काळे प्रणाली
जगातल्या बहुतेक इतर कायद्यांप्रमाणे "काळे प्रणालीचा" जन्मसुद्धा ध्यानी-मनी नसताना अचानक "अपघाती"च झाला. पण या प्रणालीची पुढील प्रगती मात्र सद्यकालीन परिस्थिती जगाचा अर्वाचीन इतिहास व बिनतोड युक्तिवाद इत्यादींच्या संशोधनावर व सखोल अभ्यासावर आधारलेली आहे. मुख्य फायदा हा की या प्रणालीची प्रचीती पहाण्यासाठीं फारसे कष्ट करावे लागत नाहीत व प्रचीती नाहीं आली तर पुन्हा "मूळपदा"वरही आरामांत येता येते.
काळे प्रणाली थोडक्यांत सांगायची तर " हे जग मिशीवाल्यांचे नाहीं" या चार शब्दांच्या एका वाक्यांत सांगता येईल. म्हणजेच या जगांत यशस्वी होऊन पुढें जायचे असेल तर मिशी सफाचट केल्याने प्रचंड फायदा होतो व न केल्यास बाकीचे कितीही प्रयत्न केले तरी हाती यश येत नाहीं. वर मी अर्वाचीन इतिहासाचा खास उल्लेख मुद्दाम केलाय् कारण सहजपणे श्मश्रू करायची आयुधे उपलब्ध होण्याआधीचा काल यांत अंतर्गत केलेला नाहीं. कारण त्या काळात पुरुष वर्ग मिशा ठेवायचा त्यात मर्दानगीपेक्षा केस भादरतांना होणार्या वेदनाच जास्त करून कारणीभूत होत्या. म्हणूनच या सखोल अभ्यासात "जिलेट" युगानंतरचाच काळ धरला आहे.
या संशोधनात ज्या धर्मात केस कापण्याबद्दल धार्मिक बंधने आहेत अशा व्यक्तींचा विचार केलेला नाहीं.
कांही वर्षांपूर्वी इंडोनेशियातील सुरबाया शहरात "पाट्या टाकत" असतांना एकदा मित्रांबरोबरच्या "महफिल-ए-यारॉं"त इथल्या "बिंतांग" बियरचे घोट घेत असताना व अगदी वायफळ गप्पा मारताना सहज सुरबायातील कंपन्यांमधील त्यावेळच्या "सीईओ"सारख्या उच्च पदावर असलेल्या बॉसेसचा विषय निघाला! माझ्या असं लक्षांत आलं की ही सर्व मंडळी बिनमिशांची होती! अगदी अपवादार्थही कुणी मिशाळ माणूस उच्च पदावर नव्हता!! ही सत्यस्थिती अगदी कट्यारीसारखी माझ्या काळजात घुसली आणि मी जेंव्हा ही गोष्ट तिथे जमलेल्या माझ्या मित्रांना सांगितली तेंव्हा टांचणी पडली तरी ऐकू जाईल अशी शांतता पसरली! भारतीय (व त्यातही मराठी लोकांत) एकमत होणे हा कपिलाषष्ठीचा योग असतो. पण या विषयावर मात्र ताबडतोब एकमत झाले व सर्व मित्रांनी एकमुखाने टाळ्यांच्या गजरात माझ्या निरिक्षणाचे स्वागत व कौतुक केले. अशी जन्मली काळे प्रणाली. कधी-कधी गप्पा-गोष्टी करता-करता प्रचंड महत्वाच्या घडामोडीही होतात त्या अशा.
