सप्रेम नमस्कार मंडळी !
दिनांक ७ जून २००९ रोजी माझे पहिले पुस्तक "रत्नपारखी शिवराय - भाग १ : बाजी पासलकर" प्रकाशित झाले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे.या छोटेखानी पुस्तिकेद्वारे मी काहि वाचकांच्या मनापर्यंत पोचलो याची साक्ष देणारे अनेक फोन्स , ईमेल्स , पत्र येतात त्यावरून लक्षात येते आहे.आता "रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे" जे ८५ % लिहून झाले आहे पण गेले सुमारे सव्वा वर्ष ते ८५ % एव्हढेच पूर्ण राहिले आहे ते लिहायला घेण्याचा मानस आहे.यासाठी एक सुरेख संधी पण डोंबिवलीच्या रोटरी क्लब ने उपलब्ध करून दिली आहे - १६-१७ जानेवारीला रायगड्-प्रतापगड वारी (हो आम्हा शिवप्रेमींसाठी गडाची भेट म्हणजे वारकर्यांना 'पंढरपूर' असते तशी वारीच आहे !) ज्यात प्रत्यक्ष बाबासाहेब पुरंदरे येणार आहेत आणि त्यांची ऐतिहासिक पुस्तकांनी तूला केली जाणार आहे ! तर या निमित्ताने आपणा सर्व रसिक वाचकांसमोर या पुस्तकाची ("रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे") एक झलक सादर करावी असे वाटले म्हणून हा सगळा प्रपंच !
------------------------------------------------------------------------------------------------------
"रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे".....एक झलक
सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकात तीन यवन सत्ता दक्षिण हिंदुस्थानात होत्या (हो तेंव्हाचा हिंदुस्थानच !) निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही ! उत्तरेत मोगलसत्ता होती.म्हणजे अखिल हिंदुस्थान यवनी सत्तांनी पादाक्रांत केला होता.या सत्तांना विरोध करण्याची क्षमता असलेली दोनच राज्ये तेंव्हा होती - एक : उत्तरेतील राजस्थान - येथील रजपूत आणि दोन : दक्षिणेतील महाराष्ट्र - येथील मराठे ! यापैकी रजपूत - यांनी मोगल बादशहाचीच चाकरी पत्करून सूत जमवलं आणि यात सामील नसणार्यांना मोंगलांतर्फे लढून जेरीस आणलं.थोड्याफार फरकाने महाराष्ट्रात मराठ्यांनी हेच केलं.उलट महाराष्ट्रात चुरस जरा जास्तच होती - कारण निजामशाही, कर्नाटकातील आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही असे तीन राजे (?????).त्यामुळे वतनाच्या तुकड्यापायी एकमेकांचा गळा कापत सुलतानाच्या पायांशी निष्ठा वहाण्यात अनेक पिढ्या गेल्या.
पण या सर्वांतून "आपलं राज्य" निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते शहाजीराजे भोसले ! कधी निजामशाही , कधी आदिलशाही तर कधी मोंगल - यांची चाकरी करावी लागली .तरी शहाजीराजांच्या मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी "स्व"राज्य हा भुंगा ह्रूदय कुरतडत असायचा !
त्याच महाराष्ट्रातील भोर तालुका ! आसपासचा सर्व प्रदेश सह्याद्रीने वेढलेला.त्यामुळे पावसाळयात बाष्पाने जड झालेले परंतू सह्याद्रीच्या डोंगररांगांनी कोंडलेले ढग सर्वत्र धुकं निर्माण करतात्.त्यामुळे या प्रदेशाला मुर्हा (म्हणजे "धुकं") असं म्हणतात्.या मुर्हे प्रदेशातील एक हकीकत.....
