खयाली पुलाव

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
1 Apr 2008 - 5:21 am

या आठवड्याची पाककृती - खयाली पुलाव
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही एवढी व्हिस्की त्यात टाकली.
"पाणी की सोडा?" त्याने विचारले.
"काही नको." केशवसुमार म्हणाला.
"म्हणजे? नीट घेणार की काय तू केशवा? त्रास होईल हो..." बेसनलाडू काळजीच्या स्वरात म्हणाला.
"नाही... काही नको, म्हणजे काहीच नको. मी पीत नाही."
"तू... पीत... नाहीस?" बेसनलाडवाने आश्चर्याने विचारले. "बापरे! म्हणजे तू अजिबातच.. अरे बापरे! तू काही खात नाहीस हे ऐकलं होतं"
"काय खात नाही?"
"हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"
केशवसुमाराने खांदे उडवले. "काय होईल ते होईल बेला, तू असताना मी ही काळजी का करावी?"
----------------------------------------------------------------------
"हुकूम बदाम."
सर्किटचा आवाज आला. तो, सन्जोप आणि विसोबा पाच तीन दोन खेळत होते. सर्किटने शहारल्यासारखे करून अंगावरचे पांघरुण गच्च गुंडाळून घेतले.
"काय, थंडी वाजत्येय का तुला सरकू?" प्रेमाने सर्किटच्या पाठीवर हात टाकत सन्जोप म्हणाला.
"पानं बघू नको हां माझी.. सरक तिकडे...आणि मला थंडी वाजत्येय असं कोण म्हणालं तुला?"
"म्हणालं नाही कुणी. हे तुझं पांघरुण बघून वाटलं मला."
"पांघरुण नाही हे काही. कातडी आहे ती. तीही गेंड्याची."
"अच्छा अच्छा.. म्हणजे ती नुसती पांघरायची असते होय? मला वाटलं की ती खरोखर तशी करायची असते. सॉरी हां..." सन्जोप विनयानं म्हणाला. "कोण पान टाकणार आहे?"
"तूच" विसोबा म्हणाला.

----------------------------------------------------------------------
"काय कर्णा? तू शेवटी आलास म्हणायचास. मला वाटलं तुझंही मन विटलं की काय मिसळपाववरुन? काय? होतोस का परत संपादक?"
"आता पुन्हा तो विषय नको, तात्या. दुसरं काहीतरी बोल. आणि हे काय? हे कुणाचं पुस्तक?" तात्याच्या शेजारी पडलेले 'काजळमाया' उचलत आजानुकर्ण म्हणाला.
"माझंच"
"तू काही म्हण तात्या, जी.ए.कुलकर्णी हा कालबाह्य झालेला लेखक आहे, असं माझं मत आहे" कर्ण जोरात म्हणाला.
"हेच म्हणतो." सन्जोपने इस्पिकची उतारी केली. "काय ती फुटलेल्या बेडकाप्रमाणे ओंगळ आयुष्ये, चिकट, ओलसर कोळ्याच्या धाग्याप्रमाणे वासनंचे जाळे, गिधाडाप्रमाणे काळे, अशुभ आणि चोच, नखे रुतवून बसलेले काहीतरी... शी शी शी...तुला
ते वाचताना किळस वाटत नाही का रे? आणि आजकाल जी.ए. वाचतो तरी कोण रे तुझ्यासारख्यांशिवाय?"
"सगळ्या गोष्टी इतरांसाठी, प्रसिद्धीसाठी करायच्या असतात काय सन्जोपशेठ?"
विसोबाने सुपारी कातरत विचारले. " मी लिहितो ते काय लोकांनी मला चांगलं म्हणावं, प्रतिक्रिया द्याव्यात म्हणून काय? आपापली श्रद्धा असते. साला, प्रतिक्रिया आल्या काय, नाही आल्या काय, आपण लिहितो आपल्या आनंदासाठी. काय?"

----------------------------------------------------------------------
दुसरीकडे चित्तर एका हातात लिंबूपाण्याचा ग्लास आणि एका हातात शंकरपाळ्याची प्लेट घेऊन येताना दिसला. सर्वसाक्षीने पुढे केलेल्या सिगारेटला मानेनेच नाही म्हणून तो थेट सर्किटजवळ येऊन बसला.
"मेरा कुछ सामान... तुम्हारे पास रहा है..." सर्वसाक्षी स्वतःशीच गुणगुणत होता.
"क्या बात है साक्षीदेवा! साक्षात गुलजार!"
"फिर!"
----------------------------------------------------------------------

सर्वसाक्षी आणि विजुभाऊचे वेगळेच चालले होते.
"जुने जाऊद्या मरणालागुनि" की अशीच काहीशी ऒळ आहे ना रे ती? या इतिहासाच्या कचाट्यातून आपण कधी बाहेर पडणार कुणास ठाऊक."
"इन फॅक्ट, मला तर असं वाटायला लागलंय की लोकांना ही असली काहीतरी नशा पाहिजेच असते - वास्तव पचवायला." सर्वसाक्षी म्हणाला.
"आणि हिंदुत्वाच्या बिंदुत्वाच्या तर गफ्फा आहेत रे गफ्फा!" विजुभाऊ उसळला. "कसला अखंड भारत, कसला सनातन प्रभात आणि कसला विवेक? आज अखंड भारत पाहिजे म्हणून तुम्ही घेणार का पाकिस्तान आणि बांगला देशाला आपल्यात सामावून? आणि या
देशातले मुसलमान म्हणशील तर.."
"एक्झॅक्टली. मला तर आजकाल असं वाटतं की वुई आर अबाऊट टु विटनेस अनादर रिव्हॉल्यूशन. मराठी भाषेचंच घे...
एका कोपयातून ऐकू आलेल्या आरडाओरडीत सर्वसाक्षीचे पुढचे शब्द विरुन गेले.
----------------------------------------------------------------------

