त्या अंधार्‍या राती काय घडले ( भाग २/२)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
28 Jul 2009 - 2:29 am

मिपाच्या प्रतिसाद/अवांतर प्रतिसाद या संबंधीच्या अथवा इतर कोणत्याही धोरणाविषयी कुठलीही चर्चा/लेखन करण्यास मनाई आहे. सबब, आपले त्या संदर्भातील लेखन संपादित कराण्यात येत आहे. पुन्हा अशी आगळीक घडल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-- आणिबाणीचा शासनकर्ता.

त्या अंधार्‍या राती काय घडले (आधीचा भाग १/२)

आपल्या नाम्याचे दोन दिवस तालूक्याच्या गावाला गेल्यान रातीच्या कट्याला जान झाल नाही. त्यामूळे गटारीला होनार्‍या बैठकीची तयारी त्याला समजली नाही.
नंतर काय घडले ?? वाचा......

गटारी आमूशाच्या बुधवारी शाम ने दुकानात येवून सगळी तयारी येवस्तीत झाल्याच सांगितल. सगळ्या वस्तू म्हनजे बाटल्या, सोडा, थंडपेय भारनियमामूळ गरम व्हू ने म्हनून गेनूच्या हाटेलीत ठेवल्येल्या व्हत्या. संध्याकाळी समद्यांनी वढ्याच्या वरल्या अंगाला नविन कालनीत आसनार्‍या संभा भोसलेच्या रिकाम्या बंगल्यात लवकर जमायचे ठरल. मी सांजच्या येळेला मोठ्या भावाला दुकानीत बोलवून घ्येतल. मी आज लवकर निघतोय हे समजताच तो गालात हसला आन मला "सांबाळून मजा कर" आस सांगितल.

सकाळपासूनच पाऊस चालू व्हता. दुपारी त्याचा जोर तर लय वाढला. काळ्या ढगांमुळे दिवसा रातीचा भास व्हत व्हता. त्यातच वादळी वारं आन चमकणार्‍या विजांची भर पडली.
या सगळ्यात आमच्या बैठकीचे बारा वाजता की काय याची मला चिंता व्हती. बाब्यानं मातर समद्यांना बैठक व्हनारच चा निरोप धाडून दिला.

तिन्हीसांच्याला म्या आन सुर्‍या हिरोव्हंडानं नव्या कालनीत जाया निघालो. गावाच्या वढ्याला आता पानी आसल म्हून मी लांबच्या रस्त्याच्या पुलावरनं गाडी टाकली तर सुर्‍या म्हनला की खालच्या आंगाच्या फरशीवरनं लवकर जावू. फरशीवून जातांना आमची लय फजीता झाली. मोटारसायकल पान्यातच बंद पडली. वरून पाऊस आन वढ्याच्या वाढलेल्या पान्यात मोटारसायकल चढावरून ढकलतांना आमाला दम लागला. चमकनार्‍या विजा आनी ढगांच्या आवाजातून आमी मोटारसायकल कशीतरी पान्याबाहेर काढली खरी पन नंतर ती काय चालू व्हईना. संभाच्या बंगल्यापत्तूर ती ढकलतच आनावी लागली. तिथ आधिच पोचलेल्या ३ / ४ जनांची आमच्यासारखीच आवस्था झाली व्हती. बाकी ४ / ५ जन संभाच्या गाडीतून आल्यामुळे कोरडे राहीले व्हते. आमी भिजल्यामुळ आंगातले शर्ट काढून बनीयनवरच राहिलो. बाहेर वादळ, पाऊसाने जरी वातावरण थंड व्हते तरी घरात मस्त उबदारपणा जाणवत व्हता. मंडळी मजा करत टेपवर मोठा आवाज करून नाचत व्हते. तसा हा बंगला एकाकी आन बाजूला जास्त वस्ती नसल्याने कोनी वरडायला येनार नव्हते. नाही म्हनायला समोरच्या सरपंच जाधवाच्या बंगल्यात गेटावरचा लाईट चालू व्हता.

