अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या?
हा PDF format मिपाचे एक सभासद श्री. अक्षय पुर्णपात्रे यांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने आपल्या व्यवसायातून वेळात वेळ काढून पुनर्टंकित केला याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार. हा लेख मी सहा महिन्यापूर्वी लिहिला होता उत्तम कथा या मासिकाच्या निबंधस्पर्धेसाठी. पण मला १००० शब्दांच्या शब्दसंख्येबद्दलची मर्यादा सांगायला तिथले कर्मचसरी विसरले. माझा लेख ३००० शब्दांचा झाला पण संपादिकाबाईंना तो आवडला व तो त्यांनी थोडासा संक्षिप्त करून प्रसिद्धही केला. तोमी इथे मी आज पोस्ट करत आहे.
लेख मोठा आहे, कदाचित एका बैठकीत वाचता येणार नाहीं, पण वाचनीय आहे असे मला वाटते. पहा आवडतो कां!
अपत्यसंगोपन - म्हणजे मुलांचं बाळपणापासून ते स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत संगोपन - ही एक अतिशय समाधानाची व अभिमानाची बाब आहे. पण हे संगोपन जर योग्य झालं नाही तर त्याचं स्वरूप मात्र क्षणात पालटतं व हा-हा म्हणता ती एक गंभीर समस्या बनते. पण म्हणून अपत्यसंगोपनाला समस्या म्हणणे साफ चुकीचे आहे. आपण अंगिकारलेलं मुलांचं संगोपन यशस्वी होईल व त्यात आपल्या हाताला अपयश येणार नाही याकडे लक्ष देणे ही अपत्यसंगोपनातली अतिशय महत्त्वाची बाब ठरणार आहे व तिच्याकडे प्रत्येक घरात त्या-त्या घरातल्या परिस्थितीस (ground reality) अनुरूप असे समीकरण वापरावे लागेल.
माझ्या लहानपणी संगोपनाबद्दल "पंचवर्षांणि लालयेत् दशवर्षाणि ताडयेत्, प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रे मित्रेवदाचरेत्" हा (आजच्या भाषेत सांगायचे तर) "फंडा" होता. आजच्यासारखं बालमानसशास्त्र कुणाला फारसं माहीत नव्हतं. मला जरी वडिलांकडून कधी मार मिळाला नसला तरी माझ्या शेजारी-पाजारी असलेले रागीट वडील मी पाहीले आहेत. बहुतांशी हा रागीटपणा गरिबीमुळे असायचा. खेळतांना जखम झाल्यास जखमेच्या वेदनांपेक्षा वडिलांकडून पडणार्या माराची भीती माझ्या मित्रांना जास्त असायची आणि मार पडायचा कारण डॉक्टरचं बिल भरणं बर्याचदा परवडायचं नाही. पण असे असले तरी आई-वडिलांनी केलेला त्याग व स्वत:च्या गरजांकडे दुर्लक्ष करून आमच्या गरजांकडे लक्ष देऊन आमचे पालनपोषण केल्याची जाणीव त्या मित्रांना (आम्हा सर्वांनाच) पुरेपूर असायची.
एरवी पैसे खर्च करायला मागे-पुढे पहाणारे माझे वडील आम्हा तीन्ही मुलांच्या शिक्षणाबाबत अतिशय जागरूक व उदार असायचे. कुठकेही पुस्तक, शिकवणी वगैरेसारख्या मागण्या क्षणात पुरविल्या जायच्या! पण नवे कपडे, नवी पादत्राणे वगैरे मात्र सहजासहजी मिळायची नाहीत. खर्च करायच्या क्षमतेला मर्यादा असल्याने हा नीर-क्षीर न्याय योग्यच होता! लहान मुलांचा शारिरिक, बौद्धिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे, एक तर्हेची महत्त्वाकांक्षा व विजिगीषु वृत्ती त्यांच्यात निर्माण करणे आणि त्यांना एक जबाबदार नागरिक बनविणे म्हणजेच यशस्वी अपत्यसंगोपन. आपल्या लहान व पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असणार्या मुलांना मोठं व कर्तृत्त्ववान करण्याइतकं सुख आणि समाधान आणखी कशातही नसतं. अगदी वापरून वापरून झिजलेल्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याची एक सुरेख मूर्ती बनवण्यासारखंच आहे ते. पदोपदी या बाळांची होणारी प्रगती किती सुखद असते ते त्यांना वाढविणार्या आई-वडिलांनाच माहीत. आपल्या मदतीने या तान्ह्या मुलां-मुलींत तर्हेतर्हेच्या मानसिक व शारिरिक सुधारणा पाहतांना निसर्गाच्या या जादूकडे आपण थक्क होऊन पहातच रहातो. तान्ह्या मुलांच्या शाळेत जाईपर्यंतच्या संगोपनाचा कालावधी एक प्रकारचा आहे. या वयात दात येण्यापासून, सर्दी-खोकला, उलट्या, जुलाब, फ्लू, मलेरिया तर कधी-कधी विषमज्वरासारखे आजार व खेळतांना पडून झालेल्या जखमा, यासाठी डोक्टरांकडच्या रात्री-अपरात्री घातलेल्या खेपा, रात्री-अपरात्रीची जागरणे, काळज्या वगैरे सगळे आले. त्यानंतरच्या काळात थोड्या वेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. आपल्या मुला-मुलींच्या शारिरिक व शैक्षणिक प्रगतीला आपल्या जबाबदार्यांत अग्रक्रम मिळतो. त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे, त्यांना येणार्या अडचणी सोडवणे, त्यांना मार्गदर्शन करणे जरुरीप्रमाणे खासगी शिकवण्या लावणे तसेच त्यांच्यात खेळाची उपजत आवड असेल तर तिच्याकडे लक्ष पुरविणे, संगीत, चित्रकला, वाचन, लेखन वगैरेसारख्या ललितकलांमध्ये त्यांना गति असल्यास तिथेही त्यांना प्रोत्साहन देणे अशी अनेक आव्हाने आई-वडिलांच्या समोर उभी असतात!
आजकाल इंजिनियरिंग किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं म्हटलं तर सोपं झालंय आणि म्हटलं तर अवघड! आमच्या वेळी (५० वर्षांपूर्वी) फार छान परिस्थिती होती. एक तर प्रवेश मिळायचा तरी आणि नाही मिळाला तर तो विषय तेथेच संपायचा. कारण "पेमेंट सीट्स" हा प्रकारच नव्हता. (फक्त मंगळूरच्या कॉलेजात असा प्रवेश मिळायचा.) त्यामुळे एखाद्याला प्रवेश मिळणे-न मिळणे फक्त विद्यार्थ्याच्याच हातात असायचे. मार्क्स कमी पडले तर "तुझे नशीव तुझ्यापाशी" अशी परिस्थिती असायची. पण आता "पेमेंट सीट्स" ही एक नवीन संस्था उदयास आल्यामुळे अगदी थोडक्यात प्रवेश हुकलेल्यांना खूप दिलासा मिळाला आहे, पण त्याचवेळी मात्या-पित्यांवरचा आर्थिक बोजा वाढला आहे. केवळ चांगल्या गुणांवरून या दोन अभ्यासक्रमांत प्रवेश मिळणं आता फारच कठीण झालं आहे. मात्या-पित्यांची एक अपेक्षा असते की आपल्या मुलाने किंवा मुलीने केवळ गुणवत्तेवर अशा महाविद्यालयांत प्रवेश मिळवावा. या अपेक्षेत पैशापेक्षा अभिमानाचाच भाग अधिक असतो. पण शेवटी जागा कमी व विद्यार्थी जास्त, त्यात अर्ध्याहून जास्त जागा "राखीव", अशी परिस्थिती असल्यामुळे सर्वांना केवळ गुणसंख्येवरच प्रवेश मिळणे अशक्यच. त्यामुळे विद्यार्थ्यांची व त्यांच्याबरोबर माता-पित्यांची जी शारिरिक व मानसिक कुतरओढ होते ती मात्र "जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे"!
एक गोष्ट आई-वडिलांनीही लक्षात ठेवावी. आपल्या अपत्याच्या बौद्धिक क्षमतेच्या मर्यादा व त्याची उपजत आवड-नावड याकडे लक्ष न देता त्यांच्यावर आपल्या अवाच्या-सवा अपेक्षा माता-पित्यांनी लादू नयेत. एक तर प्रत्येक मूल इंजिनियर-डॉक्टर होणे शक्य नाही व दुसरं म्हणजे या दोन शाखांव्यतितिक्त जगात इतरही खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेऊन नको त्या अपेक्षा आपल्या अपत्यावर लादून माता-पित्यांनी आपल्या अपत्याच्या आयुष्याचं वाळवंटही करू नये. गायन, नृत्यासारख्या ललितकला, अकाउंटिंग, खेळ-जगत असे कितीतरी इतर विकल्प आज आपल्या अपत्यांना उपलब्ध आहेत. आणि इंजिनियरिंग-मेडिकल असो किंवा इतर विकल्प असोत, या सर्वांतून तावून-सुलाखून जेव्हा आपलं अपत्य यशस्वी होऊन बाहेर पडतं तेव्हा तो आनंद गगनातही मावणार नाही असा असतो.
