दोन पोरास्नी म्हागं सोडुन गेली वो सायेब? आता पोरास्नी कसं सांगु? माजं तर समदं आविष्यच बरबाद झालं बगा !!
तो धाय मोकलुन रडत होता. आणि आम्ही सारे हतबुद्ध होवुन पाहात होतो.
तीचं शव तिथंच पडुन होतं आणि काल रात्रीपासुन हा सहावा माणुस होता तीला आपली बायको म्हणणारा ! मनोमन प्रचंड संताप येत होता. केवळ दागिन्यांसाठी माणुस या थराला जावु शकतो. काल रात्री आणखी एक ढासळलेले घर शोधताना एका महिलेचे शव सापडले होते. दागिन्यांनी बाई नखशिखांत सजलेली होती. आणि तिच्यावर हक्क सांगायला आत्तापर्यंत सहा जण आले होते.
नाही, ही कुठल्याही रहस्यकथेची किंवा खुनप्रकरणाची सुरुवात नाहीये. १९९३ साली किल्लारीला अनुभवलेलं विदारक कटु सत्य आहे हे .
३० सप्टेंबर १९९३, पहाटे ३ वाजुन ५५ मिनीटे आणि ४७ सेकंद. सगळे साखरझोपेत होते. नुकतेच बाप्पांचं थाटामाटात विसर्जन झालेलं. त्या मिरवणुकीची धुंदी मनावर होती आणि बरोबर पहाटे ३ वाजुन ५५ मिनीटे आणि ४७ सेकंदांनी पहिला हादरा बसला. मला आठवतं....मी दचकुन जागा झालो. कसलेतरी एखादा मोठा ट्रक धाडधाड करत जवळुन गेल्यावर येतो तसले आवाज येत होते. काही तरी असेल नेहेमीचंच म्हणुन दुर्लक्ष केलं आणि परत चादरीत गुरफ़टुन झोपी गेलो.
येणारी सकाळ मात्र भयानक वास्तव घेवुन आली होती. लातुरच्या परिसरात प्रचंड भुकंप झाला होता. ६.२ रिष्टर स्केल चा हा धक्का किती आयुष्यं उध्वस्त करुन गेला होता ते हळुहळु समोर यायला लागले. त्यावेळेस अभाविप आणि विवेकानंद केंद्राबरोबर स्वयंसेवक म्हणुन काम करायचो. लगेच काही बैठकी झाल्या, कुणी कुठल्या भागात जायचे ते ठरले. काही जणांनी सोलापुरातच राहुन मदतनिधी संकलन आणि इतर मदत मिळवायच्या कामात लक्ष घालायचे तर उरलेल्यांनी प्रत्यक्ष भुकंपग्रस्त क्षेत्राकडे रवाना व्हायचे असे ठरले. लगोलग अभाविपचे बरेच कार्यकर्ते संध्याकाळी सास्तुर, किल्लारी, चिंचोली, लोहारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले. किल्लारी आणि लोहारा इथे गेलेल्या टीममध्ये माझा समावेश होता. जसजसं जवळ पोहोचलो तसतसे त्या महाभयंकर विनाशाची खरीखुरी भयानक कल्पना यायला लागली. जिथे बघाल तिकडे ढासळलेल्या घरांचे ढिगारे, जमीनीला पडलेल्या प्रचंड भेगा, रक्तामासाचा खच, सगळ्या आसमंतात पसरलेली एक विलक्षण दुर्गंधी.
मृत्युची अनेक रुपे पाहिली होती. कोल्हापुर अलिबाग एस. टी. ला लोनावळ्याजवळ झालेल्या अपघातात त्या नवविवाहितेला, तिचा अर्धवट बाहेर आलेला मेंदु एका हाताने डोके घट्ट धरुन ठेवुन शिबिराच्या ठिकाणी आणताना मृत्युचे भयंकर स्वरुप अनुभवले होते. पण हे मात्र सगळ्या कल्पनांच्या पलिकडलं होतं. मृत्युबद्दलच्या सगळ्या कथा कहाण्यांना, संकल्पनांना खोटं ठरवणारा हा अनुभव होता. सगळ्यात वाईट आणि क्लेषकारक होतं ते चोहीकडुन कानावर येणारे आक्रोश. भुकंपाच्या भीतीवर मात केली होती आम्ही. पन त्या केविलवाण्या आक्रोशांना कसे तोंड देणार होतो.
क्षणभर वाटलं, इथुनच परत जावं. पण परत वाटलं, असा जर भ्याडासारखा परत गेलो तर आण्णांना कसं तोंड दाखवु, त्यांना काय वाटेल. आण्णा त्यादिवशी सकाळीच लातुरला पोलीस बंदोबस्तासाठी रवाना झाले होते. (नंतर आण्णांनी सांगितलं, आयुष्यात पहिल्यांदा पोलीस खात्यात असल्याची लाज वाटली. काही पोलीसांनीसुद्धा संधी साधुन काही प्रेतांच्या अंगावरचे दागीने पळवण्याचे प्रकार केले होते. एका कॉन्स्टेबलला तर आण्णांनीच कमरेच्या पट्ट्याने मारले होते त्यासाठी. तेव्हा त्यांच्यावर इन्क्वायरी देखील झाली होती, ऑन ड्युटी पोलीसावर हात उगारल्याबद्दल. त्यातुन निष्पन्न काही झाले नाही, पण तो कॉन्स्टेबल मात्र नंतर निलंबीत झाला). असो, तर ठामपणे निसर्गाच्या अवकृपेवर मात करायला आम्ही तयार झालो.
हळु हळु लक्षात आलं की आमच्यासारखे खुप जण आधीच मदतीसाठी पोहोचले होते. मन भरुन आलं, वाटलं, कोण म्हणतो आमच्यात एकी नाही म्हणुन. त्या क्षणी तिथे कोणी हिंदु नव्हता, ना कोणी मुसलमान ना कोणी ख्रिश्चन...तिथला प्रत्येक जण फक्त माणुस होता. आणि माणुस म्हणुन आपल्यासारख्या माणसांसाठी महाबलाढ्य अशा निसर्गाबरोबर लढायची जिद्द उरी बाळगुनच तिथे आला होता.
जिकडे नजर जाईल तिकडे भयाण विध्वंस पसरलेला. कुणाचा घरधनी हरवलेला, कुणाची लेकरं. कुणी आपल्या म्हातार्या वडीलांना शोधत होता, तर कुणी इतकी वर्ष साथ दिलेल्या बैलाच्या जोडीसाठी व्याकुळ झाला होता. सगळीकडे नुसता गोंधळ चालु होता. तीन दिवस काढले त्या परिसरात. खरंतर सुरुवात कुठुन करायची तेच कळत नव्हतं. आमच्याबरोबर आलेल्या मुली तर सुन्न होवुन गेल्या होत्या. तीन दिवस चिखल उपसावा तशी प्रेतं उपसुन काढत होतो. तोपर्यंत लष्करही मदतीला येवुन पोचलं होतं. विदेशातुनही डॉक्टर्सची पथके येवुन कामाला लागली होती.
अशीच प्रेते उपसताना वर उल्लेखलेलं महिलेचं शव हाताला लागलं. काय करावं काही सुचेना. शेवटी लष्कराने हस्तक्षेप केला तेव्हा उघडकीला आलेलं सत्य फारच भयानक, विदारक होतं. त्यांच्यापैकी एकाचाही तिच्याशी कसलाही संबंध नव्हता. पण त्या प्रत्येकाने आपलं कोणी ना कोणी या भुकंपात गमावलं होतं. संसार तर सगळ्यांचेच उघड्यावर आलेले. अन्य काही नाही, तिच्या अंगावरचे दागीने विकुन पुढचे काही दिवस घरातल्यांची पोटं तरी भरता येतील, हा क्षुल्लक (?) स्वार्थ फक्त होता. एकीकडे चीड येत होती तर एकीकडे किवही वाटत होती. स्वत:च्या असहायतेचा मनापासुन संतापही वाटत होता.
निसर्गाचा कोप एवढ्यावरच संपलेला नव्हता. झालं असं की मदत म्हणुन आलेली धान्याची पोती तिथेच छोटे छोटे तंबु ठोकुन त्यात ठेवली होती. आणि नेमकं पर्जन्यराजाने आक्रमण केलं आणि सगळीकडे चिखल झाला, सगळं धान्य भिजलं. ते सुरक्षीत ठिकाणी हलवताना आसमान आठवलं. सगळीकडेच अवकळा झालेली. निसर्गाचा कोप सगळीकडेच होता. सुरक्षीत जागा सापडणार तरी कुठे?
तशात ढिगारे उपसताना रोज नवीन प्रेतं सापडत होती. पण त्या पावसात ती प्रेतं दहन करण्यासाठी पुरेशी सुकी लाकडेसुद्धा मिळेनात. अक्षरश: एकेका चितेवर १०-१० प्रेते जाळायची वेळ आली. कित्येकवेळी तर तेही मिळायचं नाही. मग मोठाले खड्डे खांदुन कित्येक प्रेतं लष्कराच्या मदतीने तशीच पुरण्यात आली. एका रात्रीत किल्लारीचा समृद्ध परिसर होत्याचा नव्हता करुन टाकला होता भुकंपाने.
नंतर तिथुन लोहार्याला गेलो, मग काटेचिंचोली, रेबेचिंचोली, सास्तुर . पुढचे पंधरा दिवस अतिशय तणावाचे होते. नंतर तिथुन परत आल्यावरही जवळपास महिनाभर तो वास नाकातुन गेला नव्हता. हाताकडे लक्ष गेले की ती प्रेते आठवायची. लवकरच सगळी दु:खे बाजुला ठेवुन कॉलेजचा बुडालेला सिलॅबस पुर्ण करायच्या मागे लागलो.
त्यानंतर पुढच्या वर्षी दिवाळीत पुन्हा एकदा तिथे गेलो. घरात कुणी गेलं असेल तर वर्षभर कुठलाही सण साजरा केला जात नाही आपल्याकडे, घरात गोडधोड केलं जात नाही. अशावेळी संबंधिताचे नातेवाईक गोडधोड घेवुन त्याच्याकडे जातात आणि त्याचं सांत्वन करुन दु:ख वाटुन घेण्याचा प्रयत्न करतात. नेमकं हेच करण्याचं अभाविपने ठरवलं होतं. पाडव्याच्या आदल्या रात्री सोलापुरच्या शिवस्मारकमध्ये रात्रभर जागुन सोलापुरातल्या जागृत नागरिकांच्या मदतीने हजारो पुरणपोळ्या बनवण्यात आल्या. कुठुन कुठुन पुरणयंत्रे जमा केली आणि रात्रभर एकीकडे आम्ही पुरुषमंडळी पुरण वाटत होतो तर बायका पोळ्या लाटत होत्या. प्रत्येक घरात पुरणाच्या पोळ्या, बुंदीचे लाडु, एक साडी, धोतर जोडी किंवा शर्ट पीस पॆंटपीस आणि एक चादर असे वाटायचे ठरले होते.
केल्लारीच्या पुनर्वसन केंद्रात एक सत्तरीचा म्हातारा भेटला. त्याला सगळं सामान दिल्यावर ढसाढसा रडायलाच लागला, म्हणाला....
"पोरांनो, काय येळ आणलीय नशीबानं ! राजासारका राह्यलोय या किल्लारीत. अजुनबी माझ्या वाड्याबरोबर जमीनीत गाडली गेलेली माझी तिजोरी काढुन द्या. सगळं गाव मी एकटा उभा करतो पुन्हा, पयल्यासारकं !!!!
(मागे हा लेख मायबोलीवर लिहीला होता, जुनी पाने चाळताना सापडला, वाटलं हा अनुभव तुमच्याबरोबरही शेअर करावा, म्हणुन इथे टाकतोय.)
विशाल.
प्रतिक्रिया
31 Jul 2009 - 11:51 am | विजुभाऊ
एक चांगला लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद
31 Jul 2009 - 12:05 pm | ज्ञानेश...
चांगला लेख.
तुमचे मदतकार्यही कौतुकास्पद आहे.
"Great Power Comes With Great Responsibilities"
31 Jul 2009 - 11:58 am | पाषाणभेद
आपल्यासारखे सामाजीक भान सगळ्यांनी ठेवले तर?
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
31 Jul 2009 - 12:01 pm | सहज
भुकंप, सुनामी.... अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते... :-(
सुन्न.
अवांतर - एकाच तिजोरीत सगळे ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे संपत्ती जतन केली असती तर :-(
31 Jul 2009 - 5:02 pm | विशाल कुलकर्णी
एकाच तिजोरीत सगळे ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे संपत्ती जतन केली असती तर >>>
हा प्रकार किल्लारी परिसरात खुप बघायला / ऐकायला मिळाला. खरेतर किल्लारी हा उसाचा पट्टा असल्याने खुप समृद्ध भाग आहे. तिथला शेतकरीही खुप सधन आहे. पण बर्याच जणांनी पैसा बँकेत न ठेवता असा घरात साठवुन ठेवला होता. एका शेतकर्याच्या ढासळलेल्या घरात जवळपास बत्तीस किलो सोने आणि त्यापेक्षा थोडी जास्तच चांदी मिळाली. (दागिन्यांच्या स्वरुपात). त्यावेळी ती लष्कराने आपल्या ताब्यात घेतली होती, पुढे तिचे काय झाले कुणास ठाऊक?
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
31 Jul 2009 - 12:15 pm | mamuvinod
नेहमीप्रमाणे छान लेख
तुमचे मदतकार्यही कौतुकास्पद
असेच लिहित रहा
तुमच्या लिखानाचा चाहता
मामु
31 Jul 2009 - 12:21 pm | घाशीराम कोतवाल १.२
विशाल कुलकर्णी सिर्फ नाम ही काफी है! ;)
विशाल नेहमी प्रमाणे मस्त कथा आहे
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
31 Jul 2009 - 12:22 pm | mamuvinod
कोल्हापुर अलिबाग एस. टी. ला लोनावळ्याजवळ झालेल्या अपघातात त्या नवविवाहितेला, तिचा अर्धवट बाहेर आलेला मेंदु एका हाताने डोके घट्ट धरुन ठेवुन शिबिराच्या ठिकाणी आणताना मृत्युचे भयंकर स्वरुप अनुभवले होते.
सविस्तर वाचायला आवडेल
31 Jul 2009 - 12:42 pm | विशाल कुलकर्णी
कोल्हापुर अलिबाग एस. टी. ला लोनावळ्याजवळ झालेल्या अपघातात त्या नवविवाहितेला, तिचा अर्धवट बाहेर आलेला मेंदु एका हाताने डोके घट्ट धरुन ठेवुन शिबिराच्या ठिकाणी आणताना मृत्युचे भयंकर स्वरुप अनुभवले होते.