बरोब्बर ७ वाजता बैठक चालू झाली आन पाचच मिन्टात लाईट गेली. बर तर बर संभाच्या बंगल्यात इंनवरटर व्हता त्यामुळ काय फरक जानवला नाही. इंनवरटरचा बिप बिप आवाज डोक उठवत आसल्यान श्यामन तो आवाज बंद केला. दोस्त मंडळी लय दिवसानंतर मोकळीक मिळाली म्हनून खूलले व्हते. एकमेकांच्या आठवनी काढत हास्यविनोद करत व्हते. धा वाजेपर्यंत मस्त धिंगाना चालू व्हता. आज कोनी घरी जानार नसल्याने घरची काळजी नव्हती. बाहेर पावसाचा जोर आन ढगांचा गडगडाट वाढल्याचा अंदाज येत व्हता.

मंडळी आता जेवणाच्या तयारीला लागलो. बांधून आनलेले जेवन कागदी प्लेटमधी घेवून आम्ही गोल बैठक करून जेवू लागलो. जेवन संपत आल तेवढ्यात ईंनवरटर बंद झाला. आता साडेआकरा वाजत होत आले व्हते. तो तरी किती येळ चालनार. त्याची बॅट्री उतरली व्हती. महिपती म्हनला,"संभा गड्या ईंनवरटरला एकसाईडच्या ऐवजी दोन साईडची बॅट्री तरी टाकायची लेका. जास्त येळ चालली नसती का? " त्ये ऐकून सगळे हासले. संभाचा बंगल्यात कोनी नसल्याने मेनबत्ती बिनबत्ती काय नव्हती. सगळीकड अंधार व्हता. माझ्या समोरच्या उघड्या खिडकीतून समोरच्या जाधवाच्या खिडकीत उजेड दिसत व्हता. हवेमूळ तो उजेड थरथतत व्हता. त्या उजेडात कोनीतरी चालत आसलेल्याचा मला भास झाला. हे मी सगळ्यांना बोलून दाखवल. सरपंच तर गावात राहत व्हते आन २ तारखेला त्यांच्या पोराच्या लग्नानंतर नवीन जोडी आन त्याचे आईवडील देवदर्शन करायला गेले व्हते हे आमाला माहित व्हते. त्यांच्या घरात बाकी तिसर कोनी नव्हत आन त्यांचा बंगला तर रिकामा व्हता हे स्वता संभा भोसले म्हनला.

आता पाऊस जरा कमी झालेला व्हता. पन सगळीकड अंधारच अंधार पसरलेला व्हता. लाईटीनी आमच्या जेवनाचा थोडा मचका केला व्हता. तेवढ्यात पुन्हांदा मला समोरच्या खिडकीत काचेवर दोन मानसांच्या सावल्या चालत आसलेल्या दिसल्या. मी त्या लगेच आरून ला दाखवल्या आन त्याला पन तसच दिसत का म्हनून विचारल. आमच्यापैकी त्यानेच पिलेली नव्हती. त्याने पन मला जस दिसत तसच त्याला पन दिसत म्हनून मला दुजोरा दिला. आता आमाला काहीतरी येगळेच होत आसल्याचा सौंशय यायला लागला. सुरेशाने चोर आसतील असे सांगितले. पन त्या रिकाम्या बंगल्यात चोरन्यासारखे तर काही नव्हत. सरपंच नविन लग्न झालेल्या मुलासूनेसगट देवदर्शनाला गेले व्हते. आस आसल तर तिथे कोन व्हते?

