पाठीवरचा तो हात!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
28 Mar 2008 - 11:48 pm

"आले, आले बरं का!" गर्दीत कोणीतरी म्हणाले.
"कुठे आहेत, कुठे आहेत?" बरेच आवाज.
"ते काय, अँबेसिडर मधून उतरताहेत."
गुरुशर्टावर बिल्ले लावलेली काही स्वयंसेवक मंडळी पुढे सरसावत, "तुम्ही जरा बाजूला सरका हो, त्यांना यायला सुध्दा रस्ता नाहीये! नाहीतर असं करा ना, तुम्ही सगळे आत का नाही जाऊन बसत? ते तिथंच येणार आहेत."
कोणीही फारसं मनावर घेतलं नाही. ते स्वाभाविकच होतं.
सगळ्या गर्दीच्या टाचा उंच झाल्या! मिळेल तिथून पुढे घुसून, मान ताणून लोकांची त्यांना बघण्याची धडपड सुरु होती.
मलाही उत्सुकता होतीच पण हे सगळे लोक इतके पराकोटीचे उत्सुक होते की मी जरा भांबावलोच.
मी "बाबा, मलाही थोडं उंच करा ना!"
बाबांनी मला दोन्ही हातांना धरुन थोडं उचललं आणि ते मला दिसले! मंडळी, ते माझं पुलंचं साक्षात पहिलं दर्शन!!
१९८० चा सुमार असेल, मी आठवीत असावा. अहमदनगरच्या 'महावीर कलादालना'च्या उद् घाटन सोहळ्यासाठी पुलं आलेले होते.
नुकतीच त्यांची साठी झाली होती. 'पुलं एक साठवण' हे प्रकाशनपूर्व नोंदणी वगैरे करुन घरपोच आलेलं मला आठवत होतं.
(पोस्टातून घरपोच आलेल्या पार्सलातून कोरे पुस्तक बाहेर काढून, त्याच्या पानांचा छान वास घेत घेत आपण आधी न वाचताच ते घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून प्रथम आजोबांना द्यावे लागले होते हे ही लक्षात होते:)
तशी 'व्यक्ती आणि वल्ली', 'पूर्वरंग', 'अपूर्वाई' ह्या पुस्तकांची मोहिनी मनावर आरुढ होतच होती पण हे विख्यात साहित्यिक आहेत वगैरे कल्पनांना डोक्यात अजून स्थान नव्हते.

असो. तर उभ्या महाराष्ट्राच्या मनावर गारुड करणार्‍या ह्या वल्लीचं पहिलं दर्शन कसं होतं?
अहो, ते पांढरेशुभ्र केस, जणू त्यांच्या कर्तृत्वाची हिमालयाच्या उंचीची साक्ष देणारे (असं अर्थात मला नंतर वाटू लागलं, पण ते केस त्यावेळीही मला भावले होते) हे पांढरे केस फार थोड्या लोकांना खर्‍या अर्थाने शोभून दिसतात बरं का, त्यातले एक भाईकाका होते; अंगात साधा खादीचा झब्बा, फार इस्त्री बिस्त्री असली भानगड नव्हती, त्यावर फिकट हिरवं-पिवळसर जाकीट तेही खादीचंच आणि पांढरा पायजमा असा वेष; चेहर्‍यावर आताच फर्मास कोटी करुन आल्यासारखे मिश्किल भाव, त्यांचा तो खास भाईकाका ष्टाईल चष्मा आणि त्यामागचे ते, लहान मुलाची अपार उत्सुकता आणि जिज्ञासा यांनी भरलेले, डोळे! ते अजूनही माझ्या मनात घर करून आहेत. तुम्हाला सांगतो ह्या मोठ्या माणसांच्या डोळ्यात अशी काही एक वेगळीच चमक असते की बस! ते डोळे तुम्हाला पहात नसून तुमच्या आत कुठेतरी बघताहेत असे तुम्हाला जाणवते! मी अनिमिष नेत्रांनी त्यांना बघत होतो. ते चालत आत सभागृहात गेले आणि सगळी गर्दी हिप्नॉटाईज झाल्यासारखी मागोमाग गेली!