डबल बॅरल दिलीप संतापाने जांभळा झाला होता.
" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो. त्यानं म्हनलं, केशवसुमारा, बर्‍या बोलानं परत ल्ह्यायला लाग, तरीबी केशवसुमार काय तोंडातली गुळनी सोडंना. मी म्हनलं, मायला आता एक लेखच लिहितो,"रसिकाग्रणी तात्या आनि मुजोर केशवसुमार". लायब्रीतनं सात पुस्तकं आनली आन रात्री दीड वाजंपर्यंत जागून लिवून काडला लेख. डोळं बग माझं आजुन सुजल्यागत दिसत्यात. आन हितं येऊन बगतो तर काय, ह्यो केशवसुमार तात्याच्या कुल्ल्याला कुल्ला लावून बसलेल्या. गणिम सूर्याजी पिसाळ..."
" हे बघ दिलीप.." प्रमोद त्याच्या दंडाला धरुन म्हणाला. "मलाही कधी कधी त्वेषानं वार करावासा वाटतो. मीही कधीतरी एकदा 'सहमत नाही' असं लिहून बघणार आहे. पण काय करणार सांग."
"लोकशाही तत्वांचा प्रचार आणि प्रसार या तत्वाशी प्रामाणिक राहिल्याचा मिसळपावला अभिमान वाटतो, दिलीप" विसोबा म्हणाला. "व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार आणि दडपशाही व कंपूबाजीमुक्त वावर हेच धोरण आपण आजवर सांभाळलेले आहे. मी बघ कसा जनरल डायरला रिटायर करून नवीन संपादक मंडळाच्या हातात संपादन सोपवून मोकळा झालो आहे. "
"पन तात्या, तुज्या संपादक मंडळात आमची वर्दी न्हायी लावलीस तू. मी न्हाई, प्रकाश घाटपांडे न्हाई, प्राजू न्हाई, गारंबीचा बापू न्हाई, नाना चेंगट न्हाई... यवडंच काय पन धोंडोपंतबी न्हाई. तू निवडलंस ते पोष्टमन, किमयागार आन आपासाहेब चौघुले या तिगास्नी. ह्ये काय तुजं कळंना राव..."
----------------------------------------------------------------------
"बरोबर." सर्किट म्हणाला. "त्याचबरोबर सदस्यांचा अनामिक रहाण्याचा मूलभूत अधिकार जपण्याच्या कामात माझा खारीचा वाटा आहे, याचा मला सार्थ आनंद आहे."
"आता हेच बघ दिलीप, वादग्रस्त मुद्द्यांचे मिसळपावला काही वावडे आहे असे नाही. 'ज्योतिषविषयक लेख वाचण्यापासून कसा बचाव कराल?' हा प्रकाश घाटपांडेचा लेख घे, किंवा 'सरळ, सोप्या मराठीत प्रतिसाद कसे द्यावेत' हा मुक्तसुनिताचा लेख घे' नाहीतर
अगदी अलीकडचा 'उथळ आणि बटबटीत प्रतिसादांपासून सुटका' हा छोट्या डॉनचा लेख बघ... इथे सगळ्यांनाच मुक्त वावराला वाव आहे."
"हेच म्हणतो." सर्किटने सिगरेट पेटवली. "मध्ये आपण 'मला आवडलेले आंतरजालावरील साहित्य' ही स्पर्धा जाहीर केली होती. त्यात दोनच एंट्रीज आल्या होत्या. 'उडत्या छबकड्या' वर माझा लेख आणि 'केशवसुमाराच्या विडंबनांतील प्रतिमा आणि प्रतिभा -एक तुलनात्मक अभ्यास' ही बेसनलाडूची एंट्री... पण आपण नाउमेद झालो का? नाही..."
"ग्रेट, सिंपली ग्रेट.." आता विजुभाऊने रिंगणात प्रवेश केला. "अरे, चार मराठी माणसं एकत्र आली की भांड्याला भांडं लागणारच दिलीप. पण चांगल्या गोष्टीचं कौतुक करणारेही आहेतच की इथं. आता तू मध्ये 'मला जबरदस्त आवडलेला एक आंतरजालीय दिवाळी अंक' या विषयावर लिहिलंस. आम्ही दिल्या की नाही - दिल्या म्हणजे तू नाहीस बरं का - तर आम्ही घातल्या की नाही प्रतिक्रिया? मी आणि सर्वसाक्षीनं मिळून 'मुघल संस्कृतीने आपल्याला काय दिले? ही मालिका लिहिली, तर तासाभरात बारा प्रतिक्रिया. तात्याचे लेख बघ 'बाबुजींच्या गाण्यातल्या हुकलेल्या जागा' आणि 'भाईकाका कुठे घसरले?' -तर 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'या आशयाच्या पंचेचाळीस प्रतिक्रिया. तात्पर्य काय, तर असं मनाला लावून घ्यायचं नसतं... "

"बरोबर आहे हां" आतापर्यंत गप्प बसलेला संजिव म्हणाला. मलाही हाच अनुभव आहे. 'सकाळी तोंडसुद्धा न धुता क्वार्टर लावण्याने आलेली प्रचिती' या माझ्या लेखाबाबत. त्यावेळी तर माझी ओळखही नव्हती कुणाशी."
----------------------------------------------------------------------
इकडे इनोबा, धमाल मुलगा आणि पिवळा डांबिस 'दिसामाजी काहीतरी वैचारिक वाचनाचे फायदे' या विषयावर गंभीरपणे बोलत होते.
"त्याचं काय आहे धमु.." इनोबा म्हणाला. "धमु नका रे म्हणू मला.." धमाल मुलगा कळवळला. "का? त्यात काय वाईट आहे? आता याला आपण पिडा म्हणतो, त्याला काही वाटतं का त्याचं?"
"ते ठीकच आहे रे. छोट्या टिंगीलाही आपण छो टि असंच म्हणतो, पण ते जाऊ दे. ते वैचारिक काय म्हणत होतास तू?"
"हां, तर इथं लिहिताना आपण काहीतरी गंभीर आणि वैचारिक लिहिलं पाहिजे. सारखं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांसारखं कुठं या अण्णाला शुभेच्छा, या दादाचं अभिनंदन असं करत राहण्यात काही हशील नाही, काय?
----------------------------------------------------------------------

असे काथ्याकूट सुरुच राहिले!

----------------------------------------------------------------------

डिस्क्लेमरः वरील लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.
----------------------------------------------------------------------

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

1 Apr 2008 - 6:54 am | पिवळा डांबिस

सर्वप्रथम सन्जोप रावांचे अभिनंदन! चांगला लेख लिहिल्याबद्द्ल तर आहेच पण चर्चेला एक नवा विषय दिल्याबद्द्ल!! नाहीतर हल्ली जे काही विषय चालले होते, उदा. शिवाजीची जात, शाळेतले धार्मिक शिक्षण, सहा महिन्यात कर्जमुक्त वगैरे! आता मेंबरं एकमेकांच्या नरड्यावर बसणार असं वाटायला लागलं होतं.:)
नाहीतर अगदी दुसरं टोक म्हणजे पुण्यातल्या पाट्या, गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे वगैरे!!

आज अखंड भारत पाहिजे म्हणून तुम्ही घेणार का पाकिस्तान आणि बांगला देशाला आपल्यात सामावून?
का नाही? यू.पी. आणि बिहार नाही सामावून घेतला? देशासाठी त्याग करायला नको? बोला, भारतमाता की जय!!
आणि इंडस बासमती राईस खायला मिळेल तो वेगळाच!! दमादम मस्त कलंदर!!:))

डबल बॅरल दिलीप संतापाने जांभळा झाला होता.
आम्ही सहज म्हणून लिहिलेले बिरूद असे चिकटलेले पाहुन आम्ही धन्य झालो आहोत!!:))
तरी नशीब चतुरंगांनी दिलेले नांव (कोणतं ते आम्ही नाही सांगणार जा! मिपा ची शंभर पाने वाचुन काढा जर माहिती करून घ्यायचे असेल तर!) चिकटले नाही (अजून!)

