गावात दादूसारखा दांडगा दुसरा माणूस दाखवायला म्हणून नव्हता. दादूचं नाव दांडगा दादू असंच पडलं होतं. त्याचा बाप रामापण असाच दिसायला काळा वड्ड आणि अंगानं रोमनाळच्या रोमनाळ होता. त्याला ढांग रामा असं म्हणत असत. एवढा पिराएवढा मोठा रामा, पण विहीर फोडताना अचानक रक्त ओकून पाच मिनिटांत मरून गेला होता. दादू त्याच्यासारखाच. बरोबरीच्या गड्यांपेक्षा तो टीचभर उंच होता आणि त्याच्या बंडीला जरा कमी तीन वार मांजरपाट लागत असे. त्याची गर्दन रानडुकराच्या मानेसारखी होती आणि त्याची छाती तेल्याच्या दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या रॉकेलच्या बॅरलसारखी दिसत असे. पुढनं मागनं धोतर खोचून घेऊन उघड्या अंगानं दादू हातात कुर्हाड घेऊन लाकडं फोडायला लागला की त्याचे दंड अंगात आल्यासारखे वरखाली उसळ्या मारत आणि त्याच्या पिंढर्यांचे गोळे त्याच्या तेलकट काळ्या कातडीतनं बाहेर पडायला बघत. घाम पुसायला त्यानं हात उचलला की हातावरच्या सुतळीसारख्या शिरा टरारल्यासारख्या दिसत आणि खळखळून पिंक टाकायला त्यानं तोंडात पाणी घेऊन गाल फुगवले की त्याचं तोंड कुंभारवाड्यातल्या एखाद्या भाजलेल्या मडक्यासारखं दिसे. उन्हाळ्यात पट्ट्यापट्ट्याची क्वार्टरपँट घालून उघड्या अंगानं तो कडब्याची बडीम रचायला उभा राहिला आणि वर चढलेल्या गड्याकडे खाली वाकून आणि लगेच उभारून कडब्याचे बिंडे फसासा फेकायला लागला की त्याचं अंग वैशाखातल्या उन्हात काळ्या नागाची जोडी उभ्यानं जुगत असावी तसं दिसत असे. त्याचे दात पण मोठे भोपळ्याच्या बियांसारखे होते आणि त्यांच्यात फार फटी होत्या. त्यांत सदा काही ना काही अडकलेलं असे आणि मारुतीच्या देवळातल्या उदबत्तीच्या काडीनं दादू कायम दात टोकरत असे. खेड्यातल्या सगळ्या गड्यांप्रमाणेच दादूला पानतंबाखू खायची सवय होती आणि त्यानं त्याचे दात लालपिवळ्या रंगाचे झाले होते. त्याचे कुरळे केस नेहमी फार वाढलेले असत. एकदा ह्या अंगाला आणि एकदा त्या अंगाला झुलत तो येत असला की लांबनं राक्षस चालत असल्यासारखाच दिसत असे.