एका नव्या आणि जीवघेण्या प्रश्नाने आता माता-पित्यांच्या हृदयात धडकी भरली आहे. २५-३० वर्षांपुर्वी या प्रश्नाने आजच्यासारखे अतिगंभीर स्वरूप धारण केलेले नव्हते, पण आता मात्र तरुण मुलांचे अमली पदार्थांचे सेवन ही एक नवी डोकेदुखी आजच्या मात्या-पित्यांना भेडसावू लागली आहे. अगदी अलिकडे - चारेक वर्षांपुर्वी - ३१ डिसेंबरच्या रात्री सिंहगडाच्या पायथ्याशी तरुण-तरुणींनी असे अंमली पदार्थाचे सेवन करून नववर्षाचे स्वागत करण्याचा घातलेला घाट पोलिसांनी उधळून लावला त्यावेळी झालेल्या विद्यार्थ्यांच्या धरपकडीत अनेक शिकल्या-सवरलेल्या, सुशिक्षित व प्रतिष्ठित घरातली मुलेही पोलिसांच्या हाती लागली होती व त्यांना स्वगृही परतण्याआधी काही दिवस बिनखर्ची सरकारी पाहुणचारही घ्यावा लागला होता. पुणे शहर तरी अजुनही बरे आहे, पण मुंबईत सर्रास पानवाल्यांकडेही असले अमली पदार्थ सरसकट मिळू लागले आहेत असे मी वाचले-ऐकले आहे. ते पाहता तारुण्यात पदार्पण करणार्या अपत्यांच्या माता-पित्यांसाठी हे एक नवे व अपरिचित आव्हानच बनले आहे.
याबरोबरच टेलिव्हिजन व इंटरनेटद्वारा मिळणारे "नको ते" शिक्षण आपल्या मुलांपासून दूर ठेवणे हीही एक मोठी समस्या बनू लागली आहे. टेलिव्हिजन व इंटरनेट या माध्यमातून आपली मुले अमेरिकन खाणे (मॅक्डोनाल्ड, केएफसी, पिझ्झा हट इ.), पाश्चात्य कपडे व पाश्चात्य रहाणीची नक्कल करू लागली आहेत. गोर्या लोकांसारखं उसनवारी करून ऐटीत राहणं व कपड्या-लत्त्यांच्या व खाण्या-पिण्याच्या बाबतीत त्यांच्या संस्कृतीचं अंधानुकरण यातली चूक मुलांना समजावून देणे फार कठीण झालं आहे. कारण मुलांना वाटतं की आई-बाबा पैसे वाचवायला बघताहेत. पण ज्यांची आपण नक्कल करत आहोत, तेच लोक आज पौर्वात्य चाली-रितींकडे डोळसपणे पाहत आहेत, शाकाहाराकडे, योगाभ्यासाकडे वळू लागले आहेत, मदिराप्राशन टाळू लागले आहेत व स्वत:च्याच "फास्ट-फूड"ला "जंक 'फूड" म्हणू लागले आहेत हे मुलांना अजून पटत नाहीय. ते त्यांनी आता आपण होऊनच समजून घेतले पाहीजे. अमेरिकेच्या बँकांची व तिथल्या सद्सद्विवेकबुद्धिशून्य अधाशीपणाची मूर्खासारखी नक्कल इतर राष्ट्रानी (युरोपीयनांनीसुद्धा) केल्यामुळे "घी देखा लेकिन बडगा नही देखा" या न्यायाने सगळ्या जगापुढेच एक अभूतपूर्व असे संकट उभे राहीले आहे हे माता-पित्यांनी समजून घेतले पाहीजे व नंतर ते तरुणांना नीट समजावून सांगितले पाहीजे.
भारताच्या आर्थिक नीतीत औद्योगिक उत्पादनावर अधिक भर असल्यामुळे व दरमहा किमान बचतीचं बाळकडू लहानपणापासूनच अंगी बाणलेलं असल्यामुळे भारतीयांचं बिर्हाड कधीच "उधारीच्या पाठी"वर असत नाही. त्यामुळे भारताची अमेरिकीइतकी "वाट" लागलेली नाही हेही तरुणांच्या मनात बिंबविले पाहीजे. "पाश्चात्य किंवा अमेरिकन तद्दन सगळ्या गोष्टी चांगल्या" हा गैरसमज डोक्यातून बाहेर काढून आपल्या मुलांना तर्कशास्त्राप्रमाणे (logically) विचार करायला व त्याप्रमाणे वागायला शिकविले पाहीजे. असे न केल्याचे गंभीर परिणाम आपण सगळे पहातो आहोतच!
आजच्या महागाईच्या जीवनात मुलांना सकस जेऊ-खाऊ घालणे, चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्या शाळांची फी भरणे, कपडे-लत्ते पुरविणे, आधी सायकली व कॉलेजमध्ये गेल्यावर स्कूटर-मोटरसायकली घेऊन देणे, कधी उघडपणे तर कधी गुपचुप दिला जाणारा हुंडा ... ... एक का दोन ? सर्व बाजूंनी माता-पित्यांच्या मर्यादीत मिळकतीवर हल्ले होत असतात. त्यात जवळ जवळ सर्वांनाच इंजिनियरिंग-मेडिकलसाठी लाखो रुपयाच्या देणग्या द्याव्या लागतात. म्हणजे मुलाना शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करेपर्यंत पालक मंडळी "हाडापर्यंत तासलेल्या" अवस्थेतच निवृत्तीला जाऊन पोचतात. आणि मग जर जीवनातले महत्त्वाचे फासे बरोबर पडले नाहीत तर "हेचि फल काय मम तपाला" या अवस्थेला ते येऊन पोचतात व मग गत जीवनाकडे वळून पाहिल्यावर असा विचार येतो की अपत्यसंगोपन ही समाधानाची बाब होती की ती एक समस्या बनली आहे?
परदेशी लोकांची पद्धत वेगळी असते. १६-१८व्या वर्षी त्यांची मुले घराबाहेर पडतात. आपल्या शिक्षणाची जबाबदारी ही मुले स्वत:च उचलतात. बारीक-सारीक नोकर्या करून, प्रसंगी एक-दोन वर्षे "ड्रॉप" घेऊनसुद्धा! त्यांची मुले अठरा वर्षाची झाली, सज्ञान झाली की सुटी होतात व स्वत:च्या पायावर उभी राहिलेली दिसतात. मुलांचे भलते लाड ते करत नाहीत, कदाचित ते त्यांना परवडतच नाहीत. मग मुलेही त्यांच्याशी तिर्हाइतासारखीच वागतात. लंडनमधील वास्तव्यात आमच्या भारतीय मित्राच्या घराशेजारी राहणारी (त्यावेळची) नव्वद वर्षीय जोन्सबाई मला आठवते. आम्ही ज्यांच्याकडे उतरलो होतो त्या बाई (त्या पेशाने नर्स आहेत) या आजीबाईंची जमेल तितकी सेवा करायच्या, पण या जोन्सबाईचा मुलगा व सून सठी-सहामासी एखादी चक्कर मारायचे, वाढदिवसाला ग्रीटींग कार्ड आणून द्यायचे, पण एरवी स्वतःच्या संसारात मग्न. त्या बाईची दयाच यायची आम्हाला.
समाधानाची गोष्ट अशी की अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी (सुदैवाने) स्वतःच्या मुलांच्या बाबतीत मात्र गोर्यांची नक्कल न करता बरीचशी भारतीय पद्धत चालू ठेवली आहे. अजूनही त्यांची मुले कमवायला लागेपर्यंत आई-वडिलांकडेच राहतात व आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबूनही असतात. माझ्या एकेकाळच्या गोर्या बॉसने स्वतःसाठी स्वतःच्या पैशाने गाडी घेतली पण त्याच्या मुलाला "तू तुझ्या पैशाने घे" असे सांगून त्याला गाडी घेऊन दिली नाही, पण माझ्या माहितीतल्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय माता-पित्यांनी मात्र त्यांच्या मुलाला (हव्या त्या मेकची) गाडी घेऊन दिली.
आमच्या जवळच्या नात्यातलं एक अगदी आगळं-वेगळं उदाहरण सांगतो. आमच्या नात्यातला हा तरुण अमेरिकेत स्थायिक झाला आहे, अमेरिकेचा नागरिक आहे, त्याचं लग्न झालं आहे व ४-५ वर्षे वयाची एक मुलगीही आहे (आता ती मोठी झाली आहे). त्याची दोन भावंडंही अमेरिकेतच आहेत. आई-वडील भारतात होते पण वयोपरत्वे त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यांची काळजी घेण्यासाठी हा तरुण आपली बसलेली घडी विस्कटून, चांगली नोकरी सोडून सहकुटुंब भारतात परत आला, आपल्या गावी गेला, आई-वडिलांची तब्येत सुधारेपर्यंत व त्यांच्यासाठी ग्रीन कार्डाची सोय होईपर्यंत तिथे २-३ वर्षे राहिला. स्वत:च्या छोट्या मुलीला त्याने तिथल्या स्थानिक शाळेतही दाखल केले. दुर्दैवाने सर्व गोष्टींची जमवा-जमव पूर्ण व्हायच्या आधीच त्याच्या आईला देवाज्ञा झाली, मग फक्त वडिलांना अमेरिकेला घेऊन तो अमेरिकेला परत गेला व आपली बिघडलेली घडी त्याने नव्याने बसविली. या सर्व प्रकारात करियरच्या दृष्टीने त्याची बरीच पीछेहाट झाली तीही त्याने हसतमुखाने स्वीकारली! आमच्याने वयाने लहान असलेला हा तरुण आम्हा सर्वांसाठी एक अनुकरणीय उदाहरणच (icon) बनला आहे. कुठे हे भारतीय आदर्श मुलाचे उदाहरण व कुठे ते लंडनवाल्या जोन्स बाईच्या मुलाचे उदाहरण?