मग मी या विषयावर अधिक संशोधन सुरू केले. त्यासाठीं मी विविध क्षेत्रातील व्यक्ती निवडल्या. संशोधनांत जेंव्हा या प्रणालीच्या सत्यतेची ठिकठिकाणी व वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रांत प्रचीती आली तेंव्हाच मी हा लेख लिहिला व या प्रणालीचे "काळे प्रणाली" असे नामकरण केले. काळे प्रणालीची पहिली आवृत्ती मी १९८८ साली लिहिली व त्यानंतर माझ्या संशोधनातून जसजशी यात माहितीची भर पडत गेली, तसतशी मी या लेखाची सुधारित आवृत्ती प्रकाशित करीत गेलो. उदा: ९० साली दोन वर्षे पुण्यांत रहांत असतांना औद्योगिक जगातल्या अव्वल नेत्यांची उदाहरणे निघाली. ९२-९७ सालांच्या कालावधीत जकार्ता व मलेशियातील नेत्यांची उदाहरणे मिळाली. तसेंच या नूतनतम आवृत्तीत पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली जरदारी यांच्या उदाहरणाची भर घातली आहे. एकूण हे संशोधन खूप प्रचंड आहे व ते पूर्ण लिहिणे व ते प्रकाशित होणे जरा कठिणच. म्हणून ही संक्षिप्त आवृत्ती इथे दिली आहे.
हा अभ्यास मिशी सफाचट करून जबरदस्त यशस्वी झालेल्या नेत्यांच्या व मिशाळ असल्याने कमी यशस्वी किंवा पराभूत झालेल्या नेत्यांच्या कथा आहेत.
आता जरा जगाच्या व भारताच्या अर्वाचीन इतिहासाकडे पाहू या. आज अमेरिका एकमात्र ’सुपर-पॉवर’ कां आहे? जरा त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडे नजर टाका! दोनपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष बनलेले फ्रॅंकलिन रुजवेल्ट, ट्रूमन, आयसेनहॉवर, केनेडी, लिंडन जॉन्सन, निक्सन, फोर्ड, कार्टर, रेगन, बुश-१, क्लिंटन, बुश-२ व नवनिर्वाचित ओबामा या सर्वांत काय समान आहे? ते सगळे बिनमिशीचे आहेत. दोघा पिता-पुत्रांच्या नांवात बुश आहे पण ओठांवर बुश (bush) नाहीं. सगळे एकजात क्लीन-शेव्हन! काळे प्रणालीचा असा कांही पगडा अमेरिकन राजनैतिक क्षेत्रावर पडला आहे कीं खुद्द् राष्ट्राध्यक्षाची निवडणुक तर सोडाच, पण कुठलाही पक्ष, डेमोक्रेटिक असो वा रिपब्लिकन, साध्या "मुन्शीपाल्टीच्या" निवडणुकीतही मिशाळ माणसाला उमेदवारीही देत नाहींत! मला खात्रीलायक सूत्रांकडून कळले आहे कीं दर चार वर्षांनी होणार्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या शयर्तीत एकादा (वेडा) मिशाळ माणूस चुकून जरी घुसू पाहू लागला, तर पक्षश्रेष्ठी (आला कमान) त्याला सांगतात,"आधी तुझ्या मिशा उतरव, तरच तुला न्यू हॅम्पशयरच्या प्रायमरीत उतरता येईल!"
इंग्लंडनच्या पंतप्रधानांचा इतिहास गमतीदार तर आहेच, पण त्यांची उदाहरणेंही काळे प्रणाली सिद्ध करतांत. ज्या पंतप्रधानाने बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यावर उदक सोडले तो क्लेमेंट ऍटली मिशाळ होता, तर इंग्लंडला दुसर्या महायुद्धांत पराभावाच्या खाईतून बाहेर काढून विजयाचा मंगल कलश आणून देणारा विन्स्टन चर्चिल बिनमिशीचा होता. पुढे ऍटालीला पराभूत करून तो पुनश्च दुसर्यांदा पंतप्रधानही झाला.
इतिहासाचा नीटपणे अभ्यास न केलेल्या इतिहासकारांना असें वाटतें कीं सुएझ कालव्यावर इंग्लंडाची पकड जागतिक राजनैतिक मतविरोधापुढे वाकून सुएझ युद्धांत माघार घेतल्यामुळें सुटली. पण किती लोकांना ऍन्थनी ईडनला मिशा होत्या याची माहिती आहे? जर हॅरोल्ड मॅकमिलनला मिशा नसत्या तर हेलेन कीलर प्रकरणी गुंतलेल्या व त्यावेळी संरक्षणमंत्री असलेल्या "प्रोफ्यूमो" प्रकरणापायी त्यांची कारकीर्द अशी अकाली संपली नसती. हे कांहीच नाही.ब्रिटिश पंतप्रधानपदीं वर्षानुवर्षे बसलेल्या व एक धूर्त राजकारणी समजल्या जाणार्या हॅरॉल्ड विल्सनने तरुणपणी (की गद्धेपंचविशीत) मिशा ठेवल्या होत्या. पण या चतुर माणसाने वेळीच ’काळे प्रणाली’ आचरणात आणली व जसजशी पंतप्रधानपदाची खुर्ची त्यांना खुणावू लागल्याबरोबर् त्यांनी आपल्या मार्गातील ही धोंड वस्तर्याच्या एका फटाकार्यात त्या मिशा भादरून दूर करून टाकली व आपले बिनमिशीचे रुप आपल्या पक्षाला व मतदारांना दाखवून निवडणूक जिंकली व ते पंतप्रधानपदीं विराजमान झाले! त्यांची या पदावरची पकड इतकी मजबूत होती कीं थॅचरबाईंच्या आगमनापर्यंत सर्वांत अधिक काळ पंतप्रधानपद सांभाळण्याचा विक्रम त्यांच्याच नांवावर होता. (अलिकडे तो टोनी ब्लेअर या बिनमिशीच्याच नेत्याने मोडला.)
निवडणुकीच्या मार्गाने सत्तास्थानी आलेल्या क्लेमेंट ऍटली, सर ऍंन्थनी ईडन, मॅकमिलन या मिशाळ ब्रिटिश नेत्यांच्या कारकीर्दी क्षणभंगुरच ठरल्या. केवळ अपवाद म्हणून होव, कॅलॅघन व हीथ अशांची नांवे घेता येतील. पण असे अपवाद मूळ प्रणालीला पूरकच ठरतात. (Exceptions proving the rule) जॉन मेजर यांना मिशा होत्या कीं नाहीं हे गूढच आहे. टीव्हीवर पहातां असे वाटते कीं त्यांना मिशा होत्या. पण जकार्ता येथील ब्रिटिश दूतावासात केलेल्या चौकशी नुसार त्यांना मिशा नव्हत्या. एक सुमार कर्तृत्वाचा नेता तसा खूप दिवस पंतप्रधानपदी होता त्यावरून तो बिनमिशांचा असणारच या माझ्या मतावर अशा तर्हेने शिक्कामोर्तबच झाले.
माझे संशोधन भौगोलिकच नव्हे तर लिंगभेदसीमांच्या पलीकडे जाऊन केलेले आहे. "स्वच्छ उर्ध्वओठां"ची स्त्रीजात ही अजिबात अबला वगैरे नसून चांगली खमकी आहे. (अर्थात विवाहित पुरुषांना हे सांगायला कशाला पाहिजे?) देवाने असे कां केले हे समजायला मार्ग नाहीं, पण जराशी ’आ बैल, मुझे मार’वाली कृती त्याच्या हातून एखाद्या गाफील क्षणी झाली असावी! (माझय कल्पनेप्रमाणे देव बहुधा पुरुषच असावा!) त्याने स्त्रियांच्या (ईव्हच्या) ओठावर लव दिली नाहीं, पण ऍडमला मात्र मिशा देउन पिढ्यान् पिढ्या त्याच्या नशिबी पराजय लिहून ठेवला. त्याच मुळे जेंव्हा-जेंव्हा स्त्रियांनी हाती सत्ता घेतली तेंव्हा-तेंव्हा त्यांची कारकीर्द दीर्घ मुदतीची झाली. त्यात थॅचरबाई, इंदिरा गांधी, सिरिमाचो बंदरनायके अशी कितीतरी नांवे घेतां येतील. पाकिस्तानच्या पहिल्या-वहिल्या (व आजपर्यंत शेवटच्या) महिला पंतप्रधान बेनझीर भुत्तोंचे नांवही त्याच यादीत मोडते व त्या जर एका अतिरेक्याच्या गोळीला बळी पडल्या नसत्या तर आज त्यांच्या मिशाळ पतीच्या जागी त्याच पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी दिसल्या असत्या.