'सकाळी तोंडसुद्धा न धुता क्वार्टर लावण्याने आलेली प्रचिती' या माझ्या लेखाबाबत.
बाबारे, मोठ्याने म्हणूसुद्धा नकोस! आम्ही "नशा" या विषयावर (पूर्ण शुद्धीत राहून) एकच चिंतन काय लिहिलं तर दहा वड्यांनी (वडा = जो स्वतःला बेवडा समजत नाही तो) आम्हांला झापलं. पण शिंच्यांची गंमत बघ, स्वतः न प्यालेल्या दारूबद्दल धडाधडा बोलले पण त्याच लेखात मी लिहिलेल्या चहा/कॉफीच्या सवयीबद्दल मात्र अळिमिळी गुपचिळी!!
हे आमचं नशीब! नाहीतर बघ काही माणसं कसल्या-कसल्या बायकांच्या पाठीला साबण लावूनसुद्धा नामानिराळी राहतात! नाहीतर आम्ही भरलेला ग्लास तोंडाला लागण्याआधीच "शौकिन' (बेवडे असं वाचायचं!) म्हणून डिक्लेअर!!!:))

"धमु नका रे म्हणू मला.." धमाल मुलगा कळवळला.
अरे, लहान आहे रे तो अजून! कशाला छळता त्याला? आधीच लग्न करू का नको, करू का नको अशा विचाराने धास्तावलाय बिचारा! लग्नानंतरच्या हनिमूनचं टेन्शन ते वेगळंच!!:)))

आता याला आपण पिडा म्हणतो, त्याला काही वाटतं का त्याचं?"
त्याला काय वाटणार! तो बारा गावचं पाणी पिऊन टणक झालाय!! आणि नाहीतरी तो कधी कधी दुसर्‍याना पिडा देतोच!!!

सारखं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांसारखं कुठं या अण्णाला शुभेच्छा, या दादाचं अभिनंदन असं करत राहण्यात काही हशील नाही, काय?
हे मात्र अगदी खरं! तिच्यायला अगदी असंच व्हायला लागंलंय अलिकडे! आणि कहर म्हणजे नुसतं अभिनंदन केलं तरी त्याच्यावर टीकात्मक प्रतिक्रिया येतात!! आता 'अ' ने 'ब' चं केलेलं अभिनंदन 'क' ला का टोचतं कळत नाही!!:))

इकडे इनोबा, धमाल मुलगा आणि पिवळा डांबिस 'दिसामाजी काहीतरी वैचारिक वाचनाचे फायदे' या विषयावर गंभीरपणे बोलत होते.
ते आम्ही नाही, धमु तर मुळिच नाही, ते फक्त इनोबा! ते बोलतात आणि आम्ही ऐकतो. आम्हाला त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे हो! खरंतर आम्हाला विनायक नांवाच्या माणसांबद्द्ल एकूणच अतीव आदर आहे! मराठी संस्कृतीचे खरे पाईक! पेशवाईत साडेतीन शहाणे होते म्हणतात तसे मिपावर साडेतीन विनायक अती आदरणीय आहेत: एक मंगलमूर्ती (महादेव-पार्वती पुत्र), दुसरे सावरकर, तिसरे सेनापती बापट आणि अर्धे आमचे इनोबा अनिवसे!!
काय पटतं की नाही?:)))

वरील लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको.
हे खास सर्किटरावांसाठी लिहिलंय वाटतं. त्यांना अलिकडे निर्बुध्द माणसाच्या मेंदूतील पेशी होण्याचे डोहाळे लागले आहेत!!:)

बाकी लेख झकास! पस्तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या 'पिंजर्‍या'च्या २००८ मधल्या पंचनाम्यापेक्षा हे आवडलं! काय समजलांत!!!:))))

आपला कृपाभिलाषी,
पिवळा डांबिस (पिडा)

कोलबेर's picture

1 Apr 2008 - 10:06 am | कोलबेर

बाकी लेख झकास! पस्तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या 'पिंजर्‍या'च्या २००८ मधल्या पंचनाम्यापेक्षा हे आवडलं! काय समजलांत!!!:))))

अगदी हेच!!
झक्कास लेख आणि जबरा प्रतिसाद

(गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे काढणारा) कोलबेर

"अच्छा अच्छा.. म्हणजे ती नुसती पांघरायची असते होय? मला वाटलं की ती खरोखर तशी करायची असते. सॉरी हां..." सन्जोप विनयानं म्हणाला.

आमच्या कळफलकावर देखिल उसाचा रस सांडता सांडता राहिला..:)))

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 7:07 am | विसोबा खेचर

बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"

:)

आन हितं येऊन बगतो तर काय, ह्यो केशवसुमार तात्याच्या कुल्ल्याला कुल्ला लावून बसलेल्या. गणिम सूर्याजी पिसाळ..."

हा हा हा! मांडीला मांडी लावून बसणे हे ऐकले होते, कुल्ल्याला कुल्ला हे बाकी क्लासच! :)

"व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार आणि दडपशाही व कंपूबाजीमुक्त वावर हेच धोरण आपण आजवर सांभाळलेले आहे. मी बघ कसा जनरल डायरला रिटायर करून नवीन संपादक मंडळाच्या हातात संपादन सोपवून मोकळा झालो आहे. "

हम्म! आता पुन्हा तोच विचार सुरू आहे. नवीन संपादक मंडळाकरता आम्ही काही सभासद पुन्हा हेरले आहेत. आणि लवकरच आणिबाणी मागे घेऊन लोकशाहीची दुसरी फेज थोड्या वेगळ्या स्वरुपात मिपावर जाहीर करू म्हणतो! लोकशाहीत वृत्तपत्र स्वातंत्र्याला मुभा असते. त्यामुळे 'साप्ताहिक मिसळपाव' असं एखादं साप्ताहिक इथे मिपावरच सुरू करीन म्हणतो! काय रावसाहेब, आठवड्यातून एकदा "संपादकीय अग्रलेख" लिहायची जिम्मेदारी घेता काय? तुम्ही एकदम फस्क्लास लिहू शकाल म्हणून विचारतो! :)

तात्याचे लेख बघ 'बाबुजींच्या गाण्यातल्या हुकलेल्या जागा' आणि 'भाईकाका कुठे घसरले?' -तर 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'या आशयाच्या पंचेचाळीस प्रतिक्रिया. तात्पर्य काय, तर असं मनाला लावून घ्यायचं नसतं... "

अहो तेवढ्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी तेवढा आंतरजालीय अभ्यास असावा लागतो! आमचं ट्रेनिंग तर थेट तुमच्या मनोगतातच झालं आहे. तिथे पण साला आपण मिळवायचो साला ४०/४५ प्रतिक्रिया! काय रावशेठ, खरं की नाय?! :)

"बरोबर आहे हां" आतापर्यंत गप्प बसलेला संजिव म्हणाला. मलाही हाच अनुभव आहे. 'सकाळी तोंडसुद्धा न धुता क्वार्टर लावण्याने आलेली प्रचिती' या माझ्या लेखाबाबत. त्यावेळी तर माझी ओळखही नव्हती कुणाशी."

:)))) जाऊ द्या रावशेठ, साला येताजाता तात्याला हाणता तेवढं पुरे आहे की! त्या संजिवच्या पंच्याला क उगाच हात घालताय? अहो, देवभक्त भला माणूस आहे तो! :)

असो,

तुमचा हातखंडा असलेल्या विषयावर बर्‍याच दिवसांनी वाचले, खूप आनंद वाटला! खयाली पुलावचे पुढचेही भाग अंतराअंतराने येऊ द्यात ही विनंती...

