सुनिता देशपांडे ह्यांचं “आहे मनोहर तरी” हे पुस्तक फार पूर्वी म्हणजे अगदी शाळकरी वयात वाचलं होतं. त्यावेळी त्यांचा खूप राग आला होता…की आपल्या पु.ल.देशपांडेंबद्दल असं कसं काय लिहिलं त्यांनी. म्हणजे तसं काही वाईट लिहिलं नव्हतं पण ….तरीसुद्धा आतून कुठे तरी वाईट वाटलं होतं. आता लग्न होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर…. नवरा-बायकोचं खरं नातं कळल्यानंतर…. थोडी परिपक्व झालीये असं वाटल्यानंतर….. अगदी ठरवून पुन्हा एकदा वाचलं हे पुस्तक आणि अगदी मनापासून भिडलं मनाला.
आपण कधी कधी फक्त एकाच बाजूने विचार करतो आणि तोच बरोबर आहे असं गृहीतही धरतो. पण जेव्हा दुसरी बाजू आपल्याला कळते तेव्हा मात्र ओशाळल्यासारखं होतं. अगदी तस्संच झालं. सुनिताताईंचा मोठेपणा कळायला वयाची चाळीशी उलटायला लागली.
नुकतंच निधन झालं सुनिताताईंचं. त्यामुळे त्यांच्याबद्दल कितीतरी न माहित असलेली माहिती कळली…..आणि तेव्हाच पुन्हा हाती आलेलं हे पुस्तक….!! स्वत:चीच लाज वाटली ! इतके दिवस उगाचंच आपण त्यांचं मोठेपण समजून न घेता त्यांच्याबद्दल वेगळं मत करुन घेतलं. पुस्तक पुन्हा वाचताना त्यांच्याबद्दलचा आदर वाढत गेला.
अतिशय प्रांजळ लिखाण…!! अगदी सहजपणे केलेली मोठमोठी कामं… स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणाची आवड, व्यवहारी आणि काटेकोरपणा….हाती घेतलेल्या कुठल्याही कामात झोकून देण्याचा स्वभाव…..आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पु.लं बद्दलचं विलक्षण प्रेम आणि आदर….सगळं सगळं……कुठलाही आविर्भाव न आणता उतरलेलंय.
स्वत:चा गाढवपणा कबूल करावा म्हणतात. इतक्या मोठ्या व्यक्तिवर उगाचंच राग धरला ह्याचं फार वाईट वाटतंय. खरं म्हणजे माझ्यासारख्याने त्यांच्यावर राग धरणं किंवा न धरणं ह्यानं काहीच फरक पडत नाही. पण अगदी मनापासून स्वत:ची चूक मान्य करावीशी वाटतेय इतकंच. आता पु.लं. सोबतच सुनिताताईंची पण मी मोठी फॅन झालेय एव्हढं मात्र खरं.
प्रतिक्रिया
29 Nov 2009 - 11:04 am | मदनबाण
अतिशय प्रामाणिकपणे केलेले प्रकटन आवडले... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
29 Nov 2009 - 11:11 am | बिपिन कार्यकर्ते
प्रांजळपणा आवडला. त्या निमित्ताने सुनिताबाईंची याद परत ताजी झाली. बाईंना विसरणे कठीण. मोजकंच लिहून आणि लोकांच्या समोर जवळजवळ अज्जिबातच न येता एवढं स्थान निर्माण करणं हे खरोखर ताकदीच्या प्रतिभावंतालाच जमावे.
जयुताई, बर्याच लेखकांचा / पुस्तकांचा आवडीपासून नावडीपर्यंतचा (आणि उलटा प्रवासही) कधी कधी स्वतःलाच स्तिमित करून जातो. 'हे कसे आवडले होते / नव्हते तेव्हा?' ... या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आणि तशी गरजही नाही. कधी कधी आयुष्य पुढे जाताना मागे अनुभव ठेवून जातं त्याचे हे फलित असावे.
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2009 - 1:07 pm | हेरंब
अहो, तुमच्यासारखे आमच्या सगळ्यांचेच होते, पण इतक्या प्रांजळपणे कोणी कबुल करत नाही. असे पूर्वग्रह माझेही अनेकदा झाले होते. कालांतराने(म्हणजेच अक्कल आल्यावर) ते किती चुकीचे होते हे कळले.
प्रत्येक प्रश्नाला दुसरी बाजुही असते हे कळायला बरीच वर्षे जातात!
29 Nov 2009 - 2:11 pm | ज्ञानेश...
त्या पुस्तकाबद्दल अनेकांचे असेच होते.
आपला प्रांजळपणा आवडला.
29 Nov 2009 - 4:45 pm | स्वाती२
प्रांजळ प्रकटन आवडलं.
29 Nov 2009 - 4:51 pm | ऋषिकेश
मनापासूनचे प्रकटन आवडले.
केवळ साहित्यिक व्यक्तीच नव्हेत तर माझी अनेक सामाजिक, राजकीय वगैरे सार्वजनिक व्यक्तीमत्त्वांबद्दलची मते आमुलाग्र बदलली आहेत. ती आता जाणवतात आणि वर बिकादा म्हणतो त्याप्रमाणे आपले त्यावेळी असे मत का होते / नव्हते ह्याचे आश्चर्य वाटते पण त्या प्रश्नांत अडकण्यात काहिच हशील नसते.
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
29 Nov 2009 - 8:07 pm | प्राजु
खरंय! कधी कधी नाण्याची दुसरी बाजू विचारात न घेताच आपण एखाद्याबद्दल मन कलुषित करून घेतो.
प्रांजळपणा आवडला.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
29 Nov 2009 - 11:48 pm | धनंजय
सुदैवाने हे पुस्तक कॉलेजमध्ये असताना वाचले. पुलंबद्दल आदर कमी झाला नाही, पण सुनिताबाईंबद्दल आदर खूप वाटू लागला.
तुमचेही प्रकटन खूप प्रामाणिक आहे. सलाम.
30 Nov 2009 - 9:17 am | भानस
दोन तीन वेळा सलग हे पुस्तक वाचून काढले होते. प्रथम रागच आला होता. मी पुलंची एकदम वेडी चाहती वगैरेत मोडत नाही परंतु त्यांच्याबद्दल इतके परखडपणे-जरा जास्तच कडक लिखाण वाचून खरेच अजिबात आवडले नव्हते. पण पुन्हा पुन्हा वाचल्यावर इतक्या मोठ्या व्यक्तींमध्येही अशा गोष्टी असतील ज्या सहजी नजरेस पडणार नाहीत व पडल्या तरी त्यांच्या वलयात त्या विरून जातील.शेवटी माणूसच ना.... मात्र या इतक्या मोठ्या लोकांसाठी कोणीतरी स्वतःचे आस्तित्व विसरून खपत असते तेव्हां कुठे...... जयश्री प्रकटन मनापासून लिहीलेस गं...आवडले. सगळेच एका बोटीत आहोत.
30 Nov 2009 - 10:31 am | मुक्तसुनीत
कैफियतवजा लिखाण आवडले. असे लिहिताना धैर्य लागते. ते दाखवल्याबद्दल अभिनंदन.
थोडेसे क्लिशे वापरून बोलायचे तर "आहे मनोहर तरी" हे पुस्तक दीपस्तंभासारखे वाटत आले आहे. १९९० साली ते पहिल्यांदा वाचले आणि त्याचा संस्कार सदैव टिकला आहे.
२००० च्या सुमारास "आहे मनोहर तरी : वाचन आणि विवेचन " प्रसिद्ध झाले. आणि या पुस्तकावर आपण काय चिल्लर प्रेम केले आहे हे जाणवले. त्यात वाचकांची पत्रे आहेतच ; शिवाय उत्कृष्ट असे समीक्षापर लेख आहेत. ज्यांना ज्यांना "आहे मनोहर तरी" आवडले आहे त्यांनी त्यांनी वरचे पुस्तकही जरूर वाचावे असे मी सुचवेन. (प्रकाशनाचे संदर्भ मी विसरलो आहे. शीर्षक मात्र अगदी तंतोतंत असेच आहे. )
सुनीताबाईनी सहजीवनावर , निसर्गावर, कवितांवर, मूल्यांवर फार सुरेख लिहिले आहे. मात्र , "सोयरे सकळ" या पुस्तकामधे संग्रहित झालेली व्यक्तिचित्रे अजरामर आहेत. ("सोयरे सकळ" या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दलही कधीतरी लिहायचे होते. रंगलेपनाचे एक उत्कृष्ट उदाहरण. मुखपृष्ठावरून हात फिरवतानाही त्या लेपनाचा पोत जाणवतो.)
मराठी साहित्यामधे पत्रांची परंपरा जुनी आहे. (पहा : हरिभाऊ मोट्यानी संग्राहित केलेली पत्रे.) जीए कुलकर्णी आणि सुनीताबाई यांच्या पत्रांमधून उलगडलेला भावबंध अत्यंत वाचनीय आहे. एकमेकांबद्दल अतीव आदर असणारे मध्यमवयीन स्त्रीपुरुष यांचा पत्रव्यवहार. त्यातले एक अक्षरही हिणकस नाही आणि प्रत्येक पत्रामधे माणसाच्या नातेसंबंधांपासून ते मूल्यचिकित्सेपर्यंत जी चर्चा आहे त्याला अंगण मिळाले आहे दोन अशा कविमनाच्या व्यक्तींचे. सुनीताबाईंनी वसंतराव देशपांड्यांपासून ते माधव आचवलांपर्यंतच्या जीवाच्या जिवलगांबद्दल लिहिले आहे; मात्र "सप्रेम नमस्कार" या शीर्षकाचा जो मृत्युलेख त्यांनी जीएंवर लिहिलेला आहे तो मला फार सुंदर वाटतो.
असो. सुनीताबाईंबद्दल काही बोलायचे झाले तर बांध फुटल्यासारखेच होते. आंतरजालीय लिखाणामधे याची बर्यापैकी चेष्टा होते. त्याची पर्वा न करायला आम्ही थोडेच "जयवी" आहोत ? :-)
अवांतर :
आहे मनोहर तरी प्रसिद्ध झाले ९० मधे. तर मग "चाळीशी उलटलेली" व्यक्ती ते वाचताना "शाळकरी" वयाची कशी असेल असा एक प्रश्न पडला. :-) ( हलकेच घ्या !)