आदिलशाही राजवटीमधे भोर तालुक्याची भरभराट करणार्या आपल्या चाकरमानी सरदार नाईकजी जेधे यांना कारी व आंबवडे ही दोन गावे इनाम मिळाली.त्यामुळे ते तेथील वतनदार झाले.जात्याच शूर, परंपरेने संरक्षणासाठी पदरी फौज्फाटा बाळगून असलेले नाईकजी जेधे एखाद्या राजाप्रमाणेच रहात.मांढरदेवी गावच्या मांढरे यांची मुलगी अणसवा (अनुसुया चा अपभ्रंश) ही त्यांची पत्नी होती.बिदर बादशहाने करून दिलेली देशमुखी सनद वर्षानुवर्षे देशमुख घराण्यात होती.तसेच "महाला" घराणे पिढ्यानुपिढ्या जेध्यांचे आश्रित ! आता या पिढीतसुध्दा देवा महाला हा नाईकजींचा सेवक व दोस्त म्हणून जेध्यांकडे होता.
आणसवाला सातवा महिना लागलेला.ऐन पावसाळ्यात तिचे दिवस पूर्ण होणार म्हणून त्या आधीच रोहिड खोर्याची देशमुखी सनद आपल्या नावे करून घेऊन विजापूर दरबाराहून नाईकजी जेधे व देवा महाला आपल्या चार साथिदारांसह आपल्या गावी कारी येथे यायला निघाले होते.अलिकडे आपले सख्खे भाऊ सोमजी व भिवजी हे दोघे वागणुकीला बदलत आहेत ही गोष्ट चाणाक्ष नाईकजींच्या लक्षात आली होती.असं म्हणतात की अघटिताची चाहुल माणसाला आधी लागते.'आज नाईकजी पण काहिसे अस्वस्थ आहेत' हे देवाच्या लक्षात आले आणि त्यांच्याशी असलेल्या घरोब्यामुळे देवाला यामागचे कारण थोडेफार माहित होते.त्यांना जरा दिलासा देण्याच्या उद्देशाने तो म्हणाला,"धनी, तुमी कायबी काळजी करु नंगासा.वयनीसाब आता धाकलं धनी आननार हाईती.म्यां सवतां पन्नादाईला घिऊनच येतो - ती मांज्या शबुदाभायेर न्हाई!" त्यावर एक सुस्कारा सोडत नाईकजी म्हणाले ,"देवा , आरं तू हायेस म्हून तर आंमी बिनघोर वतन चालवतुया ! पर देवा, भिवजी आनि सोमजी आंता पार बदलून गेल्याती,दिवस दिवस भायेर असत्याती आन् पारावरच्या कुनबी धारकर्यांना घिऊनशान फिरत्याती.मला काई त्येंचं लक्षान ठीक दिसत न्हाई.पर कांय करावं सुचंना जांलय बंग ! जीव हाय तंवर म्या त्येनला आनि समद्या घरचांना धड करीन! पर तू ह्यो फरमानाचा कागूद अन् ह्यो शिक्का ठिवून घ्ये आनि काई इपरीत घडलंच तर आमच्या पाटी आमच्या कारबारनीची काळजी घ्ये ! त्येंच्या प्वाटात कोन जानं लक्षुमी हाय का नाराईन , पर जे कोन आंसल त्येला नीट सांबाळ बरं का गड्या ! आमचं काई इपरीत....." "धनी !", नाईकजींच्या हातातील कागद व शिक्का आपल्या हाती घेत डोईवरल्या मुंडाश्याच्या आत सारत देवा म्हणाला,"म्या जित्ता हाय तंवर असं काई वंगाळ मनांत बी आनू नंगासा ! तुमास्नी हात लावायच्या आदुगर म्यां न्हाई का कापनार येकेकाला?"
देवाचं हे असं बोलणं ऐकून नाईकजींना जरा बरं वाटलं , पण अंतर्मन सारखी धोक्याची सूचना देतच होतं ! भाबड्या देवा महालापर्यंत त्याची झळ पोचू नये या प्रयत्नात नाईकजींनी विषय बदलला.पण जसजसं गांव नदीच्या पलिकडे दिसायला लागलं तसतसं त्यांना अधिकच अस्वस्थ वाटायला लागलं.