सविस्तर वाचायला आवडेल>>>>
बारावीला लोनावळ्यात होतो डॉन बॉस्कोला. त्या दिवशी चार पाच मित्र खंडाळा घाटात उतरलो होतो मजा करायला. आणि घाटात फिरताना एके ठिकाणी झालेला हा अपघात दिसला. एस्.टी. खोल दरीत कोसळली होती. अतिशय भयानक अपघात होता तो. गाडीची चॅसी आणि वरचा सांगाडा अक्षरश: वेगवेगळे झाले होते. राजमाची पॉईंट चौकीचे पोलीस आणि यशवंती हायकर्सचे खंदे वीर यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कंबर कसली होती. अपघातग्रस्तांना दरीतुन वर काढण्याचे काम यशवंतीचे हायकर्स करत होते. साहजिकच आम्हीही मजा विसरुन मदतीला पुढे सरसावलो. तिथेच तंबु टाकुन एक तात्पुरते शिबीर उभे करण्यात आले होते. तशात एक हायकर एका जखमी स्त्रीला घेवुन दरी चढुन वर आला. आज अंगावर काटा येतो, पण दोघा मित्रांनी तिचे स्ट्रेचर उचलले होते, तिचे डोके फुटले होते, मेंदु अर्धवट बाहेर आलेला असल्याप्रमाणे दिसत होता. शेवटी तिच्याच पदराने ती जखम घट्ट बांधली आणि एका हाताने तिचे डोके अलगद धरुन तिला शिबीरापर्यंत आणले. सुदैवाने ती वाचली, लोनावळ्याला हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यावर तिचा पहिला प्रश्न होता स्वत:च्या नवर्याबद्दल, तो जिवंत आहे का नाही हे तिला जाणुन घ्यायचे होते, दुर्दैवाने कोणाजवळच त्याचे उत्तर नव्हते.
31 Jul 2009 - 4:26 pm | mamuvinod
ती महिला वाचली हे एकुन बरे वाट्ले
धन्यवाद विशालजी
31 Jul 2009 - 3:33 pm | योगी९००
आम्हीही गेलो होतो मदत कार्यासाठी..हेच सर्व बघितले. आता तर त्याची आठवण पण नको असे वाटते.
एक चीड आणणारी घटना बघितली.
मुंबईहून काही सो कॉल्ड हाय-फाय लोकं (म्हणजे कॉलेजची पोरं आणि पोरी होत्या) खास केलेल्या मिनी लक्झरी बसमधून आली. पहिल्यांदा १०-१५ मि. कामाचे नाटक केले..नंतर नंतर तर दोघं तिघं तुटलेल्या घराचे अवशेष उचलायचे आणि बाकीचे ह्याचे विविध पोझ मधून फोटो काढायचे असा प्रकार चालला होता. बहूतेक कुठल्या तरी क्लबमधून आली असावीत कार्टी. एका लश्करी अधिकार्याने त्यांच्यातील एकाला थोबडवल्यावर हा प्रकार बंद झाला. नंतर ती पोरं आणि पोरी जवळच कोठेतरी सहलीला गेले असावेत. फार फार राग आला होता.
बाकी विशालशेठ, तुमचे मदतकार्य कौतुकास्पद आहे.
खादाडमाऊ
31 Jul 2009 - 3:36 pm | प्रसन्न केसकर
खरेच अंगावर येणारे आहेत. भुकंप झाल्यानंतर जगभरची माणुसकी तिथे दिसली तशीच माणसातली गिधाडे पण. मला आठवतय तिथे मृतदेहांच्या अंगावरचे दागिने, आजुबाजुला पडलेलं सोनंनाणं, पैसे सगळे लुटले होते काही पोलिसांनी आणि बघ्यांनी.
लहान लहान मुलं अनाथ झाली त्यांचे नातेवाईक सांगत बरेचजण पुढे आले. सरकारी मदत, अनुदानाचे पैसे वगैरे लाटुन त्यांनी त्या मुलांना देशोधडीला लावलं. बर्याच मुलींना विकलं गेलं नंतर वेश्याव्यवसायासाठी. भुकंपानंतर काही महिन्यांनी मी स्वतः पोलिसांची मदत घेऊन अश्या विकलेल्या तीस एक मुलींना पुण्याच्या बुधवार पेठेतुन सोडवले पण त्यांना पुढे कुठे पाठवायचे हा प्रश्न होता. बालविवाहपण बरेच झाले त्या भागात नंतर - केवळ अनाथ मुलींना मिळालेले पैसे लाटण्याकरता.
पण विशालभाऊंसारख्या व्यक्ती अन संघटनांनी तिथे जे काम केले त्याला तोडच नाही. केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळे गावं परत उभी राहीली. सलाम त्या सगळ्यांना अन विशालभाऊ तुम्हाला पण.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
31 Jul 2009 - 4:32 pm | विशाल कुलकर्णी
त्यावेळी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी अशा ठिकाणाहुन मदत म्हणुन आलेले वेगवेगळे अतिशय उत्तम दर्जाचे कपडे पुढच्याच आठवड्यात सोलापुर, लातुर तसेच पंढरपुर, बार्शी च्या बाजारात विकत मिळत होते. :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
31 Jul 2009 - 4:39 pm | प्रसन्न केसकर
एम जी रोडच्या फुटपाथवर ते कपडे कवडीकिंमतीला विकले फेरीवाल्यांनी. एव्हढे स्वस्त कसे म्हणुन चौकशी केली तर सत्य बाहेर आले. माझ्या एका वरिष्ठ सहकार्याने बरेच कपडे घेतले अन मलाही आग्रह केला घे म्हणुन. पण नाही घेववले मला.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
31 Jul 2009 - 4:54 pm | विशाल कुलकर्णी
मदत म्हणुन गोळा झालेले, विदेशातुन आलेल्या उत्तम दर्जाचे धान्यदेखील कित्येक दिवस गोडाऊन्समध्ये पडुन सडुन गेले. भुकंपग्रस्तांपर्यंत बरीचशी मदत पोहोचलीच नाही.
त्या ८०० कोटीच्या मदतीचे तर काय झाले ते देव आणि पवारसाहेबच जाणोत? :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
1 Aug 2009 - 2:28 pm | दादा कोंडके
किल्लारीला भुकंप झाला तेंव्हा आमच्या शेजारच्या घरात काम करणारी मोलकरीण दुसर्याच दिवशी नवर्याबरोबर तिथे निघून गेली. सगळ्यांना वाटलं कुणीतरी नातेवाईक वगैरे असतील तेथे. एका आठवड्यानंतर ती बाई आली ते श्रिमंत होउनच. तिनं ते काम सोडलं आणि नंतर, 'आपण सापडू' या भितीनं कुठंतरी पळून गेली!
"I always win, except when I loose. But then I just don't count" :D
31 Jul 2009 - 4:25 pm | विसोबा खेचर
सलाम...!
तात्या.
31 Jul 2009 - 10:31 pm | टुकुल
सहमत..
--टुकुल.
31 Jul 2009 - 4:55 pm | एकलव्य
... पण जाग्या झाल्याच तर आयुष्य किती क्षणभंगूर आहे ते जाणवून जाते.
विशाल - आपल्या आठवणी येथे मांडल्याबद्दल आभार.
- एकलव्य
31 Jul 2009 - 5:24 pm | लिखाळ
चांगला लेख.
तुमचे मदतकार्य कौतुकास्पद आणि स्फूर्तीदायक.
पुनेरींचे अनुभवसुद्धा त्यांनी अजून मांडावेत अशी विनंती.
-- लिखाळ.
1 Aug 2009 - 8:00 am | मदनबाण
चांगला लेख... या लेखामुळे स्मशानातील सोनं हा धडा परत आठवला.
काही लोक निव्वळ स्वार्थापायी अशा गोष्टी करतात तर... काही वेळा पोटातील आग आणि परिस्थीती मनुष्यास अशी कृती करण्यास भाग पाडतात.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa