हैद्राबादी मटण बिर्याणी

मनस्वी's picture
मनस्वी in पाककृती
1 Apr 2008 - 2:14 pm

मित्रांनो आणि मैत्रिणींनो
काल पॅराडाईज (हैद्राबाद) मध्ये हैद्राबादी मटण बिर्याणी खाल्ली! काय चव होती सांगू... काही केल्या डोक्यातून जात नाहीये.
मस्त गरम गरम बिर्याणी... त्यावर अंड्यांचे काप... आत लुसलुशीत चमचमीत लज्जतदार मटण... जोडीला रायते... वा वा वा!

माझ्या नॉनव्हेजीटेरिअन मित्र-मैत्रिणींसाठी खास पाककृती देत आहे... नक्की करून बघा.

साहित्य :
मटण (मध्यम तुकडे केलेले) - १/२ कि.
बासमती तांदुळ (१/२ तास पाण्यात भिजवून) - १/२ कि.
कांदा (उभा चिरून) - १५० ग्रॅ. (साधारण मध्यम ४)
तमालपत्र - ४-५ पाने
लवंग - ५-६
शहाजिरे - १ चमचा
दालचिनी - ३ काड्या
काळी मिरी - ४-५
वेलदोडे - ३-४
पुदीना - २ कप चिरून
काजू - ५० ग्रॅ (optional)
दूध - २ चमचे
केशर - १/४ चमचा (वरील २ चमचे दुधात भिजवा)
साजूक तूप - १ १/२ कप

कृती :

(१)
आलं-लसूण पेस्ट - २ चमचे
शहाजिरे पावडर - १ चमचा
दालचिनी पावडर - १ चमचा
चवीपुरते मीठ
लाल तिखट - १/२ चमचा
हळद - १ चमचा
धणे पावडर - १ चमचा
हिरवी मिरची पेस्ट - २ चमचे
जिरे पावडर - २ चमचे
घट्ट दही - १ १/२ कप
ताजी कोथिंबीर बारीक चिरून - ३ कप
पुदीना बारीक चिरून - २ कप
एका भांड्यात मटणाचे तु़कडे घ्या. त्यात वरील पदार्थ टाकून छान मिक्स करून २ तास ठेवून द्या (मुरत ठेवा.)

(२)
दुसरीकडे कढईत थोडे तूप घ्या. त्यात चिरलेला कांदा ब्राउन खरपूस तळून घ्या. बाजूला ठेवा.
काजू असतील तर ते पण लाईट ब्राउन तळून घ्या.

(३)
एक मोठे जाड पातेले घेउन त्यात अर्धा कप तूप टाका.
तूप तापले की त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलदोडे टाका. ५ मिनिटे फ्राय होउ द्या.
त्यात मुरत ठेवलेले मटण टाका आणि मंद आचेवर मधेमधे मिश्रण हलवत रहा.

मिश्रण हलवता हलवता दुसरीकडे भिजवलेला तांदुळ अर्धवट शिजवा.
परातीत अर्धवट शिजलेला भात पसरून ठेवा. त्यावर थोडे तूप शिंपडा.

मटण बर्‍यापैकी (खूप नाही) शिजल्यावर ताटलीत काढून ठेवा.

(४)
भात आणि मटणाचे थर
ज्या पातेल्यात मटण शिजविले, त्यात थोडे ताटलीतले मटण घ्या.
त्यावर भाताच एक थर एकसारखा द्या.
त्यावर तूप, चिरलेला पुदीना, तळलेले काजू, दूधात भिजविलेले केशर शिंपडा.
भात आणि मटण संपेपर्यंत एक एक थर देत चला.
सगळ्यात वरती तळलेल्या कुरकुरीत तपकिरी कांद्याचा थर द्या.

(५)
थर लावून झाल्यावर लगेचच मंद आचेवर बिर्याणी तांदुळ शिजत येईस्तोवर (अंदाजे १५-२० मिनिटे) शिजत ठेवा.
जर पातेल्याचे झाकण घट्ट नसेल तर पातेल्याच्या किनारीला कणिक लावून झाकण घट्ट बंद करा.

(६)
दह्याचे रायते, कांदा, लिंबू, अंडी (उकडून अर्धी कापलेली) सोबत खायला द्या.

==============================================
कशी झाली ते इथे जरूर सांगा.

