७.४७ ची दादर कल्याण लोकल.
तोच ठराविक डबा.
तोच नेहेमीचा ६ जणांचा ग्रुप.
अर्थात मला कधी बसायला मिळाले नाही.
गाडी प्लॅटफॉर्म मधे शिरता शिरता घुसायचे प्रयोग सध्या करत नाही.
डब्यात शिरल्यावर डाव्या बाजुच्या ठराविक सहा आसने ह्याना दरदिवशी मिळतात.
दिवसभर गांजलेले हे महापुरुष ह्या एक तासाचा रिचार्जिंग साठी उपयोग करतात.
मैत्री, असुया संवाद, विसंवाद सर्व काही.
कधी आवरणातले, कधी अगदी मोकळे.
आजुबाजुचे काय म्हणतील ह्याची अजिबात पर्वा नाही.
पत्ते खेळत नाहीत, भजन म्हणत नाहीत.
सुख दु:खाच्या मोकळ्या गप्पा.
सर्व जण ४५ ते ५० चे
कित्येक वर्षाचे 'लोकल नाते'
गेले जवळ जवळ महीनाभर दादरवरुन येताना मी हीच लोकल पकडतो.
__________________________________________________________________________________
१: आयला, समोर दहा मिनिटे झाली गाडी नाही. फुल ग्रीन सिग्नल आहे तरी हा गाडी अशी हळु का चालवतो आहे रे?
५: येताना सांडल्या होत्या त्या शोधतो आहे.
आजुबाजुचे सर्व जण खी खीखी मधे सामील.
१. सांडल्यावरुन आठवले, साल्या गेले दोन दिवस तु कुठे सांडला होतास रे?
४: अरे अंगारिकेला उपाशी पोटावर काम करावेसे वाटत नाही.
१: अहो साहेब जरा बाजुला व्हा(मला). तोंड बघु दे रे तुझे. तुला काय मी माजी राष्ट्रपती वाटलो काय?
इथे मी खीक करुन हसलो.
बाकीचे गोंधळलेले.
३: मंजे काय रे?
१: ह्याचे फिजिक्स मला बरोबर माहीत आहे रे. साल्याने अंगारिकेनिमित्त ' यशस्वी अणुस्फोट" केला असणार. उपासाच्या निमित्ताने उपास सोडला असणार. दुसर्या दिवशी श्रम परिहार. मला
सांगतोय. सांभाळुन हां. आधी ब्लड प्रेशर चेक कर. शुगर चेक कर. अशाच गोळ्या घेतल्यास तर मरशील नको त्या वेळी कचकशील. आणि तुला बंद पेटीत न्यावा लागेल. नाहीतर सगळ्या जगाला कळेल तु कसा मेलास ते.
सर्व जंण हॅहॅहॅहॅहॅ
४ नंबर लाजला.
२: तुझे काय रे?
१: हॅ आपल्या कडे तसा काय प्रॉब्लेम नाय. बायकोने अमुक तमुक बाबांचा ताईत घातल्यापासुन सर्व बंद.
३: अरे बाबांवरुन आठवले. काल माझ्याकडे पेपर आला नाही. पेपर वाचल्याशिवाय आपला हिसाब बरोबर होत नाही.म्हणुन शेजार्याकडे पेपर मागायला गेलो. बघतो तर तिथे कोण तरी बाबा आला होता. आमचा शेजारी पण वेडझवा रे. त्या बाबाने अमुक कोच तमुक कडे ठेवा. कसला तरी पुतळा दक्षिणे कडे ठेवा. चपलांचा स्टँड हलवा हे सांगायचे १५०० रुपये घेतले. आयला लोक पण 'मुंडण' करणारे शोधतच असतात. हा दर महीन्याला नवा ज्योतिषी शोधत असतो. बाबा मला म्हणाला तुमच्यात आणि तुमच्या बायकोत काही विसंवाद आहेत का? आता लग्नाच्या १८ वर्षानंतर ते सगळ्यात असतात? माझी पत्रिका मागत होता शेजारी.
मी म्हणालो माझ्या दोन पत्रिका आहेत. प्रायमरी वर वेगळी जन्मतारीख. सेकंडरी वर वेगळी जन्मतारीख. बाबाच्या तोंडावर 'हजामतीचे गिर्हाईक गेले 'ची निराशा दिसली.
५:विसंवाद? आता बघ, मुंबरा जवळ आले की माझी बायको फोन करेल. २ रुपयाची कोथंबीर आणायला १ रुपया टॉक टाइम बरबाद करेल.
३: अरे तसे नसते ते. त्यांना पण कनेक्टेड राहवेसे वाटले की फोन करतात.
५: आवशीचो घोव. मी कुठे बार मधे जाणार नाही ह्याची खात्री करते. आता नाही जावेसे वाटत रे पहिल्यासारखे. अपराधी वाटते. मुलांच्या शिक्षणाचे ख्रर्च डोळ्यासमोर नाचतात. आणि कितीही सांगीतले मी बदललो आहे ते पटत नाही.
२: सगळे बदलतील पण भारत सरकार बदलणार नाही.
' मी हकीकत' बघितला आणि अक्षरशः रडलो होतो. आणि आज ही परिस्थिती तीच आहे. न फुटणारे हँड ग्रेनेड, धुरकटलेले नाईट विजन्स, क्विट इंडीया मुवमेंट च्या रायफली. आणि म्हणतात ' घास रोज अडतो ओठी". तोफेच्या तोंडी दिले पाहीजेत ह्यांना.
१: ती पण ऐनवेळी चालणार नाही. त्या पेक्षा माझ्या बायकोच्या तोंडी द्या.
३: एवढ्या काही वाईट नाही हां वहीनी.
१: अरे बाबा पोराची फी द्यायला कॉलेजमधे गेलो होतो. हा दिसला मला. कॉलेजच्या आवारात एका पोरीला खेटुन बसला होता. घरी जाउन समाचार घेउया म्हटले तर बुट काढायच्या आधीच ही करवादली. "त्याला काहीही बोलु नका. तुम्हाला पटणार नाही ते. आता जमाना बदलला आहे." मी गप्प बसलो. उद्या पोरगी बसायची थांबली तर मला हाक मारु नका हे सांगुन टाकले.
२: खरच कारे जमाना बदलला. असेल तीच्यामारी.'मेरेसे कम उम्र के लडकेसे मुझे प्यार है' आपको क्या लगता है ची जाहिरात वाचली की वाटते आपल्या पोरांचे काय होणार?
५: काय होणार कोणास ठाउ़क? आयला माझा मला म्हणतो, " बाबा ११वीत मार्क नाय पडले तर ओरडायचे नाय. पहीलेच कॉलेज १ महीना उशीरा. त्यात स्वाईन फ्लु ने आणखी दहा दिवस बंद. आता निवडणूक. प्रोफेसर्स निवड्णुक ड्युटी वर. म्हणजे ११वी चे बारा वाजले की. चटावरच्या श्राद्धासारखे उरकणार हे वर्ष. मरु दे. जे होईल ते पाहुन घेउ.
२: चल मरु दे रे ते. ठाणा येतेय जरा बटाटेवडे मागवा. आज माझ्या घरी भोपळ्याची भा़जी आहे. डब्यात पण तीच होती. आता रात्री पण तीच खायची आहे.
प्रतिक्रिया
17 Sep 2009 - 5:03 pm | अवलिया
लेख ठीक. पुढील लेखाला शुभेच्छा !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
17 Sep 2009 - 5:23 pm | दशानन
अती झालं हसू आलं !
:|
17 Sep 2009 - 5:32 pm | सूहास (not verified)
तीन वेळा वाचाव लागला !!
सो, "नॉट ओन्ली मिस्टर विनायक प्रभु"
सू हा स...
17 Sep 2009 - 6:09 pm | llपुण्याचे पेशवेll
वाहवा! लेख नेहमीप्रमाणेच छान. मध्यमवर्गीयांची वेदना आणि त्यांच्या मुलांच्या दबलेल्या भावना यांची व्यथा नेमक्या शब्दात पकडली आहे.
>>त्याला काहीही बोलु नका. तुम्हाला पटणार नाही ते. आता जमाना बदलला आहे." मी गप्प बसलो. उद्या पोरगी बसायची थांबली तर मला हाक मारु नका हे सांगुन टाकले. <<
ही वाक्ये तर विचारप्रवर्तक वाचली.. विप्रंचे अनुभवविश्व फार समृद्ध आहे. पण त्यांच्या क्रिप्टीक लेखनाचा लाभ इतराना फार कमीवेळा होतो. असो.
असेच लिहीत रहा.
-(समीक्षक) पुण्याचे पेशवे
17 Sep 2009 - 7:38 pm | सहज
गाडी सुरु झाली. मस्त!