अर्धा कप चहा
चहा पिणं हा तसा प्रत्येकाचा आवडता शौक .मी तसा सतत फिरत असल्यामुळे कुठेनंकुठे अर्धा कप चहा आमचा होतचं असतो.अगदी ए.सी. रुमअमध्ये बसून नाहीतर चहाच्या टपरीवर चक्क उभं राहून.वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या चवीचे चहा मी रिचवला आहे.
सरकारी कार्यालयात कामानिमित्त नेहमीच फेर्या होत असतात,असाच एकदा कार्यालयात चहा मागविण्यात आला.चहा घेऊन येणारा ‘पोर्या‘ असेल १०-१२ वर्षाचा! .हातात चहाची किटली आणि बोटात अडकवलेले कप.कपात चहा ओतून तो दरवाजाजवळ आमचा चहा संपायची वाट पाहात उभा होता.सहज माझी नजर त्याच्या हाताकडे गेली.त्याच्या मनगटावर मला एक डाग दिसला.मी त्याला विचारलं ‘हा डाग कसला ?’ माझ्या प्रश्नावर तो घाबरला,रडवेलाही झाला.खूप वेळा विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं ‘मालकाने गरम झारीचा डाग दिला,हातून चहाचा कप फुटला म्हणून ’.मला त्याला खूप काही विचारायचे होते त्याचे नाव.. त्याचे गाव .पण मालक ओरडेल या भितीनं तो काहिही न बोलता चहाचे कप उचलून निघून गेला.सहज चर्चा करताकरता एवढच कळल कि त्याला ५०० रु.पगार मिळतो आणि ते पैसे तो घरी पाठवतो.
दिवसभर त्याचा विचार मनात घोळत होता.हाँटेलातील तो पोर्या ...त्यांची नाव पण अशीच छोटया ,बारक्या, काळ्या..असे लाखों बालमजूर आज आपल्यात वावरतात
सायंकाळी घरी आलो.कंटाळा घालवण्यासाठी टि.व्ही लावला.. टि.व्ही वर जाहिरात लागली होती.एस्सल वर्ड में रहुंगा मै...घर नही जाऊंगा मै.....हसणारी..आगगाडीत बसणारी...बागडणारी मुलं या जाहिरातीत खूप मजा करत होती.आपल्याला,आपल्या मुलांना अगदी तोंडपाठ झालेली ही जाहिरात.
एकिकडे हसणारी..बागडणारी मुलं आणि त्यावर सहज उडविले जाणारे २००-३०० रुपये.आपल्या देशात केवढी ही विषमता.
महासत्ताक बनू पाहणार्या माझ्या भारतात आजही कित्येक गल्ली-बोळात ,टपरीवर, हातगाडीवर हजारों छोटया ,बारक्या, काळ्या फक्त जगण्यासाठी धडपडत आहेत हे मला त्या अर्धा कप चहाने दाखवून दिलय.
............................................................................................................................
प्रतिक्रिया
13 Sep 2009 - 11:24 pm | रेवती
हातगाडीवर हजारों छोटया ,बारक्या, काळ्या फक्त जगण्यासाठी धडपडत आहेत हे मला त्या अर्धा कप चहाने दाखवून दिलय.
तरीही लोकसंख्या वाढतीच आहे. लोक सरकरच्या नावे खडे फोडताहेत. शेवटी ढिगभर मुलं होणार लोकांना..... त्यांची जबाबदारी कुणी घ्यायची? सरकारनी? मग येतात अशी मुलं, मुली रस्त्यावर! चहाच्या टपरीवर आली तर नशिब चांगलं म्हणायला हवं नाहीतर बघायला आणि ऐकायला नको वाटेल अशी कामे लहान वयात फक्त मुलीच नाही तर मुलेही करताना आढळतात. त्यात त्यांची काही चूक नसते. आपल्याला मात्र वाईट वाटत राहतं.
रेवती
14 Sep 2009 - 12:07 am | प्रभाकर पेठकर
मालकाने गरम झारीचा डाग दिला,हातून चहाचा कप फुटला म्हणून
फारच अमानुष. अशा मालकांना शोधून, पकडून सरकारने तीच शिक्षा केली पाहीजे.
५०० रू. पगार हा कधीचा काळ आहे? मला वाटते हल्ली दीड ते दोन हजार मिळतात. (वर मिळणारी 'टीप' वेगळी.) आजकाल कोणी ५०० रू. देऊन महिनाभर ८-१० तास राबऊन घेत असेल तर तो मालक माणूस नाही, राक्षस म्हणावा लागेल.
एकिकडे हसणारी..बागडणारी मुलं आणि त्यावर सहज उडविले जाणारे २००-३०० रुपये.
आपल्यापेक्षा श्रीमंत/नवश्रीमंत/गर्भश्रीमंत/काळाबाजारवाले तसेच गैरकानूनी मार्गाने आर्थिक भरभराटीस आलेले अनेक पालक २-३ हजार खर्च करीत असतील. हा भेद राहणारच. अनेक देशांमध्ये आहे, फक्त भारतात नाही. (हे समर्थन नाही, वास्तव आहे.)
गावाकडे एका कुटुंबात अनेक मुले (ही चूक कोणाची?) आणि तुटपुंजी मिळकत (शेतीवरील रोजंदारीची कामे) अशी परिस्थिती खूप घरातून असते. (उदा. केरळ राज्य). अशा कुटुंबातून एखादा मुलगा शहरात जाऊन निदान स्वतःचे पोट भरू शकला तरी त्याच्या गावाकडच्या कुटुंबाला फार मोठी मदत होते. त्यातुन तो काही पैसे वाचवून घरी पाठवत असेल तर ते सत्कर्मच म्हणावे लागेल.
अशा कामगार मुलांचा शिक्षणाचा खर्च करावा म्हंटला तरी ती मुलं तयार नसतात. फार कमी मुलांना शिक्षणाची आवड असते. पण एक नक्की होऊ शकते. त्यातील काही मुले आहे त्याच व्यवसायाचे बरेचसे बारकावे शिकून एक दिवस एखाद्या नाक्यावर चहाची टपरी टाकतात. मुळात अंगी धाडस असेल तर त्या परिस्थितीतूनही ती मुले उन्नती साधतात. असो.
लेखामागील कळकळ समजली. जिथे शक्य होईल तिथे अशा एखाद्या मुलाला 'मोठा' होण्यासाठी मदत करावी.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
14 Sep 2009 - 12:19 am | टारझन
झोपडपट्टीवाल्यांना सक्तिची नसबंदी झाली पाहिझे !! ;)
बाकी अशा गोष्टींना हळहळ व्यक्त करण्यापलिकडे काही करू शकत नाही.
इथे आमचीच आम्हाला भ्रांत पडते तिकडे पोर्याच्या नशीबाची चिंता करणारा मी कोण बाबा देव ?
बाकी लेखकानं जर चहाटपरी मालकांची कंप्लेंट पोलिसाकडे करून इथे त्याचा धागा टाकला असता तर कौतुक वाटलं असतं !
सदर लेख वाचून कुठचीही मानसिक स्थिती बदलली नाही !
- (चहाप्रेमी) टी.
14 Sep 2009 - 6:58 am | लवंगी
परिस्थिती, गरीबी इत्यादि पण त्या लहानग्यांचा काय दोष आहे यात? आपल्याला जमेल तशी मग एका मुलाला का होईना जरूर मदत करावी.
14 Sep 2009 - 7:28 am | अमृतांजन
भारतासारख्या अनेक देशांत हा प्रश्न फक्त लहान मुलांचाच नव्हे तर वृद्ध व्यक्तिंचाही आहे. एखाद्या बांधकामच्या ठिकाणी नजर टाका- बाल तसेच अतिशय वृद्ध लोक कामे करतांना दिसतील.
हे पाहिले की, मन निराश होतेच, हतबलता येते. पण मग मी स्वतःला प्रश्न विचारतो की, आपण जरी ह्यांच्यासाठी काही करु शकत नसू तरी आपल्या भोवती आपले जे सगे-सोबती आहेत त्यांच्यासाठीतरी मी जे काही करावेसे वाटते ते करत आहे का? त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, मेंटॉरींग करणे, त्यांच्याशी बोलणे, शक्य तेव्हढ्या पैशाची मदत करणे, ई. ते जरी आपण करु शकलो तरी पुष्कळ असे वाटते.
14 Sep 2009 - 1:16 pm | प्रसन्न केसकर
भाऊ.... अनेकदा अशी मुलं घरातुन पळुन आलेली असतात किंवा निराधार असतात. त्यांचे हाल तर कुत्रा खात नाही. बर्याच वर्षापुर्वी एक माणुस बिहारमधुन घरुन पळुन गेलेल्या त्याच्या सहा सात वर्षाच्या मुलाला शोधत पुण्यात आला होता. त्याला मुलगा शोधायला मदत करताना अश्या मुला-मुलींना नोकरी मिळवुन देण्याच्या बहाण्याने त्यांची खरेदी विक्री करणार्या रॅकेटमधे घुसलो होतो. तेव्हा त्या मुलांनी सांगितलेल्या कथा आठवल्या की अजुनही अंगावर शहारे येतात.
14 Sep 2009 - 1:23 pm | सहज
सुखाने चहादेखील पिउ देउ नका. खरेखुरे भयकथा लेखक आहात.
कॉफी प्यायला लागलोय. नकोच तो चहा. मशीनमधली एक्प्रेसो बरी
14 Sep 2009 - 2:34 pm | अभिज्ञ
"सलाम बॉम्बे" या चित्रपटा मध्ये अशा मुलाचे प्रभावी चित्रण पहायला मिळते.
या मुलाचे चित्रपटातील नाव देखील "चायपाव"च असे आहे.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.