मराठी शाहिरी-मराठी कवितेची पहाट मानली गेली.कारण या शाहिरीने अनेक बंधने झुगारुन दिली.मराठी साहित्यात 'शाहिरी वाड;मयाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.संत कवी आणि पंत कवी यांनी मराठी साहित्याला जे योगदान दिले,तितकेच योगदान शाहिरांचे आहे हेही विसरु नये.वास्तवातील घटनांना,जीवनातील प्रसंगांना मनोरंजनाच्या माध्यमातून तात्कालीन जीवनाचा आलेख शाहिरांनी आपल्या कवनातून मांडला.देव,धर्माच्या नादात माणूस स्वतःकडे पाहण्यापेक्षा अध्यात्मात गुरफटुन गेला होता. अशा वेळी शाहिरांनी इश्वराकडून माणसाकडे पाहण्याची दृष्टी दिली. संत कवी इश्वराच्या भजनात गुंतले तेव्हा शाहिरांनी जीवनाकडे पाहण्याची नुसती द्रुष्टी दिली नाही तर समाजाला जीवनाभिमुख करण्याचा प्रयत्न शाहिरांनी केला.
"अज्ञानांधारात मार्ग चुकलेल्या अनीतीत पहसलेल्या दीनपतितांना सन्मार्ग दाखविण्याकरिता आणि स्वोद्धारासाठी ईश्वराची आळवणी करण्याकरीता संतांनी काव्ये रचली....संस्कृतातील कथा व काव्य मराठीत आणण्याकरिता आणि पढीत रसिकांना चकित कर्ण्याकरिता पंडितांनी रचना केली. त्याच वेळेस मुलुखगिरीत गुंतलेल्या,शिणलेल्या मनाला ताजेतवाने करण्यासाठी शाहिरांनी लावण्या आणि कवनाकरिता लौकिक विषय निवडले." १
नुसते लौकिक विषय निवडले नाही तर मनोरंजासाठी सामान्यजनांची दैनंदिन जीवनातील भाषा त्यांनी आपल्या रचनांसाठी वापरली. त्यांच्या भाषेतून येणा-या शब्दांवर जात्यावरची गाण्यांमधून येणा-या शब्दअलंकार होते, लोकांना परिचित असलेले शब्द ते मुद्दामहून वापरत.त्यांचे विचार भावना खरेखूरे मराठी वळणाचे होते.त्याच्यातून मराठी जाणीव व्यक्त होत होती.त्यांची भाषा जीवंत,तरतरीत,आणि अस्सल मराठमोळी होती त्यामुळे त्यांचे बोलणे लोकांना पटत होते. म्हणून तर लोकजीवनाची त्यांनी घट्ट पकड घेतलेली होतें. नुसते कवणे करीत नव्हते तर लोकांशी संवाद साधत आणि मग कवनाला एक आकार द्यायचा आणि मग ती गाणी शाहिरांची नव्हे तर माणसांची गाणी व्हायची.महाराष्ट्राच्या चालीरीती, त्यांच्या आवडीनिवडी,माणसांचे स्वभाव त्यांनी टीपले होते. म्हणजे शाहिरांचे शब्द सामान्य माणसांचे शब्द होते.म्हणून त्याला प्रदर्शीत करण्याची त्यांची शैली मराठमोळी अशीच होती.
मराठी शाहिरी वाड्;मय मराठी मनाचा अविष्कार हे खरे आहे पण 'शाहिरी' आणि 'शाहीर' या शब्दाच्या व्युत्पतीच्याबाबत यावर अनेक वाद झालेले आहेत यात हे शब्द फारशी मधून आले असावेत त्यात 'शायर' अथवा 'षाइर' असे एक मत मराठीच्या अभ्यासकात आहे. शिवकालीन मराठी भाषेत अरबी,आणि फारशी या शब्दांचा वापर दिसतो म्हणून ते मत ग्राह्य धरण्यास हरकत नसावी.मराठीचे काही मान्यवर अभ्यासक मात्र 'शाहिर' व 'शाहिरी' चा अर्थ कवी आणि कविता असा घेतांना दिसतात. लावनी पोवाड्याच्या निमित्ताने शाहिरांविषयी काही विचार प्रकट होतात ते असे-
१)शाहीर म्हणजे लावण्या पोवाडे रचणारे,तसेच लोकसमूहात मोठ्या आवाजात गाणारे.
२)राष्ट्रीय किंवा वीरवृत्तीची कवने रचून पुरुषांतील पराक्रमी वृत्तीला प्रोत्साहान देणे.
३) त्याच्या मोबदल्यात समाजाकडून बिदागी घेऊन त्यावर स्वतःची उपजीविका करणे.
४)शाहिरी रचना सादर करण्यासाठी 'तमाशा'या लोकरंगभूमीचा आश्रय घेणे.
शाहिरांनी आपल्या रचनेसाठी प्राधान्याने वीर आणि श्रुंगार या रसांचा वापर केला आहे. वीरांची गुनगाण पोवाड्यातून तर श्रुंगाराचा अविष्कार लावण्यांमधून पाहवयास मिळतो.
"वीररसाशिवाय पवाड्यांची बहार नाही.आणि श्रुंगाररसाशिवाय लावण्यांची मजा नाही."२
शाहिरांना लौकिक जीवन शब्दबद्ध करतांनी पोवाडा व लावनी हे दोन प्रकार जवळ्चे वाटले त्यात जीवनविषयक विचार आहेत पण मनोरंजनाच्या माध्यमातून जनसमूहापुढे साकार केल्यामुळे ते लोकाभिमुख झाले.
पोवाडा आणि लावणी रचणारा शाहिरच आहे,परंतू रसाविष्काराच्या बाबतीत या दोघांमधे फरक आहे. लावनी सामान्यता स्फूट रचना असते.तर पोवाडा दीर्घ असतो.लावणी आत्मनिष्ठ किंवा नाट्यगीताच्या स्वरुपाचे असते. पोवाड्यातून निवेदन कधी जरा पाल्हाळ असल्यासारखे वाटते.संगीतदृष्ट्या लावनी पोवाड्यापेक्षा कधीही भारी असते. एकतर त्याच्यातली काव्याची रचना आणि कवीकल्पनेची भरारी यामुळे लावणी जरा पोवाड्याच्या तुलनेत उजवी वाटते. पोवाडा वीररसात्मक,व्यक्तीचे स्तुतीगाणे कधीतरी प्रसंगवर्णनेही दिसतातत. लावणीत वीररस सोडून ती जीवनाच्या विविधांगाला स्पर्श करते असे दिसते.
पोवाडा या शब्दाचा उल्लेख,महिकावतीच्या बखरीत,विवेकसिंधूत,ज्ञानेश्वरीत,एकनाथी भागवत इ. अनेक थांतून दिसून येतो.पोवाड्याचा अर्थ अद्भूत,चमत्कार,ख्याती या संदर्भाने अभ्यासक वापरतांना दिसतात. यशोगान करणे हे पोवाड्याचे महत्त्वाचे विशिष्टे आहे. मात्र वीरांचे यशोगान करण्याची परंपरा शिवकालापासून प्रामुख्याने येते. शिवपूर्वकालीन पोवाडे धार्मिक क्षेत्रांतील महापुरुषाम्चे स्तुती करतांना दिसतात.
मराठी शाहिरी वाड;मयाच्या अभ्यासकांनी मराठीतील पहिला पोवाडा कोणता यावर वाद घातले आहेत. अग्निदासाचा पोवाडा आहे असे म्हणतात.मात्र '' पोवाड्यांची रचना १४ व्या शतकातील असावी असा निष्कर्ष काढता येतो''.३
पोवाड्याच्या व्युत्त्पत्तीसंबधीही संशोधकात एकवाक्यता नाही. पोवाडा हा कानडीतून मराठीत आला असावा असे म्हणतात कृ.पा.कुलकर्णी म्हणतात पोवाडा म्हणजे ठासून स्तूती करणे.तर काही अभ्यासक म्हणतात हा शब्द आर्य भारतीय शब्दकोशातून आला असावा.
प्र+वद पासून पोवाड्याची व्युत्पत्ती सिद्ध करतांना डॉ.ग. ना. मोरजे म्हणतात की संस्कृत प्र+वद, सांगणे, बोलणे,उद्देशून बोलणे या शब्दापासून पोवाडा हा शब्द आला असावा.
पोवाडा हा मूलत; एक कवण प्रकार असल्यामुळे त्याच्या अर्थाच्या संदर्भाने तो गौरव करणे,स्तुती करणे, किंवा प्रसिद्धी करणे, या हेतूने शाहिरांनी सामाजिक,ऐतिहासिक,किंवा धार्मिक दृष्ट्या विभूती असलेल्यांचा गौरव शाहिरांनी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करुन जनतेसमोर कवनाद्वारे मांडले. पराक्रमी व्यक्तींना प्रोत्साहान देन्याचे एक मोठे कार्य त्यांनी केल्याचे दिसते. त्या दृष्टीने पोवाडा या कवनप्रकाराला महत्त्व आहे.
शाहिरांच्या अभिव्यक्तित एक प्रकारचा सच्चेपणा आहे.त्यामु्ळे कोणतेच बंधन पाळावे असे त्यांना वाटत नाही.त्यामुळे धीटपणाने सारे विषय त्यांनी आपल्या कवनातून मांडले. सामान्य माणसाला रुचेल,पटेल,भावेल व आवडेल अशा सरळसरळ साध्या भाषाशैलीचा वापरांमु्ळे शाहिर लोकप्रिय झाले.
संदर्भ
१) मराठी लावणी-म.वा.धोंड,पृ.१४
२)महाराष्ट्र सारस्वत( आ.दुसरी) वि.ल्.भावे,पृ.४४७
३)मराठी वाड;मयाचा इतिहास,खंड तिसरा,संपादक रा.श्री.जोग,पृ.४४३
प्रतिक्रिया
15 Sep 2007 - 12:41 am | विसोबा खेचर
बिरुटेसाहेब,
लय भारी अन अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे! मिसळपावची सुरवातच आपल्या शाहिरीने झाली ही भाग्याचे गोष्ट आहे! :)
यापूर्वी उपक्रमावर आपला लावणीवरचा असाच अभ्यासपूर्ण लेख वाचला होता. इथे शाहिरांवरचा आणि पोवाड्यांवरचा वाचावयास मिळाला! महाराष्ट्रातील लोककलांचा आपला अभ्यास थक्क करणारा आहे..
जियो...
तात्या.
15 Sep 2007 - 2:14 am | गुंडोपंत
वा सर,
आपले या क्षेत्रातले ज्ञान अफाट आहे.
छानच लेख. अभ्यासपूर्ण नि संदर्भांसहीत.
मिसळपावाच्या सुरुवातीलाच इतके छान लेख देवोन आपण एक शुभारंभच केला आहे असे वाटते.
पोवाडे तर,समाजातून गायबच झाले आहेत, पण त्यांची इतकी अभ्यासपुर्ण आठवण ठेवणारेही आहेत हे वाचून छान वाटते आहे.
असेच येवू देत.
आपला
गुंडोपंत
15 Sep 2007 - 2:45 am | धनंजय
तुमच्या लावणीविषयीच्या लेखासारखाच हासुद्धा आवडला.
यूट्यूबवरती, किंवा असेच कुठेतरी, तुम्हाला आवडलेल्या शाहिरी पोवाड्याचे उदाहरण असल्यास तुम्ही दुवा देऊ शकल काय?
15 Sep 2007 - 7:27 am | सहज
सर एकदम झकास लेख. आवडला.
15 Sep 2007 - 8:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या,गुंडॉपंत,सहज,धनंजय,आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.'मिसळपाव'वर पहिला लेख आपला असावा या गडबडीत लेख जरा घाईतच लिहिला.त्यामुळे चुका राहिल्या आहेत.
धनंजयराव,
युट्यूबवर मला शाहिराची शोधाशोध करणे जरा कठीण आहे.अरे,या लेखासाठी मला शाहिराचा फोटो शोधता आला नाही ? मलाच कोणी तरी हातात डफ घेतलेला शाहिराचे चित्र व्य. नि. ने दिल्यास पुढील लेखनासाठी उपयोग होईल असे वाटते.
15 Sep 2007 - 11:52 am | जगन्नाथ
'मिसळपाव'वर पहिला लेख आपला असावा या गडबडीत लेख जरा घाईतच लिहिला.त्यामुळे चुका राहिल्या आहेत.
हा हा हा! मग सांगायचं ना सरळ, गप बसा म्हणून . . . लेख न लिहिणं अाम्हाला फार चांगलं जमतं, मोठ्यामोठ्या डिग्र्या घालवल्या अाहेत!
वाचून एक किडा डोक्यात अाला . . . की अापल्या शास्त्रीय संगीतात वीररस जवळपास नाहीच. सगळं अापलं झननन पायल बाजे . . . हे कसं काय झालं काय कळत नाही . . .
15 Sep 2007 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जगन्नाथ सेठ,
कुठे होता इतक्या दिवस ! शास्त्रीय संगीताचं आपल्याला बॊ काही कळत नाही.
शास्त्रीय संगीतात वीररस जवळपास नाहीच याचे उत्तर त्या विषयातील तज्ञ देतील.
पण ज्याला संगीताचं ज्ञान आहे आणि ज्याच्यात भरपूर वीररस आहे,असा माणूस आम्हाला माहित आहे ;)
17 Sep 2007 - 11:18 am | सर्किट (not verified)
शास्त्रीय संगीतात वीर रस नाही ?
अण्णांचे (किंवा रामभाऊंचे) "तू है महम्मदसा दरबार" हे ऐका..
शब्दांवरून भक्तिरसातले वाटेल. पण एका राजाच्या दरबारात पेश केलेले गाणे आहे, हे आठवा.
आणि फक्त सूर ऐका. वीर रस नाही वाटला, तर कळवा.. पुढे बोलू..
- सर्किट
17 Sep 2007 - 11:23 am | विसोबा खेचर
अण्णांचे (किंवा रामभाऊंचे) "तू है महम्मदसा दरबार" हे ऐका..