आत छोट्या स्टेजवर सगळी मंडळी स्थानापन्न झाली. हारतुरे प्रास्ताविक झालं. बोलणार्‍या मंडळींपेक्षा माझं (आणि बहुदा सर्वांचंच;) सारं लक्ष पुलं कडेच होतं! ते मधूनच असे काही मिश्किल भाव चेहर्‍यावर दाखवायचे की मला मोठी गंमत वाटत होती (त्यावेळी कदाचित ते वक्त्याच्या बोलण्यातल्या अशा काही जागा हेरुन ठेवत असावेत की त्याचा वापर ते त्यांच्या भाषणात करुन लोकांना हसवतील असे आपले मला वाटले.) झालं पुलं बोलायला उभे राहिले. तोपर्यंत कानोकानी खबर पसरुन गर्दी इतकी वाढली की लोकांना जागा पुरेना, सभागृहाचे दरवाजे बंद करु का म्हणून विचारणा झाली. आणि इथे भाईकाका खरंच का मोठे ते मला समजलं! अहो माणूसवेडाच आसामी तो, ते संयोजकांना म्हणाले "अहो असं करुयात का, आपणच सगळे बाहेर हिरवळीवर जाऊयात का? लोकांना हिरवळीवर बसायला चालत असेल तर मी तिथे व्हरांड्यात उभा राहून बोलेन. माझी काहीच हरकत नाही!" क्या बात है!! (अहो हिरवळीवरच काय काट्याकुट्यात बसून ऐका म्हणले असते तरी सर्व लोक बसले असते!:) लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात हिरवळीवर धाव घेतली! मिळेल तिथे जागा पकडून लोक बसले. आतली टेबलं खुर्च्या व्हरांड्यात आल्या. पुलं बोलायला लागले.

त्यावेळी ते काय बोलले ते मला फारसं आठवत नाहीये कारण माझ्या मनात त्या वेळी वेगळ्याच विचारांनी थैमान घातलं होतं. मला पुलंचं रेखाचित्र काढायचं होतं त्यामुळे मी सोयिस्कर जागा शोधत होतो की जिथून मला ते नीट दिसू शकतील! शेवटी महत्प्रयासाने व्हरांड्याशेजारच्या जिन्यात जागा मिळाली. हातातल्या कागदावर माझं चितारणं सुरु होतं. पुलं बोलत असल्यामुळे सहाजिकच हालत होते त्यामुळे त्यांचे विशिष्ठ कोनातले भाव चित्रात पकडताना माझी तारांबळ होत होती. शेवटी एकदाचं ते पूर्ण झालं! पुलंचं भाषण संपताच त्याच्या भोवती स्वाक्षर्‍यांसाठी गराडा पडला. एकेकाला ते हसून स्वाक्षरी देत होते. मी भीत भीतच सामोरा गेलो. मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली!
महाराजा, त्यावेळी काय वर्णावी माझ्या मनाची अवस्था! 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला! मी तरंगतच घरी आलो. एरवी ज्या गोष्टी करायला मी साफ नकार देत असे त्या सहजा सहजी ऐकताना पाहून माझे आई-बाबा गोंधळून गेले! ही काय जादू झाली?
आल्या गेलेल्याला पुलंची ती स्वाक्षरी पुढचे कितीतरी दिवस मी दाखवीत असे. तो माझा आनंदाचा ठेवा मी नीट जपून ठेवलाय!

अशीच अनेक वर्षे गेली. पुलं नंतर भेटतच गेले, पुस्तकातून , कथाकथनातून, संवादिनीतून, चित्रपटातून, नाटकातून, लेखांमधून आयुष्य समृध्द करत गेले. नंतरही पुण्यात वसंतव्याख्यान मालेच्या निमित्ताने म्हणा कुठल्याशा भाषणाच्या निमित्तने म्हणा बर्‍याचदा त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा योग आला. पण पहिली भेट ती पहिली भेट त्याचा ठसा अमिट असतो हेच खरे!

असाच काही कामाने हैद्राबादला गेलो होतो. पुलं पुण्यात 'प्रयाग' मधे अतिदक्षता विभागात आहेत हे माहीत होतेच. हैद्राबादला जाताना मनात शंकेची पाल चुकचुकली होती.
१२ जून २०००. माझं काम संपवून मी हॉटेलवर आलो. दूरदर्शवर संध्याकाळच्या बातम्या लावल्या पुलं गेले एवढंच कळलं. पुढच्या बातम्या ऐकू आल्या नाहीत. कितीतरी वेळ सुन्न बसून होतो.
छातीत खूप खूप जड वाटत होतं. दु:खावेग अति झाल्यावर डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरु झाल्या. मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी ओरबाडल्यासारखी घायाळ अवस्था झाली होती.
माझ्या पाठीवरुन प्रेमाने फिरलेला तो हात परमेश्वराने त्याच्या हातात धरला होता आणि मी पोरका झालो होतो!

चतुरंग

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

28 Mar 2008 - 11:55 pm | प्राजु

मनाला भीडणारे लेखन.
चतुरंग, तुम्ही नशिबवान आहात.. तुम्हांला पु.लं.च्या कडून शाब्बासकी मिळाली.
जाहले बहु, होतील बहु.. परि या सम हाच असे काहिसे म्हणतात ना...

लेख आवडला.

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 12:10 am | विसोबा खेचर

रंगराव,

सुंदर आठवण...!

ते व्यक्तिमत्वच विलक्षण होतं! अशी माणसं पुन्हा होणे नाही! तसं बघायला गेलं तर मराठीत अनेक उत्तमोत्तम सहित्यिक झाले, परंतु भाईकाकाही एक साहित्यिक होते ही गोष्ट खुद्द साहित्यिकांकरता मानाची होती! वास्तविक साहित्य हा भाईकाकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वापैकी केवळ एक विषय!

असो...

गुरुवर्यांना सा. प्रणिपात...

तात्या.

सर्वसाक्षी's picture

29 Mar 2008 - 12:17 am | सर्वसाक्षी

आपण ते इथे देउ शकाल तर आम्हालाही पाहता येईल. आपल्या कलेची ओळख होईल.

प्रमोद देव's picture

29 Mar 2008 - 8:44 am | प्रमोद देव

रंगराव, खरंच आपण भाग्यवान आहात. ते रेखाचित्र बघण्याची आम्हा सगळ्यांना अतीव इच्छा आहे. ती लवकरच पूर्ण कराल अशी आशा व्यक्त करतो.
प्रवाही भाषेमुळे वातावरण निर्मिती उत्तम साधलेय. मी तर वाचत होतो असे म्हणण्याऐवजी ते दृष्य पाहत होतो असे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही इतका त्यात गुंगुन गेलो होतो. आठवण अतिशय हृद्य आहे.
आपल्या मर्मबंधातली ही ठेव आमच्यासमोर उघड केलीत ह्याबद्दल मनःपूर्वक आभार.

नीलकांत's picture

29 Mar 2008 - 9:47 am | नीलकांत

तुमची आठवण अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. ते चित्र पाहण्याची उत्सुकता आहे. लेखन आवडलं.

नीलकांत

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2008 - 3:18 pm | प्रभाकर पेठकर

१२ जून २०००. माझं काम संपवून मी हॉटेलवर आलो. दूरदर्शवर संध्याकाळच्या बातम्या लावल्या पुलं गेले एवढंच कळलं. पुढच्या बातम्या ऐकू आल्या नाहीत. कितीतरी वेळ सुन्न बसून होतो.
छातीत खूप खूप जड वाटत होतं. दु:खावेग अति झाल्यावर डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरु झाल्या. मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी ओरबाडल्यासारखी घायाळ अवस्था झाली होती.
माझ्या पाठीवरुन प्रेमाने फिरलेला तो हात परमेश्वराने त्याच्या हातात धरला होता आणि मी पोरका झालो होतो!

माझ्या मनाच्या काळोख्या कोपर्‍यात तुम्ही मेणबत्ती घेऊन प्रवेशलात. जुन्या आठवणींनी चाळवाचाळव केली. मन सुन्न झालं.....

सुधीर कांदळकर's picture

29 Mar 2008 - 8:17 pm | सुधीर कांदळकर

घटना व शैलीदेखील.

धन्यवाद.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

पिवळा डांबिस's picture

30 Mar 2008 - 12:07 am | पिवळा डांबिस

भाग्यवान आहात तुम्ही, चतुरंग! परीसस्पर्श म्हणतात तो हाच!
-पिवळा डांबिस

शुचि's picture

14 Jun 2010 - 5:23 am | शुचि

असेच म्हणते.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

स्वाती दिनेश's picture

30 Mar 2008 - 1:06 pm | स्वाती दिनेश

भाग्यवान आहात तुम्ही, चतुरंग! परीसस्पर्श म्हणतात तो हाच!
असेच म्हणते.
लेख आवडला हेवेसांनल
स्वाती

हेच म्हणते....चित्र पहायची उत्सुकता आहे...

झकासराव's picture

30 Mar 2008 - 9:14 pm | झकासराव

आता त्या रेखाचित्राचा फोटो टाकाच राव. त्याशिवाय चैन पडणार नाही :)

देवदत्त's picture

30 Mar 2008 - 9:54 pm | देवदत्त

लेखनशैली आणि अनुभवकथन आवडले.

मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली!
मजा आहे तुमची.
ते चित्र आम्हालाही पाहु द्या की...

आनंदयात्री's picture

31 Mar 2008 - 11:08 am | आनंदयात्री

सुंदर आठवण छान शब्दबद्ध केलीये तुम्ही. आवडली.

सुमीत भातखंडे's picture

10 Nov 2009 - 12:37 pm | सुमीत भातखंडे

खरच परिसस्पर्श.
सुरेख आठवण आणि तितकाच मनस्वी शेवट.

यशोधरा's picture

10 Nov 2009 - 12:43 pm | यशोधरा

अगदी हृद्य आठवण आणि शब्दबद्धही तितक्याच ताकदीने केली आहेत!

सहज's picture

10 Nov 2009 - 12:44 pm | सहज

हा लेख कसा काय वाचायचा राहीला कळत नाही.

ते चित्र जरुर डकवा इथे.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2009 - 12:57 pm | बिपिन कार्यकर्ते

माझाही वाचायचा राहिला होता बहुतेक. सुंदर आहे.

रंगाशेठ, ते चित्र डकवाच.

बिपिन कार्यकर्ते

दिपक's picture

10 Nov 2009 - 4:24 pm | दिपक

खरचं सुंदर आणि मनातुन आलेले अनुभवकथन.. भावले.

सुनील's picture

10 Nov 2009 - 4:56 pm | सुनील

अतिशय हृदयस्पर्शी आठवण. ते चित्र डकवाच आता.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती२'s picture

10 Nov 2009 - 6:30 pm | स्वाती२

+५
भाग्यवान आहात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2010 - 7:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी हृद्य आठवण !
हा लेख कसा काय वाचायचा राहीला कळत नाही.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

14 Jun 2010 - 8:06 am | विकास

असेच म्हणतो!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विमुक्त's picture

10 Nov 2009 - 4:11 pm | विमुक्त

खूप सही....

विनायक प्रभू's picture

10 Nov 2009 - 6:31 pm | विनायक प्रभू

चित्र चढवा बघु.

संदीप चित्रे's picture

10 Nov 2009 - 8:33 pm | संदीप चित्रे

>> महाराजा, त्यावेळी काय वर्णावी माझ्या मनाची अवस्था! 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला!

पु.लं.ना मी लिहिलेल्या पत्राला त्यांच्या हस्ताक्षरात पत्र आलं होतं तेव्हा स्सेम हीच अवस्था माझी झाली होती !

जवळजवळ २९ वर्षांपूर्वी काढलेले चित्र आहे. आयत्यावेळी काढल्यामुळे कागद आणि पेन्सिल दोन्हीची क्वालिटी तेवढी ग्रेट नव्हती आणि चित्र काढायला तरी कुठे फार ग्रेट येत होते पण उत्साह दांडगा होता हे खरं!
पुलंची त्यावर स्वाक्षरी झाली आणि त्या चित्राचं सोनं झालं! :)

(पुलकित)चतुरंग

शेखर's picture

12 Nov 2009 - 3:19 am | शेखर

अप्रतिम हा एकच शब्द....

