काही केल्या चित्रं चढत नव्हती. पण चतुरंग यांच्या चतुर सल्ल्यामुळे अखेर "गंगेत घोडं न्हालं"
सलामतान (जो जावा लोकांच्य़ा रूढीतला एक समारंभ आहे व ज्याला मी गमतीने जावानीज स्टाईलची "सत्यनारायण पूजा" म्हणतो) हा एक निमधार्मिक विधी आहे. तो साधारणपणे देवाचे आभार मानण्यासाठी किंवा देवाचे आशिर्वाद किंवा अनुग्रह मागण्यासाठी केला जातो. पण घरातल्या एकाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा एकाद्या अपत्याच्या जन्मानंतर ४० दिवसानी किंवा लग्नानंतरसुद्धा केला जातो.
ही रूढी इंडोनेशियात इस्लाम धर्म यायच्या आधीपासूनची आहे व यावर काहीशी हिंदू धर्मात "शांत" करण्याची जी रूढी आहे तशी छाप मला दिसते.
एकाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ ठेवलेले खास भोजन ही सुद्धा एक जावानीज रूढी आहे व तिलाही सलामतान म्हणतात. (आपण श्राद्ध करतो त्यातलाच हा प्रकार असावा). मृत व्यक्तीला आपण तिला विसरलो आहे असे वाटू नये म्हणून जेवणाच्या वेळी एक जादा ताटही ठेवले जाते.
जसा आपल्याकडे शिरा प्रसाद म्हणून केला जातो तसा "नासी तुंपेंग" नावाचा भात जेवणात नक्की असतो. पण इतर जेवण मांसाहारी असते.
पण सलामतान फक्त मृत्यूनंतरच करतात असे नाहीं. लग्नविधीनंतर जी "पार्टी" दिली जाते ती जर छोट्या प्रमाणावर असेल (म्हणजे फक्त घरच्या लोकांसाठी आणि जवळच्या मित्रमंडळींसाठी) तर त्या छोट्या पार्टीलाही "सलामतान" म्हणतात.
नवीन घर घेतले किंवा नव्या घरात प्रवेश केला, पदोन्नती झाली, कुणी जवळचे माणूस दीर्घकालीन आजारातून बरा होऊन नॉर्मल झाला तरही सलामतान केले जाते. त्याचा मुख्य हेतू देवाचे आभार मानणे किंवा देवाकडून आशिर्वाद किंवा अनुग्रह मागणे हेच असते.
अर्थात यातली माहिती माझ्या इंडोनेशियन मित्रांच्या सांगण्यातून कळलेली व वाचलेली आहे. अर्थात लक्ष्मी मित्तल यांच्या सुरबाया येथील इस्पातच्या कारखान्यात व इथे जकार्ता चक्रातुंगल कारखान्यात मात्र माझ्या हस्ते हा विधी ३-४ वेळा झालेला आहे तो thanksgiving and seeking blessings च्या स्वरूपातलाच होता.
म्हणूनच जेंव्हा दरमहा १७,०००/१८,००० टन बनवणार्या कंपनीत आमच्या भारतीय चमूने ३०,००० टनाचा पल्ला गाठला तेंव्हा मी खास माझ्या साहेबांना (प्रेसिडेंट डायरेक्टरना) सांगून हा समारंभ करवला होता. या आधी आमच्या साहेबांनी स्वत:हून हा समारंभ केला होता कारण माझ्या आगमनानंतर सहा महिन्यातच एक मोठा अपघात होता-होता टळला होता.
मुस्लिम धर्मात मूर्तिपूजा बसत नसल्याने या "पूजा" म्हणजे प्रार्थना करणे (साधारणपणे कुराण या मुस्लिम पवित्र ग्रंथातील काही भाग वाचण्यात येतो), स्वागत करणे व ज्यासाठी सलामतान केले त्याबद्दल बोलणे. माझ्या भाषणात १७,००० टनावरून आम्ही ३०,००० टनापर्यंत कसे आलो याचा गोषवारा थोडक्यात घेतला व त्याबद्दल देवाचे आभार मानले. (इंडोनेशियन भाषेत "तुहान Tuhan" हा शब्द सर्व देवांना लागू आहे) तसेच आगामी नजीकच्या भविष्यात आमची कंपनी काय करणार (new investments etc) हेही सांगितले. सांगायला अभिमान व आनंद वाटतो की आज आम्ही दरमहा ४०,००० टन आकड्याच्या आसपास आहोत व ५०,०००चा आकडा आमच्या डोळ्यासमोर नाचतोय व येत्या दोन वर्षात तो आकडाही देवाच्या कृपेने आम्ही गाठू!
आता पहा खालील फोटो:
उस्ताद झैनुद्दिन प्रार्थना करत आहे व देवाचे आशिर्वाद मागत आहे.
आमचे ऑफिस मॅनेजर स्वागत करीत आहेत. मांडी घालून बसणे इथेही प्रचलित आहे.
आम्ही काही वरिष्ठ अधिकारी आपापसात चर्चा करीत असताना.
आमचे पर्यवेक्षक (supervisors) व कामगार वर्ग पूजेला आला आहे.
प्रसाद तयार आहे.
आमच्या कंपनीतील गौरांगना प्रसादवाटपासाठी सज्ज आहेत.
मी यश दिल्याबद्दल देवाचे आभार मानत असताना.
इथल्या रूढीप्रमाणे जो सलमतान करतो त्याला प्रसादाचा शंकू कापून वरचा भाग एका "द्रोणा"त घालून त्याच्या ज्यूनियरला द्यायचा असतो. त्यासाठी आपल्याकडे गवंडी वापरतात तसली 'थापी' वापरली जाते. मी भाताचा शंकू कापताना.
माझ्या डावीकडे उभी असलेली मुलगी बालीची वायान नावाची हिंदू मुलगी आहे.
मी द्रोणात प्रसादाचा भात ठेवून तो द्रोण माझ्या उजवीकडे उभ्या असलेल्या श्री अगुस पातमोनो यांना द्यायच्या तयारीत आहे.
प्रसादाचा द्रोण श्री अगुस पातमोनो यांना देताना.
माझे सहकारी संचालक श्री योहनेस प्रसाद रोलिंग मिलचे डीजीएम श्री अंतोन याना देताना
प्रतिक्रिया
18 Sep 2009 - 7:59 am | सुधीर काळे
दोन वर्षांपूर्वीचा माझा फोटो पाहिल्यावर त्यावेळी माझे वजन जवळ-जवळ ५ किलोनी जास्त होते हे लक्षात आले.
कारखान्याच्या उत्पादनवाढीत मिळालेल्या नफ्यापेक्षा हे "वैयक्तीक तोट्या"चे यश जास्त महत्वाचे!!
हाहाहा!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
18 Sep 2009 - 8:07 am | निमीत्त मात्र
मस्त फोटो. काळेजी तुम्ही अगदी डिट्टो 'जे लेनो' सारखे दिसता. हातात माइ़क घेतलेला फोटो पाहून तर तुम्ही स्ट्यांड अप कॉमेडी करत आहात असेच वाटत आहे.![](http://media.gomemphis.com/gmem/content/img/photos/2009/04/03/TV_Boston_Jay_Leno.JPG)
18 Sep 2009 - 8:54 am | सुधीर काळे
वाsssssssssssव! (WOW चे मराठीकरण)
हे खरे आहे की जो लेनोसुद्धा जरा "स्थूलिश"च आहेत! (पुलंची क्षमा मागून)
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
18 Sep 2009 - 9:03 am | सुबक ठेंगणी
जे लेनो लाही मिशी नाही!
प्रसाद बेस्ट!
(बाकी आत्ताच jay हा शब्द डिक्शनरीत तपासला! लई करमणूक झाली ;) )
19 Sep 2009 - 9:25 am | Nile
=)) =))
बाकी काळे साहेब,
हे(तुमच्या मते) अपयश घालवण्याकरता मिशा वाढवुन पहायला काय हरकत आहे? ;)
इंडोनेशीयात पण लोक धर्म, जात, पात वगैरे वर भांडत बसतात का हो?
19 Sep 2009 - 3:47 pm | सुधीर काळे
<<हे (तुमच्या मते) अपयश घालवण्याकरता मिशा वाढवुन पहायला काय हरकत आहे?>> छे, छे! विषाची परीक्षा नाही घ्यायची!
