गोष्ट------तेव्हांच्या गणेशोत्सवाची!

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जनातलं, मनातलं
31 Aug 2009 - 6:24 pm


गोष्ट ४०-४५ वर्षांमागची.ठाणे गावाची.गाव तसे मध्यमवस्तीचे.शहर आणि गाव यांच्या सीमारेषेवर असलेले.बहुतेक माणसे एकमेकांच्या ओळखीची.अश्या त्या गावातल्या तेव्हांच्या गणेशोत्स्वाच्या आठवणी.

आम्ही शाळकरी मुले गणपतिची सुट्टी लागण्यापूर्वीच आपापसात पैज मारीत असू,'यंदा आपण २१,११,५१ गणपतिंचे दर्शन घेणार !'आणि खरोखरच गणेशचतुर्थीला मोदकांच्या भरपेट जेवणानंतर आमच्यासारखी अनेक शाळकरी मुले आपापल्या मित्र-मैत्रिणींसह गटागटाने गणपतिदर्शनाला बाहेर पडत.घर ओळखीचे असो की नसो,डोकावून पहायचे,गणपति दिसला की बेधडक त्या घरांत घुसायचे,'गणपति बाप्पा मोरया'अशी आरोळी ठोकायची.
कामाने भरपूर थकलेल्या त्या घरातील बायकांपैकी एखादी माऊली उठून प्रत्येकाच्या हातावर २-४ साखरफुटाणे ठेवायची की वानरसेना पुढील घराकडे मार्गस्थ !संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम उरकला की रात्रीची आरत्यांची बोलावणी सुरू.जोरजोरात आरत्या आणि मंत्रपुष्पांजलि म्हणून घसा बसत असे.पण उत्साहापुढे त्याचे बिचार्‍याचे काय चालणार ?शाळेचा,घरचा,शेजार्‍यांचा गणपति आणायला आणि पोचवायला तोच उत्साह!भजन म्हणून म्हणून आणि मासुंदा तलावापर्यंत फेर्‍या मारून रात्री झोप केव्हां लागत असे ते कळतही नसे.'बाळपणीचा काळ सुखाचा 'म्हणतात ते खोटे नाही हेच खरे.
पुढे कॉलेजजीवनात प्रवेश केल्यावर लहानपणी उत्साहात केलेल्या ह्याच गोष्टी बावळटपणाच्या वाटू लागल्या.पण गणेशोत्स्वाचे वेड मनातून गेले नाहीच,फक्त त्याचे स्वरुप बदलले.आता वेड होते रात्री सार्वजनिक गणेशोत्स्वात होणार्‍या कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे.श्री कौपिनेश्वर मंदिर,आर्य क्रीडा मंडळ,चेंदणी,घंटाळी इ.अनेक ठिकाणी पाहिलेले कार्यक्रम तेव्हां इतके चांगले असत की आता तो सुखाचा ठेवा वाटतो.त्याच काळात श्री.रामदास कामत,माणिक वर्मा,जितेंद्र अभिषेकी,इ.गुणी गायकांचे गाणे ऐकायची संधी मिळाली.अभिरुप न्यायालयसारखा तेव्हांचा गाजलेला कार्यक्रम पहायला मिळाला.श्री.वसंत बापट,विंदा करंदीकर,मंगेश पाडगांवकर ह्या तीन कविवरांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम दरवर्षी कोणत्या ना कोणत्या गणेशोत्स्वात होत असतच.श्री.शाम फडके,बबन प्रभु ह्यांचे फार्सही तरुण हौशी कलाकार सादर करीत्.त्या काळी जणू गणेशमंडळांच्या चांगले चांगले कार्यक्रम आणण्यासाठी स्पर्धा चालत आणि आमच्या त्यांना हजेरी लावण्याच्या !निरनिराळ्या वयोगटांसाठी गीतास्पर्धा आयोजित केल्या जात आणि त्यामध्ये शेकडो स्पर्धक भाग घेत्.अश्याप्रकारे त्यावेळच्या गणेशोत्स्वांनी आमचे सांस्कृतिक,साहित्यिक जीवन संगीतमय,सुमधुर करण्यास मदत केली.आजचे गणेशोत्स्वाचे स्वरुप पाहून मनात येते,'ते हि नो दिवसो गता:'

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2009 - 6:46 pm | बिपिन कार्यकर्ते

तेव्हाच्या सुमारास आमच्या गोरेगावात अगदी सेंट पर्सेंट हेच वातावरण असायचे. आम्ही शेजारपाजारची ७-८ मुले अगदी रोज पहाटे आसपासच्या बंगल्यांमधून वगैरे फुले आणायला जायचो. मस्त आठवणी.

अवांतर: बर्‍याच दिवसांनी हजेरी लावलीत बाई?

बिपिन कार्यकर्ते

वैशाली हसमनीस's picture

1 Sep 2009 - 6:25 am | वैशाली हसमनीस

भारतात असल्यावर लिहायला वेळ नसतो आणि इथे आल्यावर लिहीण्याखेरीज दुसरा उद्योग नसतो,मूड नसतो.

प्रदीप's picture

31 Aug 2009 - 7:36 pm | प्रदीप

लेख आवडला. माझ्य्या बालपणीच्या दादर हिंदू कॉलनीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आठवणी जाग्या झाल्या. रात्रीच्या कार्यक्रमात दरवर्षी स्थानिक कलाकारांनी केलेले एक नाटक, व्यावसायिक रंगभूमिवरील एक नाटक व व्यावसायिक ऑर्केस्ट्राचा एक कार्यक्रम असा बेत असे. तेव्हा तिथे पाहिलेला 'झंकार'च्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम अजून आठवतो.

पहिल्या दोन दिवशी घरोघरी जाऊन आरत्या म्हणण्याचा उद्योग मुलांना असायचा. आमच्या आरत्या तश्या साध्याच चालीच्या असत. पण गिरगावात आमचे नातेवाईक राहत, त्यांच्या येथे चाललेल्या आरत्या वेगवेगळ्या चाली लावून, अगदी मृदंग, टाळ ह्यांच्या साथीने केल्या जात, ते फार मोहक वाटे.

वैशाली हसमनीस's picture

1 Sep 2009 - 6:47 am | वैशाली हसमनीस

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.अजून कितीतरी आठवणी प्रत्येकाच्या मनांत असतील त्या लेखनातून बाहेर पडाव्यात अशी अपेक्षा.

सहज's picture

1 Sep 2009 - 8:44 am | सहज

२० वर्षापुर्वीची गोष्ट - गणपतीच नव्हे, दिवाळी, तिळगुळ, सोने(आपट्याची पाने) लुटायला, गल्लीतल्या २५ एक घरी तरी बिन्धास्त येणे जाणे व्हायचे.

लिहा हो अजुन.

वैशाली हसमनीस's picture

1 Sep 2009 - 11:36 am | वैशाली हसमनीस

आपल्या प्रत्येक सणाची आठवण मनात वेगळीच तार छेडून जाते हेच खरे !दिवस जातात,आपणही मोठे होत जातो आणि एक दिवस लक्षात येते की त्या दिवसांच्या आठवणींनी व्याकूळ होण्याखेरीज दुसरे कांहीच आपल्या हातात नसते.

पर्नल नेने मराठे's picture

1 Sep 2009 - 12:57 pm | पर्नल नेने मराठे

हल्लीची गोष्ट - लोक 'फोन करुन' या म्हणतात :S

चुचु

स्वाती दिनेश's picture

1 Sep 2009 - 12:54 pm | स्वाती दिनेश

लेखामुळे अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या,
स्वाती

सचीन जी's picture

1 Sep 2009 - 1:21 pm | सचीन जी

इ. पाचवीपर्यंतचे माझे बालपण पुण्याजवळच्या नारायणगावामधे गेले.

गणपतीप्रमाणेच हादगा या सणाच्या आठवणी जाग्या झाल्या.
हादग्यानिमित्त ( हा सण नेमका कधी असतो हे आता आठवत नाही. आणि आजच्या मुलींना तर कदाचित याचे नावही माहीत नसेल) पाटावरती गणपती रेखुन सगळ्या मुली त्याच्या भोवती फेर धरुन 'एलमा पेलमा' हे गाणे म्हणायच्या. डब्यात खिरापत आणलेली असायची. कोणी काय आणले हे इतरांनी ओळखायचे. नंतर सगळ्यांनाच ही खीरापत मिळायची. धमाल असायची.

हे लिहिताना देखील माझे डोळे पाणावलेत! परत ते दिवस येतील काय?

पर्नल नेने मराठे's picture

1 Sep 2009 - 1:35 pm | पर्नल नेने मराठे

अहो, ह्याला अम्ही भोन्ड्ला म्हणतो.
माझी माझा भोन्ड्ला करत असे. :D
चुचु

वैशाली हसमनीस's picture

1 Sep 2009 - 5:46 pm | वैशाली हसमनीस

माझ्या माहितीप्रमाणे नवरात्रात हादगा किंवा भोंडला करतात.

पर्नल नेने मराठे's picture

1 Sep 2009 - 1:39 pm | पर्नल नेने मराठे

माझी आइ....माझा भोन्ड्ला करत असे.
चुचु

क्रान्ति's picture

1 Sep 2009 - 7:35 pm | क्रान्ति

वैशालीताई, खूप छान आठवणी जागवल्यास. आमच्या लहानपणी सोलापुरात गणेशोत्सवात औद्योगिक बँकेतर्फे व्याख्यानमाला असायच्या, त्यात कितीतरी नामवंत वक्त्यांना पहायला आणि ऐकायला मिळालं. राम शेवाळकर, व. पु. काळे, ह. मो. मराठे, यु. म. पठाण, विद्या बाळ, दत्तो वामन पोतदार, रा. चिं. ढेरे वगैरे. गाण्याचे कार्यक्रमही असायचेच. [गेले ते दिन गेले!]
चुचु, इकडे विदर्भात हा भोंडला किंवा हादगा असतो ना, त्याला भुलाबाई म्हणतात. शंकर-पार्वतीची मातीची मूर्ती आणून तिची पूजा करतात, तिच्यासमोर बसून गाणी म्हणतात. गाणी तीच आपली भोंडल्याची पारंपारिक, फक्त इकडे त्यांना "भुलाबाईची गाणी" असं म्हणतात. :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

सुधीर काळे's picture

1 Sep 2009 - 8:05 pm | सुधीर काळे

माझ्या लहानप्णी सार्वजनिक गणपती आमच्या गावापर्यंत (जमखंडी) पोचायचा होता. त्यामुळे आमचा गणपती हा दीड दिवसांचा असायचा व आला कधी व विसर्जन कधी झाले हे कळायचेच नाही. येताना मूर्ती दुकानातून आणतानाची मिरवणूक व "मोरया"च्या आरोळ्या जरा तरी लक्षात आहेत, पण घरातच विहीर असल्यामुळे विसर्जन आजोबांच्या किंवा वडिलांच्या हाती घरच्याच विहिरीवर पटकन व्हायचे.
गणेशोत्सवाची खरी गोडी लागली शिक्षणासाठी पुण्याला आल्यावर. आधी फर्ग्युसन व नंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात अशी पाच वर्षे गणेशोत्सवाची अवीट गोडी लावून गेली. "मेळे" हा प्रकार पुण्यालाच पहिल्यांदा ऐकला व पाहिला. त्यावेळी कै. गजानन वाटवे ऐन भरात होते. त्यांची गाणी ऐकायला लोक कुठून-कुठून यायचे. घोले रोड चौक, गुडलक कॉर्नर, डे. जि. वगैरे ठिकाणी धमाल चाले.
नंतर नोकरीनिमित्त्य मुकुंद कंपनीत आलो. कळव्याच्या मुकुंद कॉलनीत रहात असलो तरी गणेशोत्सवात ठाण्याला बराच वेळ जायचा व वैशालीताईंनी सांगितलेल्या सर्व ठिकाणी हजरी लागायची.
जमखंडीला असताना माझ्या धाकट्या बहिणीमुळे हादगा मात्र खूप पाहिला. सगळी गाणीही त्यावेळी पाठ होती. आता फक्त हणमंताची "नीळी" घोडीच आठवते (घोडी निळी का होती कुणास ठाऊक!) पण शेवटी खिरापत ओळखायला मजा यायची. कसल्या कोशिंबिरी, कसल्या वड्या, कसल्या उसळी, कसले लाडू वगैरे करत शेवटी ९९ टक्के वेळेला खिरापत ओळखली जायची. आम्हा दोघा भावांना पहायला परवानगी होती पण खिरापत ओळखताना मात्र आवज बंद ठेवावा लागायचा.
वैशालीताईंमुळे आज परत या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझी मुलगी लहान असताना पुण्यात कधी-कधी हादगा/भोंडल्याचा प्रयोग व्हायचा पण मी घरी अजून पोचलेलाच नसल्यामुळे फारसा पाहिला नाहीं.
पण गजाननरावांची पेटी वाजवत गातानाची मूर्ती अजून डोळ्यासमोर येतेय.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

नगरला आमच्या घरी फक्त दीड दिवसाचा गणपती असे पण मग आम्ही दोन मूर्ती करायचो एक दीड दिवसाची विसर्जनाची आणी दुसरी वर्षभर रहाणारी. त्यामुळे दहाही दिवस खिरापत चापायला मिळायची! ;)
आमच्या वाड्यातली सगळी जणं आरतीला आमच्या घरी जमायची. आमच्या जुन्या घरात १५ x ३३ फुटाचा मोठा हॉल होता त्यात मूर्ती असे. वडील हातात आरतीचे तबक घेऊन उभे रहात. झांजा, घंटा असा सगळा सरंजाम घेऊन आम्ही सगळे बालगोपाल वाड्यातले सगळे लोक
जमत. मग आरत्या सुरु होत. गणपती, देवी, विठ्ठल, हनुमान, राम, दत्त, शंकर अशा अनेक अरत्या एकापाठोपाठ एक दणक्यात म्हटल्या जात. कर्पूरारती आणी शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणजे कल्लाच असे! आरडाओरड्याने घर दणाणून जाई. मग मोठ्या पातेल्यातली खिरापत वाटली जाई.
मग आमचा मोर्चा दुसर्‍या घरांकडे वळे. अशा रीतीने दीडेक तास आरत्या करुन खिरापतींचे जेवण करुन आम्ही घरी येत असू. मग पुन्हा रात्री आराशी बघायला टोळक्याने बाहेर हिंडून मध्यरात्रीनंतर कधीतरी परतायचो. फारच मजा येत असे. सगळे आठवले.

चतुरंग