प्रभो's picture

12 Nov 2009 - 4:58 am | प्रभो

रंगाशेठ...ज ब ह रा......

लवंगी's picture

12 Nov 2009 - 5:08 am | लवंगी

लकी आहात

सहज's picture

12 Nov 2009 - 7:25 am | सहज

मस्त!

तसे मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली!

खरचं की! :-)

Nile's picture

12 Nov 2009 - 5:32 am | Nile

बेस्ट!!!

शाहरुख's picture

12 Nov 2009 - 6:17 am | शाहरुख

मस्त !!

(पुलकित)चतुरंग आवडले..

सुवर्णा's picture

12 Nov 2009 - 12:39 pm | सुवर्णा

मला दिसत नाहीये.. असं का?

सुवर्णा
http://www.suvarnam.blogspot.com/

गणपा's picture

12 Nov 2009 - 3:46 am | गणपा

रंगाशेठ खरच नशिब्वान आहत. भाईकाकांचा हात तुमच्या पाठीवर पडला. त्यांच्या कडुन कौतुक झालं.
वर पीडां काका म्हणाले तस खरच हा परिसस्पर्श.
लहान असताना इतक सुंदर रेखाटन काढलयत....लाजवाब.

नंदन's picture

12 Nov 2009 - 7:42 am | नंदन

आहे, तेचि पुरुष दैवाचे!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Nov 2009 - 4:30 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

बिपिन कार्यकर्ते

टुकुल's picture

12 Nov 2009 - 7:46 am | टुकुल

रंगासेठ, नशिबवान आहात..
लेख आणी चित्र दोन्ही जबरदस्त..

--टुकुल

मदनबाण's picture

12 Nov 2009 - 8:23 am | मदनबाण

लेख आणि चित्र दोन्ही जबरदस्त !!!

मदनबाण.....

sujay's picture

12 Nov 2009 - 8:41 am | sujay

लेख आणि चित्र दोन्ही जबरदस्त !!!

+१

सुजय

भडकमकर मास्तर's picture

12 Nov 2009 - 9:48 am | भडकमकर मास्तर

चित्र मस्त आहे ...
पण पुस्तकाच्या मागच्या बाजूला असलेल्या फोटोवरून केल्यासारखं वाटतंय .. लेखात लिहिल्याप्रमाणे भाषण करणार्‍या पु ल ं ना बघून काढल्यासारखं वाटत नाहीये...
:)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विनायक प्रभू's picture

12 Nov 2009 - 4:08 pm | विनायक प्रभू

भारी रंगाभाई.

sneharani's picture

12 Nov 2009 - 4:16 pm | sneharani

लेख आणि चित्र अतिशय सूंदरच...!!

jaypal's picture

12 Nov 2009 - 9:24 pm | jaypal

रंगाशेठ खरच नशिब्वान आहत. भाईकाकांचा हात तुमच्या पाठीवर पडला. लेख आणि चित्र दोन्ही आवडले.
रामाचा हात पाठीवरुन फिरल्यावरती ती खारुताइ तुमच्या सारखिच शहारली, मोहरली असेल ना?

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

इंटरनेटस्नेही's picture

14 Jun 2010 - 2:14 am | इंटरनेटस्नेही

छान लेख.

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

मीनल's picture

14 Jun 2010 - 5:10 am | मीनल

छान अनुभवाचे छान कथन.
छान फोटो. छान स्वाक्षरी .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

पाषाणभेद's picture

15 Jun 2010 - 4:50 am | पाषाणभेद

तुम्ही भाग्यवान आहात हेच खरं. बाकी मी पण पुलंना बघीतलेय. भाषण वैगेरे आठवत नाही आता.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 6:33 am | शिल्पा ब

साक्षात देवाला तुम्ही पाहिलं नव्हे त्याची शाबासकी मिळवलीत...बाकी पु.ल. गेले तेव्हा अगदी जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख झाले होते...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/