<<इंडोनेशीयात पण लोक धर्म, जात, पात वगैरे वर भांडत बसतात का हो?>> या विषयावर व्यक्ती तितकी मते अशी परिस्थिती आहे. ८८ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात आपल्या देशाच्या मानाने चांगलीच सहिष्णुता आहे व त्याची जी कारणे मला दिसतात ती अशी
(१) इथे लोकशाही नव्हती तेंव्हा स्वत: सौ. सुहार्तो जन्माने मुस्लिम नसल्यामुळे (त्यांनी नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला होता) सरकार-दरबारीच "तसा" कडवेपणा नव्हता
(२) आता लोकशाही आली तरी "मतांसाठी अल्पसंख्यांकांचा अनुनय" करायची कल्पना इथे अजून कुणाला आली नसावी. त्यामुळे आपल्याकडे आहे तसा इथे प्रॉब्लेम नाही. इथल्या हिंदूंना काशी-रामेश्वराची यात्रा करायची असेल तर पूर्ण खर्च स्वत:लाच करावा लागतो. पण याविषयावर आम्ही जास्त माहिती विचारायचे टाळतो.
मूळ मुस्लिम धर्म (ज्याला इथे NU-Nahdlatul Ulama म्ह्णतात) व महमदिया व अहमदिया हे पंथ यांच्यात असलेले मतभेद वृत्तपत्रांत वाचायला मिळतात तितकेच.
(३) सुहार्तो साहेबांच्या काळी ते सैन्यातील अत्युच्च पदावर कॅथॉलिक धर्माचे लोक (बेनी मुर्दानीसारखे) नेमत कारण हे कॅथॉलिक लोक अल्पसंख्य असल्यामुळे सत्ता बळकावणार नाहीत याबद्दल सुहार्तोसाहेब निश्चिंत असत असे म्हणतात. सुहर्तोंच्या काळी अशा उच्च पदावर ख्रिश्चन लोक बर्याच प्रमाणावर होते.
(४) थोडक्याता काय? तर इथेही जात-पात/धर्म वगैरे मानतात व पाळतात, पण इथे कुठलीच गोष्ट "कट्टर" नसते त्यामुळे हे प्रकार काहीसे 'undercurrents 'च्या स्वरूपातच असतात.
ही माझी मते वैयक्तिक असून माझ्या तुटपुंज्या निरीक्षणांवर, तुटपुंज्या वाचनावर व माझ्या इंडोनेशियन मित्रांबरोबर केलेल्या तुटपुंज्या चर्चेवर आधारित आहेत.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
18 Sep 2009 - 11:51 am | सुधीर काळे
मी पण डिक्शनरीत अर्थ पाहिला. पण खरा अर्थ कुठेच सापडला नाही. (Jay as in jay-walking).
पण त्या अर्थाने जर लिहिले असेल तर आपले निरीक्षण छान आहे! साकीने पाजलेली 'साके' "कांपाssssइsss" करत-करत जास्त प्राशन केली की "जे-वॉकिंग" होते खरे!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
18 Sep 2009 - 10:03 pm | JAGOMOHANPYARE
सत्यनारायणाची पूजा बन्गालमधील एका मुस्लीम पिराच्या पुजेशी ( !) नाते सान्गते, असे मीही वाचले आहे..... पण तुम्ही तर ही पुजा इस्लाम पूर्वीही होती, अशी माहिती दिलीत.. माहितीत भर पडली ( १०००० टनान्ची तरी असेल !) :) शुभेच्छा...
19 Sep 2009 - 9:15 am | सुधीर काळे
ज्या तीघांनी प्रतिक्रिया दिली त्यांना धन्यवाद!
मला वाटले होते तितका हा लेख मिपाकरांना अपील झाला नाही हे मात्र खरे. अजून मिपाकरांची आवड-निवड पूर्णपणे समजली नाहींय!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
19 Sep 2009 - 9:26 am | एकलव्य
यथासांग मांडलेली पूजा आवडली. आपल्या सगळ्याच सहकार्यांच्या चेहर्यावरचे हास्य आवडले.
