मन्मनीच्या चांदण्याला
एकदा प्राशून जा |
जागले हृदयांतरी जे
तू कधी फुलवून जा ||
स्वप्न आणि सत्य दोन्ही
का सारखे माझ्याचसाठी |
संदर्भ वेड्या भावनांचे
तू एकदा लावून जा ||
मी बोलावता येणे तुझे
मज नित्यनेमाचेच आहे |
भेटण्या मजला सखे
माझ्याविना येऊन जा ||
भाव या डोळ्यातला
अश्रूंसवे झरतोच आहे |
नच साध्य जे ते वर्ज्य हे
माझ्या मना शिकवून जा ||
घेऊ नको तू सोबतीला
या अक्षरांची माळ ही |
उमलेल जे श्वासातूनी
शब्दांविना सजवून जा ||
अंतरीचे गीत माझ्या
मी कधीचे गात आहे |
साथ दे भोळ्या सुरांची
अन तया जुळ्वून जा ||
बहरेन मी आता नव्याने
मज छंद फुलण्याचाच आहे |
सध्या रित्या ह्या ओंजळीची
पाकळी मिटवून जा ||
मैफिलीला रंग माझ्या
तरीही पुन्हा चढणार आहे |
फक्त या जिंदादिलाची
शायरी जमवून जा ||
प्रतिक्रिया
23 Aug 2009 - 7:45 am | प्राजु
सु... रे....ख!!!!
खूपच सुंदर!!!
प्रत्येक कडवं आवडलं... श्वासातूनी सजवण्याची कल्पना खूप छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Aug 2009 - 2:03 pm | बिपिन कार्यकर्ते
खरंच सुरेख कविता.
बिपिन कार्यकर्ते
23 Aug 2009 - 1:35 pm | क्रान्ति
बहरेन मी आता नव्याने
मज छंद फुलण्याचाच आहे |
सध्या रित्या ह्या ओंजळीची
पाकळी मिटवून जा ||
सुरेख, सुरेल प्रेमगीत!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
23 Aug 2009 - 9:38 pm | मदनबाण
सुंदर कविता... :)
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
25 Aug 2009 - 10:15 am | नाना बेरके
आवडली.
25 Aug 2009 - 10:50 am | विशाल कुलकर्णी
वाह क्या बात है !
<<बहरेन मी आता नव्याने
मज छंद फुलण्याचाच आहे |
सध्या रित्या ह्या ओंजळीची
पाकळी मिटवून जा || >>
सुरेख, आवडली ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
26 Aug 2009 - 8:29 am | हृषीकेश पतकी
आपला हृषी !!
26 Aug 2009 - 12:28 pm | sneharani
खरंच सुरेख कविता.
26 Aug 2009 - 12:47 pm | सागर
काय सुरेख शब्द पुष्पे गुंफली आहेत ऋषिकेशराव ...
अप्रतिम... असेच लिहित रहा...
अगदी सुरेश भटांची आठवण झाली...
माझ्या आवडत्या या चार ओळी
भाव या डोळ्यातला
अश्रूंसवे झरतोच आहे |
नच साध्य जे ते वर्ज्य हे
माझ्या मना शिकवून जा ||
बहुत बढीया...
(कविता, गजल प्रेमी) सागर
26 Aug 2009 - 3:18 pm | हृषीकेश पतकी
एकदम मस्त वाटलं सगळ्या प्रतिक्रिया वाचून..
असाच लोभ असू द्या..
आपला हृषी !!
26 Aug 2009 - 4:18 pm | प्रभो
मस्तच!!!