आजमितीस भारतीय माता-पित्यांना असे मुलांना घराबाहेर काढायचे विचारही असह्य वाटतात. आपल्या अपत्यांना नोकर्या लागेपर्यंत, त्यांची लग्न होईपर्यंत, त्यांचे फ्लॅट्स होईपर्यंत, मुलींची पहिली बाळंतपणे होईपर्यंत, एक ना एक कारणांनी पालकमंडळी गुरफटतच राहतात, त्यांच्यावर खर्च करतच रहातात व शेवटी त्यांच्या स्वत:च्या कनवटीला काहीच उरत नाही. सगळं मुलांवरून उधळलं जातं. मग अशा वेळी म्हातारपणी आपल्या मुलांनी आपली काळजी घेतली पाहीजे ही अपेक्षा चूक कसं म्हणता येईल?
बालसंगोपन हे कितीही प्रेमापोटी केले जात असले तरी शेवटी त्यात व्यवहाराचा भाग डोकावतोच आणि जर आपल्या अपत्यांकडून या बाबतीत अपेक्षाभंग झाला तर हे चुकलेले संगोपन कुणालाही एक समस्याच वाटेल. मुलांची शिक्षणे झाल्यावर व ती आपल्या पायावर उभी राहिल्यावर आपल्या "फंडा"चे पैसे तरी आपल्याजवळ रहावेत अशा विचारांमुळे हल्ली शहरी सुशिक्षितांत "एक-अपत्य" पद्धती रूढ होऊ लागली आहे कारण "दो-या-तीन-बस्स" हे समीकरण आता आर्थिकदृष्ट्या कालबाह्य झालेले आहे.
१९८७-८८च्या सुमारास मी कामानिमित्त त्रिनिदादला गेलेलो असतांना माझी तिथल्या गोर्या लोकांबरोबर बरीच घसट झाली होती. एकदा मी एका जर्मन माणसबरोबर मोटारीतून प्रवास करत असतांना आमच्या बोलण्यात गोर्यांचा "आजच्यासाठी जगा, उद्या कुणी पाहीला आहे" किंवा "कशास उद्याची बात, बघ सरुन चालली रात" या विचारसरणीचा विषय निघाला. मी पाहिले आहे की गोरे लोक साधारणपणे खूप चैन करतात, दरवर्षी सुटी घेऊन कुठे पर्यटनाला जातात, तिथेही खूप खर्च करतात, स्वतःवरही खर्च करतात, बँकेत शिल्लक टाकण्यासाठी फारसं शिल्लकच नसतं. त्यावेळी मी त्या जर्मन माणसाला म्हणालो की आम्ही भारतीय मंडळी स्वतःसाठी जगत नाही तर पुढच्या पिढीसाठी जगतो. हे ऐकून तो जर्मन माणूस जरासा विचारात पडला कारण तो पूर्वी जेथे मोठ्या प्रमाणावर भारतीय होते अशा सौदी अरेबियातील पोलाद कारखान्याचा प्रमुख होता व या जर्मन माणसाचे भारतीयांबद्दल खूप चांगले मत होते. तो मला एकदम म्हणाला "मी सौदीला असतांना नेहमी पहायचो की भारतीय लोक शनिवारी-रविवारी कामाला सदैव तयार असत (ओव्हरटाइमसाठी), सुट्या कधी घेत नसत, अगदी गरजेइतकाच खर्च करीत. मला वाटायचं की हे असे कंजूषपणे का वागतात. तुझ्या या स्पष्टीकरणानंतर तुम्हा लोकांबद्दल माझ्या मनात असलेली अनेक कोडी आज सुटली व आदरही वाढला".
"पाळण्यापासून थडग्यापर्यंत" विम्याच्या रूपानं सरकारचं संपूर्ण पाठबळ असल्यामुळे गोर्यांची जीवनाकडे पाहण्याची वृत्ती थोडीशी बेफिकिरीचीच असते. (आता मात्र ही स्थिती पालटू लागली आहे.) याविरूद्ध भारतीय लोक! सुटीला इकडे-तिकडे न जाता जास्त करून आपल्या गांवी/घरी जातात, आई-वडिलांना भेटतात, परगावी गेले तर भाऊ-बहिण-काका-मामा-मावश्यांकडे राहतात वगैरे. थोडक्यात प्रवासखर्चाखेरीज इतर खर्च टाळण्याकडेच लक्ष. नातेवाइकांकडे रहातील, त्या नातेवाईकांना आपल्याकडेही आवर्जून व अगत्याने बोलावतील व त्यांची सरबराईही अगदी राजेशाही थाटात करतील. अशा तर्हेने ही पद्धत भारतीयांना परवडणारी व सोईची होती, पण कालपरत्वे ती पण पडद्याआड जाऊ लागली आहे.
भारतीय व गोर्या लोकांच्या विचारसरणीतला फरक आणखी एका प्रसंगी जाणवला तो एका चित्रपटामुळे. १९६७-६८ सालची गोष्ट आहे ही. त्या काळात मी 'गेस हू इज कमिंग टु डिनर' (Guess Who's Coming to Dinner) हा स्पेन्सर ट्रेसी आणि कॅथरिन हेपबर्न यांच्या हळूवार व भावनाप्रधान भूमिकांमुळे कायमचा लक्षात राहिलेला चित्रपट पाहिला होता. त्यात सिडनी प्वातिये (Poitier) हा एक कृष्णवर्णीय तरुण एका गोर्या मुलीच्या प्रेमात पडतो व ते दोघे विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतात जो दोन्ही बाजूच्या आई-वडिलांना पसंत नसतो. सिडनीचे वडील आपल्या मुलाला जरा भावनात्मक ब्लॅकमेल करायला जातात व म्हणतात की तुला मोठा करण्यासाठी आम्ही किती कष्ट उचलले व किती सुख-सोयींचा त्याग केला त्याची तुला कल्पना तरी आहे का? आणि त्या त्यागाचे पांग तू असे फेडतोयस? त्याला सिडनीने दिलेले उत्तर माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. तो म्हणतो की "बाबा, तुम्ही मला मोठं केलंत त्याचे पांग मी माझ्या मुलांना तसेच मोठे करून फेडेन. तुम्ही मला जन्म दिलात तो तुमच्या सुखासाठी, माझ्या नव्हे. त्यामुळे मी स्वतः तुमचे काही देणे लागत नाही." किती फरक आहे या दोन विचारसरणीत? (ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी अवश्य पहावा)
मी तिशीत असतांना जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत मिलवॉकीला १०आठवडे कामानिमित्त्य राहिलो तेव्हा स्थानिक एक-दोन मराठी तरुण जोडपी माझ्या ओळखीची झाली व माझी त्यांच्याबरोबर थोडी-फार ऊठ-बसही झाली. त्या काळात भारतीय विद्यार्थी अमेरिकेला जात पण परत येत व भारतातच नोकरी-व्यवसाय करीत. अमेरिकेत कायमचं राहण्याची प्रथा जरा नवीनच होती व सगळ्यांच्याच मनात खोल कुठेतरी "तुम्ही आता इथेच राहणार का परत भारतात जाणार" असा प्रश्न दडलेला असायचा व त्यावर चर्चाही व्हायची. एका जोडप्याने मला दिलेले उत्तर मला छान लक्षात राहिले आहे. ते दोघे मला म्हणाले होते की आमच्या आई-वडिलांना भारतात एकटं सोडून इथं रहातांना आपलं कुठेतरी चुकतंय ही टोचणी जी आमच्या मनात कायमची घर करून असते तसे आमच्या मुलांना होऊ नये म्हणून आम्ही आता कायमचेच अमेरिकेत रहायचे ठरवले आहे. थोडक्यात त्या जोडप्याने (व तशा अनेक लोकांनी) आपल्या स्वतःच्या आई-वडिलांची जबाबदारी सध्यापुरती तरी आपल्या भावंडांवर किंवा अशीच कुणावर तरी सोपविली होती.
कुठल्याही दोन पिढ्यातील काळ हा संक्रमणाचा असतो. पण सध्याचा काळ मला जरा जास्तच संक्रमणशील वाटतो. याला सबळ कारणेही आहेत. कर्ज काढून घर घेणे ही एक बाब सोडल्यास आमच्या पिढीतील "आधी शिल्लक टाका व मगच वस्तू विकत घ्या" या नीतीच्या जागी आता "आज भोगा व जन्मभर फेडा" ही नीती आली आहे. "EMI परवडतोय् ना? मग आजच विकत घ्या जे हवंय् ते" ही पाश्चात्य विचारसरणी रूढ होऊ लागली आहे. या "उधारी करून ऐटीत रहाण्याच्या" किंवा "उसनवारीने तूप आणून मिशीला लावण्याच्या" जीवन पद्धतीच्या अतिरेकाने झालेले परिणाम (कांहीं अंशाने कां होईना) सर्व जगावर सध्या ओढवलेल्या आजच्या वित्तीय संकटामागे आहेत. या अनर्थाचा उगम या प्रवृत्तीमध्येच आहे व आपण कळे-न-कळे त्यात ओढले जात आहोत. लैंगिक सुख तर हवे पण कौटुंबिक जबाबदारी येवढ्यात नको अशा संघर्षात लग्नाशिवाय एकत्र रहाण्याच्या पाश्चात्य जीवनपद्धतीचा शिरकाव हळू-हळू आपल्याकडेही होऊ लागला आहे.
थोडक्यात काय तर भविष्यकाळात लग्नंच नाहींत मग संततीही नाहीं मग संगोपन कुणाचं? आज फ्रान्ससारख्या राष्ट्राची लोकसंख्या घटत आहे, कांहीं अपत्यविरहित फ्रेंच जोडपी मला माहीत आहेत व "कशाला हवीत मुलं" असं मला विचारूनही झालंय्.
आणि या सगळ्या आपत्तींचं मूळ आहे प्रेम, कर्तव्य व व्यवहार यांमधील संघर्ष! काळाबरोबर हा संघर्ष जास्त-जास्त वाढत जाणार आहे काय व शेवटी कुटुंबव्यवस्थेचाच बळी त्यात पडणार आहे काय? जर मुलेंच नाहींत तर संगोपन कुठलं व संगोपनच नाहीं तर समाधान कसलं अन् समस्या तरी कसली? म्हणू नये पण शेवटी हा प्रकार म्हणजे अगदी "सुंठीवाचून गेलेल्या खोकल्या"सारखाच आहे.
अलीकडे एका मराठी वृत्तपत्रात "नववृद्ध" (नुकतेच सेवानिवृत्त) व "अतिवृद्ध" (नववृद्धांचे आईवडील) या दोन वृद्धगटांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा एक अतीशय सुरेख लेख माझ्या वाचनात आला. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक सुधारणांमुळे, नव्या औषधांमुळे व औषधोपचार घेणे परवडत असल्यामुळे सर्व माणसांचे आयुष्यमान वाढलंय्. त्यामुळे या नववृद्धांच्या जोडीला आता अतिवृद्धांचा एक नवा गट अस्तित्वात आला आहे जो पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हता. त्या लेखात लिहिले होते कीं आमच्यासारखी नववृद्ध मंडळी परंपरेनुसार अतिवृद्धांची सेवा करताहेत, पण त्यांना ते बर्याचदा झेपत नाहीं. नववृद्ध स्वत:च्या वृद्धापकाळामुळे अशक्त झालेले आहेत. त्यामुळे ते स्वत: अतिवृद्धांची सेवा करू शकत नाहींत व या अतिवृद्धांची जबाबदारी आपल्या मुलांवर टाकणेही त्यांना प्रशस्त वाटत नाहीं. मग करायचे काय? कोण या अतिवृद्धांची सेवा करणार? अशा अनेक नव्या प्रश्नांना उत्तरे सहजा-सहजी देता येत नाहींयेत. पुण्यातील एक बिल्डर श्री परांजपे यांनी सुरू केलेल्या "अथश्री" या उपक्रमाकडे त्या दृष्टीने पहायला हरकत नाहीं.
आजपर्यंत एक परंपरेनुसार माझ्या आई-वडिलांच्या काळात मुलांचे संगोपन हा देण्याचा व घेण्याचा दोन्ही दिशांना येणारा-जाणारा मर्ग होता तो आता एकतर्फी होऊ लागला आहे का? म्हणजे "गेस, हू इज कमिंग तू डिनर"मध्ये सिडनी म्हणाला तसे आपल्याकडेही होऊ लागले आहे का? प्रत्येक पिढीने त्यांच्या मुलांना वाढवायचे व या मुलांनी आपल्या आई-वडिलांकडे न पहाता फक्त त्यांच्या स्वत:च्या मुलांना वाढवायचे व प्रत्येक आई-वडिलांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यायची!
केवळ एका विचारसरणीतून दुसर्या विचारसरणीत जाण्याची प्रक्रिया या पिढीत सुरू झाल्यामुळे ही पिढी संक्रमणावस्थेतून जात आहे व कांहींशी घाबरूनही गेली आहे. त्यातूनच हा आजचा निबंधाचा विषय सुचविला गेला असावा असे वाटते.
या समस्येला कसे समजून घ्यायचे, तिला कसे सामोरे जायचे, "विन-विन" पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा व अशा सगळ्याच अडचणींना तोंड देता येईल असे उत्तर त्यातून कसे मिळवायचे हे एक आव्हानच आपल्यासमोर उभे आहे.
मला स्वत:ला तरी माझ्या वयाच्या भारतीयांची लागेल तेवढा त्याग स्वत: करून पुढच्या पिढीसाठी जगण्याची, दोन्ही दिशांची जीवनपद्धतच जास्त योग्य वाटते. भारताच्या आजच्या सर्वांगीण प्रगतीत या आपल्या जीवनपद्धतीचं एक मोठं योगदान आहे व केवळ जुनी विचारसरणी म्हणून तिच्यात बदल करून पाश्चात्य पद्धत अंगिकारणे चुकीचे ठरेल. पुढच्या पिढीने या मुद्द्याकडे डोळस व दूरदर्शीपणे पाहून आपला निर्णय घेतला पाहिजे असे मला ठामपणे वाटते. या प्रश्नाला "पुढच्या-पिढीसाठी-सारे-कांहीं" या आपल्या जीवनपद्धतीपेक्षा योग्य उत्तर मिळेपर्यंत जुनी पद्धती चालू ठेवणे व त्याहूनही जास्त चांगल्या उत्तरांचा शोध घेत रहाणे हेच हिताचे ठरेल.
प्रतिक्रिया
18 Nov 2009 - 12:34 pm | सुनील
स्फोटक मसाला ठासून भरलाय ह्या लेखात. मज्जा येणार आहे प्रतिसाद वाचायला!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Nov 2009 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्फोटक मसाल्याची थोडी उदाहरणं प्रतिसादात द्यायचीत ना! आजच्या धकाधकीच्या जीवनात ३००० शब्द फारच होतात हो सुनील भौ!
अदिती
18 Nov 2009 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>आजच्या धकाधकीच्या जीवनात ३००० शब्द फारच होतात हो
हम्म ! सहमत आहे.
आजकाल इंजिनियरिंग किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं म्हटलं तर सोपं झालंय.....इथपर्यंत वाचलं. पुढे जरासा कंटाळा आला. सॉरी हं.... पुढे वेळ मिळेल तसा लेख वाचून काढीन. आणि मग प्रतिक्रिया लिहीन.
-दिलीप बिरुटे
(आळशी)
18 Nov 2009 - 8:49 pm | सुधीर काळे
पढेगा उसकाभी भला, नहीं पढेगा उसका भी भला!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 12:36 pm | श्रावण मोडक
या निबंधाला बक्षीस मिळालं होतं का? परीक्षक कोण-कोण होते? इतर विजेते निबंध कुठं (फुकटात) वाचायला मिळतील का?
18 Nov 2009 - 12:42 pm | सुधीर काळे
हा निबंध शब्दसंख्या जास्त असल्याने स्पर्धेत नव्हताच.
इतर निबंनाहींत.आतापर्यंत वाचलेले नाहींत. (distortion of gmbn)
इतर निबंधही मी आतापर्यंत वाचलेले नाहींत. आता पुण्याला गेलो कीं तो अंक आणायचा विचार आहे.
उत्तम कथा बहुतेक नेटवर नसतो.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 12:58 pm | श्रावण मोडक
ओह्ह... अरेरे... शुद्धलेखनालाच भारी महत्त्व या जगात... :( चालायचंच. आता तो अंक बघतो आंतरजालावर.
18 Nov 2009 - 12:37 pm | पर्नल नेने मराठे
लेख आवडला!!!
चुचु
18 Nov 2009 - 12:46 pm | प्रमोद देव
काळेसाहेब लेख सर्वांगसुंदर झालाय.
आवडला.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
18 Nov 2009 - 1:00 pm | sneharani
छान झालाय लेख. आवडला.
18 Nov 2009 - 1:10 pm | अवलिया
सुरेख लेख !
जियो सुधीर शेट ! जियो !
