर न्हाइ लिवत आता
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2010 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कथा....!

उन आणि रसवंतीचं वर्णन भारी.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

18 Jan 2010 - 7:33 pm | मदनबाण

आंद्या मस्त लिहलं आहेस रे...असाच लिहीत रहा. :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Jan 2010 - 8:28 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री यात्री चटका लावणार्‍या या लघुकथेत उत्तम वातावरणनिर्मिती केली आहे. परंतु लघुकथा लिहितांना कमी शब्दात हे जमायला हवे. सुरुवातीला एखादे रुंद कथानक समोर येणार आहे असे वाटते आणि मग कथेला गुंडाळल्यासारखे वाटते. रघ्याचे भावविश्व रसरशीत आहे चिपाडाप्रमाणे नाही, 'तिला' फक्त चिपाडच दिसले अशी सगळी कथाव्यवस्था सशक्त आहे. थोडेसे पसरवून मांडावे अशी विनंती.

दुमडलेली चिठ्ठी, कंगव्यात आडकणे... या घटनेतले विलक्षण बारकाईने केलेले वर्णन, न सांगता कळणारी भावनांची हिरमोड - उच्च आहे.

चतुरंग's picture

18 Jan 2010 - 10:47 pm | चतुरंग

अतिशय संवेदनशील मनाची तगमग नेमकी टिपली आहेस रे आंद्या!
(लिहिता रहा बाबा...)

(पुंड्या ऊस)चतुरंग

नंदन's picture

19 Jan 2010 - 3:40 am | नंदन

आहे. चित्रदर्शी, बारीकसारीक बारकाव्यांनी भरलेली लघुकथा! अजूनही येऊ द्या विस्ताराने.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

19 Jan 2010 - 9:57 am | चित्रा

असेच म्हणते.

Nile's picture

30 Jan 2010 - 8:32 am | Nile

असेच म्हणतो. चिपाड आवडले.

सुनील's picture

19 Jan 2010 - 10:17 am | सुनील

अतिशय सुरेख, छोटेखानी कथा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2010 - 11:36 am | बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्रीने या कथेची सुरूवात दाखवली होती, तेव्हाच काही तरी उच्च वाचायला मिळेल असे वाटले होते. तसेच झाले. पण कथा एवढी लघु असेल असे वाटले नव्हते.

प्रथे प्रमाणे एवढंच का लिहिलं वगैरे लडिवाळ हट्ट लेखका कडे करता येईल. पण माझ्या मते कथा एवढी लघु असल्यानेच तिला आत्ताचे परिमाण मिळाले आहे. कथा चांगलीच टोकदार झाली आहे. जर या कथावस्तूवर थोडी मोठी अथवा पूर्ण लांबीची कथा लिहिली असती तर मात्र फसण्याची शक्यता होती. एखादे वेळेस कथेतला पंच गेला असता. पण थोडक्यात आटोपल्याने, वेगात जाताना साध्या अपघातातही जोरदार धक्का बसू शकतो तसे कथा संपताना होते. म्हणूनच कथा चटका लावून जाते आणि मनात घर करून बसते.

आनंदयात्रीच्या लेखणीत मज्जा आहेच... (नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या या चालीवर). या आधी पण एकापेक्षा एक सुंदर लेख उतरले आहेत त्यातून. प्रसंग अथवा वातावरण डोळ्यासमोर उभं करायचं विलक्षण कसब आहे त्याच्याकडे. आम्हाला असेच उत्तमोत्तम वाचायला मिळावे अशी वाचक म्हणून मनापासून इच्छा.

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

19 Jan 2010 - 11:39 am | आनंदयात्री

:)

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Jan 2010 - 11:53 am | ब्रिटिश टिंग्या

:(

शुचि's picture

30 Jan 2010 - 6:45 am | शुचि

ग्रामीण कथा खूपच छान जमली आहे. बारकावे उत्तम टिपले आहेत. करुणरसात शेवट आहे. डोळे पाणावले.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

पाषाणभेद's picture

30 Jan 2010 - 8:24 am | पाषाणभेद

लय भारी हाय गोश्ट. त्यवडा बिडीचा भाग काडला ना तर लय भारी वाटतीया.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

बंडू बावळट's picture

30 Jan 2010 - 10:59 am | बंडू बावळट

अपूर्ण वाटलं, वाचून समाधान झालं नाही. परंतु लेखनशैली अत्यंत प्रभावी!

--बंड्या.

Rahul D's picture

17 Apr 2016 - 1:48 pm | Rahul D

व्वा काय लिवलय....

अभ्या..'s picture

17 Apr 2016 - 2:07 pm | अभ्या..

च्यायला चरक जिंदगीचा.
काय काय लिहित होती राव ही मंडळी.
आम्ही आज लिहिताव पण "हे" नाही त्यात. :(

जव्हेरगंज's picture

17 Apr 2016 - 2:24 pm | जव्हेरगंज

वा! वा! वा!

या चिपाडाला भलतीच धार होती की !

मस्त जमलीय !