घर ते माझे बालपणीचे
रंगबिरंगी आठवणीचे..
आईबाबांच्या पंखाखाली
मांडलेल्या भातुकलीचे..
प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी
वेल जुईची बहरली होती..
सैरवैर त्या अंगणी माझी
इवली पाऊले नाचली होती..
झोपाळ्याची जुनीच करकर
सवे चिऊकाऊच्या गोष्टी..
त्यामागूनी सूरांत होतसे
तिन्हीसांजेची शुभंकरोती..
एकेक पायरी यशाची ती
चढले ज्याच्या बळावरी..
घर ते माझे उभे पाठीशी
उनपाऊस घेत शिरी..
कधी न वाटे मला एकटे
घर ते माझे सखा सोबती..
कितिक गुपिते दोघांमधली
जपून त्याने ठेवली होती...
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते..
त्या मायेच्या आठवणीने
उर दाटून येई कोण..
घरट्यावरूनी त्या माझ्या
उतरून टाकेन लिंबलोण...
- प्राजु.
प्रतिक्रिया
13 Dec 2007 - 12:50 am | विसोबा खेचर
झोपाळ्याची जुनीच करकर
सवे चिऊकाऊच्या गोष्टी..
त्यामागूनी सूरांत होतसे
तिन्हीसांजेची शुभंकरोती..
त्या मायेच्या आठवणीने
उर दाटून येई कोण..
घरट्यावरूनी त्या माझ्या
उतरून टाकेन लिंबलोण...
वा! वा! अतिशय सुरेख कविता...
जियो..
आपला,
(हळवा) तात्या.
13 Dec 2007 - 12:57 am | प्राजु
इतक्या लवकर प्रतिसाद पाठवलात... बरं वाटलं.
- प्राजु.
13 Dec 2007 - 12:59 am | स्वाती राजेश
खूपच छान कविता.
त्या मायेच्या आठवणीने
उर दाटून येई कोण..
घरट्यावरूनी त्या माझ्या
उतरून टाकेन लिंबलोण...
ही सुन्दर कल्पना.
13 Dec 2007 - 8:56 am | पुष्कर
"कधी न वाटे मला एकटे
घर ते माझे सखा सोबती..
कितिक गुपिते दोघांमधली
जपून त्याने ठेवली होती...
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते.."
या ओळी विशेष आवडल्या.
-पुष्कर
13 Dec 2007 - 11:20 am | आनंदयात्री
म्हणतो .... दिवसेंदिवस प्राजुच्या कविता अधिकाधिक सुंदर अन प्रगल्भ होत आहेत हो ... और भी लिख्खो ...
13 Dec 2007 - 3:15 pm | विजय पाटील
नमस्कार प्राजुताई,
अतिशय सुंदर कविता. मनापासुन आवडली.
--विजय
13 Dec 2007 - 8:20 pm | प्राजु
आपणा सर्वांचे मानापासून धन्यवाद.
- प्राजु.
14 Dec 2007 - 6:00 pm | शलाका पेंडसे
छानच कविता आहे. माहेरची खूप आठवण झाली.
14 Dec 2007 - 10:27 pm | राजे (not verified)
"झोपाळ्याची जुनीच करकर
सवे चिऊकाऊच्या गोष्टी..
त्यामागूनी सूरांत होतसे
तिन्हीसांजेची शुभंकरोती.."
सुंदर ओळी...
विषयांतर : कोणाला ही""शुभंकरोती.." पुर्ण येते का हो ? असेल तर लिहा येथे.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
14 Dec 2007 - 10:32 pm | ऋषिकेश
शुभंकरोति कल्याणं
आरोग्यं धनसंपदां
शत्रुबुद्धीविनाशाय
दिपज्योती नमोस्तुते
(मला इतकाच माहित आहे. पुढे आम्ही दिव्य दिव्या दिपत्कार.... म्हणतो :) )
(तिन्हीसांजेचा भक्त)ऋषिकेश
14 Dec 2007 - 10:35 pm | राजे (not verified)
"पुढे आम्ही दिव्य दिव्या दिपत्कार.... म्हणतो :) )"
हे मस्तच पण आम्हाला जरा पुर्ण हवे होते हो.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
14 Dec 2007 - 11:09 pm | प्राजु
दिव्या दिव्या दिपत्कार,
कानी कुंडले मोती हार,
दिव्याला पाहून नमस्कार...
सांज होवो दिवा लागो देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी...
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देव माझा पडावा
उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणे हेची आता..
जय जय रघुवीर समर्थ.............
- प्राजु.
5 Sep 2009 - 5:13 am | पक्या
सुंदर कविता.
वर तुम्ही 'दिव्या दिव्या ' लिहीले आहे त्यात एक चूक आढळली. कदाचित टायपो पण असू शकेल. पण ज्यांना माहित नाही त्यांना अर्थ नी ट लागणार नाही.
>>तुझे कारणी देव माझा पडावा
या ठिकाणी देव च्या जागी देह हा शब्द आहे.
15 Dec 2007 - 2:43 pm | धोंडोपंत
वा वा,
प्राजुताई,
कविता चांगली आहे. आवडली. अभिनंदन.
आपला,
(वाचक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
3 Sep 2009 - 10:39 pm | विमुक्त
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते..
मस्त आहे...
3 Sep 2009 - 10:49 pm | संदीप चित्रे
कविता सुरेख आहे प्राजु...
>> झोपाळ्याची जुनीच करकर
सवे चिऊकाऊच्या गोष्टी..
त्यामागूनी सूरांत होतसे
तिन्हीसांजेची शुभंकरोती..
एकेक पायरी यशाची ती
चढले ज्याच्या बळावरी..
घर ते माझे उभे पाठीशी
उनपाऊस घेत शिरी..
>>
व.पुं.नी लिहिलंय तसं 'The more you write personal, the more it becomes universal' !
4 Sep 2009 - 2:09 pm | हृषीकेश पतकी
भावूक केले हो कवितेनी...
सुरेख आहे कविता..
आपला हृषी !!
4 Sep 2009 - 2:46 pm | पाऊसवेडी
>>>"कधी न वाटे मला एकटे
घर ते माझे सखा सोबती..
कितिक गुपिते दोघांमधली
जपून त्याने ठेवली होती...
या ओळी खूपच आवडल्या.
मला तुमच्या सगळ्याच कविता खूप आवडतात
अवांतर: >>>.तुझे कारणी देव माझा पडावा
या ऐवजी तुझे कारणी देह माझा पडावा असे हवे होते
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
4 Sep 2009 - 2:46 pm | sneharani
कविता चांगली आहे.
कधी न वाटे मला एकटे
घर ते माझे सखा सोबती..
कितिक गुपिते दोघांमधली
जपून त्याने ठेवली होती...
सुंदर ओळी... सुरेख आहे कविता..
4 Sep 2009 - 3:34 pm | सुबक ठेंगणी
नादमय ओळी...
झोपाळ्याची जुनीच करकर
सवे चिऊकाऊच्या गोष्टी..
त्यामागूनी सूरांत होतसे
तिन्हीसांजेची शुभंकरोती..
आमच्याकडे झोपाळा नव्हता पण माझे आजोबा आरामखुर्चीत बसून रामरक्षा आणि व्यंकटेशस्तोत्र म्हणायचे त्याची आठवण झाली.
4 Sep 2009 - 6:11 pm | मदनबाण
सुंदर कविता...
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते..
ये लयं आवड्या... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
4 Sep 2009 - 6:13 pm | दत्ता काळे
आवडली.
4 Sep 2009 - 6:39 pm | संतोषएकांडे
मिपाकरांशी माझी ही पहीलीच भेट...
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते..
त्या मायेच्या आठवणीने
उर दाटून येई कोण..
घरट्यावरूनी त्या माझ्या
उतरून टाकेन लिंबलोण...
खूपच सुंदर.....
रोजच वाचुया, लिहुया, भेटुया याच जागी.....
माझी मराठी बडोद्याची असून चूकून झालेल्या चूकींबद्दल
क्षमस्व....
आपला
'संतोष' एकांडे
5 Sep 2009 - 1:25 am | दिपाली पाटिल
प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी
वेल जुईची बहरली होती..
सैरवैर त्या अंगणी माझी
इवली पाऊले नाचली होती..
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते..
सुंदर....माझं जुनं घर आठवलं...
दिपाली :)
6 Sep 2009 - 9:57 am | प्रशांत उदय मनोहर
घराचं जितंजागतं चित्र उभं केलंस आणि आठवणींनी डोळ्यात पाणी आणलंस.
आपला,
(हळवा) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई