तुम्ही कधी कोणाला एखाद्या गोष्टीत तल्लीन झालेलं बघितलं आहे का? म्हणजे एखादा गायक गाणं गाता गाता एखाद् वेळेस एकरूप होतो त्या गाण्याशीच. किंवा रंगमंचावर काम करता करता एखादा अभिनेता त्या भूमिकेशी एकरूप होउन जातो. मग कशाचंच भान उरत नाही त्याला. सगळ्या जगाचा विसर पडावा आणि आपण स्वतःच आपल्या कलाकृती सह विश्व व्यापून रहावं अशी ही अवस्था. खरं तर स्वतःचं अस्तित्व अशी काही गोष्टंच उरत नाही अशा वेळेस. मी, माझं गाणं, माझा आवाज, माझा अभिनय, माझी कलाकृती असं काही मनात येतच नसावं अश्या वेळेस, ईतकी भारून टाकणारी ती अवस्था असते. आणि याचा अनुभव ती अवस्था बघणार्यालाही येते. मी स्वतः काही गाणं म्हणणार्यातला नाही, किंबहूना मला शास्त्रीय गाण्यातलं काहीही कळत नाही, पण एखादा राग छेडताना गायकाची तल्लीन झालेली मूर्ती बघितली की त्याचा हेवा वाटतो. कधी कधी 'सा रे ग म प' सारख्या कार्यक्रमात एखादा गायक किंवा गायिका गाणं गाता गाता त्यांच्याच नकळत स्वतःच ते गाणं बनतात आणि मग श्रोत्यांना मिळतो एक अप्रतिम अनुभव. देह, आत्मा, मन, विचार सगळं सगळं कस एकजीव, एकरूप झालेलं असतं. मला स्वतःला अशा वेळी सगळीकडे आकाशतत्व भरून राहिल्यासरखं वाटतं किंवा स्वतःच आकाशतत्व असल्यासारखं वाटतं. म्हणजे नक्की काय ते मला शब्दात मांडता येत नाहीये.
मी काही संगीतज्ञ नाही किंवा सतत गाणी वगैरे ही ऐकत नाही पण कधी कधी एखादं काव्य किंवा गाणं मनाला असं काही भिडतं कि वाटतं बास्स् , इथे सगळं थांबावं!
माझ्याकडे अनुप जलोटां चा 'भजनसंध्या' नावाचा एक भजनसंग्रह आहे, जवळपास २०-२२ वर्षांपूर्वीचा. त्यातलं एकन् एक भजन मला नेहमीच हा अनुभव देत आलंय.
जग में सुंदर दो ही नाम | चाहे कृष्ण कहो या राम ||
बोलो राम राम राम | बोलो श्याम श्याम श्याम ||
अनुप जलोटां नी दिव्य स्वरात गायलेलं हे भजन ऐकताना अंगावर शहारे येतात माझ्या. त्यांच्याच 'ऐसी लागी लगन' भजना मधे मीरेच्या कृष्णाप्रती तादाम्य पावलेल्या अवस्थेचं अप्रतिम वर्णन आहे. - 'महलओं मे पली | बनके जोगन चली' - यातले शेवटचे चरण अनुप जलोटांनी ३-४ वेळा गायले आहेत आणि शेवटच्या वेळी 'बनके जोगन चली' तलं 'चली' अश्या काही नजकतीने म्हणले आहे की मीरेची उत्कटता त्यांच्या स्वरांतून आपल्या गळ्याशी हुंदका होऊनंच थांबते. हीच मीरा 'रंग दे चुनरिया' मध्ये कृष्णाला सांगते -
लाल ना रंगाऊं मैं तो, हरी ना रंगाऊं | अपने ही रंग में तू रंग दे चुनरीया||
ओ शामपिया आ आ मेरी रंग दे चुनरिया ||
वर असंही म्हणते की -
ऐसी रंग दे की रंग नाही छूटे | धोबिया धोए चाहे सारी उमरिया||
हो रंग दे चुनरिया||
हे जरी मी लिहितोय तरी ही अनुभवण्याची गोष्टं आहे. शब्दांपलिकडला अनुभव आहे तो. अवघ्या शरीराची वीणा व्हावी अन् स्वर झंकारत यावेत असं काहीसं वाटतं. हीच अवस्था नेमक्या शब्दात पकडली आहे कबीराने -
तन तंबूरा तार मन, अद्भुत हैं ये साज |
हरिके कर से बज रहा, हरी की हैं आवाज ||
जियो! मला भावते ती यातली उत्कटता. स्वत्व विसरायला लावणारी भावना. बस्स् यार, मरून जावं इथच. आणि मरण सुद्धा कसं यावं ते सूरदासांच्या शब्दात ऐका -
ईतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले ||
जब प्राण कण्ठ आये, कोई रोग ना सताये |
यम दरस ना दिखाये, जब प्राण तन से निकले ||
या सर्वच रचना मला नेहेमीच भावत आल्यात.