दादूचं सगळं राक्षसासारखंच होतं. खायला त्याला चार माणसांचं खाणं लागत असे. कुणाच्या संगतीनं कुणास ठाऊक, पण दादू सतरा अठरा वर्षांचा असतानाच खाट्टमखुट्टम खायला शिकला होता आणि आता तर त्याला आठवड्यातनं दोन वेळा तरी लालभडक रश्श्यातलं मांस खायला लागत असे. मांस म्हणजे मांस. त्याला काहीही चालत असे. पैसे असतील तर मटण, कोंबडी. नाहीतर मग रक्ती, वजडी काहीही. नाहीतर मग दस नंबरी. वेळ पडली तर गावातल्या वडारांचं चोरून कापलेलं गावडुक्कर. कधी रात्री शिकारीला जाऊन पकडलेलं रानडुक्कर, ससा, साळिंदर काहीही. पण ते तिखट आणि मसालेदार पाहिजे. तेच महत्त्वाचं असल्यासारखं. चरचरीत मसाल्यात कापसाची हिरवी बोंडं शिजवून त्याला वाढली असती तरी त्यानं ती मटणासारखी मिटक्या मारत खाल्ली असती. एरवीही तो पारव्या रंगाच्या वांग्याची मसाला भरलेली भाजी आणि भाकरी, पातळ मसालेदार आमटी आणि भात, गाठीगाठी असलेला गुळाचा सांजा, पुरणाच्या पोळ्या, गुळवणी असलं जेवायला असलं की शेजारी बसलेल्याचीच काय पण वाढणार्याचीही वासना उडेल एवढं आणि असं खात असे. ऊसाची तोड संपली की मालक फडकर्यांना भडंग आणि चहाची पार्टी देत असे. दादू फडात असला की मालकाला भडंग दुप्पट करायला लागत असे. दादू वर्तमानपत्राचा पूर्ण कागद पसरून त्यावर शीग लावून भडंग वाढून घेत असे. त्याबरोबर बुक्कीने फोडलेला कांदा आणि तळलेल्या तिखट मिरच्या. चार माणसांचं भडंग संपवून दादू त्यावर दोन कप गोड आणि अगदी तोंडाला पोळेल एवढा गरम चहा पिऊन समाधानानं फ्फू..फ्फू.. असा आवाज काढत एक बिडी पेटवत असे. एक म्हणजे पुढच्या चारपाच बिड्यांतली एक. मग भरपूर चुना, तंबाखूचं पान. एवढं संध्याकाळी खाल्लं तर त्याची रात्रीपर्यंतची बेगमी होत असे नाहीतर दिस बुडायलाच त्याला आता सगळी रात्र खाऊन टाकू का काय अशी भूक लागत असे. एकूण काय, भुतासारखंच खाणं. दादूचा आवाजही त्याच्या शरीराला शोभेल असा होता. खेड्यात एकूणच सगळे लोक वरच्या पट्टीत बोलत असतात. दादू त्या सगळ्यांच्या वर सहा इंच आवाजात बोलत असे. एका काटकीला घोड्याच्या शेपटीनं एक कागदाचं रीळ बांधलेलं एक खेळणं पूर्वी मिळत असे. ते गरगर फिरवलं की पर्यंत ऱ्यांवऱ्यांवऱ्यांव असा आवाज येत असे. दादूचा आवाज तसा होता.
असल्या पिसारी माणसाची बायको एखाद्या मैनेसारखी होती. तिचं नाव दादू या नवर्याच्या नावाला अजिबात न शोभणारं, सुधा असं होतं. खेडेगावात सहसा न आढळणारं नाव. लग्नानंतर तिला लोक सुधाबाई म्हणायला लागले होते. सुधाबाई रंगानं गाईच्या खरवसाच्या रंगासारखी होती. तिचा चेहरा गोल होता आणि तिचं नाक जरा नकटं होतं. ते टोचलेलं होतं आणि त्यात हिरवट रंगाचं मुगवट घाललेलं होतं. बोलताना त्या मुगवटाशी चाळा करत बोलायची तिला सवय होती. तिचे ओठ संत्राच्या फाकीसारखे होते आणि ती ओठ जुळवून त्यांच्यांवर जीभ फिरवत मान वर करून बोलायला लागली की तिनं कुणाचा तरी मुका घ्यायला तोंड वर केलं आहे असं वाटत असे. तिचे डोळे जुन्या दाट काकवीच्या रंगाचे होते आणि तिच्या पापण्या लांब होत्या. तिची छाती कच्च्या पपईसारखी घट्ट आणि पोसलेली होती. तिच्याकडं बघताना बघणार्याचं लक्ष सगळ्यात आधी तिच्या छातीकडंच जात असे आणि पुरुष माणसांची तर तिथून नजरच हलत नसे. त्यामुळं सुधाबाई अंगाबरोबर घट्ट पदर घेऊनच बाहेर पडत असे. पण त्यामुळं बाजूनं बघितलं तर फणसाच्या झाडाला आवळे जावळे फणस लटकावेत तसे तिचे दोन्ही बाजूचे उभार आणि समोरनं बघितलं की त्यांच्यांतली घळ जास्तच रेखीवपणे दिसत असे आणि बघणारा वेडावून जात असे. मागनं तिचं नेसणं आणि झंपर याच्यामधला चांदणं पडल्यासारखा पट्टा आणि त्यावर हेलकावणारी तिच्या काळ्या केसांच्या दाट वेणीचे पेड रातराणीच्या फांदीवर भुंग्यांच्या जोड्या जोड्या बसाव्यात तसे दिसत. दादूची राखण नसती तर सुधाबाईला गावातल्या गबर बगळ्यांनी केंव्हाच नासवली असती. एवढा दादूसारखा दादू असूनही लोक सुधाबाईला बघण्यासाठी हपापल्यासारखे करत, आपापसात बोलताना तिला एका रात्रीसाठी तरी अंगाखाली घेण्याची भाषा करत आणि ती दिसेनाशी झाली की आपल्या मांड्या आवळून घेऊन सिगारेट पेटवत. पण हे अगदी खाजगीत. यातलं अक्षरही दादूच्या कानावर गेलं तर दादू आपली खांडोळी करेल हे सुधाबाईची कामना करणार्या लोकांना पक्कं ठाऊक होतं.