खूप इतिहासतज्ज्ञांत एक चुकीची कल्पना रुतून बसली आहे कीं रशियावर स्वारी केल्यामुळे हिटलर दुसरे महायुद्ध हरला. कांही इतर इतिहासतज्ज्ञांच्या मते पर्ल हार्बरवर हल्ला करण्याऐवजी जर जपान्यांनी रशियाच्या व्लाडिवोस्टोकवर हल्ला करून रशियन सेना पूर्वेकडे खेचली असती तर हिटलरने आरामांत दुसरे महायुद्ध जिंकले असते. पण खरी गोम दुसरीच आहे. हिटालरची वाट लावली त्याच्या हिटलरकट मिशांनी! अमेरिका-इंग्लंडकडील रुझवेल्ट, चर्चिल, द गॉलसारख्या बिनमिशांच्या नेत्यांपुढें (अपवाद "हॅंडलबार" स्टॅलिनचा) ऍक्सिस गोटातील हिटलर व जपानी टोजो यांच्यासारख्या मुच्छड सेनाधिकार्यांचा कसा पाड लागणार? ते कसे विजयी झाले असते? (अपवाद:मुसोलिनी). "आत्याबाईला मिशा असत्या तर" थाटात विचार केल्यास "हिटलरने जर वेळीच आपले वरचे ओठ सफाचट केले असते तर दुसर्या महायुद्धाचा निकाल खूप वेगळा लागला असता" असे माझे ठाम मत झाले आहे. तसेंच स्टॅलिन बिनमिशीचा असता तर हे युद्ध इतके ६ वर्षे रेंगाळले नसते. जर बिनमिशीचे चेंबरलेन इंग्लंडनचे पंतप्रधान राहिले असते (व चर्चिल आले नसते), तर एकही गोळी न झाडता हिटलर विजयी झाला असता. असा आहे मिशीचा प्रताप.
भारताचे उदाहरण घ्या! मिशीवाले माजी पंतप्रधान शास्त्री यांनी त्यांच्या छोट्याशा कारकीर्दीत खूप कीर्ति मिळवली, पण त्यांची कारकीर्द फारच छोटी ठरली. शास्त्रींच्या आधीचे पंतप्रधान नेहरू व नंतरच्या इंदिराबाई हे क्लीन-शेव्हन जातीत मोडतात. त्यांनी खूप वर्षे गादी चालवली.पण त्यानंतरचे मुच्छड श्री. विश्वनाथ प्रताप सिंग ११ महिन्यांतच गारद झाले. चंद्रशेखर यांच्या तर सगळ्या चेहर्यावर केसच केस होते. ते जेमतेम कांही महिनेच टिकले. पण नंतर आलेल्या बिनमिशीच्या नरसिंहरावांनी मात्र सिक्सरच मारली. लायसेन्स-राज नष्ट करून भारताला जागतिक बाजारपेठेत स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे करणार्या नरसिंहरावांची कारकीर्द सर्व दृष्टींनी अविस्मरणीय ठरली. पण त्या "यशामागील (नसलेली) मिशी" फक्त माझ्यासारख्या संशोधकालाच दिसली. ते येरा गबाळ्यांचे काम नोहे!
मला आशा आहे की भाजपाचे अध्यक्श्ग " काळे प्रणाली" कडे लक्ष देउन या बाबत ठोस पावले उचलतील व आडवानींना सांगतील कीं आपल्याला जर पंतप्रधान व्हायचे असेल तर फिरवा आधी ओठांवरून वस्तरा. पण त्यांनी मिशा ठेवण्याचा हट्टच धरला तर आहेतच सुषमा स्वराज किंवा अरुण जेटली.
