हिषेब्...जमा खर्चाचा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Dec 2009 - 11:26 pm

वर्ष संपत आले की प्रत्येक वर्षी हेच फीलिंग येते. कोनीतरी अगदी जवळचे दुरावणार असल्यासारखे राहून राहून वाटत असते. डिसेंबर चा पहिला पंध्रवडा या हुरहुरीत जातो अन दुसरा येतो कधी अन जातो कधी तेच कळत नाही इतक्या भर्रकन संपलेला असतो.

या सरत्या वर्षात काय मिळवले काय गमावले याचा कधीतरी लेखाजोखा मांडुयात. नक्की काय अनुभव पदरी पडले ते पहाण्यात.प्रत्येक वर्षाखेरीला हा विचार मनात अख्खा महिनभर वारंवार डोकावत असतो. आणि आपण एखाद्या बेसावध क्षणी झोपायच्या तयारीत असताना हा विचार एकदम तोंड वर काढतो. झोपेची आराधना वगैरे करावे लागत नाही. विचारांची गाडी सुरू होते. आठवणींची स्टेशने मागे मागे जायला सुरुवात होते. ज्यांची लग्ने डिसेंबरात होतात त्यांच्यासाठी वर्षाचा लेखाजोखा मांडाण्यात काहीच वावगे नसते. हातात हात घालून बोटांच्या वेलबुट्ट्या काढत जुन्या वर्षाला उत्साहात निरोप दिला जातो. नव्या वर्षाचे स्वागत करताना जरा कासराभर वर आलेल्या दिनकराला सलाम ठोकला जातो.

शाळेत असताना सरते वर्ष वगैरे काही भावना नसायची. टीव्हीवर विनय आपटे/भक्तीबर्वे वगैरे नी सादर केलेला खुमासदार गजरा कार्यक्रम मस्त दूध पोहे आईसक्रीम वगैरे चापून हाणत बघायचो आणि रात्री बारा वाजताच गजर लावून झोपायचो. त्यावेळेस दूरदर्शन रात्री साडेदहा वाजता बंद व्हायचे. लुकू सन्याल नामक भयनक दिसणारी बाई तेवढ्याच भयानक घोगर्‍या आवाजात पण एकदम फस्क्लास इंग्रजीत न्यूज द्यायची अन "शुभरात्री" ची पाटी झळकायची. वाड्यात शेजारीपाजारी सामसूम व्हायची. दिवाळीतले फटाके संपलेले असायचे ते शिल्लक राहिले असते तर रात्री बारा वाजता वाजवले असते. असा विचार करत झोपायला जायचे. रात्री बारा वाजताचा गजर वाजला की मुद्दाम एखाद्या गाढ झोपलेल्या भावंडाला मुद्दाम ढोसून ढोसून उठवाचे आणि अर्धवट झोपेतच त्याला हॅपी न्ञू ईयर करायचे. एखाद्या खौट शेजार्‍याच्या दारावरची बेल वाजवून उठवायचे. आणि हॅपीन्यू इयर करून वर पालकांच्या शिव्या खायच्या हा एकजात सर्व नव्या बर्षातील पहिला कार्यक्रम असायचा.

थोडे मोठे झाल्यावर कॉलेजला न्यू इयर पार्टी वगैरे शब्द ऑट स्टेट्स च्या मुलांकडून ऐकायला मिळाले. त्यावेळेस हॉस्टेल च्या पोरानी साजर्‍या केलेल्या रंगतदार पार्टीचे वर्णन ऐकून आपणही होस्टेलवर असतो तर .....असा विचार यायचा.

नोकरी लागल्यानन्तर पहिल्यांदाच घराबाहेर नवे वर्ष बंगलोर मध्ये साजरे केले होते. साजरे कसले? एकटाच होतो. कंपनी पुण्यातली. ऑफीसमधले बंगळूरकर आपापल्या घरी गेले ; गेस्ट हाऊस मध्ये मी एकटाच... कुटुंब काय असते... घर काय असते हे त्यावेळेस फारच जाणवले. बाहेर आकाशात फटाक्यांची आतषबाजी चालली होती आणि मी त्या रूम मध्ये एकटाच जगापासून आलीप्त बसलो होतो.

हा तर काय म्हणत होतो की प्रत्येक जणच सरत्या वर्षी या वर्षात कायकाय मिळवले काय गमावले याच हिषेब लावत असतो. खरच मी नक्की काय मिळ्वले या वर्षात.

कामाबाबत म्हणायचे झाले तर एका नव्या प्रोजेक्टची जबाबदारी डिसेंबर मध्ये अचानक आली. पण हे तर नेहमीचेच आहे. एक बरे आहे व्यवसायामुळे बरेचदा नवनवीन लोकांचा परिचय होतो. नव्याच विश्वात जाऊन यायला मिळते. क्लायेन्ट्स तरी किती विवीध प्रकारच्या व्यवसायातले असतात. मशीन टूल्स , कार्बाईड मोल्डिंग , एव्हीएशन इंडस्ट्री, रबर रीक्लेमेशन ,ल्युब्रिकंट्स , पेंट्स ऍन्ड सरफेस कोटिंग. बिझनेस प्रोसेस म्हणून काय काय समोर येईल ते सांगता येत नाही

मागच्या वर्षी यार्न मॅन्युफॅक्चरिंग वर काम केले. या वर्षी मिळालेला सर्वात वेगळा अनुभव म्हणजे टिश्यू कल्चर इंडस्ट्री.....शेतकी विषयात इतके प्रगत तंत्रज्ञान आपल्या देशात उपलब्ध असेल यावर विश्वासच बसत नव्हता आणि ते तंत्रज्ञान औद्योगिक वापरात आणले जाते ......सगळेच स्वप्नवत वाटत होते.

वर्ष सरतासरता एक मस्त सरप्राईज मिळाले ते ऑफिसच्या ऍन्यूअल डे ला. स्टेजवरून अचानक अनाऊसमेंट झाली शंकर महादेवन च्या नावाची अनाऊसमेंट झाली आणि त्या स्वर्गीय मैफलीत प्रत्यक्ष सहभागी व्हायला मिळाले.

यावर्षी एक जमेचा मस्त अनुभव म्हणजे आईवडील पार्ल्याच्या घरी आले होते त्याना नेहरु प्लॅनेटोरीयमला घेऊन गेलो. बाहेर पडताना त्या दोघांच्याही डोळ्यांत प्लॅनेटोरीयममध्ये असतील तेवढे सगळे तारे चमकत होते. आईला तो अनुभव भरपूर काहीतरी देऊन गेला. प्लॅनेटोरीयम च्या टेक्नॉलॉजी बद्दल नाही पण काहीतरी वेगळी माहिती मिळाली याचे तीला खूप अप्रूप वाटत होते .

प्रत्येक वर्षी नवे मित्र मिळतात. काही गमावतात. काहींची नव्याने ओळख होते. यावर्षी आमच्या शाळेच्या दहावीच्या बॅचचे गेटटुगेदर होते. वीसपंचवीस वर्षानी सगळे शाळेच्या आवारातच भेटलो. पुन्हा त्या वातावरणात मनाने फिरुन आलो.एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली. ........

आमची शाळा शुद्द मराठी माध्यमाची. मुलानी मुलींशी बोलायचे नाही हा अलीखीत नियम. तो नियम असतानासुद्धा आम्ही खूप दंगा केला. आत्ता त्या वेळच्या सगळ्या मुली भेटल्या. शरीराने त्या चाळीशीत असतील. कोणाचे केस पिकले होते. मुलांपैकी कोणी डोक्यावर चकाकता चंद्र मिरवत होते कोणी तुंदील तनु सावरत होते. पण मनाने एकदम दहावीच्या वर्गात होते. शाळेतला निरागसपणा काय असतो ते जाणवत होते. एकमेकांशी बोलायला आता कुठलाच संकोच नव्हता, आणि चोरटेपणा नव्हता.खूप वर्षानी सख्खी चुलत मावस भावंडे एखाद्या लग्नात भेटतो तसे काहीसे वाटत होते. सगळ्यानीच काही ना काही अचीव्ह केले होते. जे आले नव्हते त्यांना फोन केले. आणि पुन्हा भेटायचे नक्की ठरवले.