असंच काहीसं मला पंडित भीमसेन जोशींच्या जादुई स्वरात भजन ऐकताना होते. कळतच नाही की हा अभंग श्रेष्ठ, की त्याचं संगीत श्रेष्ठ, की ते गाणारा आवाज श्रेष्ठ. खर तर या सगळ्याचा एकत्र परिणाम असतो तो. शिवाय या प्रत्येकाला आपापली स्वतंत्र अभिव्यक्ति ही असतेच. म्हणजे भजनी ठेका सुरू झाला की त्यातले टाळ मृदुंग कान तृप्त करतात, पंडितजीं नी घेतलेला नुसता आलापही आपल्याला एका अज्ञात विश्वात नेतो अन् संतांची शब्दरचना अशी काही की सावळ्या विठूला अक्षरशः न्हावू घालतात. मला या अभंगांमधली 'मी' पणा गेलेली भावना फार फार भावते -
मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी ||
सुंदर! धन्य ते लोक ज्यानी साक्षात् ज्ञान्या, तुक्या, नाम्या ची वाणी ऐकली. सार्थकच झालं कि हो जन्माचं. मला ज्ञानेश्वर माऊलींचं नेहमीच विशेष कौतुक वाटत आलंय. आयुष्यभर समजाकडून अवहेलना वाट्याला येऊनही त्यांच्या साहित्यात कुठेही तत्कालीन समाजाविषयी, लोकांविषयी एकही कटुशब्द नाही. उलटपक्षी ते म्हणतात - जो जे वांछील तो ते लाहो| - काय सत्विकता भरून राहिली असेल हो त्या पुण्यत्म्यात. अहो एकविस हे काय वय आहे का समधी घ्यायचं. पण जो माणूस वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितो, त्याच्या अवतारकार्याला वयाचं बंधन कोण घालणार. धन्य तो देह, धन्य तो आत्मा आणि धन्य तो समाज ही ज्याने ज्ञानदेव पाहिला.
पंडितजींच्या 'आरंभी वंदितो ...' मध्ये एक ओळ आहे - 'काही केल्या तुझे मन पालटेना' हि ओळ पंडितजींच्या गळ्यातून अशी काही अवतरली आहे की त्यातली भक्ताची आर्तता काळीज हेलावून टाकते. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे मला या कलाकृतींत खरेपणा, उत्कटता, आर्तता जाणवते. (हे लिहीताना सहज मनात आलं लिहून झाल्यावर हे मि.पा. वर टाकावं. आणि अचानक लिहिताना शब्द जरा जास्त विचार करून लिहायला लागलो. लिखाणाचा फ्लो बरोबर वाटतोय ना, जास्त ताणत नाहिये ना, सुसंगत वाटतंय ना लिखाण असलं काहितरी डोक्यात यायला लागलं. पण मग वाटलं की हे बरोबर नाही. आपल्याला जे सुचेल, ते लिहायचं, त्यामुळे कदाचित तुम्हाल लिखाणात विसंगती वाटेल. पण वेगवेगळ्या कलाकृतींबद्दल जरी लिहिलं असलं तरी मांडायचा मुद्दा एकच आहे)
काल रात्री 'मी मराठी' चॅनेल वर भीमराव पांचाळ' सुरेश भटांची एक गझल पेश करत होते. काय स्वर लागला होता त्यांचा -
आज का तुला माझे एवढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रु ढाळलेस का तेव्हा ?
- तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा?
