संडे स्पेशल (खांडवी)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
26 Mar 2008 - 6:24 pm

खांडवी (हा एक कोकणातील खाद्यप्रकार आहे.)
साहित्यः
२ वाट्या तांदळाचा रवा (इडली साठी आपण विकत आणतो तो रवा घ्यावा)
२ वाट्या भरून गुळ
४ वाट्या पाणी
१/४ टी.स्पून मीठ
१ टे.स्पून तेल
१/२ टी.स्पून वेलची पूड
१/२ वाटी ओल्या नारळाचा चव
१ मोठा तुकडा आलं किसून
२ टी.स्पून साजुक तूप ताटाला लावून घ्यावे.

१.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो गार होऊ द्यावा.
२.पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवावे. ते चांगले गरम झाले की त्यात मीठ, तेल, गूळ्,आल्याचा कीस, थोडा नारळाचा चव घालुन चमच्याने ढवळावे
३.गॅस बारीक करून त्यात भाजलेला तांदळाचा रवा घालून चांगले ढवळावे व वर झाकण ठेऊन मंद गॅसवर शिजू द्यावे.
४.दोन-तीन वाफा येऊ द्याव्यात, म्हणजे झाकण काढून मधूनच ढवळावे.
५.शिजून घट्टसर गोळा झाला कि तूप लावलेल्या ताटात तो गोळा सारखा पातळसे थापून घ्यावा व वरती उरलेले खोबरे घालून हाताने दाबावे.
६.गार झाले की सुरीने वड्याकापून ट्रे मधे सजवून ठेवाव्यात व वाढतात खांडवी वर साजूक तूप वाढावे.

करायला अगदी सोपे आणि कोणी पाहूणे येणार असतील तर आधी करून ठेवता येते.

मांडणीआस्वाद

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

26 Mar 2008 - 6:35 pm | मनस्वी

नक्की करणार!
चवीला गुळाच्या शिर्‍यासारखे लागते का?
अवांतर : साखरेऐवजी गूळ घालून केलेल्या पदार्थांना वेगळीच मस्त चव असते.

विजुभाऊ's picture

26 Mar 2008 - 6:43 pm | विजुभाऊ

स्वाती ताइ ; गुजराती लोक खांडवी अशी करतात.

गुजराती खांडवी.....
बेसन पीठ , खवलेला नारळ, मिर्ची , कोथिंबीर , लिम्बु , मीठ , साखर , जिरे , मोहोरी फोडणी साठी
प्रथम बेसन पीठ पाण्यात पातळ भिजवावे.पिठले करतो तसे ते उकळावे....घट्ट होत आल्यावर त्याला मोहोरी ची फोडणी द्यावी. चवी पुरते मीठ. घालावे.
खवलेला नारळ त्यात मिर्ची बारीक तुकडे करुन घालावी , थोडी साखर, लिम्बु ,मीठ ,जीरे याचे मिश्रण थोडे तिखटच करावे
बेसन पातळच करावे. ते एक पसरट थाळीत थाळीला थोडे तूप लाउन पातळ थापावे (पोळी इतक्या जाडीचे) गार झाले की त्यावर खवलेल्या नारळाचे मिश्रण भुरभुरावे........
थंड झाल्यानन्तर थाळीत चाकुने सरळ पट्ट्या कराव्या. त्या पट्ट्यांची बाकर वडी सारखी गुंडाळी करावी.
वड्या नाजुक होतात्...वाढताना त्यावर कोथिंबीर घालुन वाढावी.
सु. बेसन करताना लाल तिखटाचा वापर करु नये..मिर्ची च वापरावी...पिवळ्या खांडवी वर हिरवी कोथिंबीर छान दिसते
कळावे आपला...........खाण्यापेक्षा प्रयोग करण्यात मजा जास्त घेणारा
विजुभाऊ

चतुरंग's picture

26 Mar 2008 - 7:19 pm | चतुरंग

तुम्ही इथे हळूच अशी 'सुरळीची वडी' सोडून दिलीत (का गुंडाळून दिलीत?!) आणि आता वीकांतापर्यंत आम्हाला वाट पहाणे आले!

चतुरंग

स्वाती राजेश's picture

26 Mar 2008 - 6:55 pm | स्वाती राजेश

विजुभाऊ, मस्त रेसिपी आहे.
याला आम्ही महारष्ट्रात "सुरळीची वडी" म्हणतो.
आणि फोडणी मधे भाजलेले तीळ सुद्धा टाकतो.