वाटेत एका गर्द रानातून ते आता गावाच्या वेशीत पोचणार होते.वेळ तिन्ही सांजेची ! रातकिड्यांची किरकिर , अंधार पडायच्या वेळेस मशाल पेटवून सहा जणांचा पुढचा प्रवास सुरू होता.सर्वांत पुढे चौघे जण , मग नाईकजी आणि शेवटी धन्याला पाठिमागून लक्ष ठेवत आणि संरक्षण देणारा देवा महाला.देवा तसा एकदम जिगरबाज माणूस , पण आपल्या धन्याची कधी नव्हे ती अशी अवस्था बघून तो स्वतः पण आज जरा ढेपाळलाच होता.
अचानक पुढच्या चार जणांपैकी एक जण ओरडला ,"धनी घात झाला !" आणि एव्हढे बोलून होईतोवर पुढचे चारही जण जिवाच्या आकांताने किंचाळी फोडत आणि आपापल्या छात्या दाबत घोड्यांसह खाली कोसळले ! त्यांच्या हातून खाली पडलेल्या मशालींनी आपलं काम चोख बजावलं ! वैशाख वणव्यासारखं वैशाखातलं ते पायाखालचं वाळलेलं गवत उभं पेटलं ! देवा भान येऊन आपला घोडा धन्याच्या घोड्याच्या पुढे घालणार तो त्याला दिसलं की धन्याच्या हातून उगारलेली तलवार गळून पडली आणि छातीवर हात दाबत ते पण खाली पडले.मनात असून देवाला घोडा पुढे घेताच आला नाही .कारण तोवर माळाच्या चढणीवर नाईकजींचं घोडं आपल्या मालकाला घेऊन पोचलं होतं आणि त्याला सात आठ जणांनी घेरलं होतं ! एकाने नाईकजींना दंडाला धरून खाली पाडलं आणि घोड्यावरून गतप्राण होत खाली कोसळणार्या नाईकजींचा जीव यमाकडे आपण धाडल्याची खात्री पडल्यावर तो गरजला, " ह्येंच्या कमरंची ती थैली घिऊन्श्यान सुटा आन् तडक भिवजी आनि सोमजी भाऊंसमोर न्हिऊन घाला.आन् त्यो द्येवा पडला का न्हाई ? त्या चार जनातच आसंल बंगा , ह्ये ५ मुडदं पन घ्येऊन चला बिगीनं ! आन् त्यो द्येवा नसंल त्या चार जनांत तर गावंल तथं उभा कापा त्येलाबी , चला सुटा !"
कधी नव्हे ते देवाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! "हे लोक ७-८ तरी असावेत, कितीही लढलो तरी आपण पडणारच! खेरीज ज्याच्यासाठी लढायचे तो धनीच जग सोडून गेलाय , वयनीसायेबांकडे बंगायचं आसंल आनि वतनाचा कागूद टिकवायचा आसंल तर जीव वाचवाया हुवा , धन्यास्नी तसं वचन दिलयां न्हवं?" असं म्हणून कमरेचा शेला हाती धरून त्यानं आपलं घोडं बाजुच्याच झाडीमधे दामटवलं आणि आधी शेल्यानं त्या घोड्याचं तोंड नाकाच्या वरील बाजूस व डोळ्यांच्या खाली घट्ट बांधलं कारण वणव्यामुळे घोडं खिंकाळंल आन मंग वयनीसाब पातुर पोचाया व्हायाचं न्हाई ! आपल्या डोळ्यांदेखत आपल्या धन्याला संपलेला पाहून येणारे हुंदक्यांचे कढ आवरणं त्याला कठीण झालं तसं त्याने तलवारीच्या खोवणीचा शेला आपल्या स्वतःच्याच तोंडात कोंबला आणि आपल्या आसवांना मुक्त वाट करून दिली ! संताप आणि दु:खाने पिळवटला गडी किती वेळ जनावरावर मांड टाकून होता कुणास ठाऊक ! दु:खाचा आवेग ओसरल्यावर त्याला जाणवलं की ते लोक प्रेतं घेऊन निघून गेले आहेत्.