दहावीत असताना केलेल्या उचापतिंची एकदा उजळणी झाली. गॅदरिंगला केलेल्या नाटकाची आठवण निघाली शास्त्र मंडळाच्या सहलींची मज्जा , वर्गात सर्वांसमोर घेतलेल्या शिक्षेची मजा फिशपोंडच्या वात्रट कोट्या सर्वानाच आठवत होत्या.

एकमेकाना मुले कुटुंब वगैरे आहेत हे आम्ही सारेच जण काही काळासाठी विसरलो होतो. कित्येक वर्षांच्या अंतराने आम्ही भेटत होतो. शक्य असते तर पुन्हा जोडीसाखळी आबादुबी फुल-बॅट सुद्धा खेळायची आमची तयारी होती. या वर्षातली सर्वात मोठ्ठी ठेव आम्हाला मिळाली

या वर्षात काय गमावले याचा हिषेब लावायच्या भानगडीत पडायचे नाही. आपला मूर्खपणा पुन्हापुन्हा उगाळायचा नाही.काही नाती कमावली काही गमावली. कमावलेल्या नात्यांइतकीच गमावलेली नातीही फार महत्त्वाची असतात. एखाद्या क्षणी आपण मनात नसतानाही काहीतरी बोलून जातो. गोष्ट फार मोठी नसते. पण परीणाम वेगळाच होतो. नकळत कुठेतरी जुळलेली तार तुटते.... आणि सूर उतरत जातात. नक्की कुठे सांधायचे तेच उमजत नाही.

माझा असाच एक मित्र आहे औरंगबादचा. जुळलेली तार कधी तुटली तेच कळाले नाही. नक्की काय बिघडले तेच समजले नाही. तो सल या वर्षाखेरीस फारच जाचतोय. वेदना होताहेत पण नक्की कुठे ते सांगता येत नाही थोडेसे तसेच.

काही नाती संपतात. ती मनात कायम असतात पण ज्याच्याशी नाते ठेवायचे तेच काळाच्या ओघात लुप्त होतात..... मग पुन्हा ती नाती कुठे जोडताही येत नाहीत. त्याला इलाज नसतो.

काही नाती काळाच्या एका वळणावर पुन्हा नव्याने आपली ओळख करून देतात. नव्या वर्षात ही सगळी नाती पुन्हा एखाद्या वळणावर भेटतील....सूर नव्याने जुळतील्.. ही आशा ठेवत मी सरत्या वर्षाला निरोप देतो.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

टारझन's picture

16 Dec 2009 - 11:44 pm | टारझन

नितांत सुंदर लिहीलंय .. डिसेंबराच्या शेवटल्या दिवसांत असंच काहीसं मनात रेंगाळत असतं .. एरव्ही मी आमच्या घराच्या टेरेस वर झोपायचो. अगदी पुण्याची कोरडी आणि बोचरी थंडी असली तरी ३-३ गोधड्या घेऊन झोपायचो. रात्री आकाशात तारे मोजतांना आपण वर्षात काय केलं ? आपल्या लाईफ चा आलेख कुठवर येऊन पोचला ? हे विचार करतांना अजुन मागे आपसुकंच जातं !
गेलं वर्षं तर फारंच अनुभव देणारं परदेशातलं होतं .. ह्या वर्षी अजुन नवे अनुभव आले. काही चुका झाल्या काही चांगली कामं झाली :)

मी मात्र गेल्या वर्षात मराठी अंतरजालावर ज्याम फेमस झालो हो ! हल्ली लोकं आपल्या नावाचं चलन वापरतात त्यांचे ब्लॉग चालवायला ;) देव काका सर्वांन्ना सद्बुद्धी देवो :)

आमच्या वेळेस प्रशांत दामल्या आणि विनय येडेकर ह्या लोकांच्या विनोदी मालिका लागायच्या इयर एंडला.. केवळ डिडि सह्याद्री असल्यानं तेवढी करमणूक मोठी वाटे.

विजुभाऊ .. एका अत्यंत चांगल्या उतरलेल्या प्रकटणाबद्दल अभिनंदन !

- टारझन

शेखर's picture

16 Dec 2009 - 11:55 pm | शेखर

श्री रा रा टारझन साहेब ह्यांच्याशी सहमत.

छान लेखाजोखा मांडलाय श्री विजुभाऊजी शाहसाहेबांनी ... ह्या वर्षी नवीन वर्षाची पार्टी केली तर ते सुद्धा अनुभव वाचायला आवडतील.

प्राजु's picture

17 Dec 2009 - 8:35 am | प्राजु

खूप दिवसांनी विजुभाऊ श्टाईल लेख आलाय. आणि मनापासून आवडला हा लेख.
वर्षाच्या शेवटी हा लेखाजोखा होतोच. नक्की काय काय गमावलं, काय मिळवलं, काय उधळलं.. सगळंच डोळ्यापुढे उभं असतं.
माझंही काही असंच झालं. लिहिन कधितरी..
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 8:59 am | पाषाणभेद

मस्त लेख आहे विजूभौ.
बाकी तुमची फार लवकर हेपी न्यु इअर ची तयारी झाली बॉ. आमचे ऐनवेळी ठरते कुठे बसायचे त्ये.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

विनायक प्रभू's picture

17 Dec 2009 - 9:45 am | विनायक प्रभू

ह्या लेखाबद्दल इयर एंड ला आपल्याकडुन शिवास रिगल चे तुम्हाला पचतील एवढे पेग लागु बर का विजुभौ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2009 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ, मस्त लिहिलं....!
डिसेंबर संपत आला की काय तरी आतल्या आत रितं व्हायला लागतं !

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

17 Dec 2009 - 9:51 am | विनायक प्रभू

बोटांच्या वेलबुट्ट्या म्हणजे काय हो विजुभौ?
नाय म्हणजे माझे पण लग्न २९ डीसेंबर चे म्हणुन विचारतो बर का?

विजुभाऊ's picture

17 Dec 2009 - 12:03 pm | विजुभाऊ

बोटांच्या वेलबुट्ट्या म्हणजे काय
प्लास्टर झालेल्या हाताने ते जमणे अम्मळ अवघडच आहे.

दुसर्‍या वर्षीपासून वेलबुट्ट्यांना हरकत नसावी! ;)

(बुट्टी)चतुरंग

अवलिया's picture

17 Dec 2009 - 11:15 am | अवलिया

श्री रा रा विजी जुजी भाजी उजीसाहेब

आपला लेख आम्हाला आवडला. अतिशय छान झाला आहे.

असेच लेख आपण नेहमी लिहित रहावे ही विनंती.