शब्दांवरून भक्तिरसातले वाटेल. पण एका राजाच्या दरबारात पेश केलेले गाणे आहे, हे आठवा.
आणि फक्त सूर ऐका. वीर रस नाही वाटला, तर कळवा.. पुढे बोलू..
क्या बात है! सर्कीटशी सहमत आहे..
बाबुजींचं अडाण्यातलं 'माता न तू वैरिणी' पण आठवा!
तात्या.
15 Sep 2007 - 9:28 am | चित्रा
>>लय भारी अन अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे! मिसळपावची सुरवातच आपल्या शाहिरीने झाली ही भाग्याचे गोष्ट आहे! :)
सहमत!
15 Sep 2007 - 11:56 am | नंदन
सुरेख लेख. पोवाडा या शब्दाची व्युत्पत्ती आवडली.
नंदन
(http://marathisahitya.blogspot.com/)
15 Sep 2007 - 12:11 pm | आजानुकर्ण
सुंदर लेख. आवडला.
15 Sep 2007 - 6:54 pm | पंकज
http://www.powade.com/
इथे शाहिरांचे फोटो आणि पोवाडे मीळतील.
15 Sep 2007 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंकज,
दुव्याबद्दल आभारी.
अरे पण, डफावर थाप मारून आवेशात उभ्या असलेल्या शाहीराचा फोटो पाहिजे रे !
नाही मिळाला तर यापेक्षा उत्तम फोटो नाही असे समजून आपण दिलेल्या दुव्यांवरील फोटोंचा वापर करेन.
पुन्हा एकदा थँक्स :)
16 Sep 2007 - 11:02 am | धोंडोपंत
वा वा प्राध्यापक साहेब,
लेख आवडला. सुंदर विवेचन.
आपला,
(तृप्त) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
16 Sep 2007 - 12:02 pm | नाना फडणवीस
छान लेख.
नाना फडणवीस
16 Sep 2007 - 12:23 pm | चिपलूनचा बाल्या
मास्तरांनु,
आमच्या म्होप बाल्या लोकानी वाचल. रामा, नारायन, गुनाजी, मामा, परब्या,जगल्या सगल्यांना लइ आवडल. यश्वदा आनि वसुंधरेला बी ऐकवल.
चिपलूनला याल तव्हा सगल्यांनला भेटुन जावा.
बाल्या
16 Sep 2007 - 2:12 pm | विसोबा खेचर
>>रामा, नारायन, गुनाजी, मामा, परब्या,जगल्या सगल्यांना लइ आवडल. यश्वदा आनि वसुंधरेला बी ऐकवल.
यातली मामा, परब्या आणि यश्वदा ही नांवं खूप आपलिशी वाटली! :)
तात्या.
4 Apr 2009 - 2:33 pm | दशानन
येवढा चांगला लेख कसा काय नजरेतून राहिला.
सर एकदम मस्त लेख !
आवडला !
>>"वीररसाशिवाय पवाड्यांची बहार नाही
क्या बात है !
कुणाकडे आहेत एमपीथ्री पोवाडे :?
अथवा मला लिंक द्या.
लावण्यापण चालतील !
5 Aug 2012 - 12:01 pm | सुहास..
_/\_
तुमचा कि बोर्ड तुम्हाला लवकरात लवकर सापडो ;)
5 Aug 2012 - 10:55 pm | प्रचेतस
उत्तम आणि माहितीपूर्ण लिखाण.
बिरुटे सर, लिहित चला.
19 Sep 2020 - 2:34 pm | डीप डाईव्हर
अरेरे, फक्त चार दिवस आधी जर हा छान धागा सापडला असता तर मिपावरील या पहिल्या धाग्याला १४ व्या जन्मदिवसाच्या शुभेच्छाही देता आल्या असत्या.
दिलीप बिरुटे सर, माहितीपूर्ण लेख आवडला 👍 धाग्याला बिलेटेड हॅपी बर्थडे अशा चार दिवस उशिराने शुभेच्छा!
19 Sep 2020 - 3:04 pm | कंजूस
साहित्यवीर, नमस्कार घ्यावा.
आणि लेखणी म्यान करू नका.
30 Aug 2023 - 12:15 am | चित्रगुप्त
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सरांचा हा मिपावरील आद्यलेख आज योगायोगाने सापडला. वाचून धन्य झालो. बिरुटे सर आणि मिपाचे आद्य संस्थापक 'विसोबा खेचर' (तात्या अभ्यंकर) तसेच नंतरच्या काळात अनेक वर्षांपासून निष्काम भावनेने, सातत्याने मिपाचे जतन करणारे नीलकांत आणि प्रशांत यांना कोटि कोटि प्रणाम.
मिपा-रोप लाविलें जाली । गगनावेरी वेलु गेली