फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला. पण त्याच्या काही फायदा होणार नव्हता. त्याचा त्रिफळा उडालेला होता. राजेश आऊट झालेला होता. तो पेवेलियन मध्ये परतला. त्याच्या फ्रेंचाईसच्या मालकिणीने त्याच्या कडे पाहून थंब्स अप केले. राजेशने ही तिच्या कडे पाहत एक स्माईल दिले.
रात्री बेडरूम मध्ये राजेश आपल्या बायकोला म्हणाला, राणी तुझ्या स्वप्नाचे फार्म हाऊस घेण्याची इच्छा आज मी पूर्ण केली.
(2)
राजेशचा त्रिफळा उडाला आणि राजूने डोक्यावर हात मारला. राजू स्वत:ला बुद्धिमान समजत होता. लीग खेळणार्या सर्व खेळाडुंचे आंकडे त्याला माहीत होते. कोणता खेळाडू, कोणत्या गोलंदाजाविरुद्ध चांगला खेळतो, कोणत्या मैदानात चेंडू कसा येतो इत्यादींचे त्याने उत्तम रीतीने अध्ययन केले होते. त्याच आधारावर तो दररोज स्वप्नील टीम बनवायचा. प्रत्येक मॅच संपल्यावर आपल्या चुका शोधायचा. त्याने आकड्यांच्या आधारावर आजच्या फायनल मॅचसाठी स्वप्नील टीम निवडली होती. आज एक कोटी जिंकण्याची त्याला शंभर टक्के खात्री होती. मॅच संपला. निवडणूकीच्या सर्व्हे प्रमाणे त्याचे अंदाज या वेळी ही चुकले होते. या सीझन मध्ये कर्ज घेऊन त्याने लाखो रुपये स्वप्नील टीम वर खर्च केले होते. लोकांचे कर्ज कसे चुकविणार, बायको मुलांचे पोट कसे भरणार... या यक्ष प्रश्नांचे उत्तर त्याच्यापाशी नव्हते. न कळत त्याची पाऊले रेल्वे लाइनच्या दिशेने चालू लागली.....
प्रतिक्रिया
14 Apr 2025 - 8:20 pm | मुक्त विहारि
आवडल्या..
14 Apr 2025 - 9:14 pm | अमरेंद्र बाहुबली
छान! क्रिकेट नामक व्यावसाय नी त्यावर चालणार सट्टा! तरीही काही लोक क्रिकेट पाहतात!
14 Apr 2025 - 10:33 pm | चित्रगुप्त
मजेशीर कथा. 'बेकफुट' आणि 'बैट' शब्द जरा खटकले (आखरले).
हिंदीत अजून 'बॅक' , 'बॅट' लिहीण्याची पद्धत सुरु झालेली नसली तरी मराठीत त्या मात्रा फार काळापासून प्रचलित आहेतच. परंतु तुम्ही 'मॅच' बरोबर लिहीलेले आहे.
21 Apr 2025 - 5:12 pm | विजुभाऊ
ते पटाईत काका हिंदी प्रदेशात रहातात. मराठीमधे लिहीतात