तिचं अस्तित्व `आपल्या जगा'पासून केव्हाच वेगळं झालंय...36 वर्षांपूर्वी जिवंतपणाच्या सगळ्या संवेदना हरवलेली अरुणा शानभाग सध्या पुन्हा चर्चेत आली असली, तरी त्या चर्चेचे वारे तिच्या आसपासदेखील पोचलेले नाही... `ती जिवंत आहे', एवढंच `केईएम'चे वैद्यकीय अधिकारी सांगतात. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने तिचं एकटेपण आणखी `कडेकोट' झालं आहे... `केईएम'च्या एका निर्जन कोपऱ्यातल्या `बेड'वर एकाकीपणे तिची देखभाल करणारे कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाचे अतिवरिष्ठ अधिकारी वगळता, अन्य अनेकांना ती कुठे आहे हे माहीतदेखील नाही... अनेक परिचारिका आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात `डॉक्टरकी'चे धडे गिरविण्यासाठी शिकतानाच वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये गळ्यात "स्टेथो' अडकवून `ड्यूटी' करणाऱ्या अनेक नवख्या डॉक्टरांना तर अरुणा शानभाग हे नाव आज पहिल्यांदाच माहीत झालंय...
... आज अरुणाच्या `स्टोरी'चा `नवा अंक' सुरू झाला, म्हणून माझी पावलेही उत्सुकतेने `केईएम'कडे वळली. अरुणाला `ठेवलेल्या' त्या वॉर्डच्या आसपास तिच्या `अस्तित्वा'च्या काही खाणाखुणा असतील, तर त्या अनुभवाव्यात असं वाटत होतं. पण `प्रशासना'नं तिथं पोहोचू दिलंच नाही... अरुणानं जगावं, की मरावं, हे जर प्रसार माध्यमं ठरवणार असतील, तर त्यांच्यातल्या कुणावर अशी वेळ आल्यावर आम्ही काय करावं, असा थेट प्रश्न प्रशासनाच्या एका वरिष्ठानं `घुसवला', आणि मी गप्प होऊन बाहेर पडलो... आवारातल्याच `मेडिकल कॉलेज'चे काही स्टुडंटस घोळक्यानं गप्पा मारत आसपास फिरत होते... एका घोळक्यापाशी मी थांबलो, आणि अरुणाची चौकशी केली... त्यांच्या चेहेर्यावरची प्रश्नचिन्हं मला स्पष्ट दिसली... पण आजच ती `स्टोरी' छापून आल्यानं काहींना लगेच उलगडाही झाला, आणि अनेकांनी केवळ खांदे उडविले... मी तिथून निघालो, आणि एका काहीश्या एकाकी व्हरांड्यात उभा रहिलो... समोरून एक काहीशी वयस्क, रिटायरमेंटकडे झुकलेली नर्स येताना दिसली... मी तिला थांबवलं, आणि पुन्हा अरुणाविषयी विचारलं... क्षणभर तिच्या डोळ्यात वेदनेची झाक उमटलेली मला जाणवली, पण ती सावरली... मानेनंच नकार देत ती पुढं निघाली... मी पुन्हा तिला थांबवलं.
`तुम्ही पाहिलेलंत तिला?' मी विचारलं... आणि तिनं मान हलवली.
`कशी आहे ती?' ती कोमात आहे, हे माहीत असूनही मी पुढचा प्रश्न विचारला.
`ती जिवंत आहे'... ती थंडपणानं म्हणाली.
मी स्तब्ध...
तिच्या डोळ्याततली वेदना आणखीनच स्पष्ट झालेली.
`कुणी असतं तिच्यासोबत?'...
`२४ तास?' नकारार्थी मान हलवतच तिनं मलाच विचारलं.
`नातेवाईक वगैरे?'... पुन्हा ती गप्प.
`कुठे ठेवलंय तिला?' मी एक अयशस्वी प्रयत्न पुन्हा केला...
आणि काहीच न बोलता, मान झुकवून ती चालू लागली...
---------------
नोव्हेंबर 1973 मध्ये, म्हणजे तब्बल 36 वर्षांपूर्वी सूडभावनेने पेटलेल्या सोहनलाल वाल्मिकी नावाच्या कुणा नरपशूने कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळून तिच्यावर पाशवी बलात्कार केला, तेव्हाच तिच्या मेंदूच्या संवेदना हरपल्या. तिची वाचा आणि दृष्टीदेखील हरवली... कुत्र्यांना अमानुषपणे वागविणार्या या `टेंपरवारी' सफाई कामगाराला कडक शब्दात समज दिल्याचा सूड म्हणून त्यानं तिच्यावर अमानुष बलात्कार केला. संवेदना हरपलेल्या स्थितीमुळे मूक अरूणाला स्वतः त्याविरुद्ध कोणताच पुरावा देता येणं शक्यच नव्हतं...
काही दिवसांतच तिचं लग्न होणार होतं. सामजिक अवहेलनेपासून वाचविण्यासाठी प्रशासनानं बलात्कारची तक्रारही केली नव्हती, असं म्हणतात...
सोहनलालवर बलात्काराचा आरोपही होऊ शकला नाही... आणि तो शिक्षा भोगून पुन्हा आपल्या, माणसांच्या जगात परतलाही...
अरुणा मात्र, सोहनलालने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहे... एकाकीपणे, मूकबधीरपणे...
पण तेव्हापासून, तिनं आपल्या, `जिवंत जगा'कडे डोळे उघडून पाहिलेलंदेखील नाही...
... 36 वर्षांपूर्वी सुरू झालेली अरुणाची ही "कथा' आज एका नव्या वळणावर येऊन थांबली आहे. रुग्णालयातील तिच्या संवेदनाहीन अस्तित्वाचादेखील कधीकाळी तिथल्या परिचारिकांना मोठा दिलासा होता. कारण, अरुणावरील अत्याचारामुळे रात्रंदिवस ड्यूटी बजावणाऱ्या परिचारिकांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अरुणा शानभाग हे परिचारिकांच्या लढ्याचे प्रतीक बनले होते.
अरुणा शुद्धीवर नाही, तिच्या संवेदना हरवल्या आहेत, हे माहीत असूनदेखील याच भावनेतून तिच्यावरील मायेपोटी तिच्यावर उपचार करणाऱ्या आणि तिच्याच "बॅच'च्या परिचारिका आज बहुधा रुग्णालयाच्या सेवेत नाहीत. त्यामुळे, बेशुद्धावस्थेतही अरुणानं परिचारिकांच्या जगाशी जुळवलेलं नातं आज संपून गेलं आहे. अरुणा ही रुग्णालयाच्या आणि तेथील आजच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने केवळ एक "कथा'च राहिली आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी "अरुणाची स्टोरी' पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि प्रसारमाध्यमांची "केईएम' परिसरात गर्दी सुरू झाली. पालिका प्रशासनाने याची दखल घेतली आणि अरुणाचा वॉर्ड रहदारीसाठी बंद केला... तो आणखीच एकाकी झाला. जगाच्या जिवंतपणाचं भानदेखील नसलेली अरुणा अधिक एकटी झाली. अरुणाच्या वॉर्डकडे फिरकण्यावर महापालिका आयुक्तांनी बंदी घातली, त्याला आता अनेक वर्षे झाली आहेत. अरुणाला जिथे ठेवलंय, तिथे जाण्याची सर्वसामान्यांना मुभा नाही. गेल्या 36 वर्षांच्या काळात अरुणाच्या "स्टोरी'चा गाभादेखील काहीसा पातळ झाला आहे. तिच्या मायेचं, कुटुंबातलं बहुधा कुणीच तिच्याकडे फारसं फिरकत नाही. तिच्या संवेदनाहीन शरीरात केवळ "वैद्यकशास्त्रीय जिवंतपणा' आहे, पण "जिवंतपणा' असलेल्या जगापासून ती दूरच आहे. अरुणावर उपचार सुरू असलेला रुग्णालयाचा तो "कोपरा' केवळ पाहता यावा, आणि शक्य झाल्यास लोकांपर्यंत पोचवावा, म्हणून आज पुन्हा प्रसारमाध्यमांनी खूप प्रयत्न केले.
... ३६ वर्षं जगाकडे पाठ फिरवून राहिलेल्या अरुणाने आता आपल्या वयाची साठी ओलांडलेली असेल...
पुन्हा एक नवी "स्टोरी' सुरू झाली आहे!...
http://zulelal.blogspot.com
http://72.78.249.124/esakal/20091218/5024535996562450320.htm
प्रतिक्रिया
18 Dec 2009 - 9:47 am | मदनबाण
:(
18 Dec 2009 - 10:03 am | प्रकाश घाटपांडे
अशा स्टोरी मधुन दयामरणाचा प्रश्न प्राधान्यक्रमावर येतो. तसेच बलत्काराबद्दलच्या शिक्षेचा प्रश्न सामाजिक न्याय या स्वरुपात पुन्हा एकदा नव्या रुपाने येतो. दिनेशराव आपण सकाळ मध्ये ही वृत्तकथा मांडलीत व एक अर्थाने सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणलात याबद्दल अभिनंदन. या वरुन सुखांतची आठवण येते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Dec 2009 - 10:35 am | वेताळ
.......
वेताळ
18 Dec 2009 - 11:58 am | jaypal
.............
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Dec 2009 - 5:51 pm | स्वाती२
:(
18 Dec 2009 - 6:29 pm | बिपिन कार्यकर्ते
जेव्हा जेव्हा अरूणाची कथा ऐकली तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. ऐकवत नाही. तिला खरंच सुखाने मरण द्यावं असं वाटतं.
तो सोहनलाल आज कुठे आहे, काय करतो, त्याला काय वाटते इत्यादी कळेल का?
बिपिन कार्यकर्ते
18 Dec 2009 - 8:39 pm | धमाल मुलगा
फक्त शिव्या येताहेत डोक्यात.
बदला घेण्यासाठी बलात्कार...प्रशासनानं बलात्काराची तक्रार न करणं....आप्तांनीही नशीबापुढे हार पत्करुन शेवटी येणं जाणं कमी करणं....ह्यावर कडी म्हणजे त्या ठिकाणचा जिवंतपणा, राबता गोठवणं.....
अरे द्या रे कोणीतरी त्यांना शेवटचं इंजेक्शन...सुटतील तरी बिचार्या!!!
18 Dec 2009 - 9:01 pm | प्रकाश घाटपांडे
ज्या मैत्रीण पिंकी बिरानी यांनी आपल्या मैत्रिणीला इच्छामरण द्यावे, यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली दयामरणाच्या विषयाला आता नव्याने कायदेशीर उहापोह होईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Dec 2009 - 9:28 pm | चतुरंग
अरुणा शानभागच्या ह्या केसच्या निमित्ताने बलात्काराचा गुन्हा आणि त्याची शिक्षा ह्याचा संपूर्ण परामर्श घेऊन कायद्यात योग्य ते बदल करता येतील का ह्या दृष्टीने अभ्यास व्हायला हवा. सर्वोच्च न्यायालयाने ह्याबाबतीत पुढाकार घेऊन समिती नेमावी आणि काम सुरु करावे असे वाटते. (अरुणाला खरोखरच दयामरण द्यावे असे वाटते. सोहनलाल आज कुठे आहे? त्याला अरुणाची स्थिती दाखवावी.)
(काल संध्याकाळीच इथे अमेरिकेतल्या ह्या केसची हकिगत कानावर आली एका ९ वर्षाच्या मुलाला पळवून नेऊन त्याच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ३५ वर्ष सजा भोगून हा माणूस शेवटी डीएनए चाचणीत निर्दोष ठरला. न केलेल्या गुन्ह्याची ३५ वर्ष शिक्षा! सोहनलालच्या केसहून अगदी उलटा प्रकार. नियतीचा खेळ अजब असतो हेच खरे.)
चतुरंग
19 Dec 2009 - 1:40 am | टुकुल
डोक्क सुन्न झाल.
--------
19 Dec 2009 - 2:34 am | संदीप चित्रे
अशा वेळी (आणि चतुरंगने दिलेल्या बातमीसंदर्भातही) राहून राहून हेच मनात येतं -- ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन :(
19 Dec 2009 - 3:28 pm | पर्नल नेने मराठे
कठिण आहे...... स्वामी सगळ्याना चान्गली बुध्दी द्या.
चुचु