मस्त लेख ! आवडला !!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
18 Nov 2009 - 1:35 pm | सुधीर काळे
देवसाहेब, चुचु, स्नेहाराणी (उच्चार बरोबर आहे ना?), अवलिया-सेठ:
आपल्या पसंतीच्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
हा लेख माझ्या व माझ्या सौ.चा (मी लिहिलेल्या लेखांतला) सर्वात आवडता लेख आहे.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 1:39 pm | टारझन
हॅहॅहॅ ... लेख न वाचता केवळ किबोर्डावरचं एन्ड बटन दाबून समोर दिसलेल्या टेक्स्ट बॉक्सात टाईप केलेली प्रतिक्रिया ;)
बरोबर ना नाना ?
असो !! सहज रावांच्या संयमी वाचनक्षमतेला सादर प्रणाम :)
थोडक्यात , सहजरावांच्या प्रतिक्रियेतुन लेखाची कल्पना आली !!
18 Nov 2009 - 1:29 pm | सहज
>या समस्येला कसे समजून घ्यायचे, तिला कसे सामोरे जायचे, "विन-विन" पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा व अशा सगळ्याच अडचणींना तोंड देता येईल असे उत्तर त्यातून कसे मिळवायचे हे एक आव्हानच आपल्यासमोर उभे आहे.
लेख सुरु झाला अपत्य संगोपन म्हणून शेवट मात्र वृद्ध पालकांचे काय यावर येउन ठेपला. :-) त्यामुळे दोन वेगळे निबंध एकत्र झाले आहेत असे वाटते. त्यातपरत पाश्चात्य व पौर्वात्य संस्कृती / रहाणीमान, संस्कार/मुल्य, आर्थिकनिती याचा वरवर उहापोह / टिका नेहमीचीच.
विषय चांगला आहे. पण वन शू फीट्स ऑल नसावे. एकपेक्षा जास्त उत्तरे असणार व प्रत्येक कुटूंबाला आपापली उत्तरे शोधावी लागणार.
तसेही ओल्ड एज होम संकल्पना भारतातदेखील झपाट्याने पसरत आहे :-)
आज ज्याने त्याने आपापल्यापुरता विचार करुनही आज मानवाची संख्या ६.७ अब्ज आहे. अगदी आदिमानव पासुन परग्रहावर जाउन राहणारा एवढी प्रगती केली आहे. त्यामुळे मनुष्य या प्रजातीपुढे "संगोपन" तरी फारशी काही समस्या आहे असे दिसत नाही. आता पुढचे ध्येय निसर्गावर (मानवाच्या शत्रुवर) संपूर्ण विजय. ह्या भूमीकेतुन पहाता, वर उपस्थीत केलेले प्रश्न एकदम वैयक्तिक वाटत आहेत.
आणी हो, निकोप संगोपन जमत नसताना (friend from peshawar) अपत्य जन्माला घालण्यापेक्षा अपत्यविरहित फ्रेंच जोडपी चांगला मार्ग निवडत आहेत असे वाटते.
लेख लहान व ठराविक मुद्यांना धरुन असता तर चर्चा अजुन सखोल झाली असती.
18 Nov 2009 - 2:17 pm | सुधीर काळे
खरं तर समाधान काय किंवा समस्या काय, दोन्ही पालकांचेच मुद्दे आहेत व संपूर्ण निबंध या विषयावरच लिहिला आहे.
यातली परदेशातील उदाहरणे माझ्या समोरची आहेत, काल्पनिक नाहींत! कुणाला पटतील कुणाला नाहीं! पण खरी आहेत, जोन्सबाई धरून! तिच्या घरी मी व सौ जाऊन आलोय्.
लेख नक्कीच लांब झालाय्. लिहायला बसलो आणि एका बैठकीत लिहिला. नंतर पॉलिश करायला वेळ लागला. पण काहीच काढवेना.
असो!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 2:22 pm | सहज
>यातली परदेशातील उदाहरणे माझ्या समोरची आहेत, काल्पनिक नाहींत! कुणाला पटतील कुणाला नाहीं! पण खरी आहेत, जोन्सबाई धरून! तिच्या घरी मी व सौ जाऊन आलोय्.
काल्पनिक नाही म्हणत हो कोणी पण परदेशातील जे उदाहरण/स्थिती तुम्ही म्हणता आहात त्या जवळपास सगळ्याच देशात आढळतील. आपली किंवा परकी अशी काही ही समस्या विभागता येणार नाही इतकेच.
18 Nov 2009 - 4:05 pm | सुधीर काळे
फरक आणि साम्य दोन्ही मी लिहिली आहेत व हेही लिहिलं आहे कीं आपल्या देशात आता परदेशी आहे तशी परिस्थिती होऊ लागली आहे. आणि म्हणूनच कांहींसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ज्या पालकांनी १८व्या वर्षापासून मुलांना स्वतंत्र केलं त्यांना संगोपन तसं कमी करावं लागलं व अपेक्षाही कमी असतात. या उलट संगोपनात तन-मन-धन या तीन्ही गोष्टी invest केल्यावर जर पालकच शेवटी सांपत्तिक दृष्ट्या असहाय झाले व ज्यांच्यात invest केले त्यांच्याकडून return on investment मिळालं नाहीं तर त्यातून मार्ग काय? "cradle-to-grave" पद्धतीच्या विम्याचीही सोय नाहीं मग काय करणार?
प्रश्नच प्रश्न आहेत व उत्तरे नाहींतच.
इंडोनेशियात तर याहून जास्त भयानक परिस्थिती आहे. भारतीय व पाश्चात्य यातलं वाईट ते घेतलं गेलेलं मी पहातो. शिल्लक नाहीं, विमा नाहीं व म्हातारपणी फारच असहाय झालेले वृद्ध दिसतात इथे.
नववृद्ध व अतिवृद्ध यावरच्या लेखांचा उल्लेख केला आहे तोही याच दृष्टिकोनातून. ८५-९० वर्षाचे अतिवृद्ध लोक आज समाजात आहेत व त्यांना साठीतले लोक सहाय्य करताहेत. ते चित्र जर बदलले तर अतिवृद्धांची हालत जोन्सबाईसारखी होईलच कीं नाहीं? अशी होऊ द्यावी कां आपण?
सगळ्या समस्यांना उपाय देण्याची माझी क्षमता नाहीं, कदाचित् कुणाचीच नसेल. पण भारतियांनी आतापर्यंत अनुसरलेली पद्धती मला योग्य वाटते व मी तेच शेवटी सुचविले आहे.
पिढीप्रमाणे त्याबद्दल एकवाक्यता वा मतभेद होतील यात शंका नाहीं.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 2:02 pm | प्रकाश घाटपांडे
आता वृद्ध आईवडिलांचा सांभाळ न करणार्या मुलांना न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार कायद्याधारे फटकारायला सुरवात केली आहे. वसंत व्याखानमालेत एक किस्सा ऐकला. परदेशातील मुलाने भारतात आल्यावर गोड गोड बोलुन आईवडिल रहात असलेली सदनिका विकुन परदेशात घेउन जाण्यासाठी विमानतळावर नेले आन तो केव्हाच विमानाने गेला आणि ते केवळ विमानतळावर वाट पहात बसले. हातात काहीच नाही .आभाळ कोसळले त्यांच्यावर.
आपली मुल आपल्याला सांभाळतील या भ्रमात आता कुणी राहु नये. संपत्ती ही आपल्या पश्चात द्यावी. भावनेच्या भरात हयातीत देउ नये.
आता मुल व आई वडिल जवळजवळ सदनिका घेउन राहतात. पण एकत्र राहत नाहीत. म्हटल तर एकत्र म्हटल तर वेगळे अशा मोड मध्ये रहातात. घरोघरी मातीच्या चुली हा एक चित्रपट या वर आधारला आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Nov 2009 - 2:08 pm | पर्नल नेने मराठे
परदेशातील मुलाने भारतात आल्यावर गोड गोड बोलुन आईवडिल रहात असलेली सदनिका विकुन परदेशात घेउन जाण्यासाठी विमानतळावर नेले आन तो केव्हाच विमानाने गेला आणि ते केवळ विमानतळावर वाट पहात बसले. हातात काहीच नाही .आभाळ कोसळले त्यांच्यावर.
माझा विश्वास नाहि बसतेय :o असे होण्यापेक्षा मुले नकोचत :(
चुचु
18 Nov 2009 - 2:30 pm | अमोल नागपूरकर
परदेशी लोकांची पद्धत वेगळी असते. १६-१८व्या वर्षी त्यांची मुले घराबाहेर पडतात. आपल्या शिक्षणाची जबाबदारी ही मुले स्वत:च उचलतात. बारीक-सारीक नोकर्या करून, प्रसंगी एक-दोन वर्षे "ड्रॉप" घेऊनसुद्धा! त्यांची मुले अठरा वर्षाची झाली, सज्ञान झाली की सुटी होतात व स्वत:च्या पायावर उभी राहिलेली दिसतात. मुलांचे भलते लाड ते करत नाहीत, कदाचित ते त्यांना परवडतच नाहीत.
पण असे केल्याने मुले स्वतन्त्र होतत. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची आणि त्यान्चे परिणाम भोगण्याची क्षमता त्यान्च्यात निर्माण होते, असे नाही का वाटत?
»
18 Nov 2009 - 3:37 pm | सुधीर काळे
तुम्ही म्हणता आहात त्यात खूपच तथ्य आहे. असं स्वतंत्र झाल्यामुळं ही मुलं कणखर होतातच, त्या मानाने आपली मुलं जरा जास्तच सुरक्षित वातावरणात वाढतात व त्याचे तोटे आहेतच.
तीन वर्षें मी तीन अमेरिकन लोकांबरोबर काम केलं (त्यातला एक माझा बॉस) त्या काळात त्यांच्यातले अनेक गुण मला आढळले जे भारतीय लोकांच्यात नाहींत. उदा. आपल्याला एकादी गोष्ट येत नसेल तर आपण कुणाला तरी मित्रांत विचारतो व प्रश्न सोडवतो. हे अमेरिकन स्वतः सगळं शोधायचे. दुसर्यावर अवलंबून न रहाता स्वतः शक्य तो आपल्या समस्या सोडवायच्या हा त्यातला एक गुण मी पाहिला.
पाश्चात्य ते सगळं वाईट असं मी म्हणत नाहीं, पण आज जी संक्रमणावस्था आली आहे तिकडे निकडीने पाहिले पाहिजे असं मला वाटतं.
लेखाचा शेवट हा पर्याय दिल्याशिवायच झाला आहे, कारण प्रत्येक कुटुंबाला 'फिट्ट' बसेल असा एक पर्याय मिळणे अशक्यच.
वाचकांनी आपल्या कल्पना द्याव्यात कारण चांगल्या कल्पनांचं नेहमीच स्वागत असतं.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 3:28 pm | अमृतांजन
प्रकाटाआ
18 Nov 2009 - 3:27 pm | अमृतांजन
काळेसाहेब,
लेखाचे नाव वाचून जी मनोधारणा होते ती लेख वाचतांना चूकीची आहे हे समजायला लागते. लेखात अनेक विषय हाताळले आहेत त्यामुळे मुख्य विषय भरकटला गेला आहे. तुम्ही तो पुन्हा जागेवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मांडलेल्या समस्येला भारत, भारताबाहेर पश्चिमेकडील देश, मध्यपूर्व देशातील स्थलांतरीतांचे प्रश्न, अशा किनारी आहेत.
अनेक समस्या वरवरुन जरी सारख्या वाटत असल्यातरी, त्या तशा नाहीत असे म्हणायला जागा आहे का? का त्या एकच स्वरुपाच्या आहेत?- असे काही तुमचे मत तुम्ही मांडायला हवे होते असे वाटते.
लेखाची बांधणी हा एक विषय घेऊन जर वरील लेखावर नजर त्रयस्थाच्या नजरेने टाकलीत तर तुम्हाला मी काय म्हणते आहे ते कळेल.
18 Nov 2009 - 3:39 pm | सुधीर काळे
पहातो प्रयत्न करून!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 4:04 pm | प्रकाश घाटपांडे
पहा! आमचे दृष्टीने विषय वा आपण भरकटणे हे सर्वस्पर्शी होण्याकडे जाते. व्यापकतेकडे वाटचाल. आपले भरकटणे आम्हाला चांगला वैचारिक प्रवास घडवुन आणते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Nov 2009 - 5:07 pm | आनंद घारे
आपण दोघे साधारणपणे एकाच कालखंडात एकाच परिस्थितीमधून वर आलो आहोत. (मी तेवढा वर आलो नाही आणि बाहेरचे जग कमी पाहिले आहे असे असले तरी). त्यामुळे तुझे बरेचसे अनुभव मला माझेच वाटले इतके चांगल्या प्रकारे ते मांडले आहेस. त्यामुळे मी ३००० शब्द एका दमात वाचू शकलो.
पण मला असे वाटते की पालकांच्या मनात मुलांबद्दल असलेल्या प्रेमापेक्षा असुरक्षिततेच्या भावनेपोटी आजकाल भारतात बालसंगोपनाला जरा जास्तच महत्व मिळू लागले असावे. आपल्या लहानपणी एवढी असुरक्षिततेची भीती नव्हती आणि पालकवर्ग 'देवावरी भार' ठेऊन निर्धास्त रहायचा. मुलाला सक्षम आणि सुसंस्कृत बनवण्यावर त्यांचा भर असे, त्याच्या करीअरवर तेवढा नसे. पाश्च्यात्य देशात अनएंप्लोयमेन्ट अलाउन्स वगैरे असल्यामुळे पालक निश्चिंत असतात आणि मुलेही पालकांवर अवलंबून नसतात.
ज्या पिढीमधील मुलांनी कधी एकत्र कुटुंब पाहिलेच नसेल अशी मुले वृद्ध झाल्यानंतर आपल्या पाल़कांचा खूप विचार करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे नववृद्ध आणि अतिवृद्ध हा फरक मला तरी तात्पुरता वाटतो.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
18 Nov 2009 - 6:27 pm | jaypal
हल्ली बिचा-या आजिला नातवाच तोंड पहायला बि.एस.एन.एल. ची जादु सर्विस किंवा वेब कॅम लागतो. म्हातारीचा सुरकुतलेला सायीच्या मायेच हात उघड्या पाठिवरुन फिरणं आणि आटपाट नगराची असंख्य वेळा ऐकलेली गोष्ट ऐकत झोपणं. किती नातवांच्या नशीबी आहे?
अपत्य संगोपन समाधानानिच केलं पाहीजे.(संगोपनात समाधानच मिळायला हवं) भविष्यातील समस्यांचा विचार करुन ते नेट्के कसे होईल?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Nov 2009 - 6:39 pm | सुधीर काळे
ब्राव्हो!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 6:58 pm | स्वाती२
लेख चांगला आहे पण मुळात पाश्चात्य समाजात आई वडिल १८ वर्षांनंतर मुलासाठी काही करत नाहीत आणि मुलेही नंतर आई वडिलांसाठी काही करत नाहीत हे गृहितकच चुकीचे आहे. अन्यथा इथे ५२९ प्लॅन, कवरडेल एज्युकेशन अकाउंट, सँडविच जनरेशनचे प्रश्न हे काहीच नसते. सविस्तर प्रतिसाद आजचे अपत्य संगोपन(लेकाचे दात उपटून घेणे) झाले की. :)
18 Nov 2009 - 9:06 pm | सुधीर काळे
स्वातीताई,
इथं लिहिलेलं बरंचसं मी पाहिलेलं किंवा थेट ऐकलेलं आहे. पण मी कांहीं पाश्चात्य देशात राहिलेलो नाहीं. मिलवॉकीची गोष्ट १०० टक्के खरी आहे (माझ्याबरोबर जेवताना झालेल्या चर्चेतली), माझ्या बॉसची गोष्ट त्यानेच मला सांगितली आहे, जोन्सबाईची गोष्ट पण व आमच्या नात्यातल्या icon ची पण खरी आहे (प्रथमपुरुषी-एकवचनी).
पण तरी जर कांहीं कमी-जास्त झाले असेल तर जरूर सांगावे. त्याचे स्वागत आहे.
भारतातल्या व्यथाही कांही प्रत्यक्ष व कांहीं ऐकलेल्या असतात. पण मला जे दिसले व मी जे ऐकले त्याबद्दल मी प्रामाणिक राहिलो आहे. ५२९ प्लॅन, कवरडेल एज्युकेशन अकाउंट, सँडविच जनरेशनचे प्रश्न याबद्दल आजपर्यंत कधी वाचले नाही. समजावून घ्यायला आवडेल.
मूलतः हा लेख पूर्व विरुद्ध पश्चिम असा नाहींच आहे. माझ्या युरोपियन मित्रांच्या बोलण्यातून जे आले त्यानुसार पश्चिमेतल्या लोकांना वृद्धापकाली कमीतकमी आर्थिक ओढाताण होत नसावी. अमेरिकेतही हे कांहीं प्रमाणात खरं आहे. पण भारतात मात्र परिस्थिती अशी नाहीं. सेवानिवृत्तांपाशी फारशी शिल्लक उरलेली नसते. त्यामुळे हा प्रश्न गंभीर होऊ घातला आहे.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 9:21 pm | प्राजु
लेख चांगला आहे. आवडला.
यातले काही प्रश्न मी वाचलेल्या "फॉर हिअर ऑर.." मध्येही होते.
बृहन्ममहाराष्ट्र मंडळ या अमेरिकेत स्थायिक झालेल्या नव वृद्धांसाठी काही योजना राबवते आहे असं ऐकलं आहे. नक्की माहिती मिळाली की सविस्तर प्रतिसाद लिहिन.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
18 Nov 2009 - 9:35 pm | सूहास (not verified)
काळे काका , लेखातील तर्क आवडले ...तरुणानी खरोखरच " फायनास्शंली डिसीप्लीन्ड" रहाण्याची गरज आहे ईतिपासुन ते पालकाचे आणी पाल्याचे कर्तव्य ईथपर्यंत..
तिकडे काय होत आणी काय होत नाही ह्यात मुळातच अजिबात रस नाही ?? पण सरसकट भारतीय जीवनपध्दतीला एक प्रकारे दादच द्यावी लागेल.
पुणे शहर तरी अजुनही बरे आहे, पण मुंबईत सर्रास पानवाल्यांकडेही असले अमली पदार्थ सरसकट मिळू लागले आहेत असे मी वाचले-ऐकले आहे.>>>
पुण्यात मिळायचे !!! मी सहसा ज्या कंजारभाटचा उल्लेख करतो ..तिथेच..बंद झाली....पण गांजा नावाचा अमली पदार्थे तिथे अजुनही मिळतो असा माझा अंदाज आहे कारण रात्रीच्या(१.३० ते ३.३० च्या दरम्यान) खुप पॉवर बाईक्स फिरतात...
मला स्वत:ला तरी माझ्या वयाच्या भारतीयांची लागेल तेवढा त्याग स्वत: करून पुढच्या पिढीसाठी जगण्याची, दोन्ही दिशांची जीवनपद्धतच जास्त योग्य वाटते>>>>
ह्या वाक्यासाठी टाळ्या !! दोन्ही दिशांच्या जीवनपध्दतीत दोषही आहेत ..आपल्या जीवनपध्दतीत सर्वात मोठा दोष म्हणजे केवळ मौज करण्याच्या स्टाईलचे अंधानुकरण...बाकी तिकडचे दोष आपण जाणताच
अगदी अलिकडे - चारेक वर्षांपुर्वी - ३१ डिसेंबरच्या रात्री सिंहगडाच्या पायथ्याशी तरुण-तरुणींनी असे अंमली पदार्थाचे सेवन करून नववर्षाचे स्वागत करण्याचा घातलेला घाट पोलिसांनी उधळून लावला त्यावेळी झालेल्या विद्यार्थ्यांच्या धरपकडीत अनेक शिकल्या-सवरलेल्या, सुशिक्षित व प्रतिष्ठित घरातली मुलेही पोलिसांच्या हाती लागली होती व त्यांना स्वगृही परतण्याआधी काही दिवस बिनखर्ची सरकारी पाहुणचारही घ्यावा लागला होता. >>>.
तो दिवस मला आजही आठवतो , सिहंगड वरुन आम्ही चार मित्र " नाईट आउट" करुन साधारण दोनच्या सुमारास परतत होतो.ही पार्टी जेथे चालु होती ..त्याच रेस्टांरट मध्ये बसलो...पार्टी आतल्या उसाच्या मळ्यात गार्डनमध्ये आणी आम्ही बाहेरच्या विभागात बसलो...पलीकडे नुसता गोंगाट होता..डी.जे. चा नाही बरका..नुसतेच बायकांचे आणी माणसांचे आवाज... आम्ही वेटरला बियर मागिवली ..त्याच्या कडे माझा ब्रॅन्ड नव्हता..त्यातलाच एक मित्र ..तो पण त्या ब्रॅन्डशिवाय पितच नाही ...वेटर ने आम्हाला दुसरे रेस्टॉरंट सुचविले.आम्ही दुसर्या रेस्टाँरट मध्ये गेलो ...तिथे बियर आणी जेवण संपेपर्यत बसलो...बाहेर गाडीला किक मारायच्या आत...आमच्या समोरुन तिन पोलीस जीप आणी दोन पिंजरे गेले...आम्ही दुसर्या दिवशी पेपरमध्ये हे वाचले.....मला आज अजुनही कळत नाही की काय म्हणु...त्या ब्रॅण्ड ला धन्यवाद देऊ का ...त्या वेटरच्या समयसुचकतेला..तुम्ही म्हणाल तु बियरच नसती पिली तर...माहीत नाही..एका झोपडपट्टीच्या मुलाला(म्हणाल तर गुंडाला) तेव्हा एक बियर कधीतरी म्हणजे कॉमन आहे असे वाटायचे...अजुन ही वाटते...काही विशेष वाटत नाही...पण कालच माझे आणी धम्याचे (आपला धमाल मुलगा बर का !!) ह्या विषयावर की दारुने थोडा मेमरीवर परिणाम होतोय ..कमी करायला पाहिजे...सोडायला पाहिजे आणी त्यावर हा लेख...अजुनही नीटपणे कळत नाही ....सोडली तर सुधरला म्हणुन टोमणे बसायचे...कधीतरी ठीक आहे....
शेवटी :: ती पकडल्या गेलेली मुलांमध्ये बहुतांशी मुंबई आणी बैंगलोरची होती ...त्या पार्टीस रेव्ह पार्टी म्हणतात्...जरा गुगल केल्यास असल्या पार्टीची भरपुर चित्रे बघावयास मिळतील...पुण्यात दोन-एक-वर्षापुर्वी "फायर अॅन्ड आईस" च्या आडबाजुला असाच पार्टी करण्याचा प्रयत्न झालता ..खुद्द फायर अॅन्ड आईसच्या चालकांनी तो हाणुन पाडला...
सू हा स...
19 Nov 2009 - 12:15 am | संजय अभ्यंकर
काळे साहेब,
एका सुंदर लेखाने मिपाच्या ज्ञानभांडारात भर घातल्याबद्दल धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
19 Nov 2009 - 12:29 am | ऋषिकेश
सगळ्या बाबतीत अनुभव जुळत नसले तरी लेख आवडला
मराठीतून टंकल्याबद्दल श्री अक्षय यांचेही आभार
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
19 Nov 2009 - 3:41 am | रेवती
काळेकाका, लेख आवडला.
एका बैठकीत वाचूनही काढला.......इतका काही मोठा नाही झालेला.:)
आपली सगळी मते पटली असे म्हणता येणार नाही तरीही लेख आवडला असेच म्हणीन्.सध्याची संक्रमणावस्थेतली पिढी घाबरून गेलीये असे आपण म्हणता त्यात थोडेफार तथ्य आहे पण प्रत्येक पुढची समजली जाणारी पिढी ही थोडी साशंक असते असे मला वाटते.:) आईवडीलांचा वृद्धपणीचा सांभाळ हा एक बागुलबुवा करून ठेवलाय्.....सगळ्यांनीच! त्यातून जर अनिवासी भारतीय असतील तर प्रश्न त्या कुटुंबापेक्षा शेजारीपाजारी यांनाच गहन वाटायला लागतो की काय असा प्रश्न पडतो. मुलांना वाढवणे हे आईवडीलांचे स्वभाव, अनुभव यावर अवलंबून असते. जसे आपण इंजिनियरिंग्/मेडीसिनबद्दल म्हणता तसेच आहे. या शाखांचे महत्व आपणच वाढवून ठेवले आहे, मग शिक्षणसंस्थांनी त्यावर त्यांचे खिसे भरले तर कुठे बिघडले?
माझ्यामते आधी आपली म्हातारपणीच्या मीठभाकरीची सोय व्यवस्थित केल्याशिवाय मुलांना पैसे वाटणे हा वेडेपणा ठरेल. त्यांना अडीअडचणीला थोडे पैसे (बजेटप्रमाणे) देणे हे आपले कर्तव्य आहे पण शारीरिक्/मानसिक कष्ट त्यांनाही करू दिले तर मिळालेल्या गोष्टींचा आनंद त्यांनाही जास्त मिळेल. तो त्यांच्यापासून हिरावून घेण्यात हाशील नाही. (आता कसं मला जबाबदार व्यक्ती झाल्यासारखं वाट्टय!;))
रेवती
19 Nov 2009 - 7:17 am | वैशाली हसमनीस
लेख आवडला.पण आपणच संस्कारित केलेली मुले आपल्याला विचारणार नाहीत असा नकारात्मक विचार आपण कां करावा ?दुर्दैवाने तसे झालेच तर आपले संस्कार कमी पडले असे समजावे,असे मला वाटते.आपल्याहातून अपत्यसंगोपन नीटपणे पार पडले नाही असे मानावे.आपण अनेक पाश्चिमात्य उदाहरणे दिली आहेत्,मला मात्र येथे मलेशियात अनेक मलाइ,चिनी,हिन्दु कुटुंबात तीन पिढ्या सुखाने नांदताना दिसतात्.असो.चांगल्या विषयाला वाव दिल्याबद्दल अभिनंदन.
21 Nov 2009 - 4:12 am | स्वाती२
मुलाला जन्म देणे, वाढवणे हे सर्व करताना प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार खर्च करावा. बरेचदा पालक मुलांवर कुवतीबाहेर खर्च करतात आणि मग मुलांकडुन अपेक्षाभंग झाला की पस्तावतात. पण आपणच मुलांना अवाजवी लाड करून बिघडवले हे मान्य करत नाहीत.
भारतात आपण जेव्हा एकत्र कुटुंब पद्धत आहे, मुले आई वडिलांजवळ राहातात असे म्हणतो तेव्हा त्यातले प्रेमाने एकत्र राहाणारे किती आणि नाईलाज म्हणून किती हे ही पहायला हवे. मला स्वतःला आजी आजोबा नव्हते त्यामुळे मित्र मैत्रिणींचे आजी आजोबा हेच माझेही आजी आजोबा होते. यातील बरेचसे आजी आजोबा इतर जी एक दोन मुले आहेत ती कशी अजिबात विचारत नाहीत, या मुलावर कसा सगळा भार पडतो, ओढाताण होते वगैरे ऐकवायची. काही काकू आपल्याला किती सासुरवास झाला हे ऐकवायच्या. काही ठिकाणी वडिलोपार्जीत घरात तीन वेगळ्या चुली हा ही प्रकार बघितला. तेव्हा वृद्ध आईवडिलांचा प्रश्न काही नवा नाही.
