स्वयंपाघरातील अनुभव...

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in जनातलं, मनातलं
29 Mar 2008 - 6:49 pm

स्वयंपाघरातील अनुभव..
हे शिर्षक वाचून कदाचित तुम्हाला वाटेल की, असे अनुभव लिहावेत्...जसे
रोझा सिनेमात हिरो, हिरोईन ला स्वयंपाघरात गाठून हळूच गमतीने सिगरेट देतो, तिला एकदम ठ्सका लागतो.
बॉबी मधे डिंपल स्वयंपाघरातून पिठाचे हात घेऊन, हिरो आलेला असतो तेव्हा दरवाजा उघडते.

असे अनुभव न लिहिता तुम्ही सर्वजण कधी ना कधी स्वयंपाघरात गेला असाल तेव्हा तिथे काही पदार्थ करताना, किंवा बायकोला/नवर्‍याला अथवा
मित्र/मैत्रिणीला आश्चर्यचकीत करण्यासाठी काही बनवण्यासाठी स्वयंपाघरात मजेशीर अथवा चांगले अनुभव असतील ते इथे शेअर करावेत.
सुरवात माझ्यापासून करते..

आमच्या घरी मे महिन्याच्या सुट्टीमधे सर्व चुलत भावंडे जमलो होतो. घरातील मोठी माणसे काही कारणासाठी बाहेर गेली होती. आम्ही सर्व भावंडानी वरण, भात ,चपाती व भाजी करायचे ठरवले. कुकर लावयला सोपा होता. सर्वांनी कामे वाटून घेतली. तेव्हा पहिल्यांदा मी चपाती केल्या होत्या. त्या चपाती इतक्या वातड झाल्या होत्या की तुटता तुटत नव्हत्या. कुणी सुद्धा खाल्ल्या नाहीत. शेवटी सर्वांनी नुसता वरण,भात आणि भाजी खाल्ली.
नंतर त्या मी केलेल्या सर्व पोळ्या कुत्र्याला घातल्या, ते सुद्धा नुसते हुंगून पुढे गेले... हे पाहिल्यावर सर्व जण खोखो हसत म्हणाले, बघ तुझ्या चपाती कुत्रे सुद्धा खात नाही, मग आम्ही कसे खाणार???

अवांतर: पण हीच भावंडे आता मी कधी भारतात येइन आणि मी केलेले वेगळे वेगळे पदार्थ कधी चाखायला मिळतील याची वाट पाहात असतात.

मौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

उदय ४२'s picture

29 Mar 2008 - 6:57 pm | उदय ४२

स्वातीताई,
चपात्या केल्या म्हणुन त्या चामट झाल्या,पोळ्या केल्या असत्या तर....
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2008 - 10:52 pm | प्रभाकर पेठकर

पहिल्यांदा मटण करायला घेतले.
दुकानात जाऊन कच्चे मटण कसे घेतात हेही माहीत नव्हतं. पण घेऊन आलो १ किलो.
घरी आणून धुवून घेतले. कच्च्या मांसाचा तो ओला थंड स्पर्ष पहिल्यांदाच अनुभवत होतो.
माहिती असलेल्या थिअरी नुसार सर्व मसाले टाकून मटण शिजण्याची वाट पाहात होतो. मधे मधे तुकडे चाखताना जाणवलं काही केल्या हॉटेल सारखी चव येत नाहिए. (मी नुसते मांस चाखून पाहात होतो, रस्सा चाखलाच नाही) त्यामुळे ५-६ वेळा तिखट मीठ वाढवले. मटण शिजले पण मानव जातीने खाण्यापलिकडे पोहोचले होते. एक किलो मटण जड अंतःकरणाने टाकून द्यावे लागले. असो.
अनुभवातून शिकत गेलो. कॅटरिंग कॉलेज जॉईन केले असते तर 'फि' द्यावी लागली असतीच नं...