अवांतर : तुमचे पण स्वयंपाकघरामधील अनुभव/रेसिपी येऊ देत. आम्हालाही आवडेल नविन नविन शिकायला.
वाट पाहात आहे.:))))

प्राजु's picture

26 Mar 2008 - 10:01 pm | प्राजु

ही सुरळीची वडीच..
मात्र, खांडवी मात्र एकदम सह्ही.. या संदर्भात एक किस्सा आठवतो..
केव्हा तरी .. आईने मला गूळाच्या सांजा करायला सांगितला होता. मी ऑफिसला जायच्या गडबडीत होते. आईने सांगितले की, रॅक वरच्या डब्यात जाड रवा आहे तो घेऊन, तूपात परत आणि त्यात गूळ, नारळ आणि लवंग घालून कुकरला १-२ शिट्ट्या कर.. पटकन होईल असे सांगून आई कुठेतरी आत गेली. मी १-२ डबे ढुंडाळले आणि रवा घेऊन मस्तपैकी सांजा केला... आणि मी गेले. ऑफिसमध्ये आईचा फोन आला म्हणाली, "तुझा बिंदू चौकात सत्कार करायला हवा." मी विचारले,'का?" म्हणाली, " तू इडली रव्याचा सांजा केला आहेस"... तो सांजा कोणीही विशेष आवडीने नाही खाल्ला. फक्त माझ्या बाबांनी मात्र "खांडवी सारखा झालाय "असं म्हणत खाल्ला.. काय करणार मी केला होता ना तो...बाबाच तेवढे खाणार कसंही झालं असलं तरी..
ही आठवण झाली आता....
- (सर्वव्यापी)प्राजु

'खांडवी' खाऊन किती दिवस झाले?
एकदम आईच्या आठवणीने हळवा झालो हो! आता भारतभेटीत आईला ही फर्माइश असणारच.

चतुरंग

वरदा's picture

26 Mar 2008 - 8:21 pm | वरदा

स्वाती मला का कोण जाणे नेहेमी वाटायचं की खांडवी आपण शिरा करतो त्या रव्याची करतात्..तिथे असताना फक्त खायचं काम करायचे ना..कुठला रवा कोण जाणे मस्त लागतंय ना मग झालं आता करुन पाहेन नक्की सोप्पी वाटली....आल्याची चव लागते का खूप? मी खाल्लेल्या खांडवीत आलं असल्याचं आठवत नाही...

दोन्हीच्या योगे कफ वाढू नये म्हणून आल्याची योजना असावी! ते उष्ण असते आणि कफनाशकही, किंचित स्वादापरते पुरते!
चतुरंग

वरदा's picture

26 Mar 2008 - 8:53 pm | वरदा

पटलं....

स्वाती महेश's picture

27 Mar 2008 - 7:24 am | स्वाती महेश

छान रेसिपी दिलीस स्वाती. ह्यालाच खांतोळी म्हणतात का गं? जम्ल्यास एखादा फोटो पणा टाकत जा.

विसोबा खेचर's picture

27 Mar 2008 - 8:16 am | विसोबा खेचर

मिपाच्या अन्नपूर्णादेवी स्वातीताई यांस,

स न वि वि,

आम्ही खांडवी हा पदार्थ बहुत करून श्रावणात करतो. आपल्याकडे बर्‍याच घरी नागपंचमीला श्रावणी करायची पद्धत आहे. तुम्ही इथे भर उन्हाळ्यात खांडवीची इतकी सुंदर पाकृ दिलीत आणि मला सुखद श्रावण आठवला! तुमच्यासारख्या सिद्ध सुगरणीच्या लेखणीतून उतरलेली ही पाकृदेखील नेहमीप्रमाणेच केवळ सुरेख!

बाकी खांडवी हा खास ठेवणीतला पदार्थ! या पदार्थाची स्वत:ची एक शान आहे, एक मिजास आहे! साजूक आणि खमंग! क्या केहेने! :)

आमची म्हातारीही फार सुरेख खांडवी करते बरं का स्वातीताई! :)

छ्या! काय स्वातीताई तुम्हीपण! अहो सोबत तुम्ही केलेल्या खांडवीचा फोटू जोडला असतात तर मिपाच्या मुखपृष्ठावर झळकवला असता! असो, पुन्हा केव्हातरी तुम्ही केलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटूही पाहायची इच्छा आहे. तुमच्यासारख्या अन्नपूर्णेने केलेले पदार्थ फोटूस्वरुपात नुसते बघूनदेखील आम्हाला आनंद होईल! :)

आपला,
(खांडवीप्रेमी) तात्या.

शैलेश दामले's picture

4 Apr 2008 - 12:08 pm | शैलेश दामले

एक विसरलेला कोकणी पदाथर्