आम्ही नुकताच उडुपी पर्यंत प्रवास केला. आज पर्यंत विविध प्रकारे प्रवासलेखन करून झालेले आहे. हा माझा एक वेगळ्या प्रकारे प्रवासलेखन करण्याचा प्रयत्न आहे. कुठे कसे जावे काय पाहावे याचे हे वर्णन नाही. या लेखात दक्षिण कन्नडा प्रदेशातील दिसलेल्या आर्थिक घटना किंवा इतिहास यांचा आढावा घेतला आहे. त्याकरता या प्रदेशातील बँकिंगचा इतिहास, मंगलोरी कौलं उद्योग, आणि आधुनिक हार्वेस्टर यांची चर्चा केली आहे.
दक्षिण कन्नडातील बँकिंग
आज देशात ज्या शासकीय मालकीच्या ज्या बँका आहेत (ज्या पूर्वी खाजगी मालकीच्या होत्या) त्यातील ४ बँकांची सुरुवात दक्षिण कन्नडा प्रदेशात झालेली आहे. कॉर्पोरेशन, सिंडिकेट, कॅनरा, आणि विजया या चार बँकांची सुरुवात दक्षिण कन्नडा प्रदेशात झालेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात दक्षिण कन्नडा हा प्रदेश मद्रास प्रांताचा भाग होता. आज कर्नाटक राज्यात या प्रदेशाचे दोन जिल्हे (मंगळुरु आणि उडुपी) झालेले आहेत. कॉर्पोरेशन बँकेच्या संस्थापकांपैकी हाजी अब्दुल्ला यांच्या उडुपी येथील घरातून बँकेला सुरुवात झाली त्या घरात आता एक संग्रहालय आहे. त्यात मुख्यत्वेकरून नाणी-नोटा यांचे प्रदर्शन आहे. हाजी अब्दुल्ला यांचा पुतळा आहे आणि कॉर्पोरेशन बँकेचे अन्य संस्थापक यांची चित्र आहेत. मात्र या छोट्याश्या प्रदेशात झालेल्या बँकिंग क्रांतीचा गौरव करणारे एखादे दालन अजिबात नाही. अर्थात तत्कालीन खाजगी मालकीच्या या बँकांच्या संस्थापकांचे कर्तृत्व शासनाकडून मान्य होणे शक्यही नाही. यातील विजया बँक सोडून अन्य ३ बँकांच्या संस्थापकांमध्ये गौड सारस्वत ब्राह्मणांचा भरणा होता. अम्मेमबई सुब्बाराव पै आणि उपेंद्र पै हे अनुक्रमे कॅनरा आणि सिंडिकेट यांचे संस्थापक. गोव्यातील पोर्तुगीजांच्या छळामुळे गौड सारस्वत ब्राह्मण उत्तरेला रत्नागिरी, ठाणे आणि दक्षिणेला तत्कालीन मद्रास प्रांतातील दक्षिण कन्नडा प्रदेशात येऊन पोचले. यातील बऱ्याच जणांनी महसूल खात्यात नोकरी धरली आणि अनेक जणांनी व्यापारातही उडी घेतली. शिक्षणाच्या बाबतीतही त्यांनी मुसंडी मारलेली होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मद्रास प्रांतात मद्रास शहराच्या खालोखाल इंग्रजी जाणणाऱ्यांची संख्या दक्षिण कन्नडामध्ये होती. गौड सारस्वत ब्राह्मणांमध्ये एक पद्धत होती की बालकाच्या जन्माच्यावेळी एखादी रक्कम कोण्या शेठजींकडे ठेवावी आणि बालक सज्ञान झाले की ती परत घ्यावी. मात्र यात व्याजही मिळत नसे आणि मुद्दल जाण्याचा धोका होता. अशा काही महिलांची तक्रार ऐकून आणि काही व्यापाऱ्यांना मदत करावी या हेतूने अम्मेमबै सुब्बाराव पै या मंगळुरु येथील वकील गृहस्थांच्या पुढाकारातून कॅनरा हिंदू पर्मनंट फंड या नावाने १९०६ मध्ये जॉईंट स्टॉक बँकिंग कंपनीची स्थापना झाली. कंपनीच्या स्थापनेवेळची ध्येय आजही आपल्याला कॅनरा बँकेच्या वेबसाईटवर पाहायला मिळतात. त्यात अंधश्रद्धा दूर करणे, शिक्षणाचा प्रसार, बचतीची सवय लावणे, गरजुंना मदत यांचा समावेश आहे. उपेंद्र पै, वामन कुडवा, उपेंद्र पै यांचे बंधू टी एम ए पै यांनी मिळून कॅनरा इंडस्ट्रियल अँड बँकिंग सिंडिकेट लिमिटेड या नावाने १९२५ साली उडुपी येथे बँकेची स्थापना केली. सिंडिकेट बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे दारोदार जाऊन खरोखर पै पै रोज गोळा करून समाजातल्या सामान्य माणसापर्यंत बचतीची सेवा आणि सवय पोहोचावण्याचे काम. पिग्मी ठेव योजना असे त्या ठेव योजनेचे नाव ठेवण्यात आले होते. या प्रसिद्ध नावांसहित एकूण २३ बँकांची स्थापना या प्रदेशात झाली. त्यातल्या काही बंद पडल्या आणि कॅनरा बँकेने एकूण १० बँक आपल्या ताब्यात घेतल्या. पुढे या बँक एवढ्या मोठ्या झाल्या की बँकांच्या राष्ट्रीयीकरणात (सरकारी आदेशाने संपत्तीची खाजगी मालकी संपुष्टात आणून त्यावर सरकारी मालकी स्थापित करणे) त्यांचाही नंबर लागला. ज्या उद्देशासाठी राष्ट्रीयीकरण केल्याचे सांगण्यात आले ते काम या बँका मात्र आधीपासूनच करत आलेल्या होत्या.
मंगलोरी कौले
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना इथल्या कौलारू घरांचे आकर्षण वाटते. आज जी कौलारू घरे शिल्लक आहेत त्यावर जी कौले आहेत ती मंगलोरी कौले आहेत. अजूनही ती कौले मंगलोर किंवा तिथल्या प्रदेशातून कोकणात येतात. मंगलोरी कौले येण्याआधी कोकणात वापरात असलेली कौले खापराची कौले या नावाने ओळखली जात होती. अर्धा पोकळ दंडगोल (half hollow cylinder) अशा आकाराने त्याचे वर्णन करता येईल. ही कौले एकमेकात घट्ट बसण्याच्या दृष्टीने फारशी चांगली नाहीत. जे लोक कौलारू घरात प्रत्यक्ष राहिले आहेत त्यांनी अचानक उद्भवणाऱ्या गळतीचा अनुभव घेतला असेल. त्याबाबतीत सुद्धा हा एकमेकात घट्ट न बसण्याचा दोष अधिक वाईट. तसेच कौलांच्या खाली जे लाकडाचे आच्छादन लागते ते या खापरासाठी अधिक दाट करावे लागे कारण या कौलांचा आकार तसा लहान असे. मंगलोरी कौले मात्र अधिक सपाट आणि एकमेकात चांगली बसणारी असतात. आकाराने मोठी असतात त्यामुळे खालचे आच्छादन तितके दाट आवश्यक नाही. कारवारकडून कुंदापूर शहरात प्रवेश करताना उजव्या बाजूला नदीच्या काठावर लाल विटांच उंच धुरांडं आणि लाल विटांच्या काही इमारती दिसतात तो एक मंगलोरी कौलांचा कारखाना आहे. या विशिष्ट प्रकारच्या कौलांचे उत्पादन व्हायला दक्षिण कन्नडा भागातील ख्रिस्ती मिशनऱ्यांचा सहभाग आहे. सध्याच्या स्वित्झरलँड मधील बाझल (Basel) शहरातील बाझल मिशन नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्ती धर्मप्रसारक संस्थेची शाखा मद्रास प्रांतात १८३१ मध्ये सुरु झाली. आपल्या धार्मिक कार्यासोबत शेती, विणकाम, छपाई इ मिशनने उद्योगातही सहभाग घेतला. याच उद्योगाचा भाग म्हणून जॉर्ज प्लेब्स्ट हा मनुष्य इकडे भारतात आला आणि त्याने मिशनसाठी एक छापखाना १८५१ मध्ये सुरु केला. जॉर्जचे लक्ष या भागातील मातीच्या वस्तू तयार करायच्या उद्योगाकडे गेले आणि त्यातून त्याने मिशनसाठी कौलं तयार करायचा कारखाना १८६३ मध्ये मंगळुरु येथे सुरु केला. सुरुवातीला २ कामगार आणि काही बैल यांच्यासह दिवसाला ३६० कौलांचे उत्पादन होऊ लागले. जॉर्जचे विशेष म्हणजे त्याने माती आणि वाळू यांच्या मिश्रणावर प्रयोग करून त्यांचे योग्य प्रमाण शोधून काढले. १८८० मध्ये बैलांची जागा वाफेवरील यंत्रांनी घेतली आणि यांत्रिक पद्धतीने उत्पादन सुरु झाले. कौलांचे उत्पादन वर्षाला १० लाख पर्यंत पोहोचले. पुढे केवळ कौलांवर न थांबता मातीच्या अन्य वस्तूही करण्यास सुरुवात झाली. १९०७ साली मिशनच्या कारखान्यात ३००० कामगार कामावर होते. वर लिहिल्याप्रमाणे स्थानिक कौलांचा आकार अर्ध दंडगोलाकार असे. मंगलोरी कौलांचे उत्पादन जरी इथले असले तरी ते विशिष्ट डिझाईन मात्र जॉर्जने युरोपातील मार्सेल पॅटर्न वर अधारीतच तयार केले होते. गिरालडोनि बंधूंकडे या मार्सेल डिझाईनचे पेटंटसुद्धा त्याकाळात होते. यांत्रिकीकरणामुळे अचूक आकार, अचूक मिश्रण हे फायदे हाती तयार केलेल्या कौलांपेक्षा या मंगलोरी कौलांचे होते. अचूक आकारामुळे अर्थातच हि कौले एकमेकात बसायला एकदम उपयुक्त ठरतात. यांत्रिकीकरणातून येणारे असे फायदे, तसेच त्यातल्या उत्पादकता वाढीमुळे होणारे स्वस्त उत्पादन आणि त्यामुळे कौले घालणे गरीबालाही परवडणे, तसेच अधिकच्या मागणीमुळे अधिक रोजगार निर्मिती यांची साखळी या कौलांच्या उत्पादनाच्या दृष्टीने तपासून पाहण्यासारखी आहे. अशा प्रकारे प्रयोगशील राहणाऱ्या समाजाशी आपली स्पर्धा तेव्हाही होती आणि आत्ताही आहे याची नोंद त्यानिमित्ताने करून ठेवतो.
हार्वेस्टर
माझा प्रवास नेमका ऑक्टोबर महिन्यात झाल्यामुळे कर्नाटक राज्यात महामार्गाच्या कडेला हार्वेस्टर यंत्र घेऊन जाणारे ट्रक विसावलेले दिसले. कर्नाटकातील किनारी भागात भाताच्या पिकाची कापणी करायला निघालेली किंवा कदाचित काम संपवून परत निघालेली ही यंत्रे मी पहिल्यांदाच इतक्या संख्येने पाहिली. साधारण २५-३० लाख रुपयांना मिळणारे हे यंत्र एक एकर भाताची कापणी सुमारे सव्वा तासात करू शकतात. अर्थात शेतकरी या यंत्रांचा वापर तासाप्रमाणे भाडे देऊन करतात. २०२० सालात याचा दर तासाला २००० रुपये असल्याचे दिसते. भाताच्या झोडण्याच्या पायरी पर्यंतचे काम या यंत्राने होते असे एका परिचितांशी बोलल्यावर समजले. तसेच विविध पिके कापू शकतीलअशीही यंत्रे आता उपलब्ध झाली आहेत. ती यंत्रे ऑक्टोबर महिन्यात गोवा, किनारी कर्नाटक येथे भात कापणी करून पुढे सरकत तामिळनाडू पर्यंत विविध पिकांच्या कापणीचे काम करतात. शेतात काम करणाऱ्या माणसांची उपलब्धता कमी होत असल्याने शेतकरी या यंत्रांना पसंत करत असल्याचे दिसते आहे. कोकणातही शेतीत काम करायला माणसे मिळणे हळू हळू कमी होत चालले आहे. त्यामुळे इथेही यंत्रांचा वापर हळू