आणखी एक महत्वाची गोष्ट ऐका. मी या लेखाची प्रथमावृत्ती लिहिली तेंव्हा मी श्री.लक्ष्मी निवास मित्त्ल यांच्या कारखान्याला उर्जितावस्था आणण्यात गुंतलो होतो. त्यावेळी ते एक उदयोन्मुख कारखानदार होते व मिशा ठेवत असत. पण जस-जसे त्यांचे पोलादी साम्राज्य वाढू लागले तसे त्यांच्या लक्षांत काळे प्रणाली आली असावी, कारण एकाएकी त्यांची मिशी नाहींशी झाली! याच्याहून चांगले उदाहरण माझ्याकडे नाहीं!
या लेखाचे पुनर्टंकन श्री. अरुण वडुलेकर यांनी केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!
सुधीर काळे, जकार्ता
ता. क. ही काळे प्रणाली इतकी का सगळीकडे "फिट्ट" बसते? याचे कारण माझ्या मतें उलटे आहे..... म्हणजे बिनमिशाचे लोक यशस्वी होतात हे आपण पहातो, पण हे पहात नाहीं कीं लोक जसजसे यशस्वी होऊ लागतात तसतसा त्यांना मिशा कोरायला वेळ मिळेनासा होतो व मिशा गुल होतात. आपल्याला वाटते कीं बिनमिशीवाले जिंकतात, पण सत्य हे आहे कीं यशस्वी लोक मिशा उडवतात!
प्रतिक्रिया
15 Jun 2009 - 1:51 pm | श्रावण मोडक
बिनमिशांचे आडवानी... कल्पनाच अशक्य कोटीतली आहे. म्हणजे आडवानींच्या मिशांची मला चिंता नाही. मी चिंता करतोय ती आर. के. लक्ष्मण यांची. त्यांनी आडवानींनी जो कार्टुनी चेहरा दिलाय तो या निवडणुकीनंतर तर अगदी वास्तविक ठरतोय. बिनमिशांच्या आडवानींचा चेहरा काढणे लक्ष्मण यांनाही जमणार नाही.
बाकी थेअरी भारी. पटो ना पटो, मांडणी छान केलीत.
15 Jun 2009 - 2:01 pm | सुधीर काळे
धन्यवाद. यशस्वी लोक वेळे अभावी मिशा साफ करतात हेच त्यामागील कारण असावे असे वाटते.....
सुधीर काळे
15 Jun 2009 - 9:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता खरंच मजा आली लेख वाचायला.
इंदीरा गांधींचा क्लीन-शेव्हन असा उल्लेख तरिही खटकलाच!
16 Jun 2009 - 7:42 am | सुधीर काळे
खरं तर मला क्लीन अपर लिप म्हणायचं होतं! मूळ इंग्रजीत Look at India. Our ex-PM Lal Bahadur Shastri, although he led India so well in his short stay, had a very short tenure. His predecessor (Pandit Jawaharlal Nehru) and successors (Mrs. Indira Gandhi and Rajiv Gandhi) were with clean upper lips and had long innings असं आहे.
इंदिराबाईंना क्लीन शेव्हन म्हणायचा उद्देश कधीच नव्हता. तरी क्षमस्व!
16 Jun 2009 - 7:59 am | मुक्तसुनीत
लेख रोचक वाटला. खुसखुशीत शैलीतला.
बाकी (दाढी नि ) मिशीवाल्यांचे जग : ;-)
16 Jun 2009 - 8:54 am | सुधीर काळे
धन्यवाद!
सुधीर काळे
काळे प्रणाली (इंग्लिश आणि मराठी मिळून) या लेखाने शिवसेनेवरील माझ्या लेखाला "एकूण वाचन" व "प्रतिक्रिया" या दोन्ही निकषांवर मागे टाकले हे पाहून सानंद आश्चर्य वाटले.
29 Aug 2009 - 8:49 am | सुधीर काळे
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार लक्ष्मण यांचा "कॉमन मॅन" सहाजिकपणेच मिशाळ असतो. मिशा उतरवल्यास तो "कॉमन" रहाणार नाहीं.
"काळे प्रणाली"ला आणखी एक टेकू.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
29 Aug 2009 - 9:34 am | ज्ञानोबाचे पैजार
ह्या प्रणाली चे अनुकरण करण्याधी आपल्याच अजुन एका मित्राचा सल्ला जरुर लक्षात घ्यावा. मिशा भादरुन आपण आपल्याला देवाच्या असीम कृपेने मिळालेल्या एका "नैसर्गीक फील्टर" ला मुकतो आहोत, जो आपले अनेक रोगांपासुन रक्षण करु शकतो.
लक्षात ठेवा "सीर सलामत तो पगडी पचास"
आपला एक (मिशाळ) हितचिंतक
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
29 Aug 2009 - 10:31 am | प्रमोद देव
वा,काळेसाहेब मस्त लिहिलंय.
आपला,
मिशीतल्या मिशीत हसणारा
प्रमोद देव
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
29 Aug 2009 - 11:01 am | ब्रिटिश टिंग्या
लै भारी! :)
- टिंग्या काळे!
29 Aug 2009 - 4:20 pm | भोचक
मस्त. थिअरी पटो न पटो. वाचायला मात्र मजा आली.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
29 Aug 2009 - 6:25 pm | योगी९००
मस्त मजा आली लेख वाचताना...
पण काही अपवाद्...आपले शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे (पहिले) वगैरे वगैरे..
एक प्रश्न..औरंगजेब, अकबर मिशी काढून फक्त दाढी ठेवून होते म्हणूनच त्यांनी जास्त राज्य केले काय?
खादाडमाऊ
30 Aug 2009 - 11:45 am | कानडाऊ योगेशु
आपल्या तर देवदेवतांना मिशाच नाहीत.
राम-लक्ष्मणाच्या वनवासात जटा मात्र वाढल्या पण दाढी मिशा नाही..असे कसे?
का राम लक्ष्मणाचे दैवी रूप ठसविण्यासाठी अशी चित्रे/मूर्त्या बनवल्या गेल्या असतील.
(दाढी करायला टाळाटाळ करणारा) योगेश
30 Aug 2009 - 2:20 pm | पाषाणभेद
हा लेख नजरचुकीने सुटून गेला. आता वाचला आणि मजा आली. आपला फोटो पण यात टाकला असता तर लेखजन्मदाता काळेप्रणालीचा उद्गाता कोणती प्रणाली अवलंबतो ते समजले असते.
तरी आपण मागणीचा पुरवठा करावा ही विनंती.
"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
30 Aug 2009 - 3:38 pm | सुधीर काळे
फोटो कसा चढवायचा ते सांगा!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
30 Aug 2009 - 5:12 pm | पाषाणभेद
http://www.misalpav.com/node/921
आधी याहूची फ्लिकर किंवा ईतर वर अकाउंट तयार करा.
"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
30 Aug 2009 - 3:49 pm | सुधीर काळे
धार्मिक कारणासाठी दाढीमिशा ठेवायला लागतात असे लोक धरले नाहीत. उदा. शीख, औरंगजेब वगैरे.
देव वगैरे मंडळीही बाहेर.
का कुणास ठाऊक, पण दाढी आणि मिशा असलेले लोक काळे प्रणालीत फिट होत नाहींत असे मी लिहिले आहेच. प्रमोद देवसाहेबांनी दाढी आणि मिशा दोन्ही ठेवल्या आहेत त्यामुळे त्यांना घाबरायचे कारण नाहीं.
बाजीरावांसारखे कांही अपवाद नियम सिद्ध करतात. (exceptions that prove the rule)
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
31 Aug 2009 - 10:41 am | सुधीर काळे
Deleted a no-photo
31 Aug 2009 - 10:48 am | Nile
काळे साहेब, फोटो चढवता आला नाही हे अपयश तुमच्या सफाचट असण्याच्या माथी मारावे का? ;) (ह. घ्यालच)