राहून राहून वाटतं
मी एन आर आय कसा?
माझा देह जरी इथे
माझं मन राही तिथे
माझं घर माझ्या देशा
मी बोलतो तीच भाषा
त्यांची माझी गाणी एक
पावसामधले पाणी एक
माझ्या पगाराचं चलन वेगळं
म्हणुन का केवळ असा उसासा?
ज्ञानार्जनाची हौस म्हणुन
गाव सोडून आलो शहरात
अर्थार्जनाची गरज म्हणुन
देश सोडून परदेशात
एक संक्रमण चालतं तर
दुसर्यालाच विरोध कसा?
रोज घरच्या बातम्या वाचतो
मतदानात भाग घेतो
हुषारीची कदर करतो
यथाशक्ति मदत करतो
भ्रष्टाचरणी चिडून उठतो
प्रतिकार करतो जमेल तसा
तरीही मी परका कसा?
माझ्या देशप्रेमाची का कुणी
वांझोटी शंका घ्यावी
माझ्या निष्ठेला, मायेला आणि
का कुणी आव्हानं द्यावी?
कुणी सहज करावा अपमान
इतका माझा मान स्वस्त कसा?
अंतर्मन माझे विचारे
'तुझे आई-बाप, मित्र सारे
यांच्यावरच्या प्रेमासाठी
करावा लागतो का रे
ओरडून कोरडा घसा?
सांगावं लागतं का त्यांना
तू त्यांचा कसा?'
'मग देशावरच्या मायेसाठी
का कळवळून द्यावा खुलासा?
का सांगावंस तू देशी कसा?
गरज नाही खुलाश्याची
तुझं व्रत, तुझा वसा
ठणकावून म्हणावं
मी आहे, हा असा!
पुन्हा चर्चेचे कष्ट नकोत की
मी एन आर आय कसा?'
प्रतिक्रिया
23 Jul 2009 - 10:16 pm | बेसनलाडू
छान! चालू द्यात!
(वाचक)बेसनलाडू
23 Jul 2009 - 10:38 pm | भाग्यश्री
छान कविता,आशय..
शेवटचे कडवे आवडले..
http://www.bhagyashree.co.cc/
23 Jul 2009 - 10:41 pm | विकास
फारच छान कविता आहे.
बाकी नावाप्रमाणेच बहुगुणी आहात हे आपले काव्य वाचताना समजले!
25 Jul 2009 - 1:59 pm | Nile
सहमत आहे! सुंदर कविता. :)
23 Jul 2009 - 11:00 pm | विसोबा खेचर
कविता उत्तम आहे.. अनेक प्रश्नांची फार चांगली आणि पटण्याजोगी उत्तरं दिली आहेत..
विरोध संक्रमणाला नाही आणि नव्हता..
दोन महिने नाय झाले परदेशात जाऊन तर लगेच काही मंडळी भारताला नावं ठेवायला लागतात, गलिच्छ म्हणतात, केवळ अश्याच लोकांचा मला प्रचंड राग आहे आणि राहील..
अन्य अनिवासी भारतीय हे सर्व माझे सगेसोयरे आहेत आणि देशबांधव म्हणून मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे.
मात्र परदेशात जाऊन थोडक्याच अवधीत भारताची घृणा करणारी काही मंडळी आजपर्यंत अनेकदा माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आली त्यामुळे नकळत सर्वच अनिवासी भारतीयांबद्दल मनात कटूता निर्माण होते. मात्र परवाच्या भाग्यश्रीच्या एका लेखाने आणि आता आपल्या या कवितेने खूप बरे वाटत आहे असे प्रांजळ निवेदन करतो..
हम सब एक है..
जय हिंद...
आपला,
(भारत हा अतीतीव्र वीकपॉईंट असलेला) तात्या.
23 Jul 2009 - 11:06 pm | बहुगुणी
हे संस्थळ आपल्या मालकीचं असल्याने आपल्या स्पष्ट खुलाश्याने नक्कीच बरं वाटलं! धन्यवाद!
24 Jul 2009 - 1:35 am | संदीप चित्रे
वाचून बरं वाटलं.
मी असेही लोक पाहिले आहेत जे शरीराने भारतात आहेत आणि मनाने परदेशी झालेत :)
24 Jul 2009 - 9:25 am | लवंगी
माझ्याच मनातले विचार मांडलेत अस वाटल. प्रत्येकवेळी अनिवासी भारतियांना घालुन-पालुन बोलणार्या प्रतिक्रीया वाचल्या कि एकदम परकं झाल्यासारख वाटत. तात्या, म्हणुनच तुमची प्रतिक्रीयावाचुन बरं वाटलं.
25 Jul 2009 - 10:29 pm | सखी
माझ्याच मनातले विचार मांडलेत अस वाटलं - अगदी अगदी.
प्रत्येकवेळी अनिवासी भारतियांना घालुन-पालुन बोलणार्या प्रतिक्रीया वाचल्या कि एकदम परकं झाल्यासारख वाटत. तात्या, म्हणुनच तुमची प्रतिक्रीयावाचुन बरं वाटलं. -- सहमत!
25 Jul 2009 - 8:06 pm | प्राजु
एकदम आवडली कविता.
खूपच आवडली. मनातलं वादळ सगळं उतरवलं आहे .. :)
मस्तच!
गरज नाही खुलाश्याची
तुझं व्रत, तुझा वसा
ठणकावून म्हणावं
मी आहे, हा असा!
पुन्हा चर्चेचे कष्ट नकोत की
मी एन आर आय कसा?'
या ओळीने काय सुचवायचे आहे.. पुन्हा निवासी आणि अनिवासी अशी चर्चा/वाद/ भांडणे नकोत.. असंच का?
(तसं असेल तर असंच म्हणेन की, अपेक्षा फार करता अहात.. )
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jul 2009 - 6:42 am | बहुगुणी
असं नक्कीच वाटतं, तशी अपेक्षा ठेवणं फार चुकीचं नसावं..
माझं प्रकटन आवडल्याचं/पटल्याचं कळवणार्या सर्वांचे आभार.
26 Jul 2009 - 4:36 pm | दत्ता काळे
:)
26 Jul 2009 - 4:43 pm | पर्नल नेने मराठे
माझा देह जरी इथे
माझं मन राही तिथे
:|
चुचु
5 Jan 2011 - 11:31 pm | मस्तानी
२००९ मध्ये लिहिलेली २०११ मध्ये वाचली तरीही !
आणि संदीप चित्रे यांची प्रतिक्रियादेखील तशीच 'कालातीत' ... 'शरीराने भारतात आणि मनाने परदेशी' भेटत राहतात ! :)