१९९९ साली आमचे स्टेशनरी चे भाड्याचे दुकान होते . त्याच्या कामानिमित्त मला अनेकांकडे जावे लागे. त्यात एक दूरचे नातेवाईक होते त्यांच्या कडे नेहमी जाणे होई. त्या नातेवाईकांची एक मुलगी होती. मी त्या वेळी ऐन तारुण्यात होतो, लग्नाळू होतो. ती मुलगी मला आवडत असे. तिला सुद्धा माहित होते की मी तिच्यावर लट्टू आहे.
माझी हिरो होंडाची cd १०० SS घेऊन मी त्यांच्या कडे सामान द्यायला दोन एक आठवड्यातून जात असे. ती घरात असावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असे, आणि ती दिसली की मनात फुले उमलत असत. ते लोकही मला चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नसत. काही कौटुंबिक कारणाने माझे लग्न जमत नव्हते [जे मला आणि माझ्या कुटुंबाला ओळखतात त्यांना माझे लग्न का जमत नव्हते हे माहित आहे.], माझी जी नोकरी होती त्यात पगार सुद्धा बेताचाच होता.
मला ती आवडते ही बाब त्या मुलीच्या आई बाबाना कळली होती. एकदा माल घेऊन मी त्यांच्या कडे डिलिव्हरी करण्यासाठी संध्याकाळी गेलो. तीला आणि तिच्या कुटुंबाला आज सरळ माझी माहिती द्यायची आणि लग्नाचे विचारायचे असे मी ठरवले. माल घेऊन त्यांच्या घराची बेल वाजवली, आणि दार तिनेच उघडले. मनात परत फुले उमलली. सामान ठेवून बिल घेतले. नेहमी प्रमाणे चहा घेऊन जा अशी त्यांची गळ घातली आणि मला तेच हवे होते म्हणून मी थांबलो. पण आज "ती" एकटी नव्हती. तिची एक मैत्रीण पण होती आणि त्यांच्या गप्पा सुरु होत्या, मला मुद्दाम ऐकू जातील अशा.
तर माझ्या मनातली ती स्वप्नललना तिच्या मैत्रिणीला सांगत होती त्यावरून माझ्या लक्षात आले की माझी स्वप्नललना आता कोणाची तरी स्वप्नपत्नी आहे, आणि माझ्या स्वप्नललनेच्या मनात स्वप्नपती म्हणून मी नसून "तो" कोणी आहे. त्याच्याबद्दलच त्या दोघी बोलत होत्या. एकंदरीत तो सुदैवी स्वप्नकुमार अमेरिकास्थित असून त्याच्या कडे BMW आहे असे समजले.
माझी स्वप्न ललना मैत्रिणीने सांगत होती की "तिने तीच्या स्वप्न कुमारला फोन केला तर तो घाईत होता, तर ही म्हणाली की थोडा उशीर झाला तर सांग गाडी पंक्चर झाली म्हणून."
तर मग "तो" तिला म्हणाला "हनी" [म्हणजे मधाळ बायको], मी BMW पंक्चर झाली असे नाही बॉस ला सांगू शकत. मग त्या दोघींच्या BMW वर, अमेरिका कशी उत्तम आहे, भारत कसा भुक्कड आहे यावर चर्चा सुरु होत्या. मधील काळात तिच्या आईने चहा आणून माझ्या हातात ठेवला होता.
अमेरिका कौतिक ऐकत आणि भारत कसा भुक्कड आहे याबाबत विवेचन ऐकत मी तो साखर घातलेला पण आता कडू लागणरा चहा संपवला आणि तिच्या आईला अच्छा करून निघालो. .. बाहेर cd १०० SS उभी होती ....आणि माझ्या मनात पंक्चर झालेलं माझं स्वप्न ......
---- मनात उमललेली फुले त्यांचा सुवास अनुभवायाधीच कोमेजून गेली होती.
मग माझ्यासारख्यांचा स्वप्न भंग झालेल्या लग्नाळू आणि तारुण्यातील मुलांना भावना मोकळ्या करायच्या ज्या दोन हक्काच्या जागा असतात त्यातली एक म्हणजे मित्रांबरोबर बार मध्ये जाणे आणि पोटात दारू टाकून डोळ्यातून अश्रू सोडायचे [पण हा महागडा उपाय आहे],
आणि दुसरी हक्काची आणि फुकट जागा म्हणजे घरातील "चिंतन गृह" [ज्याचा उपयौग तसे सगळेच सकाळी करतात ते].
मी चिंतन गृहात गेलो, सुदैवानी घरात कोणी नव्हते, आणि अश्रूंना मोकळी वाट करून दिली....माझे हुंदके चिंतनगृहात विरले.. आपला पगार आठवला ... आपलाही लायकी कळली ....आपण कधीही अमेरिकेत जाऊ शकत नाही याचे वैषम्य वाटले. ...
लोकांच्या अश्रूंची फुले झालेली मी ऐकलंय, पण माझ्या ते अश्रू मात्र गटार गंगेत विलीन झाले ...
----------------
या गोष्टीला आता जवळपास २१ वर्षे झाली. परवा एका नातेवाईकांच्या लग्नाला गेलेलो.. तिथे जवळपास २० वर्षांनी त्या मुलीची आई भेटली. आपणहून चौकशी करायला आली. मी काय करतो , पगार किती वैगैरे....