--अवलिया

पर्नल नेने मराठे's picture

17 Dec 2009 - 10:41 am | पर्नल नेने मराठे

’न्यु इयर सेलिब्रेशन’ हा शब्द कळाला तो आमच्या गल्लितल्या तायांमुळे. १-२ दिवसआधी मिटिन्ग घेतली जाई. एका ताईच्या घराला ९-१० पायरया होत्या ती जागा मिटिन्गची. आधी काहि वर्शे प्रत्येकीच्या घरात जाउन लागणारे जिन्नस गोळा केले जात व आमची लुटुपुटु मदत घेउन पदार्थ त्या पायरीवाल्या ताईच्या घरी केले जात. मग ताया जरा मोठ्या झाल्या न मग पैसे काढु लागलो व विकतचे आणु लागलो. पण जागा तिच पायरयांची. समोर मुख्य रस्ता होता, ताया ’हा गेला तो आला’ करीत गालातच हसत. काही वर्षानी त्या का हसत ते हि कळले ;) व मग आम्ही सुध्दा ताया झालो. त्या दिवशी सन्ध्याकाळी ७ ला जमुन आम्ही धिन्गाणा घालत असु. रात्री १२ नंतर खादाडी करुन मग फ़िरायला बाहेर पडत असु. मग भेन्ड्या वैगरे खेळुन झोपायला ३ सुध्दा वाजत, पायरीवाल्या ताईच्या घरीच ताणुन देत असु. असे सेलिब्रेशन आम्ही मनात आले कि करत असु, त्यावेळेस मेनुला मह्त्व नसे अगदी खिचडीसुद्ढा चालत असे. लग्न झाल्यावर एका ताइची भेट झाली तेव्हा कधीतरी लहानपणी आमचे ’हे’ सुध्दा आमच्यात येउन खिचडी खाउन गेलेत 8| असे ताईच्या लक्श्तात आले. आता त्या पायरय़ाचे घर जाउन तिकडे मोठा टावर झाला आहे. :S
चुचु

sneharani's picture

17 Dec 2009 - 11:40 am | sneharani

अतिशय मस्त लिहलयं. आवडलं. खरच डिसेंबरमध्ये कधीतरी विचार येतो सरत वर्ष कसं गेलं याचा..!
:)

या आधिचा प्रतीसाद का संपादीत झाला ते काही कळलं नाहे ब्वा?
मी फक्त म्हटल होत ३१ डिसेंबरला माझी बॅलन्स शीट "टॅली" होते. त्यात संपादीत करण्यासारख काय होतं? ज्या संपदकाने संपादन केले आहे त्यांनी कृपया मला कळवावे, जेणे करुन प्रतीसाद देताना मला भविष्यात सुधारणा करता येइल.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

लवंगी's picture

17 Dec 2009 - 12:21 pm | लवंगी

मित्राला नव वर्षाच्या शुभेच्छा द्यायला फोन करा विजुभाऊ.. तुटलेल्या तारा जुळायलापण वेळ नाहि लागत..

टुकुल's picture

17 Dec 2009 - 12:21 pm | टुकुल

विजुभाउ,
लेख एकदम मस्त जमला, शेवटी शेवटी थोडा हळवा झालो, का ते लिहिलच लवकर.

--टुकुल

चतुरंग's picture

17 Dec 2009 - 5:49 pm | चतुरंग

हा एकदम झक्कास झालाय छोटेखानी लेख. सरत्या वर्षातला लेखाजोखा आणि मुक्त विचारांचे धागे एकदम मस्त!
ऑस्ट्रेलियापासून सुरु होणारी नवीन वर्षाची आतषबाजी सरकत सरकत अमेरिकेपर्यंत येत जाते त्याची मला नेहेमीच मौज वाटते! :)

(नवीन)चतुरंग

स्वाती२'s picture

17 Dec 2009 - 6:50 pm | स्वाती२

लेख आवडला.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Dec 2009 - 7:31 pm | प्रकाश घाटपांडे

काही नाती काळाच्या एका वळणावर पुन्हा नव्याने आपली ओळख करून देतात. नव्या वर्षात ही सगळी नाती पुन्हा एखाद्या वळणावर भेटतील....सूर नव्याने जुळतील्.. ही आशा ठेवत मी सरत्या वर्षाला निरोप देतो.

या सुरांची आन नात्यांची समीकरण फार विचित्र असतात. कधी आत्मपरिक्षण करायला लावणारी, कधी इतरांना माफ न करणारी ,कधी स्वतःलाही माफ न करणारी. काही न सुटलेले हिशोब पुढील वर्षात ढकलायचे असतात. काळ चाललाय आपल्या गतीने !कुठे नेणार कुणास ठाउक?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भानस's picture

17 Dec 2009 - 10:15 pm | भानस

घाटपांडेंशी सहमत. ही उजळणी होतेच..... :) बरे-वाईट...कुठले पारडे जड तर कुठले खाली.