- एकलव्य
19 Sep 2009 - 3:10 pm | सुधीर काळे
आपल्या सूक्ष्मनिरीक्षणशक्तीला दाद देतो. खरंच आहे आपण म्हणताय् ते. आमच्या कंपनीत ३०,००० टन बनतील असे कुणालाच वाटले नव्हते व तो टप्पा गाठल्यावर लोकांना मनापासून आनंद झाला होता. या आधी एक-दोनदा अगदी हाता-तोंडाशी आलेला घास २९,००० टनावर हातातून निसटला होता व त्यामुळे यावेळी लोकांत खरा "एंथ्यू" होता.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
19 Sep 2009 - 12:53 pm | पर्नल नेने मराठे
प्रसादाचे ताट पाहुन सिझलर्सची आठ्वण आली =P~
चुचु
19 Sep 2009 - 3:04 pm | सुधीर काळे
पर्नल,
तुझा प्रतिसाद अगदी अस्सल (original) आणि एकमेवाद्वितिय (unique) आहे हं! सुरेख!!
प्रसाद दिसतोय् खरंच "सिझलर"सारखा! पण आपल्यात-तुपल्यात सांगायचं तर तो सत्यनारायणाच्या प्रसादासारखा किंवा सिझलरसारखा चवदार नसतो तर अगदी बेचव असतो!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
19 Sep 2009 - 4:07 pm | पर्नल नेने मराठे
:S अग बबो
चुचु
19 Sep 2009 - 1:07 pm | ऋषिकेश
यानिमित्ताने उपक्रमावरील ही चर्चा आठवली (त्या लेखातील प्रतिसाद पहा)
ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ०५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "तू शाम मेरा| साचा नाम तेरा...."
19 Sep 2009 - 10:01 pm | सुधीर काळे
या दुव्याची Executive summary दिली असतीत तर वाचलाही असता!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
19 Sep 2009 - 4:05 pm | अमोल केळकर
वा साहेब,
मस्त आले आहेत फोटो. इडोनेशीयातील पुजेची माहिती छान
अवांतर
तुमचा फोटो ऑफीस मधे ( मुकंद ) सहकार्यांना दाखवला तसेच माझी ओळख आहे अशी फुशारकी ही केली.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
19 Sep 2009 - 5:58 pm | भोचक
छान लेख. वेगळी माहिती मिळाली. बाय द वे इंडोनेशियात हिंदूंची संख्या किती असावी? शिवाय तिथले मुस्लिम आणि त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन या विषयीही वाचायला आवडेल. आखाती देशातील मुस्लिमांविषयी ढोबळमानाने (आणि बिकांच्या कृपेने) थो़डीफार माहिती असल्याने, आता पौर्वात्य मुस्लिमांविषयी उत्सुकता आहे इतकंच.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती
19 Sep 2009 - 9:53 pm | सुधीर काळे
खरंच पौर्वात्य मुस्लिमांबद्दल लिहायचा विचार आहे!
पण इंडोनेशियन मुस्लिम लोक व मलेशियन मुस्लिम लोक पौर्वात्य असले तरी सारखे नाहीत असा माझा अनुभव आहे.
मी पत्रकार नाही मेटॅलर्जीतला इंजिनियर आहे. तुमचे कौतुक डावखोरे नव्हते (left-handed compliment) अशी आशा आहे!
पण मेटॅलर्जीशिवाय इतर वाचनच जास्त आहे हे मात्र खरे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
19 Sep 2009 - 9:59 pm | सुधीर काळे
माझ्या वाचनाप्रमाणे इथे हिंदू ३ टक्के आहेत म्हणजे २५ कोटीच्या ३ टक्के (७५ लाख). आता फक्त बालीतच राहिले नसून पोटापण्यासाठी/नोकरीधंद्यासाठी सगळीकडे पसरले आहेत. बालीत मात्र कदाचित ९० टक्क्याहून जास्त लोक हिंदू आहेत.
ख्रिश्चन (कॅथॉलिक व प्रोटेस्टंट मिळून) ९ टक्के (सव्वादोन कोटी)
सुधीर
20 Sep 2009 - 2:05 pm | प्रसन्न केसकर
कसा कुणाला माहिती हा लेख नजरेतुन सुटला होता. आत्ताच वाचला आणि आवडला. इंडोनेशियन लोक, तिथलं समाजजीवन, चालीरीती याबाबत अजुन लिहिलत तर वाचायला नक्कीच आवडेल.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
21 Sep 2009 - 8:05 am | पारंबीचा भापू
कल्पना मस्त. माझाही पुणेरीसायबाच्या कल्पनेला पाठिंबा आहे.
भापू