जाता जाता - हा लेख 'आपापसात' मध्ये न जाता मुख्यप्रवाहातच राहील एवढं तरी मिपाचं वैशिष्ठ्य तुम्हाला मानायला हरकत नाही रावसाहेब! :)

आपला,
(साप्ताहिक मिसळपाव सुरू करून संपादकीय अग्रलेखाची जबाबदारी संजोपवर सोपवायची एक नवीनच कल्पना सुचलेला!) तात्या.

मुक्तसुनीत's picture

1 Apr 2008 - 7:24 am | मुक्तसुनीत

एका नव्या आदिबंधात्मक सौंदर्यशास्त्राच्या पायाभूत दृष्टांताची मुहूर्तमेढ म्हणतो. इत्यलम् ! ;-)

प्राजु's picture

1 Apr 2008 - 7:28 am | प्राजु

सर्वप्रथम सन्जोप रावांचे अभिनंदन! चांगला लेख लिहिल्याबद्द्ल तर आहेच पण चर्चेला एक नवा विषय दिल्याबद्द्ल!! नाहीतर हल्ली जे काही विषय चालले होते, उदा. शिवाजीची जात, शाळेतले धार्मिक शिक्षण, सहा महिन्यात कर्जमुक्त वगैरे! आता मेंबरं एकमेकांच्या नरड्यावर बसणार असं वाटायला लागलं होतं.:)
नाहीतर अगदी दुसरं टोक म्हणजे पुण्यातल्या पाट्या, गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे वगैरे!!

डांबिसकाका, हे मात्र झकासच..!

संजोपराव,
आपला हा खयाली पुलाव अतिशय चांगला जमला आहे. हा हैद्राबादी पुलाव होता.. आता पुढचा पुलावचा प्रकार कोणता आणि कधी शिजवताय?? :)))

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

बेसनलाडू's picture

1 Apr 2008 - 8:17 am | बेसनलाडू

सिम्प्ली सुपर्ब!
(आस्वादक)बेसनलाडू

धनंजय's picture

2 Apr 2008 - 12:41 am | धनंजय

मस्त

मुक्तसुनीत's picture

1 Apr 2008 - 8:34 am | मुक्तसुनीत

प्रसिद्ध विनोदी अमेरिकन टीव्ही सिरिज "साईन्फेल्ड" मधे "बिझारो वर्ल्ड" नावाचा एक सुप्रसिद्ध एपिसोड आहे. त्याची आठवण झाली. या एपिसोडचा सारांश असा की जेरी, जॉर्ज आणि क्रेमर , या अत्यंत आळशी, विचित्र, विक्षिप्त अशा तीन मित्रांमधे वावरणार्‍या इलेनला अचानक तीन नवे असे लोक भेटतात जे या तीन मित्रांसारखेच जवळजवळ दिसतात, पण त्यांच्या बरोब्बर उलट्या स्वभाव-विभावांचे (म्हणजे नम्र , अभ्यासू, सभ्य - आणि म्हणूनच अत्यंत वैशिष्ट्यहीन, कंटाळवाणे !) असतात. संजोपरावानी एक असेच "बिझारो" जग रेखाटले आहे, ज्यात जो जो जसा जसा "नॉर्मल" जगात आहे तो तो त्याच्या बरोब्बर उलटा या "बिझारो" जगात आहे :-)

" साईन्फेल्ड"च्या त्या एपिसोडमधे मूळचे "नॉर्मल" मित्र आणि त्यांच्या "बिझारो" जगातल्या प्रतिकृतींची शेवटी गमतीशीर भेट होते. संजोपरावांच्या दुनियेत असे झाले तर ??

सर्किट's picture

2 Apr 2008 - 1:41 am | सर्किट (not verified)

काय वो तुमचे ते लेखन संजोपराव !

" हे बघ दिलीप.." प्रमोद त्याच्या दंडाला धरुन म्हणाला. "मलाही कधी कधी त्वेषानं वार करावासा वाटतो. मीही कधीतरी एकदा 'सहमत नाही' असं लिहून बघणार आहे. पण काय करणार सांग."

आम्ही आम्ची सगळी कॉफी ठ्ठ्या करून आमच्या ल्यापटापवर सांडवली बघा..

एकदा तरी प्रमोदकाका नॉन-पॉलिटिकल झालेत, तर तुमच्या घरीच सत्यनारायण घालू...

- सर्किट

आजानुकर्ण's picture

1 Apr 2008 - 8:47 am | आजानुकर्ण

मानामान किती | तुझ्या क्षुल्लका संपत्ती ||
जा रे चाळवी बापुडी | कोणी धरिती ती गोडी ||

पाहतोसी काय | आता पुढे करी पाय ||
वरि ठेवू दे मस्तक | ठेलो जोडुनी हस्तक ||

रिद्धीसिद्धी देसी | आम्ही चुंभळे नव्हो तैसी ||
तुका म्हणे ठका | ऐसे नागविले लोका ||

वा वा.

(आस्वादक) आजानुकर्ण

छोटा डॉन's picture

1 Apr 2008 - 8:53 am | छोटा डॉन

संजोपराव , तोडलतं तुम्ही ... जवाब नही ...

""हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?""
हा हा हा, खरे आहे. सुमारशेठ, विचार करा .....

"सर्किट म्हणाला. "त्याचबरोबर सदस्यांचा अनामिक रहाण्याचा मूलभूत अधिकार जपण्याच्या कामात माझा खारीचा वाटा आहे, याचा मला सार्थ आनंद आहे.""
जबरा ...

"इकडे इनोबा, धमाल मुलगा आणि पिवळा डांबिस 'दिसामाजी काहीतरी वैचारिक वाचनाचे फायदे' या विषयावर गंभीरपणे बोलत होते."
आता मात्र खरचं पोट दुखुस्तोवर हसू आलं. मस्त ...

अवांतर : असे लेख लिहण्याची कल्पना चांगली आहे, बघु आम्ही पण ट्राय करतो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

1 Apr 2008 - 10:23 am | विजुभाऊ

सन्जोप राव तुमी खरेच जब्बर लिवताय्.....मला तर प्रत्यक्ष आपण बसलोय असे वाटायला लागले.
बाकी खरेच आपण एकदा सगळे मिळुन कॉफी प्यायला बसूच( ए धमु हसलास का रे? ऑ.....तुला काय कॉफी चे नुसते नाव काढले तरी लत्ता ( अर्थ: कीक) बसु लागली की काय.
मजा आला ....जरा क्लायंट शी तह आणि वाटाघाटी चालल्यात. मोकळा झालो की येतोच घाटात.
बाकी सध्या इथले लोक कसले कसले घाट घालताहेत. घाटाच्या पायथ्याशी वैचारीक कट्टा करण्याचा घाट घालुन तो पार ही करतात.
हां, तर इथं लिहिताना आपण काहीतरी गंभीर आणि वैचारिक लिहिलं पाहिजे. सारखं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांसारखं कुठं या अण्णाला शुभेच्छा, या दादाचं अभिनंदन असं करत राहण्यात काही हशील नाही, काय?
हे मस्तच....
इतके डायरेक्ट लिहु नका नायतर ही मंडळी " कायम चूर्ण चांगले की ईसबगूल "यावर जब्बरी वैचारीक परी संवाद घडवायचे.
सन्जोप काकांचा पुतण्या विजुभाऊ

केशवसुमार's picture

1 Apr 2008 - 10:41 am | केशवसुमार

संजोपराव,
ज ह ब ह रा हा..
"हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"
खो खो खो खि खि खि...
लवकरच तुमच दर्शन घ्यायला हवे..
ते प्राण्यांची शरीर नाही हो.. प्रेतं.. प्रेत.. ते तेव्हढ लगेच बदला बघू..
केशवसुमार
अवांतर :तुम्ही कविता /गझल कधी लिहताय..??

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 10:42 am | विसोबा खेचर

" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो.

च्यायला! आमचे बिरुटेशेठ एवढ्या शिव्या कधीपासून द्यायला लागले? :))

की, एक प्राध्यापक दुसर्‍या प्राध्यापकाच्या तोंडी शिव्या घालून शिव्या द्यायची हौस भागवू पाहतोय!? :)

चालू द्या, चालू द्या, तुमच्या शिव्या-ओव्या सगळं काही यथास्थित चालू द्या! आमचं काहीच म्हणणं नाही.

पण काय रे संजोप, अरे अजून किती अभिव्यक्ति स्वातंत्र्य पाहिजे तुम्हा लोकांना? आणिबाणीच्या परिस्थितीतही लेको तुम्हाला एवढं अभिव्यक्ति स्वातंत्र्य मिळतं आहे, तरीही अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाने माझ्या नावाने शिमगा करून माझ्या डोक्यावर मिरे वाटता? :)

अरे थोडासा तरी न्याय करा की रे! की तात्या म्हणजे भिकारचोटच माणूस आहे असा ठरावच पास करून घेतलाय तुम्ही लोकांनी? :)

छ्या..!

मिपावर तात्पुरते/प्रासंगिक यथास्थित भांडू पण शेवटपर्यंत सगळे एकत्र आनंदाने नांदू एवढीच माझी मनापासूनची इच्छा आहे असं मी तुला जुना मित्र म्हणून आणि चंचीला स्मरून शेवटचंच सांगतो आहे संजोप! लेका पुण्यात मिपाचा कट्टा झाला, मन मोठं करून तू काही नाही गेलास त्या कट्ट्याला सांग बरं! साला, मला मनोमन खूप आनंद झाला असता! लेका पुण्यात राहतोस आणि कट्ट्यकडे पाठ फिरवतोस? शोभलं नाही तुला! :)

तात्या.

स्वाती दिनेश's picture

1 Apr 2008 - 11:31 am | स्वाती दिनेश

तात्याच्या भाषेत ...और ये लगा सिक्सर!
"संजोप स्पेशल" टच, खूप दिवसांनी तुमच्या खास टच चे लिखाण केलेत. मजा आली वाचताना!
स्वाती

धमाल मुलगा's picture

1 Apr 2008 - 11:35 am | धमाल मुलगा

च्यामारी, सध्या वेळ नाहीय्ये निवा॑त प्रतिसाद टाकायला... उद्या तब्ब्येतीत लिहितो उत्तर :-)

बाकी चिमटे एकदम फस्कल्लास

-(कळवळणारा) धमु

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 11:38 am | विसोबा खेचर

लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.

ठीक आहे, ठीक आहे. ज्जा! तुला केली क्षमा!! :)

आपला,
(क्षमाशील ज्येष्ठ!) तात्या.

स्टार वॉर्स सागा कन्टिन्युज

एन्ड ओबी-वन [का पालपटाइन] इज बॅक!!

एक दिवस ल्युक स्कायवॉकर्णाला, डार्थ खेचर म्हणणार आय एम युअर फादर!!

मग द जेडाय कॉन्सील एन्ड द सीथ लिव्हड हॅपीली एव्हर अफ्टर!!

वारकरी
जी. एं. लुकास!!

[गुरू, 03/27/2008 - 11:25
माफ करा. कार्यबाहुल्य. जी.एं. वर लिहायचे तर अभ्यास करावा लागतो. उगीच जाताजाता अमुकला ग्रेट म्हणावे की नाही किंवा 'आमचा गो इतिहास...' असे गळे काढण्याचे ते काम नव्हे.
तेवढा वेळ सध्या नाही. सवड मिळाली की लिहितो.]

हे बदडायच काम सवडीच का सोयीचं? अभ्यासपुर्वक की जाताजाता खरडलेल? :-) तुम्ही "ओबी वन राव" का "संजोप पालपटाईन" एकदाचे काय ते ठरवा. डार्थ खेचरला इतके घट्ट धरुन ठेवताय.

चेल्याने गिर्यारोहण / यात्रा संपले असल्यास गुरुजींना अर्थ समजवावा!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2008 - 6:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेल्याने गिर्यारोहण / यात्रा संपले असल्यास गुरुजींना अर्थ समजवावा!!

कोण चेला आणि कोण गुरु ? :)
अहो, सहजराव !!! जी. ए. च्या कथांवरुन निघणार्‍या अर्थावरुन त्यांचे सध्या जमत नाही.
(नुकतेच दोघांनी मिळुन जी.एंची पुस्तके पाचगणीच्या धबधब्यात सोडली - एक बातमी )
त्यामुळे सध्या एक तुकारामाची गाथा वाचतो, तर एक इंग्रजी पुस्तकाचे स्वैर अनुवाद करतोय म्हणे :)

भोचक's picture

1 Apr 2008 - 4:55 pm | भोचक

हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"

संजोपजी,
मजा आला. शैलीसुद्धा धमाल. प्रत्येकाची वैशिष्ट्ये छान टिपली आहेत.

(स्वतःच्याही पाठीपर्यंत साबण न पोहोचल्याने हळहळणारा) भोचक

सर्वसाक्षी आणि विजुभाऊचे वेगळेच चालले होते.
"जुने जाऊद्या मरणालागुनि" की अशीच काहीशी ऒळ आहे ना रे ती? या इतिहासाच्या कचाट्यातून आपण कधी बाहेर पडणार कुणास ठाऊक
."
हा विजुभाऊ चा स्वभाव एकदम फक्कड पकडला आहे. हो ! तो "जुने जाऊद्या मरणालागुनि" म्हणताना ऐतिहासिक भाषा पण टेचात वापरतो...काय वल्ली आहे हे नीट कळतच नाही. ऐतिहासीक म्हणावा तर परवा संजीव च्या स्तोत्रावर जाम घसरला आणि उखडला.
तुम्हाला काय कर्ण पिशाच्च वश झालेय की काय अशी शन्का येत्येय. स्वभावाचे यक्झॅक्ट वर्णन ....धमु चे सुद्धा. कट्ट्यावर न जाता सुद्धा येवढं?
लेख आवडला.........अगदी मनापासुन

विजुभाऊ's picture

1 Apr 2008 - 7:51 pm | विजुभाऊ

विजुभाऊ चा स्वभाव एकदम फक्कड पकडला आहे. हो
बरे झाले मला ते तरी समजले. आपले इतिहासावर प्रेम आहे.
पण आपण त्यामुळे केवळ इतिहासातच रहात नाही. ईतिहासावर प्रेम करताकरता उगच स्वतःच ऐतिहासिक पुराण वस्तु व्हायला आवडत नाय आपल्याला
आपल्या इतिहासातल्या योग्य त्याच गोष्टींचा अभिमान आहे.
कोणी उगाच स्तोत्रे म्हणुन कर्ज फिटेल म्हणाले की आपल्या डोक्यातली सगळे बाजीप्रभु जागे होतात गनीम टीपायला.स्तोत्रे म्हणुन फारतर म्हणण्याची हौस फिटेल
स्तोत्रांचा उपयोग मला फार झाला वर्गात गाण्यांच्या भेंड्या खेळताना.
र वरुन तर रामरक्षेमुळे कधीच प्रॉब्लेम आला नाय.