वरदा's picture

29 Mar 2008 - 11:33 pm | वरदा

आई बाबा गावाहुन येणार होते म्हणून मी वरण भात लावला....लहान होते मी मला तूरडाळ आणि चणाडाळ मधला फरक नाही कळला...एकदा ३ शिट्या झाल्यावर शिजली नाही डाळ म्हणून परत कूकर लावला...मग परत गॅस वर शिजवून पाहिली तरी डाळ शिजत नव्हती आणि नेहेमीच्या वरणासारखी दिसतही नव्हती....बिचार्‍या आईला घरी आल्यावर दही भात खावा लागला....पण रात्री आम्हाला कटाची आमटी मिळाली ना:)))

मीनल's picture

30 Mar 2008 - 7:04 am | मीनल

माझी आई एकदा बाहेर गावी गेली होती.
मी लहान होते.
बाबांनी पिठलं ,भात करायच ठरवलं.
कूकर ने भात छान शिजवून दिला.
मग बाबांनी पिठले करायला घेतले.फोडणी जमली.मिरची घातली .कांदा परतला.
नंतर पाणी घातले कढईत.उकळी आल्यावर त्यात बेसन घातले.
ते जास्त झाले .मग पाणी वाढवले.
मग पुन्हा बेसन ,मग पाणी ,मग बेसन ,पुन्हा पाणी.
असे करून करून कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला.
`छान आहे ` असे तोंडदेखले बोलून मॅनर्स पाळायचे माझे वय नव्हते.
``शी ,हे काय?मला नको हे !मी नाही खाणार`` मी स्पष्टपणे सांगून मोकळी झाले.
बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा!
कढईतल्या पदार्थाने कच-याच्या डब्याची वाट धरली.बिच्चारा पदार्थ !

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2008 - 10:02 am | प्रभाकर पेठकर

कढई ओतू जाई पर्यंत काहीतरी पिवळसर/मधेच कच्चा/ पाणिदार /गोळेदार पदार्थ तयार झाला.

ह्याला म्हणतात पीईईईईठ्ठ्ठ्ठ्ठ्लऽऽऽ

विसोबा खेचर's picture

30 Mar 2008 - 10:15 am | विसोबा खेचर

मिपाच्या रसोईप्रमूख स्वातीताई यांस,

स न वि वि,

अवांतर -

पण हीच भावंडे आता मी कधी भारतात येइन आणि मी केलेले वेगळे वेगळे पदार्थ कधी चाखायला मिळतील याची वाट पाहात असतात.

त्या भावंडात मलाही धरायला हरकत नाही स्वातीताई! मलादेखील वाट पाहायला आवडेल! झकासपैकी तळलेली पापलेटं, पापलेटची मालवणी आमटी आणि कोलंबीपुलाव असा तुमच्या हातचा बेत करा! डोन्ट वरी, भाऊबीजेची ओवाळणी अगदी भरभक्कम घालीन!:)

असो...!

स्वातीताई, तुमच्या अश्या चर्चाप्रस्तावामुळे तात्यातला 'साहित्यिक-लेखक' जागा होतो! :)

आता आमचा स्वयंपाक घरातील एक अनुभव!

अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या, नशीबाची दानं नेहमी सुलटीच पडतात असं नव्हे!

परंतु एकदा कॉलेजच्या दिवसात एका पावसाळी दुपारी घरी 'ती' आली होती! तेव्हा नुकतंच जमलं होतं आमचं! मी खूप प्रयत्न करून तिला पटवली होती आणि सुरवातीला अनेकदा भाव खाऊन शेवटी 'तात्याच' जिनियस आहे हे उमगून तीही मला पटली होती! :)

तर काय सांगत होतो?

अश्याच एका कुंद दुपारी 'ती' घरी आली होती! साला घरात दुसरं कोण नाय, फक्त आपण आणि ती! बाहेर पावसाने झकासपैकी बडा ख्याल जमवला होता. महानोरांच्या शब्दात सांगायचं तर बाहेर 'नभ उतरू आलं' होतं आणि आत आमची अंगं नाही, तरी मनं मात्र त्या 'हिरव्या बहरात' झिम्माड झाली होती!

आणि अश्यातच,

"ए, भजी करुया? मी बटाटाभजी एकदम मस्त करतो..!"

असा परस्ताव मी टाकला!

अहो काय सांगू तुम्हाला स्वातीताई, त्या वेळेस चेहेर्‍यावर थोडे मिश्किल, थोडे लाजाळू भाव ठेवत तिने भज्यांच्या कल्पनेला काय सुंदर होकार भरला होता! छ्या...आपण तर साला एकदम पागल! :)

डाळीच्या कालवलेल्या पिठात तिखटमीठ टाकण्यापूर्वी,

"थांब, तुला कळायचं नाही, माझा तिखटमिठाचा अंदाज एकदम परफेक्ट आहे. तेव्हा ते मीच टाकतो बरोब्बर अंदाजाने!"

"बरं बाबा, तूच टाक!"

ओट्याजवळ शेजारी शेजारी उभे होतो आम्ही.

"चल, तू हो आता बाजूला, मी तळते भजी."

अर्रे, पण किती घाई करशील, तेल तरी तापू दे ना!"

हे आमचे प्रेमळ संवाद आजही आठवतात स्वातीताई!

आणि मग अगदी बटाट्यांचे काप काढण्यापासून ते फायनल भजी कढईतून बाहेर काढेस्तोवर आम्ही दोघांनी मिळून केलेली ती बटाटा भज्यांची रेसिपी! त्यानंतर अनेकदा बटाटाभजी खाल्ली असतील परंतु तिनं आणि मी मिळून केलेल्या त्या भज्यांची सर कशालाच नाही! अहो लग्नात सगळेच नवराबायको एकमेकांना अगदी जाहीरपण श्रीखंडाचे वगैरे घास देतात पण भर दुपारी अंधारून आलेल्या त्या झिम्माड पावसात प्रियकर-प्रेयसीने एकमेकांना दिलेल्या त्या बटाटाभज्यांच्या घासाची लज्जतच वेगळी!

जवान थे हम, उन दिनो की बात कर रह हू! :)

असो, तर असा हा आमचाही स्वयंपाक घरातील एक अनुभव! साता जल्माच्या प्रितीचा!

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2008 - 11:00 am | प्रभाकर पेठकर

अलिकडे 'ति'ची मुलं मला 'तात्यामामा' अशी हाक मारतात तो भाग सोडून द्या

अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2008 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला.

हाहाहाहा:))))))))
च्यायला नुसतं डोकं पकवलं होतं या अनुष्कानं.
मिपावर प्रवेश केला की कुठेतरी दिस्तेच ती बया. (कोणाच्या तरी वाढदिवसाला आहेच, शुभेच्छा तरी आहेच )
पण तिच्या फोटोबिटोवरुन काय सभ्य वाटते, पण आमच्या दोस्ताची पार वाट लावून टाकली राव या बयेनं :))))

पिवळा डांबिस's picture

30 Mar 2008 - 9:24 pm | पिवळा डांबिस

तुम्हा लोकांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय!
अरे बाबांनो, "ती" वेगळी, आणि अनुष्का वेगळी!! तुम्ही लेखात वाचा, तात्या त्यांच्या कॉलिजातील दिवसांतल्या (म्हणजे बघा, डलहौसी राज्य करीत होता तेंव्हा!!) "ती" बद्दल बोलतायत!!
अनुष्काच्या फोटोवरून (तात्यांनीच दाखवलेल्या हो!!) असे दिसते की तात्या जेंव्हा कॉलिजात होते तेंव्हा अनुष्का दुपट्यात असावी!!:)))
आणि अनुष्का भजी कशाला मागेल? ती फारफार तर बोंडा मागेल. "ही" कोणीतरी सुंदर खाशी सुबक ठेंगणी मराठमोळीच कन्यका असावी!!:))
तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!!
:)))
-डांबिस पिवळा

विसोबा खेचर's picture

31 Mar 2008 - 12:28 am | विसोबा खेचर

तात्या, तुमच्या लिहीण्याचा 'अभ्यास' करतांना आम्हा विद्यार्थ्यांना ही एक डिफिकल्टी आली आहे, जरा सोडवून द्या ना प्लीऽऽऽज!!
:)))

हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :)

तात्या.

प्रमोद देव's picture

30 Mar 2008 - 11:09 am | प्रमोद देव

अनुष्काला मुलं आहेत? आयला, हे नव्हतं माहीत बुवा आपल्याला.

:)))))))))))))
खरं काय हो "तात्यामामा!"

देवदत्त's picture

30 Mar 2008 - 3:52 pm | देवदत्त

छान विषय.
माझ्या आठवणीतील..
मी बहुधा सातवीत होतो. आई-वडिल बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुपारचा स्वयंपाकही बहिणच करायची. एकदा तिला कॉलेजमध्ये प्राणीशास्त्रात उंदीर कापायचा होता, त्यामुळे ती मला म्हणाली की आज काही मी स्वयंपाक करेन असे वाटत नाही. तिने मला वरण भात कुकर मध्ये कसा लावावा हे शिकविले. पण बहुधा मी नेमके पाणी किती टाकावे हे विसरलो, त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे ३/४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला. थोड्यावेळाने पाहिले तर सगळे कच्चे होते. म्हणून तो प्रकार २ ३ वेळा केला. शेवटी ११ शिट्ट्या झाल्यावर ही माझा वरणभात काही शिजला नाही. त्यामुळे कॉलेजमधून आल्यावर माझ्या बहिणीलाच स्वयंपाक करावा लागला होता.

तसेच एकदा आई आजारी होती. पण आमच्या आईस्क्रिमच्या आग्रहास्तव तिने मला सांगितले की तू बनव आईस्क्रिम, मी सांगते कसे ते. त्याप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन मी दूध कढवून (?) साखर, मिल्कमेड वगैरे टाकून आइस्क्रिमची तयारी केली. मग शीतकपाटात (फ्रिजमध्ये हो) ते घट्ट झाल्यावर संध्याकाळी चाखल्यावर लक्षात आले की आईस्क्रिम सुरूवातीला तर गोड लागते पण घशातून जाता जाता तिखटपणा जाणवतो. जेव्हा आईने विचारपूस केली तेव्हा कळले की जी कढई वापरली होती ती भाजीकरीता वापरण्यात आली होती. काही कारणाणे त्यात भाजीचे तिखट राहिले होते. त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :)

त्यानंतर बहुधा मला असे काही करण्यास मिळाले नाही. ;) तरीही ऑमलेट, मॅगी, चहा करणे हे तर चालूच होते.

पण गेले २ वर्षांपासून मी वरणभात चांगला बनवतो आणि आता तर भाजी ही.

सुधीर कांदळकर's picture

30 Mar 2008 - 6:21 pm | सुधीर कांदळकर

आमच्या शेजारच्या घरातील छोट्या भाचे मंडळींचा दुपारी पत्ते खेळतांना जोरदार आग्रह झाला. निवांत जेऊन पत्ते खेळत बसलो होतो. म्हणजे दोन तीनचा सुमार असावा. मे महिन्यातील २९-३० वगैरे तारीख असावी. अरे उन्हाळ्यात काय भजी खाता? पावसात खावीत. त्यातच मजा आहे. उन्हाळ्यात बर्फाचा लाल गोळा खावा. पाऊस आला तर जरूर करीन. मी त्यांची बोळवण केली. मी तेव्हा अठरा एकोणीस वर्षांचा होतो. घरी मी व माझा मोठा भाऊ. हा टारझन. याला त्यांनी कापले. गोळा खाल्ला. अयूबखान आणि कंपनी गांवी गेले होते. त्यामुळे आजूबाजूची लहानमोठी बच्चे कंपनी आमच्याच घरी असे.

आणि तासाभराने ढग आले. व पाचसाडेपाचला खरोखर पाऊस आला. तरी मी आढेवेढे घेऊन टाळतच होतो. मग काय? छोट्यांच्या जोडीला मोठे आले. मग करावी लागली. नाहीतर मार खावा लागला असता. छोटेमोठे किमान पंधरा जण असावेत. टारझनचा काही उपयोग नाही . कांदे, पीठ सगळे संपेपर्यंत माझी पाककला दोन एक तास चालू होती. फारशी चांगली झाली नसावीत. मला मदत म्हणून एका मुलीने पटापटा कांदे कापून दिले. घरून भरपूर चटणी - नारळ कैरीची - करून आणण्याचे पुण्यकृत्य केले. (वक्रदृष्टीने पाहू नका. माझापेक्षा आठदहा दहा वर्षाने मोठी व तिचे नुकतेच लग्न ठरले होते) पण फारच धमाल आली.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

वरदा's picture

30 Mar 2008 - 6:23 pm | वरदा

त्यामुळे मग आम्हाला वेगळ्या चवीचे आईस्क्रिम खावयास मिळाले. :)

काही हरकत नाही चिली आईस्क्रीम असतं की......
बाबांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.बिच्चारे बाबा!

असाच एकदा माझ्याही बाबांनी भात केला....मला खूप जोरात म्हणाले तू असा भात खाल्ला नसशील आणि त्या भातात सगळी पेज तशिच होती...म्हटलं हो खरच नाही खाल्ला आणि खाऊ पण नाही शकत तांदूळ आणि पाणी.....

मी अमेरीकेत आल्यावर मला कणीक कुठली आणायची ते माहीत नव्हतं...पहीले तर ती भिजत नव्हती आणि भिजल्यावर पोळ्या केल्या तर पापड तोही चिवट...

वरदा's picture

31 Mar 2008 - 12:40 am | वरदा

हो, ती भजीवाली वेगळी आणि अनुष्का वेगळी! :)


मग अनुष्का भजी तळायला कधी येणार?:)))))) ह घ्या नक्की..

प्राजु's picture

31 Mar 2008 - 8:58 am | प्राजु

अनुभव.. म्हणजे माझ्या बाबांच्या माझ्यावरच्या प्रेमाची हद्द आहे..
आई तेव्हा शिक्षिका होती आणि शाळेची सहल घेऊन कुठेतरी गेली होती. आमच्या कामवाल्या मावशिंनी पोळ्या केल्या आणि बाकीची कामे करून त्या घरी गेल्या. त्या रात्री बाबांना थोडं बरं नव्हतं. मी म्हणाले "आमटि भात खाल का?" मला बाबा म्हणाले "येईल का तुला करायला? " मी अगदी तोर्‍यात "हो" म्हणाले. भात कुकरला केला. आणि आमटिसाठी मस्त तेल तापवून फोडणी केली, त्यात कांदा चिरून घातला, पाणी घातलं, मीठ- तिखट आणि गूळ घातला. उकळी आल्यावर मस्त आमटी तयार झाली. जरा दिसायला वेग्ळी दिसत होती... जरा पातळ झाली असावी असा विचार करून, मी ताटात भात वाढला आणि वाटित आमटी वाढून बाबांन बोलावलं जेवायला. बाबांनी आमटी भातावर ओतून घेतली...मी त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत होते. आधी कौतुक, मग काहीतरी गोधळल्यासारखे आणि मग मिश्किल भाव.. असे बदलल्त जाणारे भाव पाहून मी विचारलं... "बाबा, छान नाही का झाली आमटी?" बाबा म्हणाले, " छान झालिये.. फक्त तू या आमटीत तूरीची डाळंच घालायला विसरली आहेस.." :((((
मला माहितिही नव्हतं तेव्हा की आमटीत डाळसुद्धा घालतात्...पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल...
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर

'आमटीत डाळसुद्धा घालतात्'

आयला! ख्रर्रच कीऽऽऽऽ

शेवटी मुलीसाठी बाबा हे बाबाच असतात!

चतुरंग

मनापासुन's picture

31 Mar 2008 - 11:41 am | मनापासुन

पण बाबांनी ते मसालेदार पाणी आमृतासारखं लागत असल्याप्रमाणे भातासोबत खाल्ल...

प्राजु तुला असे बाबा मिळाले ...भाग्यवान आहेस.हे भाग्य सर्वांच्या नशिबात नसते.
हॅट्स ऑफ टू युवर बाबा..ग्रेट

प्राजु's picture

31 Mar 2008 - 6:36 pm | प्राजु

शेवटी मुलीसाठी बाबा हे बाबाच असतात!

हे मात्र अगदी खरं...

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Mar 2008 - 9:35 pm | llपुण्याचे पेशवेll

मी २२ ऑक्टोबरला न्यू यॉर्क मधे आलो.. आणि अगदी २३ ऑक्टोबरची ही गोष्ट..

सकाळी ५चालाच जाग आली.(जेटलॅग वगैरे जे काय म्हणतात त्यामुळे)..
म्हटले उठलोच आहे तर चहा करावा(तशी चहाची चाहत आम्हाला फार. आणि एक मित्र त्या घरात आधीपासून रहात असल्यामुळे सगळे जिन्नस घरात होतेच.)
मस्त पैकी पाणी उकळत ठेवले. मस्त ५ चमचे साखर घातली.(कालचा तो गोल डबा निळ्या रंगाचा ज्यातून माझ्या मित्राने साखर म्हणून पिठीसाखर काढून दिली होती. 'इकडे साखर अशीच असते असे म्हटला होता.')चहा पावडर घालून, चहा थोडा उकळवून गॅस बंद केला. आणि चहा थोडा मुरवत ठेवला. दूध वेगळ्या पातेल्यात उकळवले. मस्त मुरलेला चहा गाळला आणि त्यात दूध घातले. स्वैपाघरातली खडखड ऐकून माझा मित्र जागा झाला. त्याला म्हटले "बघ मी चहा केला आहे.". तो अगदी कौतुकाने म्हटला "हो का! मला पण दे. बघू तरी पुण्याचे अमृततुल्य कसे लागते आहे." मी माझ्या कपातला अर्धा चहा त्याच्यासाठीच्या कपात घातला. आणि म्हटले "पी, आणि सांग कसा आहे ते."
त्याने मस्तपैकी फुर्रर्रर्र आवाज करून पहीला घोट घेतला. माझी नजर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघण्यासाठी त्याच्या चेहर्‍यावर खिळली होती. एकदम त्याचा चेहरा पहील्या घोटासरशी कसनूसा झाला आणि तो म्हणाला "धन्या, भा* त्या निळ्या गोल डब्यात मीठ असते आणि लाल गोल डब्यात साखर."
आता बघण्यासारखा चेहरा माझा झाला होता. कारण मी अद्याप त्या चहाची चव पाहीलीच नव्हती. :)
न जाणे बिचार्‍याला कसे वाटले असेल ५ चमचे मीठ घातलेला चहा पिऊन.........

पुण्याचे पेशवे

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 11:37 pm | प्रभाकर पेठकर

साखर जरी असती तरी पिवविला नसता चहा. एका कपाला ५ चमचे साखर?

स्वाती राजेश's picture

1 Apr 2008 - 12:03 am | स्वाती राजेश

कारण चहा कोण बनवत होते?
पुणेरी पेशवे

स्वाती राजेश's picture

1 Apr 2008 - 12:06 am | स्वाती राजेश

पुण्याचे पेशवे
ह्.घ्या.

चतुरंग's picture

31 Mar 2008 - 10:12 pm | चतुरंग

२००१ ला एका मित्राकडे कॅलिफोर्नियाला गेलो होतो.
त्याचे लग्न झालेले नसल्यामुळे बल्लवाचार्यांची जबाबदारी आम्हा दोघांवरच आली. (नाही तर कसे - कांदे चिरुन दे, बटाट्यांची साले सोल, मिरच्या चिरुन दे असले निरुपद्रवी मदतीचे प्रकार करुन सटकता येते; आणि शिवाय 'केली बरं का मदत' असा भाव पण खाता येतो;०)) तर तसा योग नव्हता.
भात-आमटी-भाजी इथपर्यंत सगळं ठीक होतं पण एकदम आमच्या डोक्यात काय किडा आला तर स्वीट डिश हवीच! आता हुडकून कोणती डिश हुडकावी ह्याला काही सुमार? महाशय म्हणाले 'उकडीचे मोदक' करुयात! मी म्हणालो " अरे बाबा, बायका स्वयंपाकात पी.एच्.डी. ला जो पदार्थ करतात तो आपण बिगरीत असताना घेणे म्हणजे जरा लईच होतंय!"
पण नाहीच, खाज कशाला म्हणायची मग!
परातीत पिठी घेतली, पाण्याला थोडे आधण आणून ओतले पाणी त्यात! झाला, इथेच पहिला लोच्या झाला! ('पाण्याला आधण आणून त्यात थोडे लोणी घालून विरघळवावे मग त्यात थोडी थोडी पिठी घालून ढवळावे असे की गाठी होऊ नयेत - इति सौ.सिंधूताई साठे! हा पाकग्रंथ हाताशी नसल्यामुळे आमची वाट लागली).
मग काय सांगावे? त्याचा चिकट गोळा होऊ लागला, मग कधी हाताला तेल लाव, कधी गोळ्याला तेल लाव, कधी वरुन थोडी पिठी भुरभुरवून बघ असले नामी प्रकार सुरु झाले, शेवटी शेवटी तर इतके फ्रस्ट्रेशन आले की हेअर ड्रायर लावून गोळा सुकवून बघितला! अशा 'हातघाईच्या' पाऊणतासाच्या लढाईनंतर एक छानसा लद्द्या तयार झाला!;)
एकीकडे सारण ठेवले होते ते मात्र बरे झाले (कारण बहुदा त्यात आम्हाला फारसे काड्या करण्यासारखे काही नव्हते हे असेल!).
शेवटी भुकेने ह्यावर मात केली! छोटे छोटे गोळे करुन त्यात सारण भरुन तसेच उकडून काढले आणि साजूक तूप वरुन माखून खाल्ले. तसे बरे लागले (न लागून सांगताय कोणाला?!).
संपूर्ण जेवण होईपर्यंत एकमेकाकडे बघत फक्त हसत होतो. बोलणे शक्य नव्हते कारण 'मोदक' तोंडात गेला की खळीने चिकटवल्यासारखे तोंड बंद होऊन जाई ते मोदक संपल्यावरच उघडे!!
हा अनुभव आमच्या सौं. ना सांगितल्यावर मग काय, आजतागायत मोदक म्हणले की आमची मनमुराद चेष्टा होते!

चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 11:57 pm | प्रभाकर पेठकर

पुस्तक पाहून पाककृती करण्यातही विनोद घडू शकतात.

एकद नवरा बायकोत भांडण होते. बायको माहेरी निघून जाते. नवराही जिद्दीस पेटतो. मला स्वयपाक येत नाही म्हणून तोरा मिरवते काय? दाखवतोच करून एखादा झकास पदार्थ. त्यात काय कठीण आहे.
महाशय पाककृतीचे पुस्तक काढतात. काय करावे, काय करावे विचार करताना एक पाककृती समोर येते 'केक'.
तो ठरवतो, बस्स केकच करायचा आणि नमुना सासरी पाठवून द्यायचा, बायको साठी.
साथीला ४ मित्रांना बोलावतो. 'या आज केक खाऊ.'
पुस्तकात दोघांसाठी प्रमाण दिलेले असते. इथे माणसे होतात ६. तो सर्व पदार्थांना ३ ने गुणून सामग्री जमवतो, स्टेप बाय् स्टेप सर्व व्यवस्थित करून केके ओव्हन मध्ये ठेवतो.
दोन तासांनी ओव्हन उघडतो तर आत मध्ये काळा धूर भरलेला असतो. घाईघाईने केक बाहेर काढतो तर पूर्णपणे जळून को़ळसा झालेला असतो.

कारण.....

पाककृतीच्या शेवटी दिलेले असते 'आता हे मिश्रण ओव्हन मध्ये ४० मिनिटे भाजा.'

चतुरंग's picture

1 Apr 2008 - 12:01 am | चतुरंग

हा अनुभव बाकी झकास!

(अवांतर - इथे नवरा बायको म्हणजे श्री व सौ. पेठकर असे तर वाचायचे नाही ये ना?;))ह.घ्या.

चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2008 - 12:40 am | प्रभाकर पेठकर

(अवांतर - इथे नवरा बायको म्हणजे श्री व सौ. पेठकर असे तर वाचायचे नाही ये ना?;)

तसे कोणी वाचले/समजले तरी माझी काही हरकत नाही. पण सुदैवाने इतका वाईट प्रसंग माझ्यावर कधी गुदरलेला नाही. (हे सहज कळावे.)

माफी असावी. उगीच लिहिले असे झाले..

चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2008 - 10:16 am | प्रभाकर पेठकर

छे..छे..! अजिबात राग नाही. दुसर्‍या कोणाच्या प्रतिक्रियेवर मीही अशीच प्रतिक्रिया दिली असती. त्यात राग कशाबद्दल? तुमची प्रतिक्रिया निखळ विनोदी आहे. मला आवडली.