भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे
निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे
कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी
कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी
बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती
विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती
पागोळ्यांच्या गोळ्या टपर्यांवर तडतड करती
चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती
दरवाज्यावरती आली वाळवी तरणीताठी
कुरबुर करण्यात उलटली बिजागरींची साठी
वैचित्र्यातील सौंदर्ये पाऊस घेऊनी आला
मनातल्या चिखलाचा शिंतोडा एक उडाला
प्रतिक्रिया
29 Aug 2009 - 9:44 pm | श्रावण मोडक
उध्वस्तता, ढासळणारे शहर, कोंडलेली हवा... असं बरंच काही समोर आलं.
30 Aug 2009 - 1:38 pm | पाषाणभेद
छान प्रयत्न आहे.
"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
30 Aug 2009 - 4:00 pm | दत्ता काळे
दरवाज्यावरती आली वाळवी तरणीताठी
कुरबुर करण्यात उलटली बिजागरींची साठी
पुण्यात जुन्या मुंबई - पुणे रस्त्यावर असेच एक सरकारी ऑफिस आहे.
30 Aug 2009 - 6:47 pm | बिपिन कार्यकर्ते
छान कविता आहे. चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
बिपिन कार्यकर्ते
30 Aug 2009 - 6:50 pm | प्रशांत उदय मनोहर
छान कविता. चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. ;)
31 Aug 2009 - 8:55 am | विसोबा खेचर
अशक्य कविता...!
तात्या.