>>र वरुन तर रामरक्षेमुळे कधीच प्रॉब्लेम आला नाय.

'अ' वरून म्हणायचं असावं तुम्हाला.

व्यंकट

इनोबा म्हणे's picture

1 Apr 2008 - 8:05 pm | इनोबा म्हणे

जबरा हो संजोपराव.... पुलाव अगदी झक्कास जमलाय.
वि.सू.:ज्यांना झेपत नसेल त्यांनी हा पुलाव जास्त खाऊ नये,नाहीतर पूलाखाली बसायची वेळ येईल. :)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

स्वाती राजेश's picture

1 Apr 2008 - 10:11 pm | स्वाती राजेश

सुंदर लिखाण केले आहे.
प्रत्येकाचे वैशिष्ट्य छान टिपले आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Apr 2008 - 11:05 pm | ब्रिटिश टिंग्या

'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'
हे एकदम जब्रा.....

असे काथ्याकूट सुरुच राहिले!
अशाच काथ्याकुटांच्या प्रतिक्षेत :)

- छोटी टिंगी ;)

झंप्या's picture

2 Apr 2008 - 7:21 am | झंप्या

"पन तात्या, तुज्या संपादक मंडळात आमची वर्दी न्हायी लावलीस तू. मी न्हाई, प्रकाश घाटपांडे न्हाई, प्राजू न्हाई, गारंबीचा बापू न्हाई, नाना चेंगट न्हाई... यवडंच काय पन धोंडोपंतबी न्हाई. तू निवडलंस ते पोष्टमन, किमयागार आन आपासाहेब चौघुले या तिगास्नी. ह्ये काय तुजं कळंना राव..."

खल्लास रावसाहेब! जींकलात!!.. पण काय हो तो किमयागार तर ठार झाला बाळासाहेब (आपासाहेब नव्हे) रुसुन गेलाय वाटतं, पोष्टमन तर घरोघरी पोथ्या पोहिचवतोय..मग ते गारंबीचा बापू, शलाका पेंडसे, राजीव अनंत भिडे हे लोक कुठे गेले ओ? आजकाल कुठे गेले.. तिच्यामायला तात्याच्या लिखाणाला पण ते प्रतिसाद घालत नाहीत बघून काळजी वाटते.

अगदी अलीकडचा 'उथळ आणि बटबटीत प्रतिसादांपासून सुटका' हा छोट्या डॉनचा लेख बघ..

हे तर कै च्या कैच! १ नंबर!!

'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'

असले प्रतिसाद देणार्‍यांना लाल भडक तर्रीची धुरी देऊन नुसत्या डोळ्यातुनच नव्हे तर आणखी कुठून कुठून पाणी काढावेसे वाटते बघा!उगाच मिसळपाव मिसळपाव करुन नाचतात आणि गुळमट प्रतिसाद टाकतात लेकाचे.

सुधीर कांदळकर's picture

2 Apr 2008 - 8:17 pm | सुधीर कांदळकर

खयाली पुलाव.
अभिनंदन, धन्यवाद.

सुधीर कांदळकर.

मुक्तसुनीत's picture

2 Apr 2008 - 10:23 pm | मुक्तसुनीत

शीर्षकावरून "खयाली पुलाव , कित्ता बी खाव !" असे म्हणणार्‍या अस्सल "कोल्लापुरी" पै. अमान मोमीनांची आठवण झाली .

अभिज्ञ's picture

2 Apr 2008 - 10:35 pm | अभिज्ञ

मागे बिरुटे साहेबांचा "तात्या मनोगतावर परतला" असाच काहितरी एक लेख होता.
त्यात सुध्दा ब-याच लोकांचि स्टाईल (ने?) मारलि होती!

तसाच हा एक झकास "लेख".
मोकळा वेळ मिळत नसल्याने आम्हि काहि इथे जास्त लिहित नाहि,पण मि.पा.वर वाचन मात्र चालू असते.
त्यामुळे बरीच पात्रे ,त्यांची शैली माहित आहे.त्यामुळे लेखाचा जास्त आनंद घेता आला.
असो.

(फक्त मिसळपाववरतिच वावरणारा) अबब

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2008 - 6:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संकेतस्थळावरील व्यक्तिचित्रांची चांगलीच खेचली आहे. लेखन बहारदार झाले  आहे आणि ते आवडले. बाकी आमच्या तोंडी खालील लेखनात ओव्या जरा लैच झाल्या, जाऊ द्या !!!!  या निमित्ताने आपण आपली हौस तर भागवून घेतली. :)
" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो.
सहमत !!!! ;) हाहाहाहाहा:))))))))) 
'एक जबरदस्त फसलेला आंतरजालीय दिवाळी अंक'  या विषयावर आपण कधीतरी आमचे खिसे चाचपणार हेही आम्हाला माहित होतं :)
खयाली पुलावात  'दिलीप' च्या मसाल्याचा लै  वापर झाल्यासारखा  वाटला !!!! :) 'ज्योतिषविषयक लेख वाचण्यापासून कसा बचाव कराल?' हा प्रकाश घाटपांडेचा लेख घे,:)))))) ह. ह. पु. वा. च्यायला आमच्या घाटपांडे साहेबांनी काय लिहावे आता !!!
आणि जी.ए.कुलकर्णी हा कालबाह्य झालेला लेखक आहे, असं माझं मत आहे" कर्ण जोरात म्हणाला.

हे शक्य तरी आहे का ? जी. ए.चे जगभरात दोनच वाचकच शिल्लक राहिले आहेत, एक आपण आणि आमचा मित्र कर्ण ;)
अवांतर :) लेखनाच्या या आकृतीबंधाचा  वापर आपल्यापासुनच आम्ही शिकलो. त्यावर आम्ही दोन प्रयोग केले. आणि आपलेही दोन झाले. आता नवीन काही तरी शोधा बॉ !!! :)
आपला
दिलीप(डबल बॅरलवाला)

सृष्टीलावण्या's picture

3 Apr 2008 - 9:06 am | सृष्टीलावण्या

तुमचे मुक्तचिंतन वाचले, मनात आलं इतक्या सुंदर कल्पनाविलासाला थातुरमातुर प्रतिसाद देण्यात हशील नाही. पण काय लिहावे सुचेना. २ दिवस खालच्या पापणीला वरची पापणी लागली नाही.

खरोखरच मागल्या शुक्रवारी वातावरण पार कोंदटले होते, (मिपाचे ग्रहयोगच तसे असतील म्हणा पण) तात्यांच्या इडलीवड्याच्या आत्मचरित्राने त्या धुमसत्या निखार्‍यांवर पाणी टाकले आणि आपल्या ह्या हलक्या फुलक्या लेखाने तर कित्येकांच्या मनातली साचलेपणाची जळमटं निघाली. खडाजंगी, वादविवादाने जे साहित्यिक अग्निमांद्य आले होते ते ह्या दिलपाक लिखाणाने समूळ नष्ट झाले.

अगदी अलिकडच्या अक्करमाशी लिखाणांचा धांडोळा घेतला तर तुमचा लेख सर्वांगसुंदर आहेच पण त्यात दांभिकपणाचा लवलेश नाही. विनोदाच्या क्षितिजावर जणू कस्तुरीचे हास्यतुषार दरवळले.

मी अधून मधून तल्लफ आली कि हा लेख वाचते, तेव्हढेच काही काळ ह्या धकाधकीच्या जीवनात दाठरलेले मन प्रफुल्लित होते. बाकी काही म्हणा, तुमचा हा लेख उमजला तर एखादा नसनखवडा पण पोट धरधरून हसेल.

ह्या ठाव घेणार्‍या लेखात तुम्ही अनेकांच्या नाकावर लिंबू घासलेत. खरी मजा तर आता सुपात असणार्‍यांची आहे. आपला काय पंचनामा होणार ह्या भीतीने त्यांना घोसळले आहे .

पुढचा लेख झटकन् येऊ दे.

हा असला प्रौढ मराठीत प्रतिसाद देण्यासाठी मराठी शब्दकोशात ठेवणीतले मराठी शब्द धुंडाळणारी,

सृला
>
>
बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...

मुक्तसुनीत's picture

3 Apr 2008 - 9:57 am | मुक्तसुनीत

सृला यांच्या शब्दकळेला मुक्त दाद द्यावीशी वाटते. त्यानी मांडलेल्या विचाराबद्दल दुमत होऊ शकते, परंतू शब्दांच्या निवडीच्या अस्सलपणाबद्दल कुणाला कसलीही शंका असायला नको. "नसनखवडा" , "दाठरलेले" मन , नाकावर लिंबू घासणे , अनेकाना "घोसळलेले" असणे , साहित्यिक "अग्निमांद्य "..... अहाहा. जीभेला चव आली राव.

धमाल मुलगा's picture

3 Apr 2008 - 10:19 am | धमाल मुलगा

बरोबर असेलही हो तुमच॑!

पण वाचल्या वाचल्या आम्हाला झीटच आली त्याच॑ क्काय?
आधी कळेचना की नक्की कुठच्या भाषेत लिहिल॑य. आम्ही बिचारे पोटापुरत॑ शिकुन मोलमजुरी करणारे गरीब बिच्चारे हमाल. पार फाफललो ना...

ए सृष्टीताई, आधी जरा डिस्क्लेमर टाकत जा ग॑ बाई, 'खालील लेखन हे ज्या॑च्या मराठीची प्रकृती क्षीण आहे त्या॑नी स्वत:च्या जबाबदारीवर वाचावे. काही शब्दा॑मुळे अशा व्यक्ती॑स मानसिक धक्का बसू शकतो !' वगैरे वगैरे :-))))

बाकी बेष्टच हो!

- (भाषादारिद्र्यस॑पन्न) ध मा ल.

विसोबा खेचर's picture

3 Apr 2008 - 10:28 am | विसोबा खेचर

आम्ही बिचारे पोटापुरत॑ शिकुन मोलमजुरी करणारे गरीब बिच्चारे हमाल.

हा हा हा धमाल्या! आमची पण तीच गत आहे रे बाबा! :)

आम्ही आपलं जसं सुचेल तसं आमच्या भाषेत लिवायचा प्रयत्न करतो. एकतर श्रीमंत शब्दसंपदा लाभलेली भाषा कशाशी खातात तेच आम्हाला माहीत नाही आणि दुसरं म्हणजे ओढूनताणून, इकडनं-तिकडनं शब्द चोरून मुद्दामून तशी भाषा लिहिणे आमच्या स्वभावात बसत नाही!

आपला,
(भाषाप्रभू नव्हे, तर भाषेचा दिवाळखोर!) तात्या.

सृष्टीलावण्या's picture

3 Apr 2008 - 1:14 pm | सृष्टीलावण्या

तू म्हणतोस तर असे एक अस्वीकरण टाकायला हवे खरे म्हणजे लोक जास्त चवीने वाचतात (उदा. वरचा लेखच पहा ना. त्यातले अस्वीकरण आणि त्यावर डांबिसकाकांचा अभिप्राय ह्यासाठी आगामी मिपा साहित्य संमेलनात नक्की कोणाला अग्रासन द्यावे ह्याबाबत मनात कल्लोळ उठला आहे).

मात्र असे हे अस्वीकरण टाकले नसताना सुद्धा तू आणि काही वेळ नसणार्‍या व्यक्तिमत्वांनी माझा प्रतिसाद आवडीने वाचल्याचे पाहून मन भरून आले.

असो. झीटीमधून पूर्ण सावरला असशील तर आजानुकर्णाचा 'दिल्ले दान' वरील माझा प्रतिसाद वाच. तिथे उरलेले चविष्ट शब्द लिहिले आहेत.

>
>
बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2008 - 10:17 pm | पिवळा डांबिस

वरचा लेखच पहा ना. त्यातले अस्वीकरण आणि त्यावर डांबिसकाकांचा अभिप्राय ह्यासाठी आगामी मिपा साहित्य संमेलनात नक्की कोणाला अग्रासन द्यावे ह्याबाबत मनात कल्लोळ उठला आहे.

सृलाताई तुम्ही काय, किंवा तात्या, केशवसुमार, सन्जोपराव काय मिपाच्या साहित्यमंदिरातले पुजारी! (ज्यांची नांवे घ्यायची राहिली असतील त्या पुजार्‍यांनी जोडे मारू नयेत!) आम्ही आपले पुजार्‍यांच्या पायाकडचे सेवक!! तुमची साहित्यिक प्रतिभा आमच्याकडे नाही.
तेंव्हा,
सेवा करावया लावा,
देवा, हा योग्य चाकर||

आपला,
पिवळा डांबिस
(हे मी उपरोधाने लिहीत नसून खरोखरच तसे वाटते म्हणून लिहीत आहे)

मनापासुन's picture

3 Apr 2008 - 10:29 am | मनापासुन

जखमेवर मीठ चोळणे हे माहीत होते.......... नाकावर लिम्बु घासणे?
नाक ठेचणे हे माहीत होते....नाकाला मिर्च्या झोंबणे हे ही माहीत होते.
स्रुश्टीताई "नाकावर लिम्बु घासणे" या नव्या वाक्प्रचाराबद्ल मसाप मधे ठराव घेतो.
..............."पोहोर्‍याचा अण्णु" होताना मनापासुन पाहीले.
(पोहोर्‍याचा अण्णु होणे....संदर्भ : अंतु बर्वा. मधली आळी,रत्नागिरी )

सन्जोप काका
भगिनिमंडळावर तुमचा एवढा आकस का हो? अगदी अनुल्लेखाने मारताय
वरदाबै , प्राजुबै , स्वाती राजेशबै , मीनल तै , स्रुष्टी तै ,मनस्वी बै , सुवर्णमयी बै ,स्वाती दिनेश तै
यांच्या बद्दल काहीतरी लिहा
नाय तर त्या भडकतील आणि मिपा वहिनी सेना काढुन तुमचे त्यात भाषण ठेवतील्... ३३% जागा तरी लिहा त्यांच्या वर
.......................टी व्ही मालीकेत ही महीलां वर अन्याय न पाहु शकणारा...विजुभाऊ