तुम्ही दिलेले भारतीय तरुणाचे उदाहरण कौतुकास्पद पण सर्वांनाच हे जमेल असे नाही. आमच्या अगदी जवळच्या मराठी मित्राची आई इथे त्यांच्या बरोबर राहाते. भारतातला भाऊ जबाबदारी घेत नाही. मध्यंतरी त्यांना स्ट्रोक आल्यानंतर प्रश्न होता तो म्हणजे पूर्ण बर्या झाल्या नाहित तर....? या मित्राचे दुकान आहे. नवरा बायको सकाळ पासून रात्री पर्यंत दुकानात. घरी १२ तास आईजवळ पगारी माणूस ठेवणे परवडणारे नाही. दोघांपैकी एकाने घरी राहाणेही शक्य नाही. सुदैवाने त्या बर्या झाल्या पण अन्यथा नर्सिंग होम शिवाय पर्याय नव्हता.
गेली १५ वर्षे मी अमेरिकेत राहातेय. सर्व काळ मिडवेस्टमधेच गेलाय. त्यामुळे ईस्ट किंवा वेस्ट कोस्टच्या राहाणीमानाबद्दल मला माहिती नाही. इथले आईवडिल मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवतात. सध्या असे करण्यासाठी ५२९ प्लॅन आणि कवरडेल असे दोन चांगले पर्याय आहेत. ५२९ मधे आजी आजोबाही पैसे घालू शकतात आणि बरेच आजी आजोबा असे करतात. मात्र इथे शिक्षण खूप महाग आहे. त्यामुळे जोडीला स्कॉलरशिप मिळवणे, लोन काढणे हे करावे लागते. खेळात चमकल्यास चांगल्या स्कॉलरशीप मिळतात म्हणून आईवडिल बराच पैसा आणि वेळ खेळात प्राविण्य मिळावे म्हणून खर्च करतात. इथे श्रमाला प्रतिष्ठा आहे. १४व्या वर्षापासून मुल नोकरी करु शकते. कॉलेज अॅडमिशन साठी मार्कांबरोबर नोकरी-धंद्याचा अनुभव, समाजकार्य वगैरे गोष्टींनाही महत्त्व असते. कॉलेजमधे रोजच्यारोज अभ्यास करावा लागतो. कट्ट्यावर बसून दिवस घालवला परीक्षेला तोंड दाखवले असे चालत नाही. पैसे भरुन डिग्री विकत मिळत नाही. त्यामुळे कुवत नसेल तर मुल कॉलेजला जात नाही. पण त्याला जॉब मिळवायला बापानेच मदत केलेली असते. युनियन शॉप्स मधले जॉब हे कुटुंबातल्या कुटुंबात भरले जातात. बरेच पालक मुलाने कार पैसे साठवून घ्यावी अशी अपेक्षा करतात. काही पालक कार घेऊन देतात पण गॅस आणि इंशुरन्सचा खर्च मुलगा करतो. यात मुलाला स्वावलंबी बनवणे एवढाच हेतू असतो.
इथे विभक्त कुटुंब पद्धत आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ मुलगा लग्न झाले की वेगळे बिर्हाड थाटतो. म्हणजे तो आईवडिलांना विचारत नाही असा नव्हे. शक्यतो घर आई वडिलांच्या घराजवळ घेतात. घराच्या डाऊन पेमेंट साठी आईवडिलांनी मदत केलेली असते. रविवारी चर्च नंतर आईवडिलांकडे किवा आजीआजोबांकडे जेवायला जातात. आई वडिल दोघेही नोकरी करत असतील तर शक्य असेल तर मुलं आजी आजोबा, काही ठिकाणी पणजी, आत्या आजी वगैरे सांभाळतात. म्हातारे आईवडिल शक्य तोवर स्वतंत्र राहातात. शक्य ती कामे स्वतः करतात. हळूहळू गवत कापणे वगैरे कामे मुलं करायला लागतात. आठवड्यातून एकदा येऊन लेकीसुना घराची सफाई करणे, जेवण फ्रीजर मधे भरणे करतात.शेवटी बरीच रस्सीखेच होऊन काहीजण मुलाकडे राहायला जातात काही खास वृद्धांसाठी असलेल्या अपार्टमेंट मधे राहायला जातात. माझ्या माहितीत बर्याच कुटुंबात वृद्ध आई किंवा वडिल राहातात. माझ्या एका शेजार्याचे वडिल त्याच्या बरोबर राहायचे ते नुकतेच वारले. दुसरी शेजारीण म्हातारी आहे. तिच्या मदतीला सारखे कुणी ना कुणी येत असते. नवर्याच्या मित्राचे वडिल त्याच्या कडे राहायचे. आता दिवसभर एकटे ठेवणे शक्य नाही असे झाले तेव्हा नर्सिंग होम मधे ठेवले. असे करणे त्याच्या साठी अतिशय दु:ख्खाचे होते. आज ४० ते ६० वयोगटातील आठातील एक अमेरिकन हा मुले वाढवतोय आणि म्हातार्या पालकांची काळजी घेतोय. त्यांना sandwich generation म्हणतात.
वृद्धांचे प्रश्न सगळीकडे आहेत आणि जसजसे आयुष्य मान वाढतेय तसे तसे ते बिकट होतायत हे मात्र नक्की.
22 Nov 2009 - 3:34 pm | सुधीर काळे
माहितीबद्दल धन्यवाद. सध्या मी प्रवासात आहे. नंतर सविस्तर उत्तर देईन.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
21 Nov 2009 - 5:45 pm | भोचक
हम्म. विचार करायला लावणारा लेख.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
21 Nov 2009 - 5:49 pm | नीधप
लेख अपत्य संगोपनाबद्दल आहे की वृद्धांचे संगोपन याबद्दल की इथले आणि तिथले जीवन याबद्दल?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
22 Nov 2009 - 3:30 pm | सुधीर काळे
लेख आई-वडिलांना अपत्यसंगोपनाने झालेले समाधान किंवा त्यांच्यामुळे उद्भवणार्या समस्या यांच्यावर आहे.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
22 Nov 2009 - 3:56 pm | नीधप
ह्म्म्म मला तरी तिन्ही मुद्द्यांची सरमिसळ झाल्याने कुठलंच म्हणणं स्पष्ट झालं नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
23 Nov 2009 - 9:29 pm | उपास
नमस्कार काळेकाका,
एकूणात लेख आवडला पण बर्याच मुद्द्यांना हात घातलाय आपण, प्रत्येक मुद्दा हा स्वतंत्र उपमुद्दा होऊ शकतो.. तसेच गोर्यांविषयीचे काही तर्क काळा चष्मा लावून काढलेले वाटले :) स्वाती२ यांचे स्पष्टीकरण आणि अनुभवकथन विशेष आवडले. प्रत्येक समाजाच्या, वयोगटाच्या समस्या आहेत पण दुसर्याचे स्वातंत्र्य जपून (त्याला गृहीत न धरता) त्यावर तोडगा काढण्याची अमेरिकन वृत्ती मला तरी निश्चित अपिल करते. उदा. द्यायचे तर, तुमच्या आयकॉन प्रभृतींबद्दल. एका दृष्टीकोनातून (जो तुम्ही मांडलाय) छान चित्र दिसते, पण..
१. त्या माणसाबरोबर त्याच्या कुटुंबाची ससेहोलपट होते त्याचं काय? त्या व्यक्तिने आई वडिलांसाठी परत जाणं पत्करलं तर त्यासाठी त्याच्या बायकोने तिच्या करिअर वगैरेंच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी सोडायचं का? मुलीने इतक्या लहान वयात अमेरिका-भारत्-पुन्हा अमेरिका अस संक्रमण अंगावर घ्यायचं का? विचार करा, मुंबईला शिकणार्या एखाद्या विद्यार्थ्यास वडिलांच्या बदलीमुळे कुठेतरी चिखलवाडीत जाऊन शिकायला लागतय आणि मग पुन्हा मुंबईत येतोय काही काळाने, कसं असेल त्याचं आयुष्य, कसे जोडले जातील मित्र? काय मिळेल शैक्षणिक स्थैर्य?
२. दुसरं म्हणजे आयकॉनच्या ह्या केस मध्ये वडिलांना अमेरिकेत उतार वयात येऊन, इथल्या मेडिकल तसेच सगळ्या सिस्टीमशी जुळवून घेणं, तिथले मित्र, नातेवाईक सोडून इकडे येणं सोप्प असेल का?
ह्यावर तिन्ही पिढ्यांनी दाखवलेले सामंजस्य हा एकच उपाय आहे, आणि हे इतके व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहेत की सगळ्यांना एकच उपाय लागू होणे नाहीच पण परांजपेंच्या अथश्री चा किंवा इथल्या रीटायर्ड होम्स चा पर्याय व्यवहार्य आहे हे नक्की.
पुन्हा एकदा चांगली चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला..
-
माझा ब्लॉग - उपास, मार आणि उपासमार