संस्कृतीपाकक्रिया

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2008 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर

४ कप पुदीना जरा जास्त वाटतो आहे तसेच साहित्यातील शाहिजिर्‍याचे काय करायचे हे सांगितलेले नाही तरी पण एकंदर पाककृती मस्त वाटते आहे. लवकरच करून पाहीन.

धन्यवाद.

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 3:52 pm | मनस्वी

गडबडीत राहून गेले..
क्र. ३ मध्ये शहाजिरे पण फ्राय करावेत.

४ कप पुदीना जरा जास्त वाटतो

कप कोंबून कोंबून भरु नका! तशी पुदीना पाने कपमध्ये थोडीच मावतात.

मनापासुन's picture

1 Apr 2008 - 2:39 pm | मनापासुन

पॅराडाईज पेक्षा हैद्राबाद हाउस ची मस्त असते.
साथ मे मीर्ची का सालन बी हुना मेरेकु
जर पातेल्याचे झाकण घट्ट नसेल तर पातेल्याच्या किनारीला कणिक लावून झाकण घट्ट बंद करा.

पातेल्याच्या किनारील कणीक लाउन घट्ट बंद करणे हे दम बीर्याणीच्या साठी करतात

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 3:50 pm | मनस्वी

तुम्ही पॅराडाइजला भेट दिली आहे का?
मी हैद्राबाद हाऊस आणि पॅराडाइज, दोन्हीकडे अनेकदा दिली आहे. त्यामुळे बिर्याणीसाठी पॅराडाइजलाच पसंती!

विजुभाऊ's picture

1 Apr 2008 - 3:59 pm | विजुभाऊ

हो.अनेकदा .पॅराडाईज चे वैषिष्ठ म्हणजे प्रत्येक मजल्यावर मिळणारी बिर्याणी वेगळ्या चवीची लागते.मला त्यातल्या त्यात पहिल्या मजल्यावर टेरेस ची आवडते. पॅराडाइज ची बिर्याणी मल जरा स्पायसी वाटली.
हैद्राबाद हाउस ची बिर्याणी कमी स्पायसी असते.
बाय द वे मला हैद्रबाद मधे "हलीम" आणि पाया आवडतो. हे पदार्थ चार मिनार जवळ चांगले मिळतात
चिकन तंदूर खायचे तर कोतागुडा सर्कल जवळ एक दुकान आहे.तसली चिकन आणि कबाब मला अजुन इतरत्र कोठेच मिळाली नाही.
हैद्राबाद हाउस कोंडापुर ची बिर्याणी सोबत मस्त मिर्ची का सालन...अहा लाजबाब.

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 4:10 pm | विसोबा खेचर

मनपासून आणि मनस्वी,

आपली दोघांची चर्चा वाचली. त्यात हैद्राबाद हाऊस आणि पॅराडाइज यांचा उल्लेख आला आहे. त्या दोन्ही ठिकाणी मीही एकदा अवश्य भेट देईन.

परंतु तुम्ही दोघांनी आमच्या जाफरभाईची मटण बिर्याणी खाल्ली आहे का? खाल्ली नसेल तर अवश्य खावी, हा तुम्हा दोघांनाही सल्ला!

मुंबईला फॉकलंड रोड, गोल देवळाजवळ जाफरभाईचं दिल्ली दरबार हे हॉटेल आहे. अधिक माहितीकरता हे संकेतस्थळ पहा आणि ही पाहा जाफरभाईच्या दिल्ली दरबारची मटण बिर्याणी! अप्रतीम असते...!

साला, उद्या अनायसे बुधवार आहे! रॉयल चॅलेंजचे दोन पेग मारून जातोच दिल्ली दरबारला आणि हाणतो मनसोक्त! :)

तात्या.

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 4:16 pm | मनस्वी

हम्म्म्म्म्... फॅसिनेटिंग वाटतीये!
मुंबईला येणे झाले की नक्कीच खाउन बघीन!

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2008 - 6:01 pm | प्रभाकर पेठकर

श्री. तात्या,

फोटो खासच आहे. बायका मेक्-अप करतात त्या प्रमाणे बिर्याणीनेही फोटो सेशन साठी पुदीना पाने, काजू, लवंगा, तमालपत्र आणि नळीचे दोन-दोन पीस असा भरगच्च मेक्-अप केला आहे. बिर्याणी अगदी इन्व्हायटींग पोझ मध्ये आहे. दिल्ली दरबारवाला जाफरभाई आपल्या निकटवर्तीयांपैकी दिसतो आहे, रेसिपी विचारून घ्या नं.