विसोबा खेचर's picture

3 Apr 2008 - 2:07 pm | विसोबा खेचर

रावसाहेबांचं मिपावर आणि खास करून तात्यावर विशेष पिरेम असल्यामुळे त्यांच्या खयालीपुलावाची मध्यवर्ती थीम ही 'तात्या'च दिसते आहे! :)

७ परिच्छेदांपैकी फक्त २ परिच्छेदात त्यानी आम्हाला वगळलंय! :)

बाकीचे ५ परिच्छेद तात्यामय आहेत! :)

हे पाहा -

परिच्छेद १ -

बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"

परिच्छेद २ -

यात विसोबाला पत्ते खेळताना दाखवलंय! :)

परिच्छेद ३ -

"काय कर्णा? तू शेवटी आलास म्हणायचास. मला वाटलं तुझंही मन विटलं की काय मिसळपाववरुन? काय? होतोस का परत संपादक?"
विसोबाने सुपारी कातरत विचारले. " मी लिहितो ते काय लोकांनी मला चांगलं म्हणावं, प्रतिक्रिया द्याव्यात म्हणून काय? आपापली श्रद्धा असते. साला, प्रतिक्रिया आल्या काय, नाही आल्या काय, आपण लिहितो आपल्या आनंदासाठी. काय?"

परिच्छेद ६ -

" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो. त्यानं म्हनलं, केशवसुमारा, बर्‍या बोलानं परत ल्ह्यायला लाग, तरीबी केशवसुमार काय तोंडातली गुळनी सोडंना. मी म्हनलं, मायला आता एक लेखच लिहितो,"रसिकाग्रणी तात्या आनि मुजोर केशवसुमार".

परिच्छेद ७ -

तात्याचे लेख बघ 'बाबुजींच्या गाण्यातल्या हुकलेल्या जागा' आणि 'भाईकाका कुठे घसरले?' -तर 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'या आशयाच्या पंचेचाळीस प्रतिक्रिया. तात्पर्य काय, तर असं मनाला लावून घ्यायचं नसतं... "

आता बोला! अहो रावशेठ, अहो अजून किती चड्डी उतरवाल आमची?!:)
पण बघा हां, पुन्हा त्यावर, 'आपुन तो साला हैइच नंगा फकीर!' असं म्हणून आम्ही मोकळे होऊ! :)

तेव्हा राव साहेब, जरा विजूभाऊ म्हणतात त्याप्रमाणे पुढच्या पुलावात आम्हाला जरा वगळा आणि महिला मंडळालाही आणा! आम्ही जरा एखाद एपिसोड तरी पुलावाबाहेर राहू म्हणतो! :)

पुढच्या वेळेला जरा सर्कीट, पोष्टमन व त्याची प्रसव ही कविता आणि चित्तरचा संताप, माधवी गाडगीळ, राजीव अनंत भिडे, शलाका पेंडसे, सर्कीटने केलेला पोष्टमनचा पर्दाफाश, डबक्यातल्या फालतू राजकारणामुळे वैतागलेली आमची सोनाली, मिपावर येऊन काही लोकं खरडीतनं 'यापेक्षा चांगली संस्थळं अजून शिल्लक आहेत' असं लिहून मिपाचे मेंबर फोडण्याचा नाकाम प्रयत्न करतात! ;), वगैरे कल्पनाकिस्से जरा रंगवा जोरदार! :)

हां, वाटल्यास खयाली पुलावाच्या त्याच्या पुढच्या भागात पुन्हा तात्याला आणलंत तरी चालेल. चला, लगे हाथ तुम्हाला एक थीमही सुचवतो. आवडली, पसंद पडली तर अवश्य लिहा तिच्यावर.

थीम अशी आहे की काही मराठी संस्थळांवर संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाली आहे म्हणून तात्या चेकाळला आहे आणि "साला, तो तिथे ज्ञानेश्वरी उतरवतो काय, थांब साला, मी पण मिपावर तुकारामाची गाथा उतरवून काढतो!" असा संतप्त होऊन 'पण' करतो आणि इतर मंडळी त्याला शांत करतात! :)

बघा बुवा, थीम पसंद पडली तर अवश्य लिहा, आम्हाला वाचायाल मजा येईल! :)

चला..! उशीर होतोय, आता निघायला हवं! विशेष्ठ सेवा पुरवणार्‍या बायकांच्या डोक्यावर शिकेकाई घालायला जायचंय आज! :)
(स्वगत!)

आपलाच,
तात्या.

--

पुढचा मिपाकट्टा पिरंगुट येथेच व्हायला हवा!!! :)

हा खयाली पुलाव झाला.....आता पियाली पुलाव..............हे चॅलेन्ज कोण मिसळवीर घेणार.
..............................पुलाव मनापासुन आवड्तो

पुलावाच्या अजुन कोणकोणत्या व्हरायटीज येणार आहेत इथे?
अवांतरः एक सहज म्हणुन विचारतो...पुलाव आणि बिर्याणी यात एक्झॅक्ट फरक काय( रंग सोडुन)

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 11:38 am | मनस्वी

(१) बिर्याणी थर देउन बनवितात. पुलावामध्ये थर नसतात.
(२) बिर्याणीचे मसाले पुलावाशी तुलना करता जास्त तीव्र असतात.
(३) बिर्याणीला मटण / चिकन / भाज्या आणि भात वेगवेगळे शिजवून मग दम लावतात. पुलाव डायरेक्ट फोडणीत भाज्या आणि तांदुळ टाकून करतात.

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर

मला जाणवलेला फरकः-

बिर्याणीत तूप जास्त असते.
बिर्याणी, भात आणि मटणाचे थर लावून केली जाते.
मटण आणि भात वेगवेगळे शिजवून जशी बिर्याणी करतात तशीच कच्चे मटण आणि तांदूळ एकत्र थर लावूनही बिर्याणी करतात.
बिर्याणीत जास्त कॅलरीज असतात.
बिर्याणी पचायला जरा जड असते.
बिर्याणी त्यातील मसाल्यांमुळे तसेच, पुदीना, कोथींबीर, केशर, तूप ह्या पदार्थांमुळे पुलावा पेक्षा एकदम वेगळी लागते.

पुलाव मटण शिजवलेल्या पाण्यात करतात. त्याला मराठीत आखणीचा आणि उर्दूत या़खनीचा पुलाव असे म्हणतात.
शिजवलेल्या मटणाची बारीक तुकडे (हाडे नाही) ह्या पुलावात घालतात.
पुलावात गरम मसाले, तूप कमी प्रमाणात वापरतात.
पुलाव, बिर्याणीपेक्षा पचायला हलका असतो.
मटणाची याखनीमुळे पौष्टीक असतो. त्यामुळे दीर्घ आजारातून उठलेल्या माणसास शक्तीवर्धक आहार म्हणून देतात.

बिर्याणी किंवा पुलाव हा फक्त मटणाचाच करतात. चिकन आणि व्हेज बिर्याणी आणि पुलाव हे सोयीनुसार शोधून काढलेले पदार्थ आहेत.