धन्याचे शब्द आठवून त्याला गहिवरून आलं आणि तो भानावर आला.जळणार्या गवताच्या अंधुक प्रकाशात त्याला धन्याची उघडीबोडकी तलवार आणि दूर उडालेलं म्यान दिसलं.तलवार म्यानेत घालून तो तडक गावात शिरून पन्नादाईला घेऊनच धन्याच्या वाड्यात शिरला.गस्तीच्या माणसांनी त्याची ती अवस्था पाहिली आणि ताबडतोब त्याला आत घेत त्याला आणि पन्नादाईला विचारपूस केली.पण इतका वेळ दाबून ठेवलेलं दु:ख आता देवाच्या नरड्यातून हंबरड्याच्या रुपानं बाहेर पडलं ! रात्रीच्या वेळेला , ते पण माध्यान रातीला घुसमटत्या आवाजातील ते काळीज चिरत जाणारे शब्द "धनी !....आणसवाची झोप उडवून जिवाचा थरकाप उडवून गेले ! ती ओसरीवर आली आणि नाईकजींच्या बैठकीवर त्यांची तलवार ठेवून धाय मोकलून गदगदणार्या देवाला बघून तिला परिस्थितीची कल्पना आली.अतीव दु:खाने मूर्छित होऊन ती कोसळणार तोच देवासोबत आलेल्या पन्नादाईने तिला सावरले.स्वतः ओलेती बाळंतीण असलेल्या आणि त्यात "दाई" असलेल्या पन्नाला ' गर्बारपनांत कुकवाचा धनी ग्येला आनि पोटुशी बाय!' असं पेचदायक बाईचं दु:ख न समजतं तरंच नवल !
यानंतर देवा महालानं त्याच्या कुटुंबियांसहित आणसवेला आधार दिलां.नाईकजींचे दिवस वगैरे उरकल्यावर तिनं सर्व माणसांना विश्वासात घेतलं.परिस्थितीची आणि खाल्ल्या अन्नाची जाण असणारी ती माणसं जिवावर उदार होऊन आणसवा आणि तिच्या पोटातला गर्भ यांच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटू लागले.
या घटनेनंतर सव्वादोन महिन्यांनी आणसवेला मुलगा झाला.त्याचं नाव कान्होजी ठेवण्यात आलं !
स्वतःच्या जन्मापूर्वीच पितॄछत्र हरवलेल्या या बालकाने म्हणजेच कान्होजींनी पुढे आपल्या महाराष्ट्राच पितॄछत्र - छत्रपती शिवाजी महाराज आणि आपलं स्वराज्य कसं राखलं याचं सुसंगतवार वर्णन तुमच्यापर्यंत पोचवणारं हे माझं २५०+ पानी दुसरं पुस्तक असेल : "रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे".....
प्रतिक्रिया
12 Jan 2010 - 2:45 pm | फ्रॅक्चर बंड्या
फार छान लिहलय...
नक्की वाचेन तुमचे पुस्तक...
binarybandya™
12 Jan 2010 - 5:11 pm | स्वाती२
छान लिहिलय. पुस्तकासाठी शुभेच्छा!
12 Jan 2010 - 7:10 pm | सागर
प्रिय मित्रवर्य उदय यांस
खूप उत्कंठेने पुस्तकाची वाट पहात आहे ...
जास्त उशीर करु नये ही विनंती ..
पहिल्या भागातील त्रुटींवर या भागात घेतलेली मेहनत जाणवते आहे.
खूप छान... लवकरच संपूर्ण पुस्तक वाचायला मिळो ही अपेक्षा आणि सदिच्छा
जय शिवराय
- सागर