अभिज्ञ's picture

1 Apr 2008 - 10:55 pm | अभिज्ञ

मला वाटते हैदराबाद हाउस चि जास्त चान्गलि आहे.पराडाइज चा निव्वळ मासळि बाजार झाला आहे.
बाकि ,मनस्वी ,तुमच्या पद्धतिने केलेलि बिर्याणि तर ह्या दोन्हि ठिकाणांपेक्षा अधिक रुचकर होतेय.

अबब.

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 2:53 pm | विसोबा खेचर

वा वा! तरीच मी म्हणत होतो की मिपावर लॉगईन केल्यावर एकदम बिर्याणीचा घमघमाट कुठून येतो आहे? बघतो तर मटणबिर्याणीची ही पाकृ! :)

अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ येऊ द्या!

आपला,
(मटणबिर्याणीचा भोक्ता!) तात्या.

शरुबाबा's picture

1 Apr 2008 - 5:25 pm | शरुबाबा

हो.अनेकदा .पॅराडाईज चे वैषिष्ठ म्हणजे प्रत्येक मजल्यावर मिळणारी बिर्याणी वेगळ्या चवीची लागते.

मी पॅराडाइज ला अनेकदा भेट दिली आहे, पण वरिलप्रमाणे अनुभव कधिच आला नाहि .

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 6:11 pm | मनस्वी

तेच म्हणते मी! मलाही असा अनुभव आलेला नाही.

रिमझिम's picture

1 Apr 2008 - 6:31 pm | रिमझिम

जरा शाकाहारी बिर्याणी ची रेसीपी पण सागा ना

( फक्त दुसर्याचे डोके खाणारी ) रिमझिम :))

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 6:42 pm | मनस्वी

(१) फक्त मटणाऐवजी आवडतील त्या भाज्या घ्या. उदा. मटार, गाजर, श्रावण घेवडा, फरस बी, बटाटा, ढोबळी मिरची इ.
(२) मसाल्याचे प्रमाण थोडे कमी ठेवा कारण मटणापेक्षा फळभाज्यांना त्यामानाने थोडा कमी गरम मसाला चालेल.
(३) भाज्या १ तास मुरत ठेवल्या तरी पुरे होतील.

मी अजून केलेली नाहीये... तुम्ही ट्राय करून सांगा कशी होते ती... :)

विजुभाऊ's picture

1 Apr 2008 - 6:48 pm | विजुभाऊ

नाही शाकाहारी बिर्याणी मधे भाज्या मुरत ठेवल्या की त्या फार मउ पडतात. खाण्याची मजा जाते.त्या ऐवजी भाज्या न शिजवता टाकल्या तर छान लागतात.
भाज्या मधे जर सुरण वापरले तर ते मटणासारखेच दिसते.शिजतेही छान....
शाकाहारी बिर्याणी केवळ भातात लवंग दालचिनी वेलदोडा केसर मीरे वापरुन ही मस्त लागते.
......................... शौकीन विजुभाऊ

प्राजु's picture

1 Apr 2008 - 7:16 pm | प्राजु

भाज्या मॅरिनेट नाही करायच्या. मात्र टि भाजी तयार करताना, नीट मसाला घालून दही घालून शिजवावी ती ही पूर्ण शिजवू नये. आणि वरती सांगितल्याप्रमाणे थर लावावेत आणि शिजवावी बिर्याणी.
मटन बिर्याणीची रेसिपी मात्र उत्तम.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

तो हैद्राबाद हाऊस जाव या पॅराडाइज जाव दोनो एकदम सही!
बोले तो हमकू दोनो अच्चा लगा!
पॅराडाइज तोडा ज्यादा स्पाइसी होना. है.हा. का जायका कुच और होना और मिर्ची का सालन भी नक्को भूलू!
'हलीम' तो क्या बोले रे खतमिच होता रे देर नक्को करु!

चतुरंग

स्वाती राजेश's picture

1 Apr 2008 - 9:42 pm | स्वाती राजेश

मनस्वी मस्त कृती आहे. करेनच तुझ्या पद्ध्ती प्रमाणे...
जर पातेल्याचे झाकण घट्ट नसेल तर पातेल्याच्या किनारीला कणिक लावून झाकण घट्ट बंद करा.
याऐवजी एखादे पातळ कॉटनचे फडके पाण्यात भिजवून, घट्ट पिळून जर त्या भांड्याच्या तोंडाला बांधले (घट्ट) त्यावर झाकण ठेवले तरी चालते.

येऊ देत आणखी रेसिपीज...