दादूनं सुधाबाईला पोटरीवर आलेली ज्वारी राखावी तशी राखली होती. पैशाच्या जोरावर आपल्याला पाहिजे ते करून सगळं करून दाबून टाकायला बघणारे पुंड सगळीकडेच असतात, तसे या गावातही होते. दादू शरीरानं असा असला तरी तो रोजंदारीवर काम करणारा गडी होता. त्याची परिस्थिती एकूण साधारणच होती. सुधाबाईला पोटाला खायला कमी पडत नव्हतं, पण हौस मौज कुठली व्हायला? दादूची भीती नसती तर गावातल्या कुणीही तिच्यासमोर झळझळत्या लुगड्यांचा गठ्ठा टाकला असता. चकाकणार्या पिवळ्या नव्या दागिन्यांनी तिचा गोरा गळा भरून टाकला असता. मग कदाचित मान उंच करून त्या पिकलेल्या ओठांनी सुधाबाईने त्याचा मुका घेतलाही असता. जोपर्यंत जिभेला पैशाची चटक लागत नाही तोपर्यंत शील बील सगळं. एकदा का दामाजी बोलायला लागला की मग त्याचा आवाज सगळ्यात मोठा. सुधाबाईनं इशारा करायचा अवकाश, की तिचा मोल लावायला लोक रांकेनं उभे राहिले असते आणि ज्याची बोली जास्त त्याच्या अंथरुणात बाई आलीच असती. गावातल्या लोकांची ही भावना माहिती असलेला दादू कुणाच्या वाळल्या चगाळ्यावर पाय देत नव्हता. राबावं, राक्षसासारखं खावं आणि पोट उघडं टाकून निवांत झोपावं असं त्याचं धोरण होतं. तरी त्याची झोप सावध होती. नशीबानं आपल्या झोळीत पडलेली ही केवड्यासारखी बाई कशी सांभाळायची हे त्याला माहीत होतं. सुधाबाई त्याच्या नजरेच्या धाकात होती. आपल्या वागण्यात वावगं काही दिसलं तर आपला मालक आपल्याला बाजारात चाबकानं फोडून काढेल हे तिला माहिती होतं.
जनगोंड पाटलाच्या सोयाबीनची मळणी सुरू होती. यंदा दोन चार वळीव चांगले झाले होते आणि वैशाख संपता संपता पेरणी केलेलं आगाप सोयाबीन तांबेर्यातनं वाचलं होतं. दाणानदाणा घट्ट भरला होता. मळणी मशीनमधनं खड वाळलेल्या दाण्यांचा पत्र्यावर गारा वाजाव्यात असा आवाज येत होता. मावळतीच्या वार्यानं भुस्काट उडून जात होतं. पोती भरत होती. सोयाबीन धान्य वजनाला जड. तोंड बांधलेलं पोतं उचलायचं म्हणजे साध्या गड्याचं काम नाही. दोघं जण दोन्हीकडनं धरून उचलत होते आणि दादू ते पोतं एकट्यानं पाठीवर घेऊन खोपीत थप्पी रचत होता. त्याच्या अंगातलं पाठीवर, छातीवर घामानं ओलं झालं होतं आणि कपाळ घामानं डबडबलं होतं. मशीनात घास अडकला आणि सूर लावलेल्या गड्यांनी पाणी प्यायला थोडा दम घेतला. दोन पायांवर बसलेल्या दादूनं पाण्याचा तांब्या हातात घेतला आणि घशातनं आवाज करत चार मोठे घोट घेतले. एकाएकी तांब्या त्याच्या हातातनं खाली पडला. दादू बसल्या जागेवर कलंडला, आडवा झाला. त्याचं अंग थडथडत होतं. त्याच्या तोंडातून जनावरासारखा आवाज येत होता. त्याचं धोतर ओलं झालं होतं.