तितक्यात "ती" दिसली .... तीही आपाहून बोलायला आली... अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यावर मूळचे भारतीय भारतात आल्यावर जसे असतात तशीच तीही होती..... पण दोन मुलांची आई होती ... १९९९ मधल्या तारुण्यातील वसंत समयी तिच्यात असलेला बहर आज कोठेही दिसत नव्हता ... (आणि तसा मी सुद्धा कुठे परिकथेतील राज कुमार राहिलो होतो ?)
मनात विचार आला त्यावेळी हिच्या "स्वप्नपतीकडे " BMW होती, तर आज कोणती गाडी असेल? कदाचित चार्टर्ड प्लॅन असेल का ?
तीची आई पण जवळच होती. त्यांच्या बोलण्यातून जे कळले मात्र धक्कादायक होते... म्हणाली.... "त्यावेळचा तो स्वप्नपती आता तिचा पती राहिला नसून त्या दोन मुलांचा फक्त "बायोलॉजिकल फादर" आहे."
"अमेरिकेचा कंटाळा आलाय... एका मुलाला काही आरोग्य विषयक प्रॉब्लेम्स आहेत , व्यसने आहेत..भारतात जी मेडिकल सर्विस मिळते ती कुठेच नाही ... . मला आता परत यायचं आहे इथे ..मुलाला आयुर्वेद उपचार घ्यायचेत. थोडं इतर लोकांच्यात मिसळू द्यायचं आहे.. आपली संस्कृती त्याला सांगायचीये ...अनुभवू द्यायचीये . तुझ्या ओळखीत कुठे कोकणात वाडी , शेतजमीन आणि घर असेल तर नक्की बघ... मला घ्यायचय....."
खरंतर सूड उगवला गेला या भावनेनी मी मनात खुश व्हायला हवं होतं पण खरंच वाईट वाटलं .... आणि
का कुणास ठाऊक तुकारामांचा अभंग मॉडिफाइड व्हर्जन मध्ये डोक्यात गुणगुणला...
"याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस भारतात व्हावा।।
कौस्तुभ पोंक्षे
प्रतिक्रिया
10 Dec 2025 - 9:30 am | विवेकपटाईत
मुले अमेरिकेत गेली याचा आनंद प्रत्येक पालकाला होतो. माझा मुलगा अमेरिकेत आहे हे तू सल्ला सांगताना त्यांची छाती 56 याच्यापेक्षा जास्त मोठी होते. पण पंच्याहत्तरी उलटल्यानंतर कोणता वृद्धाश्रम उत्तम आहे याच्या शोध घ्यावा लागतो. अमेरिकेतील मुलांनी जर फायनान्स केले नाही तर शेवट अत्यंत दारुण होतो.
बाकी अमेरिकेत ही लोक भारतीय संस्कार जपतात. दारू आणि ड्रग्स पासून दूर असलेल्या मुलांचे भविष्य तिथे ही उज्ज्वल आहे.
10 Dec 2025 - 10:14 am | युयुत्सु
नियतीचा न्याय म्हणतात तो हा॑च!
10 Dec 2025 - 10:33 am | धर्मराजमुटके
बरं झाले खुश नाही झालात. आयुष्याच्या संध्याकाळी सूड उगवून देखील काही फायदा नसतो. जी गोष्ट ज्यावेळी हवी त्यावेळी मिळाली नाही तर जे नुकसान होऊन गेले ते भरता येत नाही. सुड देखील तरुण वयातच घेता आला तर मजा आहे.
10 Dec 2025 - 11:27 am | विजुभाऊ
एकदम पटले.
आणि जे काही घडले यात लेखकाचे काय कर्तृत्व आहे?सूड हा काही पॅसिव्ह गोष्ट नाहिय्ये. त्यासाठी स्वतः काहितरी करावे लागते.
10 Dec 2025 - 10:39 am | युयुत्सु
जी गोष्ट ज्यावेळी हवी त्यावेळी मिळाली नाही तर जे नुकसान होऊन गेले ते भरता येत नाही.
+१
10 Dec 2025 - 11:29 am | विजुभाऊ
मिली तो मिली नहीतो अपनी गली.........
लेखक/कथानायक
10 Dec 2025 - 3:33 pm | कानडाऊ योगेशु
खरेतर स्वप्नललनेने तसा काहीही विश्वासघात केला नाही व हा सारा एकतर्फी मामला होता.उलट प्रत्यक्ष तोंडावर नकार देऊन पाण उतारा न करता आडुन आडुन आता माझ्या बद्दल विचार करणे सोड हे सुचविले.खरेतर लेखकाने तिचे आभार मानायला हवेत. मी ही लग्नाच्या मार्केट मध्ये उभा असताना काही जणींनी नकार दिला होता व त्याचा राग आला होता पण मी देखील काही जणींना नकार कळवला होता. त्यामुळे आधी वाटत असलेली सूडाची भावना कालांतराने नाहीशी झाली.
ही मराठी शॉर्ट्फिल्म बघण्यासारखी आहे.
10 Dec 2025 - 9:35 pm | खटपट्या
बहुतेक मी तुमच्या स्वप्नकुमारीला ओळखतो.
व्यनी करतो.