हळू सुरु झाला आहे. त्याचे सगळ्यात पहिले रूप म्हणजे पॉवर टिलर ज्यांची धड धड आता भात लावणीच्या काळात गावोगाव ऐकायला मिळते. दक्षिणेकडील राज्यात लावणीसाठीही यंत्रांचा वापर सुरु झाल्याचे वाचण्यात आले. देशातील ट्रॅक्टरची बाजारपेठ ६० हजार करोडची आहे आणि हार्वेस्टरची बाजारपेठ अजूनही लहान आहे (१० हजार करोड) पण वाढते आहे. कोकणात मात्र उंच सखल प्रदेश, जमिनींचे लहान तुकडे हे या यांत्रिकीकरणासमोर अडथळे आहेत. मात्र मला खात्री आहे कि हे अडथळे पार होतील, कदाचित याच यंत्रांचे थोडे लहान आकाराचे, कमी शक्तीचे प्रकार अस्तित्वात येतील आणि ते कोकणातही आपल्याला पाहायला मिळतील.
जाता जाता
कारवार येथे महामार्गाला अगदी लागून नौसेना संग्रहालय आहे ज्यात एक विमान आणि एक युद्धनौका आहे. हे विमान पाणबुडीविरोधी प्रकारचे आहे आणि त्यात अगदी आतपर्यंत जाऊन पाहता येते. विमानाच्या बाह्य भागावरील चिन्ह योग्य प्रकारे काढलेले आहे. त्यात चोचीत मासा पकडून उडणारा पक्षी दाखवला आहे जे पाणबुडीविरोधी युद्धाचे अगदी समर्पक चित्रण आहे.
संदर्भ
1) Mainstreaming the Financial Inclusion Agenda in India -Lessons from the genesis and growth of Canara Bank,1906-1969. Rajalaxmi Kamath, P C Narayan, IIMB-WP N0. 577
2) Amol Agrawal on the Bankers who Built Modern India, conversation with Shruti Rajagopalan at Mercatus Center YouTube channel
3) https://www.architecturaldigest.in/story/tracing-the-history-and-legacy-...
4) https://www.sahapedia.org/the-basel-mission-and-its-terracotta-products-...
5) https://indianexpress.com/article/india/not-just-paddy-and-wheat-combine...
6) https://indianexpress.com/article/explained/explained-economics/explaine...
प्रतिक्रिया
17 Nov 2025 - 12:11 am | रामचंद्र
चांगली माहिती मिळाली.
17 Nov 2025 - 4:44 am | कंजूस
वेगळ्या प्रकारचा परशुराम भूमीचा लेख आवडला.
17 Nov 2025 - 12:23 pm | सुबोध खरे
ज्यात एक विमान आणि एक युद्धनौका आहे.
हे विमान TU १४२ M या अतिशय लांब पल्ल्याच्या पाणबुडी विरोधी विमान आहे याचा पल्ला २६ तास उड्डाण करण्याचा होता आणि एकदा उड्डाण केले कि साडे बारा हजार किमी पर्यंत हे विमान उडू शकते( साडे सहा हजार किमी जाऊन परत).
नौदलात म्हणत कि हे विमान ओख्या वरुन उड्डाण करून कन्याकुमारीला वळसा घालून कलकात्यापर्यंत जाऊन परत कन्याकुमारीला वळसा घालून परतओख्यापर्यंत येऊ शकते. https://en.wikipedia.org/wiki/Tupolev_Tu-142
आणि हि युद्ध नौका आय एन एस चपल म्हणून क्षेपणास्त्रे डागणारी नौका रशियन ओसा २ श्रेणी ची नौका आहे. १९७१ च्या युद्धात कराची यावर क्षेपणास्त्र हल्ला करून कराची बंदर भाजून टाकण्यात या नौकेचा मोठा सहभाग होता.
https://en.wikipedia.org/wiki/Chamak-class_missile_boat#:~:text=The%20Ch...
17 Nov 2025 - 9:01 pm | केदार भिडे
या माहितीबद्दल धन्यवाद. तिथले बरेच माहिती फलक पावसाने वाढलेल्या रानाने वेढले गेले होते त्यामुळे ते वाचता आले नाहीत.
20 Nov 2025 - 7:46 pm | Nitin Palkar
चांगल्या लेखाच्या पुरवणीत विशेष माहिती...
20 Nov 2025 - 4:54 pm | अभ्या..
फारच मस्त लेख,
अश्या विषयांना कोणी स्पर्श करत नाही म्हणून जास्तच आवडला.
बँकिंगचा इतिहास मस्तच. पिग्मी बॅकिंगचा सिंडिकेट इतिहास आवडला. काही समाजाच्याच्या रक्तातच अर्थव्यवहार भिनलेला असतो. बॅकिंग मध्ये ते आघाडीवरच असतात. जगभर हे आढळते.
अशीच कहाणी आपल्या महाराष्ट्रातल्या चिरमुलेंची युनायटेड वेस्टर्न बँक (आयडीबीआय मध्ये मर्ज झाली), मिरज स्टेट बँक, आणि इतर तालुकास्तरावरील कित्येक को ऑपरेटिव्ह बँकांची. ह्यातल्या कित्येक राष्ट्रीयीकॄत बँकामध्ये मर्ज झाल्या, काहींनी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मान तुकवून शेड्युल्ड बँकासोबत जाणे पत्करले तर काही कायमच्या बंद झाल्या.
ज्या बँका राष्ट्रीयीकृत बँकात मर्ज झाल्या त्यांच्या कर्मचार्यांना सुरुवातीस अस्मितेमुळे आणि बदल्यामुळे वाईट वाटले पण नंतर मजबूत पगार आणि युनियन, कामाची सुलभता अशामुळे सुसह्यता आली. स्वतःचे घर, गाडी, मुलाबाळांचे परदेशी शिक्षण अशा एकेकाळच्या मध्यमवर्गीय स्वप्नांना लाभलेल्या पंखामध्ये बळ ह्या राष्ट्रीयकरणामध्येही होते हे मान्य करण्यात काहीही गैर नाही.
बाकी मंगलोरी कौले आणी हार्वेस्टरचाही आढावा मनोरंजक.
21 Nov 2025 - 10:27 pm | चावटमेला
ज्या बँका राष्ट्रीयीकृत बँकात मर्ज झाल्या त्यांच्या कर्मचार्यांना सुरुवातीस अस्मितेमुळे आणि बदल्यामुळे वाईट वाटले पण नंतर मजबूत पगार आणि युनियन, कामाची सुलभता अशामुळे सुसह्यता आली. स्वतःचे घर, गाडी, मुलाबाळांचे परदेशी शिक्षण अशा एकेकाळच्या मध्यमवर्गीय स्वप्नांना लाभलेल्या पंखामध्ये बळ ह्या राष्ट्रीयकरणामध्येही होते हे मान्य करण्यात काहीही गैर नाही.
१००% सहमत. माझ्या एका मित्राचे आई, वडील दोघेही कराड अर्बन बँकेत होते. ती बँक पुढे बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाल्यानंतर त्यांच्या घरी आलेली सुबत्ता पाहिली आहे.
20 Nov 2025 - 7:56 pm | Nitin Palkar
खूप सुंदर, महितीप्रद लेख.
बँकिंग बद्दल थोडे बहुत वाचले होते.
मंगलोरी कौलांची माहिती नवीनच समजली. मंगलोरी कौलांच्यापूर्वी वापरत असलेल्या कौलांना ज्याचा उल्लेख या लेखात खपराची कौले असा केला आहे,त्यांना कोकणात नळयाची (nalyachi) कौले म्हणतात.
24 Nov 2025 - 12:19 pm | कानडाऊ योगेशु
सुरेख वाचनीय लेख.
चित्रेही डकवता आली तर पाहा.
25 Nov 2025 - 11:33 pm | सुखी
झकास !!