आमी सगळे खिडकीपाशी उभे राहिलो. तेवढ्यात समोरून एका स्री च्या हासन्याचा आवाज आला. लख्खकन एक विज चमकून गेली. ढगांच्या कडकडन्याचा आवाज झाला. सुरेश म्हनला की, "आज आमूशा हाय. माला तर कायतरी येगळाच सौंशय येतो हाय." नंतर त्याने माहित आसलेला भूताचा किस्सा सांगितला. माझ्या आंगावर काटा आला. आशीच गत संभा आन आरूनची झाली व्हती. म्हंमद म्हनला की आसले काही नसते. आपन बंगल्याजवळ जावून पाहू. शाम पन तयारीत व्हता. आता आमची बर्‍यापैकी उतरली असल्याने आमी हो नाही करता सगळे तयार झालो. संभान त्याच्या गाडीचे लाईट चालू करून उजेड केला आन हातात टामी घेतली. आमी त्या बंगल्याच्या आवारात आलो. पुन्यांदा हासन्याचा आवाज आला आन खिडकीतल्या काचेवर एका मोकळे क्यास सोडल्यल्या स्री ची सावली दिसली. पुन्यांदा एकडाव विज चमकली आन मोठा कडाडन्याचा आवाज आला. आमचे सगळ्यांचे आता लाईट लागले व्हते. बाब्या पन सुदित आला व्हता. भितीने सगळे आंग थंडगार पडले व्हते. एवढ्यात एकदम मोठा आवाज झाला. तो आवाज विजेचा नव्हता आन तो या बंगल्यात झाला नव्हता. तो आवाज कसला ह्ये पाह्यसाठी आमी सगळे त्या बंगल्याच्या बाहेर पळत आलो. पाहातो तर संभाच्या बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यातले लिंबाचे झाड पडल व्हत. त्यामुळे बंगल्याच कंपाऊंड पडले व्हत. आता आमी पार घाबरलो. आरून ने रामरक्शा म्हनायला सुरवात केली. बाब्या डोक धरून खाली बसला. तेवढ्यात आमच्या माग दरवाजा उघडायचा आवाज झाला. एका स्री च्या बांगड्यांचा आवाज आला आन एका मानसाच्या आवाजात ऐकू आले की, "काय रे, काय झाले?" आम्ही भेदरून राम राम म्हनू लागलो. आता काय वाढून ठेवल्येल हाय त्ये पाहायसाठी मागे वळून पाहातो तर सरपंचाचा पोरगा माधव आन त्याची लग्नाची बायको उभी होती. आमी त्यांना झाड पडल्याचा आवाज झाल्याच सांगीतल.

आमी त्यांना ते तर देवदर्शनाला गेल्याबद्दल विचारल्यावर तो म्हनला, "आम्ही तर आज दुपारीच देवदर्शन करून गावात आलो आणि लग्नानंतर पहिली रात्र साजरी करण्यासाठी येथे आलो होतो. पण विज नसल्यामूळे अन पावसामूळे आम्ही जागेच होतो तेवढ्यात काय आवाज झाला हे पाहण्यासाठी बाहेर आलो."

आम्ही काय समजलो आन परिस्थिती काय व्हती ह्ये पाहून जोरात हासलो. आम्ही हासतो ह्ये पाहून माधवची बायको लाजली आन घरात पळत ग्येली.

समाप्त.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

28 Jul 2009 - 9:48 am | विशाल कुलकर्णी

मस्त जमली आहे. :-)

अवांतरः फक्त काही ठिकाणी 'स्त्री' असा उल्लेख आहे. बाकी समदं आपल्या गावरान बोलीत बोलनारा नाम्या बाईला 'स्त्री' का म्हनतुया? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

विजुभाऊ's picture

28 Jul 2009 - 9:48 am | विजुभाऊ

एकदम सस्पेन्स सांगुन टाकला भाव.
आसं कुटं आस्तं का.
चांगली दोनचार गानी/ हुहुहु करत भयान मुजीक आस्लं कायतरी पाय्जे हुतं.
पर कायबी म्हना भासा लै भारी वापार्लीया.

टारझन's picture

28 Jul 2009 - 10:16 am | टारझन

छान चाल्लय रे दगडफोड्या ....
भाषा उत्तम जमलीये .. उगाच गावठी करायचं म्हणून पचका केला नाहीस हे बरे :)

- टारझन

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2009 - 10:39 am | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ! माधवची मान्सच निगाली व्हय!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सूहास's picture

28 Jul 2009 - 1:15 pm | सूहास (not verified)

:)) :)) :)) :))
सुहास

अनिल हटेला's picture

28 Jul 2009 - 2:27 pm | अनिल हटेला

बोलीभाषा गावरान जमलीये खरं..... :-)

सस्पेन्स अजुन थोडा खुलवायचा ना राव.......

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

पाषाणभेद's picture

29 Jul 2009 - 11:08 am | पाषाणभेद

पुढच्या वेळेस सर्व सुचनांचा विचार करण्यात येईल.

धन्यवाद.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद