चहाच्या पानापासुन चहा पावडर करेपर्यंत ज्या अनेक क्रिया-रीतींतुन चहाचे पान जाते त्यावर एक ग्रंथ लिहीता येईल. ह्या रीतींमुळेच चहाचे अगणित प्रकार, चवी, वास, रंग, तयार झाले. ह्या सर्व उत्पादन पद्धती अर्थातच एकदम विकसित झाल्या नाहीत व अनेक डोकेबाज माणसांनी त्यात अनेक आवश्यक बदल घडवून आणले आहेत.
अशीच एक छोटीशी गोष्ट.
पुर्वी तोडून वाळवलेल्या चहाच्या पानांवर वाफेचा फवारा मारला जाई. वाफेतील उष्णते व आर्द्रतेमुळे, सुरुवातीची अतिशय कडक झालेली चहांची पाने मऊ होऊन त्यात ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरु होई. ह्यानंतर पुन्हा ऑक्सिडेशनची प्रक्रिया ठराविक काळानंतर थांबवण्यासाठी ती पाने वाळवली जाई. नंतर अशी पाने पुढील क्रियांसाठी पाठवली जात.
ह्यात गोची अशी असे की, चहाची सुरुवातीची वाळवलेली पाने कमी-अधिक कडक असत व ती पाने त्याच्या कडकतेनुसार वर्गवारीकरुन त्यावर किती कमी-जास्त उष्णतेची वाफ मारली पाहीजे हे ठरे. अर्थातच हे काम खूप कौशल्याचे असे अन्यथा चहाची प्रत बदलत असे. ऑक्सिडेशनची प्रक्रिया त्यावर अवलंबून असल्यामुळे ते काम खूप अनुभवी लोकांकडून करवून घेतले जाई. पानांत खूप जास्त आर्द्रता झाली तर ऑक्सिडेशनची प्रक्रिया लांबे व त्यामुळे चहाच्या पानात बुरशी तयार होत असे. असा चहा अर्थातच आरोग्याला धोकादायक असतो.
वरील कौशल्यावर जास्त अवलंबून राहणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले व त्यासाठी त्यावर उपाय शोधण्यासाठी एका डोकेबाज माणासाला प्राचारण करण्यात आले. त्याने ती उत्पादन प्रक्रिया पाहील्यानंतर विचारले की, "वाफ ही तुम्ही पानांवर ह्यासाठी मारता की, त्यात आर्द्रता व उष्णता असते. त्याऐवजी, तुम्ही उष्णता व आर्द्रता वेगवेगळी करुन का नाही वापरत?"
झाले, युक्ती गवसली आणि त्यानंतर, एका धुक्यासदृश आर्द्रता-वातावरण केलेल्या खोलीत नुसती गरम हवा पानांवर मारली जाऊ लागली व ह्या दोन्ही प्रक्रीयांत एकाचवेळी अधिक चांगला समन्वय निर्माण झाला. लागणारे अंगभूत कौशल्यही कमी झाले व चहाची प्रत-वारंवार अधिक सुधारली.
प्रतिक्रिया
4 Aug 2009 - 1:11 am | पक्या
ह्म्म्म. बघितले तर किती सोपे वाटते सोल्युशन पण सर्वांना सुचेलच असे नाहि.
लेख मोठा असता आणि असेच चहा संदर्भात अजुन ३-४ किस्से असते तर वाचायला मजा आली असति.
4 Aug 2009 - 8:21 am | अजय भागवत
चहा आणि कॉफी हे दोन्ही पेये सध्याच्या त्याच्या प्रगतीच्या टप्प्यावर येण्यासाठी अनेक सुधारणा मुद्दम केल्या गेल्या व काही अचानक गवसल्या. त्याबद्दल इतके लिहीता येईल की बस!
मिपासारख्या खवय्यांच्या पाककला अनेकदा वाच्ल्या पण चहा बद्दल काहीही वाचण्यात न आल्यामुळे मी हा एक छोटेखानी लेख टाकायचे ठरवले.
चहा करतांना मी वेळ मिळाला की, अनेक छोटे-छोटे प्रयोग घरी करतो. मजा येते. पण आई जितका फक्क्ड चहा बनवते की, तसा यायला जन्म जाईल. चहापुराण/महात्म्य मोठे आहे, त्यावर बरेच लिहीता येईल हे मात्र खरे.
4 Aug 2009 - 9:42 am | भाग्यश्री
शोध मारा की हो जरा!
http://www.misalpav.com/node/1354
प्रतिसादात बरीच माहीती आहे..
http://www.bhagyashree.co.cc/
4 Aug 2009 - 1:15 pm | अजय भागवत
नक्की वाचेन, आभार!
4 Aug 2009 - 1:56 pm | सुनील
चहाची प्रत ओळखण्यासाठी निष्णात मंडळींची नेमणूक केलेली असते. ही मंडळी दिवसभरात अनेक प्रकारच्या चहाची (चहाची पाने टाकून उकळलेल्या पाण्याची) प्रतवारी ठरवितात. त्यासाठी ते चहाचे पाणी पीत मात्र नाहीत, नुसतेच जिभेवर घेऊन तोंडातून फिरवतात आणि नंतर थुकून टाकतात!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Aug 2009 - 7:16 pm | अजय भागवत
आहे खरे हे कौशल्याचे काम! त्यांना Tasters म्हणायचे की, Testers? :-)
4 Aug 2009 - 7:18 pm | दशानन
असलं काम... दारुच्या फॅक्टरीमध्ये पण असतं का ओ सुनील भाउ :?
निरागस (राजे)
+++++++++++++++++++++++++++++
अवांतर - छान माहीत !
आवडले !
4 Aug 2009 - 10:04 pm | सुनील
असतं बरं का राजे, तिथेही वाईन टेस्टर असतात. पण त्यांनादेखिल वाईन फक्त तोंडात घेऊन, थोडी फिरवून, थुंकून टाकावी लागते! पीता येत नाही!!
(पोचलेला) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Aug 2009 - 7:27 pm | रामदास
कुरीयन साहेब त्यांच्या सुरुवातीच्या काळात टेस्टर व्हायला शिकणार होते असे वाचलेले आठवते.तसे झाले असते तर आपल्याला चहा चांगला मिळाला असता अमूलचे बटर मात्र मिळाले नसते.
5 Aug 2009 - 10:52 am | आशिष सुर्वे
खरंय!
मलाही थोडी माहिती द्यायची हुक्की आलिय..
माहिती आवडली तर नक्की कळवा!!
चहाचे प्रकार
चहाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
परंतु, खालील चार प्रकार हे प्रमु़ख म्हणून गणले जातात आणि सार्वत्र सहज उपलब्ध आहेतः
१) ब्लॅक टी
२) ग्रीन टी
३) व्हाईट टी
४) ओलोंग (Oolong) टी
(आणि एक प्रकार जो काही विशेष वर्गात लोकप्रिय आहे, त्याला 'हर्बल टी' म्हणतात. मजेची गोष्ट अशी की, हा 'हर्बल चहा' मुळात 'चहा' नसतोच!
काही विशेष ओषधी वनस्पतींची (herbs) सुकी पाने आणि/किंवा फुले - ह्यांचा अर्क काढला जातो आणि त्यालाच देतात नाव ठोकून..'हर्बल टी' म्हणून!
'ब्लॅक टी ' चे ही खाली दिल्याप्रमाणे दोन प्रकारात ढोबळ वर्गिकरण केले जाते:
अ) 'लिफ टी' (उत्तर भारतात विशेष लोकप्रिय)
ब) 'डस्ट टी' (दक्षिण भारतात विशेष लोकप्रिय)
'टी टेस्टींग'
आमच्या कंपनीमध्ये (टाटा टी) आम्हालाही अधूनमधून 'टी टेस्टींग' ची संधी मिळते..
'टी टेस्टींग' ची 'एस. ओ. पी.' ही थोड्याफार फरकाने 'सुनील'भाऊंनी सांगितल्यासारखीच असते..
आणि 'अजय'भाऊंनी म्हटल्याप्रमाणे हे खरे कौशल्याचे काम आहेच. आणि त्यासाठी विशेष टीम असते आणि त्यांना 'Tea Tasters' म्हणतात ( Testers नव्हे!). आणि हेच 'Tea Tasters' चहाची प्रतवारी ठरवितात.
एकदा चहाची प्रतवारी आणि वर्गिकरण झाले की, तो चहा 'ब्लेंडींग' प्रक्रियेसाठी पाठविला जातो.
'ब्लेंडींग' ची प्रक्रिया अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायची झाली तर ती अशी:
'ब्लेंडींग' म्हणजे, एक विशिष्ट प्रतिची चव (taste), गंध (aroma ) प्राप्त करण्यासाठी, एकाहून अधिक चहाच्या प्रति- गुणवारीनुसार आणि विशिष्ट प्रमाणात एकत्र करणे.
'ब्लेंडींग' नंतर हा 'चहा' 'पॅकॅजिंग' करून मग मार्केट मध्ये पाठविला जातो..
हे चहापुराण आपल्याला आवडल्यास.. एक झक्कास 'कटींग चाय' होऊन जाऊदे!!
-
Mind-blasting, Mind-blowing, Chaiwalla . . कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
5 Aug 2009 - 2:16 pm | अजय भागवत
माहीती मोलाची भर घातल्याबद्दल आभारी!
सी टी सी ही काय भानगड आहे?
5 Aug 2009 - 6:02 pm | आशिष सुर्वे
चहा दोन प्रकारांनी बनविला जातो.
१) ऑर्थोडॉक्स (Orthodox)
२) सी टी सी (C.T.C.)
सी टी सी चे संपूर्ण नाव आहे... 'कट ट्विस्ट कर्ल' ( Cut Twist & Curl )
ह्या प्रक्रियेमध्ये चहाची पाने मशीनच्या 'ईन-फिड' मध्ये टाकली जातात. ह्या मशीनमध्ये ३ रोलर्स असतात जे ह्या पानांना अनुक्रमे 'कट', 'ट्विस्ट' आणि 'कर्ल' करतात.
ह्या ३ प्रक्रियेंमुळे चहाला एक विशिष्ट आकार येतो.
ह्या प्रक्रियेनंतर ह्या चहाचे 'फरमेंटेंशन' केले जाते.
नंतर हा चहा सुकविला जातो.
शेवटी हा चहा 'सॉर्ट' केला जातो.. ह्या सॉर्टींगमध्ये मुख्यत्वे २ प्रकार हातात येतात:
अ) सी टी सी लिफ
ब) सी टी सी डस्ट
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''