आज सकाळी उठल्यावर आधी लायब्ररीत गेलो, 'एल्गार' आणलं आणि अक्षरशः न्हावून निघालो. पहिलीच गझल तृप्त करून गेली -
ओठी तुझ्या न आले, अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही
मराठी वाचता येण्याचं सार्थक झालं. अगदी हेच फिलींग 'भाउसाहेब' ही देतात. आत हेच बघाना -
दोस्तहो दुनियेस धोका मेलो तरि आम्ही दिला |
येऊनिया नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला ||
भाऊसाहेब तुम्हाला सलाम! अरे या माणसाने आपल्या मरणाचंदेखील सुंदर काव्यात रुपांतर केलं आणि आम्ही करंटे आमच्या अमूल्य जीवनाचा नरक बनवतोय. सुरेश भटांनी म्ह्टल्याप्रमाणे ही आमचीच करतूद की-
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते ||
मी २००३ साली हिमालयात गेलो होतो. तिथल्या एका माणसाने एक प्रसंग सांगितला होता तो आत्ता हे लिहिताना आठवला - दूरदर्शन तर्फे एक माणूस त्या घांगरिया (अहाहा ! काय सुमधूर नाव आहे) गावात काही दिवस राहिला होता. तिथल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स वर एक डोक्युमेंटरी बनवत होता. काही महिने तेथे राहून तेथून निघताना तो माणूस म्हटला - 'ये जगह स्वर्ग हैं स्वर्ग, अगर नरक में रहने का आदि नही होता तो यही ठहर जाता|' असाच अजुन एक प्रसंग. काश्मीरच्या दाल लेक मधून शिकार्यातून जात होतो. पाण्यात शेवाळं आणि तेलाचा तवंग वगैरे बघून म्हणालो, " पानी खराब हैं|" यावर तो शिकारा चालवणारा काश्मिरी युवक म्हणाला, "पानी कभी खराब नही होता साब, हम ईन्सान उसे खराब बनाते हैं|" आणि हे समजायला त्याला शालेय शिक्षण वगैरे घ्यायची गरज वाटली नव्हती. कारण शाळेत काय आपण पाणी म्हणजे H2O हे शिकणार. एक सुंदर वाक्य आठवलं -
Why kids are so innocent &grown up people are so selfish,
Perhaps it is EDUCATION that makes the difference.
जाऊदे शाळा अणि शिक्षण पद्धती बद्दल बोलून वास्तवात यायचं नाहिये मला.
तर मनाला भिडणार्या कलाकृती....संदिप-सलिल च्या कविताही अश्याच मनाला भिडतात. तसं पाहिलं तर आपल्याच मनातल्या भावना पण त्यांना योग्य शब्दांचं कोंदण मिळालं की कश्या झळाळून येतात नाही? अत्यंत सोप्या शब्दांत काव्यरचना करून या जोडगोळी ने खुप उत्तमोत्तम रचना दिल्या आहेत. त्यांच्या ५०० व्या प्रयोगाच्या वेळी त्यांनी 'दमलेल्या बाबाची कथा' ही कविता ऐकवली होती. मी ज्या ज्या वेळी ही कविता ऐकतो, त्या त्या वेळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. नव्हे, हमसून हमसून रडतो मी ती ऐकताना. त्या दिवशी सलिल जेव्हा हि कविता गात होता तेव्हा, स्वतः सलिल, कविता वाचून दाखवणारा संदिप, निवेदन करणारा सुनिल बर्वे, वादक, प्रेक्षक सर्वांचाच कंठ दाटून आला होता. अप्रतिम..... केवळ अप्रतिम !!
संदिप चीच 'नामंजूर' हि एक गझल -
मला ऋतूंची साथ नको अन् कौल नको
मला कोणत्या शुभशकुनाची झूल नको
मुहुर्तं माझा तोच ज्या क्षणी हो ईच्छा
यील त्या लाटेवर डुलणे नामंजूर
ये हुई ना बात. भेंचोद आपल्या मर्जीचा आपण मालक. नादंच नाही करायचा. आणि वागण्या बोलण्यात transperency किती तर -
मी मनस्वितेला शाप मानले नाही
मी उपभोगाला पाप मानले नाही
ढग ज्यातून अद्याप एकही फिरला नाही
नभ ऐसे मी अद्याप पाहिले नाही
कुठेही दांभिकता नाही. जे आहे ते असं आहे, पटलं तर घ्या. नव्हे, झेपलं तर घ्या. असाच दांभिकतेचा आव ना आणणारा एक शेर आठवला -
मत कर मना मुझे ए मौला, मस्जिद में पीने से |
या फिर ऐसी जगह दिखा दे जहा खुद्दा नही हो ||
आता हा दारुडा शायर अध्यात्मिक द्रुष्ट्या अधिक उंची वर आहे कि त्याला दारू पिउ नको म्हणणारा मौला हे ज्याचं त्याने ठरवावं.
चला, मला वाटतं की मी आता वाहवत चाललोय, तेव्हा आवरतं घेतो. लिहित बसलो तर अजुन बरीच पानं होतील.
प्रतिक्रिया
2 Jan 2010 - 5:27 am | विकास
लेख एकदम आवडला. मनापासून लिहीलेले जाणवले....
यावरून संत सोयराबाईचे भजन आठवले जे किशोरी आमोणकरांनी अप्रतीम गायले आहे:
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग ||
मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया |
देही असोनी विदेही, सदा समाधिस्त राही |
पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे चोखीयाची महारी |... अवघा रंग एक झाला
मला वाटते हा "पंढरीचा राया" कुणाचा गाण्यात असतो, कुणाचा नाचात तर कुणाचा संशोधनात अथवा इतर कुठल्यातरी अभिजात कला/ज्ञानात दडलेला असतो. पण बर्याचदा तो आपल्याला माहीतच नसतो की आपला कशात आहे ते. त्याचा साक्षात्कार ज्या क्षणाला होतो त्या क्षणाला "पाहता पंढरीचा राया" सारखी अवस्था होते. ज्यांना ते कळते ते खरे भाग्यवान, जे ते समजण्याची धडपड करतात ते त्या मार्गातील वारकरी आणि इतर कदाचीत नुसतेच विश्लेषक असतात....
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
2 Jan 2010 - 11:05 pm | चाणक्य
लाख मोलाचं बोललात विकासराव. मी 'हेवा वाटतो' म्हटलं ते यासाठीच. पण आपल्यातच दडून असलेला 'हा' विठु आपल्यालाच लवकर कळू नये हा किती विरोधाभास आहे नाही?
2 Jan 2010 - 5:45 am | सुधीर काळे
चाणक्यसाहेब,
काय सुंदर लेख लिहिलाय् तुम्ही! तुमचेच शब्द वापरून सांगतो कीं एखादा गायक जसा गाणं गाता गाता संगीताशी एकरूप होतो किंवा रंगमंचावर काम करता करता एखादा अभिनेता जसा त्या भूमिकेशी एकरूप होउन जातो तसाच मला वाटलं कीं हा लेख लिहिता-लिहिता तुम्ही तुमच्या लिखाणाशी एकरूप झालेले आहात!
व्वा! सुरेख!! अजून लिहा असेच.
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
2 Jan 2010 - 8:19 am | निमीत्त मात्र
व्वा! काकांशी सहमत आहे!
2 Jan 2010 - 8:02 am | चित्रा
तुमच्या भावना वाचकांपर्यंत पोचवू शकलात, छानच वाटले. अनेक माहिती नसलेल्या रचनांशी ओळख झाली.
अरे या माणसाने आपल्या मरणाचंदेखील सुंदर काव्यात रुपांतर केलं आणि आम्ही करंटे आमच्या अमूल्य जीवनाचा नरक बनवतोय.
तुमचा हा मनातला लेख खूप काळ लक्षात राहील.
2 Jan 2010 - 12:08 pm | स्वाती दिनेश
चित्रसारखेच म्हणते,
लेख आवडला.
स्वाती
2 Jan 2010 - 9:07 am | प्रकाश घाटपांडे
हा लेख 'आतुन' आल्यासारखा वाटतो. त्यावर विकास यांचा प्रतिसाद म्हणजे दुग्धशर्करा योग. खुप दिवसांनी चाणक्य यांचे भावपुर्ण तरीही आशयघन असे लेखन वाचायला मिळाले.
कुठे थांबाव याच अचुक हे भान. कारण यावेळी वाचकाला हे संपुच नये अस वाटत असत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
2 Jan 2010 - 9:44 am | सहज
छान छान
2 Jan 2010 - 7:00 pm | समंजस
छान लेख. एकदम आवडला
:)
2 Jan 2010 - 7:27 pm | तिमा
लेख चांगला मनापासून लिहिलेला असला तरी थोडा भरकटलेला वाटतो.
जाताजाता: माझा एक मित्र अनुप जलोटांना 'अनुप खलबत्ता' म्हणायचा. कारण ते गाताना एखाद्याच स्वरावर थांबून त्याला कुटतात असे त्याचे मत होते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
2 Jan 2010 - 8:37 pm | सुधीर काळे
खरं आहे तिरशिंगराव,
अनुप जलोटाजी भजनं म्हणताना मला खूप भावतात. पण त्यांनी गझल गाऊ नये. गझल म्हणणार्या गायकाच्या आवाजात 'दर्द' पाहिजे. पहाडी, खणखणीत आवाजाचे जलोटाजी त्याबाबतीत अगदी 'खलबत्ता'च आहेत.
पण भजने? अतीशय सुंदर! रागांचे ज्ञानही सखोल व सुरांवर पूर्णपणे नियंत्रण. त्यांचे "चदरिया झीनी रे झीनी रे" हे भजन ऐकाच!
पण लेख भरकटलेला वाटला नाहीं.
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
2 Jan 2010 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला.
-दिलीप बिरुटे
2 Jan 2010 - 8:24 pm | संजा
>>>>आज सकाळी उठल्यावर आधी लायब्ररीत गेले, 'एल्गार' आणलं आणि अक्षरशः न्हावून निघालो.
सर/मॅडम,
खुपच छान
संजा.
2 Jan 2010 - 8:28 pm | jaypal
वाचन आहे हो.
लेख आवडला हे वेगळ सांगण न लगे
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
2 Jan 2010 - 11:10 pm | चाणक्य
टंकायची घाई, एक काना खाई.
:P
2 Jan 2010 - 8:58 pm | प्राजु
अतिशय सुरेख!!
खूप मनापासून आलेला हा लेख मनापर्यंत पोहोचला. प्रत्येक शब्द न् शब्द खरा आहे.
मनाची अशी अवस्था खूप वेळा अनुभवास येते. सुरेश भटांची कोणतीही रचना याची प्रचिती देतेच देते. आरती प्रभूंचं, आशा भोसले यांनी गायलेलं "गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे.." हे गाणे ऐकतानाही असंच काहिसं होतं. आपण कुठे आहोत याचं भानही राहात नाही. पं वसंतराव देशपांडेंचं गाणं ऐकतानाही मनाची अवस्था तरल होऊन जाते.
खूप दिवसांनी.. खरंच खूप दिवसांनी एक चांगला लेख वाचल्याचं समाधान मिळालं.
धन्यवाद.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
2 Jan 2010 - 10:35 pm | प्रमोद देव
छान आहे लेखन.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
2 Jan 2010 - 11:41 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री चाणक्य, लेख आवडला. श्री जलोटा यांचे गाणे आवडत नसले तरी त्यांच्या समरसण्याचे कौतुकच आहे. अशा तात्पुरत्या तल्लीनतेप्रमाणेच काही कलाकार/ व्यक्ति आपल्या कामाशी कायमच तादात्म्य पावलेले आढळतात. अशा लोकांचा नेहमीच हेवा वाटतो पण केव्हा केव्हा अशी तादात्म्यता मानवी असुरक्षिततेचा (जी प्रेरणाही आहे) पुरेसा वेध घेतेय का याविषयी शंकाही वाटते. एका विचार करायला लावणार्या लेखाबद्दल धन्यवाद.
3 Jan 2010 - 10:53 am | भडकमकर मास्तर
चांगला लेख...
मला काही गाणी बरी वाटतात, काही आवडतात , काही लैच आवडतात ... (पण एकरूप होणं वगैरे होतही असेल पण मला मान्य करायला आवडत नाही.. ;) )
अवांतर : भजन संध्येचा मीही खूप काळ फ्यान होतो... इतना तो करना स्वामी .. आपलं फेवरीट गाणं आहे... ( शाळेत असताना घरी आणलेली पहिली क्यासेट हीच होती , आणि तीच अनंतकाळ वाजवली होती.. त्या काळात जलोटा भयानक म्हणजे भयानकच पॉप्युलर होते))...