दादूला झटका आलाय म्हणून एक पोरगा सुधाबाईला सांगत आला. सुधाबाई घाईघाईनं पण तरीसुद्धा पदर अंगाभोवती घट्ट गुंडाळून घेऊन पाटलाच्या मळ्याकडे आली तेंव्हा लोकांनी दादूला उठवून बसवला होता. पाटलाच्या वाटेकर्यानं एक्क्या गाडी जुंपली होती. कांबळ्याचा आडोसा करून सुधाबाईनं दादूचं धोतर बदललं. दोन गड्यांनी दादूला खाकेत हात घालून उभं केलं. त्याला आपला तोल सांभाळता येत नव्हता. त्याचा डावा हात पाकोळीसारखा फडफडत होता आणि त्याचं तोंड वाकडं झालं होतं. अंगातल्या बंडीवर लाळ गळत होती.
चौगुले डॉक्टरांनी दादूला तपासलं आणि पुढं न्या म्हणून सांगितलं. साधं काही असलं तर चौगुले डॉक्टर गावातच उपाय करत. थोडं गंभीर असलं तर ते शेजारच्या गावातल्या मोठ्या डॉक्टरला बोलावून घेत. पुढं न्या असं सांगितल्यावर सुधाबाईचा धीरच सुटला. आता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या डोक्याच्या डॉक्टरकडं न्यायला लागणार. पै पैसा तर लागणारच, पण उसाभर करायला माणूस, तिथं दवाखान्यात डॉक्टरबरोबर बोलायला, काय पाहिजे नको बघायला, एक ना दोन. जनगोंड पाटील प्रस्थ मोठं होतं. त्यांच्या घरच्या दोन मोटारी होत्या, ड्रायव्हर होते. लगेच एका गाडीतनं दादूला मोठ्या दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी तपासून मान हलवली. झटका तर जोरातच आला होता आणि डाव्या अंगावरनं वारं गेलं होतं. वेळेवर दवाखान्यात आणलं म्हणून बरं, नाहीतर जिवाला धोका होता, डॉक्टर म्हणाले. आता धोका टळला तरी दादू पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याला लकवा मारला होता. वर्ष-सहा महिन्याने फरक पडेल, हळूहळू हातात बळ येईल, आधार घेऊन का होईना, चालायला येईल, डॉक्टर म्हणाले.
दहा-वीस हजार रुपये खर्च करून, आठ दिवस दवाखान्यात काढून दादू आणि सुधाबाई गावाकडे आले तेंव्हा दादूचं तोंड वाकडंच होतं आणि त्याच्या खाकेत कुबड्या होत्या. त्याच्या वजनाला पुरे पडाव्या म्हणून बुगडाकडून मुद्दाम करून घेतलेल्या झण्ण कुबड्या त्याच्या अंगाच्या बोज्याखाली चरारा वाकत होत्या. दोन्ही बगलांना त्याचा सदरा त्या कुबड्यांवर अडकून त्याचा चोंबाळा झाला होता आणि त्याचं केसाळ पोट आणि त्यावरचं मातीत मुजलेल्या शंखासारखं दिसणारं बेंबाट उघडं पडलं होतं. जागेवर बसला तरी दादू ह्या त्या अंगाला कलंडत होता. दोन्ही बाजूला तक्क्या लावून बसवलं तरच त्याला बोजा सांभाळून बसायला येत होतं. उजव्या हातानं घास घेतला की त्याचा डावा हात लटालटा कापायला लागत होता. त्यानं तोंडात घातलेला घास त्याच्या एका बाजूनं अंगावर सांडत होता. त्याच्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं. रोज सकाळ संध्याकाळ त्याला म्हशीला द्यायच्या गोळ्यांसारख्या चार चार मोठ्या औषधांच्या गोळ्या खायच्या होत्या. एवढा डोंगराएवढा माणूस, पण आता त्याचं पोतेरं झालं होतं.
आजारी माणसाला, त्याच्या घरच्यांना विश्रांती घेऊ द्यावी, त्यांना काही वेळ तरी एकटं सोडावं एवढा पोच खेड्यातल्या माणसांना असत नाही. दादूला बघायला येणार्या माणसांना तोटा नव्हता. येईल तो माणूस दादूबरोबर चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करत होता. दादू काहीतरी कळणारं, न कळणारं बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या बोबड्या शब्दांचा ऐकणारे लोक आपापल्या पद्धतीनं अर्थ काढत होते. काय गा, दादू?असं कुणी विचारलं की दादू डोळ्यांत पाणी आणून भोग..असं म्हणत होता, तेवढं बाकी ऐकणार्याला नीट कळत होतं. येणारी जाणारी माणसं थोडा वेळ बसून काय करायचं बाबा..म्हणत उठत होती. एखाद्याच्या दुखण्यावर डॉक्टरी उपाय सुरू असले की आपण त्यात सारखं काही आपल्या मनाचं सुचवू नये एवढं शहाणपणसुद्धा फार कमी लोकांना असतं. खेड्यातल्या लोकांना तर नाहीच. दादूच्या दुखण्यावर कुणी घोरपडीचं नाहीतर पारवाळाचं तेल लावायला सांगत होतं, कुणी बकर्याच्या रक्तात हीट जास्त म्हणून ते लावायला सांगत होतं. गावातल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरमधून गळणार्या वंगणात तर फारच जास्त पॉवर असते म्हणून ते गोळा करून त्यानं दादूच्या अंगाला मालीश करावी असं कुणी सुचवत होतं. शिवाय या गावचा वैद्य, त्या गावचा देशी औषध देणारा कुणीतरी हे उपाय सांगितले जात होतेच. बायका सुधाबाईला हा देवरुषी, ती जोगतीण असले उपाय सांगत होत्या. खेड्यात एखादा माणूस आजारी असला की जो कालवा असतो तो दादूच्या घरात सुरू होता. दादूला डाव्या बाजूला लकवा मारला असला तरी त्याची उजवी बाजू धड होती. सुधाबाई त्याचं सगळं करत होती. एकाडएक दिवसानं का होईना, कुणाच्या तरी मदतीनं त्याला न्हाणीघरात नेऊन त्याच्या अंगावर चार तांबे घालणं, दर रविवारी त्याला बाळू न्हाव्यासमोर तटकरावर भिंतीला टेकवून बसवून त्याची हजामत करून घेणं, त्याचे कपडे आपल्या हातानं धुवून टाकणं, हे सगळं ती बिनबोभाट करत होती. हातनूरला मुलाण्याचा कोणतरी माणूस आहे, तो लकव्यावर चांगलं औषध देतोय असं कळाल्यावर एक दिवस नणंदेला दादूजवळ बसवून सुधाबाई हातनूरला गेली. आप्पा मुलाण्यानं दिलेलं औषध निर्गुडीच्या आणि एरंडाच्या रसात मिसळून अंगाला लावायचं होतं. पाला काय कुणीही येणाराजाणारा आणून देत होता, पण रोज तो हाराभर पाला पाट्यावर वाटायचा, कपड्यातनं सोदून त्याचा रस काढयाचा आणि मग त्यात ते औषध घालून तो रस दादूच्या अंगाला वरपासून खालीपर्यंत लावायचा हे दमवणारं काम होतं, पण सुधाबाई ते नेटानं करत होती. त्याचा उपयोग होतोय, नाही होत काही कळत नव्हतं. कुणी म्हणायचे, दादूच्या हातात जरा बळ आल्यासारखं वाटतंय बरं का आज, तर कुणी म्हणायचं छा, काल आणि जरा तकवा दिसत होता तोंडावर, आज जरा सोकल्यावाणी वाटायलाय.
जनगोंड पाटील दादूला भेटायला आला तेंव्हा त्याला बघीतल्यावर दादूनं डोळ्यात पाणी आणलं. जनगोंड दादूजवळ बसला. काय घोर लावून घेऊ नकोस तू, दादू.तो म्हणाला. सा म्हयिन्यात खडखडीत होतोस बघ तू. डॉक्टर म्हणलायच तसं. पुढच्या वर्षी सोयाबीनची रास करायची न्हाई व्हय लका.दादूनं त्याच्या वाकड्या तोंडातनं कसला तरी आवाज काढला. पैशे कुठं पळून जात न्हाईत, दादू.जनगोंड पानाला चुना लावत म्हणाला. बघू ते मागनं. मी हाय न्हवं? पान खातुस? कुटून द्यू काय खलबत्त्यातनं?दादूनं नको म्हणून मान हलवली. आतल्या बाजूला बघितल्यागत करत तो म्हणाला, वयनी हाय न्हवं घरात?अंगाभोवती पदर घट्ट गुंडाळून घेऊन सुधाबाई बाहेर आली. तिला गेल्या काही दिवसांत आपल्याकडं बघायाला वेळच झाला नव्हता. विस्कटलेल्या केसाची सुधाबाई केळीच्या कोक्यासारखी दिसत होती. नजर उचलून तिनं पाटलाकडं बघितलं. काय पायजे नको मला सांगायचं, वयनी. जनगोंड म्हणाला. दादू बरा हुस्तवर तुमच्या चुलीची जबाबदारी माझ्याकडं.सुधाबाईनं तोंड वर करून जनागोंडकडं बघितलं. एवढं बोलला मालक, आमचं फिटलं.ती म्हणाली. तसं कसं, तसं कसं... जनगोंड म्हणाला. बरोबर आलेल्या एकाला तो म्हणाला. वसंता, उद्याच्याला कार जुंदळ्याचं एक ठिकं आनून टाकायचं. काय? आणि धा किलो तांदूळ, चार किलो तुरीचा डोळ आन दोन शेर मूग. आणि काय लावून द्यू काय?
दादूचा एकच हात वर झाला. कशाला, कशाला? सुधाबाई म्हणाली.
आं? कशाला म्हंजे? घर चालायला नको व्हय? कशाला म्हंजे काय बोलणं का काय? जनगोंड म्हणाला.
बघता बघता वर्ष सहा महीने होऊन गेले आणि दादूच्या दुखण्याचं अप्रूप संपलं. येणारी जाणारी माणसंपण कमी झाली पण जनगोंड पाटलाच्या दादूच्या घरी फेर्या वाढल्या, पण त्या कशासाठी हे बारक्या पोरालाही कळलं असतं. काय काय दादू..म्हणून जनगोंड दादूच्या घरी येई, घटकाभर दादूजवळ बसेपण. इकडच्या तिकडच्या गोष्टी करी. दादूचं त्याच्या बोलण्याकडं लक्ष नसे. तो जनगोंडाचे भट्टीचे कपडे, त्याच्या हातातल्या जाड अंगठ्या, गळ्यातलं सोन्यात गाठवलेलं वाघनख आणि दाराशी त्यानं काढलेल्या चकचकीत कापशी वहाणा बघत असे. मग जनगोंडा उठे. दादू, तू दमला असचील, नको लई तकाटा घिऊ, पड जरा असं म्हणून सुधाबाई अशी हाक मारत आतल्या खोलीत जाई. खोलीचा दरवाजा सजगती वार्यानं बंद झाल्यासारखा होई. आत कडी नसे पण दोन्ही दारं सप्पय लावल्यागत होत. आतल्या खोलीतनं काय ऐकू येतंय, काय नाही हे दादू कान टवकारून ऐकण्याचा प्रयत्न करत असे. आतनं आधी आधी नुसत्या कपाबशा किणकिणल्याचे, भांड्यात पाणी ओतल्याचे आवाज येत. अलीकडे कधी गरा भाजल्याचा वास येई, कधी कढईत काहीतरी तळायला सोडल्याचा आवाज येई. कांद्याच्या, घोसावळ्याच्या भजीचा खमंग वास येई. कुचुकूचू बोलण्याचा, हसण्याचा आवाज येई. सुधाबाईची काकणं बोलू का नको, बोलू का नको असा आवाज करत. दादू काहीतरी आवाज करण्याचा प्रयत्न करी, घशातल्या घशात गुरगुर करे. शेजारी पाण्याचा तांब्या असला की लवंडून द्यायला बघे. सुधाबाई बाहेर येऊन दादूला काही पाहिजे नको विचारे. दादू तिला निरखून बघत असे. कधी काही आवाज करी, कधी नाही नुसताच तो सुधाबाईकडे गार डोळ्यांनी बघत राही. तिच्या अंगावरच्या कपड्यांकडं बघत राही. कशाचा तरी तपास केल्यासारखी त्याची नजर भिरभिरत असे. कधीतरी उचललाच तर आपला धड हात जरासा उचलल्यासारखा करी. जरा वेळानं धोतराच्या सोग्यानं तोंड, मिशा पुसत जनगोंड बाहेर येई. जरा येळ पडला न्हाईस व्हय गा? विसावा घेत जा जिवाला... असं म्हणे आणि दादूकडं न बघता आपल्या नाल मारलेल्या गोंड्याच्या कापशी चपला घालून चालू लागे. त्याच्या चपलांचा आवाज ऐकत दादू बसून राही.
रविवार होता. संध्याकाळी गावचा बाजार भरत असे. भाजीपाला काहीतरी आणायला पाहिजे म्हणून शेजारच्या नाईकाच्या पोरीला दादूकडं लक्ष ठेवायला सांगून सुधाबाई दुपारचीच बाहेर पडली. नाईकाच्या इंदूला जरा कणकण होती म्हणून ती सकाळपासून पडून होती. तू उठू नकोस, तुझी पण भाजी मी घेऊन येते असं सुधाबाईनं तिला सांगितलं होतं. संध्याकाळी गर्दी फार होते म्हणून लवकरच जाऊन येते असं सुधाबाई म्हणाली होती. दादूला तिनं ताक-कण्या भरवल्या होत्या. अंगाला लावायच्या औषधासाठी निर्गुडीचा रस काढून ठेवला होता. बाजारास्नं आल्यावर औषध लावते असं सुधाबाई सांगून गेली होती. दुपारची वेळ होती. दादूचा डोळा लागला होता. पोरगी पुस्तक वाचत बसली होती.
दादूला जाग आली तेंव्हा अंधारलं होतं. शेजारची पोरगी कधीतरी कंटाळून निघून गेली असावी. जमिनीवर उजवा हात टेकवून दादू कसातरी उठून बसला. अर्ध्या चड्डीतनं दिसणारा आपला वाळक्या लाकडासारखा दिसणारा पाय बघून त्याला भडभडून आलं. त्यानं इकडं तिकडं बघितलं. त्याला लघवीला दाट लागली होती. डोक्यावर डास घूं करत होते. कुठंतरी पाली चुकचुकत होत्या. उकाडा फार वाढला होता.
दाराच्या कडीचा आवाज आला. सुधाबाई आत आली. तिनं दिवा लावला. पोरगी थांबली नाही होय?ती म्हणाली. दादू काहीच बोलला नाही. सुधाबाईनं मोरीत जाऊन हातपाय धुतले. पाण्याचा आवाज आला. तिनं देवासमोर उदबत्ती लावली असावी. अंगाला पदर घट्ट गुंडाळून घेऊन काहीतरी गुणगुणत ती बाहेर आली. तिचं अंग आता पारोसं झालं, आपल्या अंगणात आता वाटेकरी आला आणि आता आपणच भिकारी झालो हे दादूला कळालं.
पाला चेचून घेते सुधाबाई म्हणाली.
भांडं दे गं मला दादू म्हणाला.
कुणीतरी ओरडल्याचा जोरात आवाज आला आणि धाडकन काहीतरी पडलं. काहीतरी धडपड धडपड झाली आणि मग थोड्या वेळाने सगळं शांत झालं.
भाजी काय आणली हे विचारायला इंदूची मुलगी दादूच्या दारात आली. दार उघडंच होतं. पोरगी आत आली.
पोरीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून इंदू, तिचा नवरा, तिची जाऊ पळतच दादूच्या घरात आले.
दादूच्या उजव्या हाताजवळच लाल झालेला वरवंटा पडला होता. जमिनीवर निर्गुडीचा हिरवा रस आणि तांबडं रक्त यांचे ओघळ सुटले होते. डोकं फुटलेली सुधाबाई चटईवर थंडगार पालथी पडली होती. दादूची छाती श्वास लागल्यासारखी वरखाली होत होती. त्याच्या डोळ्यांतनं पाणी गळत होतं. त्याच्या डावा हात सारखा फडफडत होता आणि त्याच्या तोंडातनं छातीवर लाळ गळत होती आणि आपल्या बोबड्या आवाजात दादू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. एखाद दुसरा शब्द ऐकणार्याला कळत होता.
अबरू गेली ....अबरू गेली गा .. अबरू गेली..
प्रतिक्रिया
24 Nov 2025 - 3:25 pm | सुक्या
झकास !! खुप दिवसानंतर काहीतरी छान वाचले.
अजुन येउ द्या !!
25 Nov 2025 - 9:56 am | सोत्रि
मस्त!
शब्दप्रभू संजोपरावांच्या पोतडीतला आणखिन एक मोती.
- (संजेपरावांच्या लेखणीचा पंखा) सोकाजी
25 Nov 2025 - 10:16 am | युयुत्सु
एक नम्र सूचना - व्यवस्थित परिच्छेद केल्याने ब्रिदींग स्पेस वाढते आणि वाचनीयता वाढायला मदत होते.
25 Nov 2025 - 11:52 am | मारवा
सवंग
25 Nov 2025 - 6:24 pm | स्वधर्म
तुम्हाला सर्जनशीलतेचे स्वातंत्र्य आहे तरी पण...
इथल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे
... ग्रामीण कथा म्हणजे वैफल्य (फ्रस्ट्रेशन) च्या कथा असेच समिकरण असते. नाहीतर मग बेरकी व्यक्तीमत्वांच्या, चावट किंवा फजितीच्या कथा.
या कथेचे कथाबीज 'सूड' हे असले तरीही कथा विनाकारणच चावट कथेकडे झुकलीय. चावट वर्णनाचा मोह टाळता आला असता तर लेखनाची पातळी खूप वाढली असती असे वाटते. शिवाय दादूने सुधाबाईला मारुन सूड घेण्यापेक्षा संधी साधून जनगोंडला मारून सूड घेतला असता तर बहार आली असती. तो कसा ते ग्रामीण बेरकी लोकांना बरोबर माहिती असते. निव्वळ कलागती लावून एखाद्याच्या हातून काम करवून घेणारे करामती लोक खेड्यात फार. आता त्याच्या जगण्याचेच वांदे होऊन बसले. पण हे लेखकाचे स्वातंत्र्य आहे आणि ते मान्य आहे.
28 Nov 2025 - 2:53 pm | कपिलमुनी
एवढा अभ्यास आहे तर तुम्ही पण लिहा
28 Nov 2025 - 6:42 pm | विजुभाऊ
पॉईंटाचा मुद्दा आहे.
25 Nov 2025 - 11:26 pm | सुखी
खुप दिवसानंतर छान वाचले.
झकास !!
28 Nov 2025 - 2:54 pm | कपिलमुनी
भारी कथा !
व्यक्तिमत्व ठाशीव !
28 Nov 2025 - 6:43 pm | विजुभाऊ
छान लिहीलंय. तीनही व्यक्तिमत्वे डोळ्यासमोर उभी राहिली .