पावश्या लवकर आलाय का......!!!!

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
30 Mar 2025 - 6:06 am

gudhi
----
हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा .
------
चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणवा जाणवू लागलाय.यावर्षी जरा लवकर उन्हाळा आलाय का? संक्रांती नंतर दुपार तापू लागली. होळी येण्या आगोदरच माठ, डेरे, पंखे सुरू झालेत.वातानुकूलित यंत्रांची खरेदी तपासणी, दुरूस्ती सुरू झाली आहे.कागदी लिंबू, काकड्या यांचे भाव कडाडले आहेत.टरबूज, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.मार्तंडाने आता पासूनच आग पाखडायला सुरूवात केली आहे. पर्यावरणातील बदल निसर्गातही स्पष्ट दिसू लागलेत.महादेववाडी, ढगाईमाता टेकडीवरील अरक्षित वन विभागाची वनराई पूर्णपणे सुकून गेली आहे.झाडांचे खराटे झालेत.आकाशा कडे हात उंचावून पाऊस कधी येणार विचारात आहेत. टेकडीवरील तळ्यातले पाणी केव्हाच संपुष्टात आले आहे.उरल्या सुरल्या चिखल पाण्यामधे टिबुकली,पाणकोबंडी,खंड्या, हिरवी तुतारी (सॅण्डपाईपर) व बगळा (पाॅण्ड हेराॅन) कधीमधी दिसत आहे.किटक भक्षी कोतवाल, वेडा राघू, छोटा शिक्रा या सारख्या पक्षांनी केव्हाच हा भाग सोडून पलायन केले आहे.कधी ॲशी प्रिनिया,जंगल प्रिनिया तळ्याच्या काठावर असलेल्या झाडांवर गाणे गाताना दिसायच्या पण हल्ली कुठे गेल्यात माहित नाही.गवतातले पक्षी,लार्क्स,पिपीटस् कुठे कुठे दिसत आहेत.मागील दोन वर्षांपासून मी सातत्याने या वनराईत आठवड्यातून तीन चार दिवस तरी किमान दोन तास तरी इथे रमतो.भरपूर पक्षी दिसतात. या वर्षी मात्र चित्र जरा वेगळे दिसत आहे.

या वर्षी आमच्या सोसायटीतील विदेशी झाडे सुद्धा कमीच बहरली. तांबूस पांढर्‍या रंगाची फुले देणारा जपानी चेरी ब्लाॅसम पिवळ्या फुलांचा रक्तरोहिडा (टोकोमा), जांभळ्या फुलांचा गुलदस्ता डोक्यावर मिरवणारा जाकरांडा इत्यादी झाडे थोडीफार बहरली आहेत पण आगदी जिवावर आल्या सारखी. काटेसावरीला सुद्धा कमीच शेंगा आल्यात. यावर्षी आकाशात उडणाऱ्या म्हातार्‍यांची संख्या कमीच असणार आहे.आकाश शेवग्याची पण तीच अवस्था. सोसायटीतील हिरवळ कमी झालीय तरी काही हिरव्या गर्द पानांनी भरलेली वड,पिंपळ, कडुलिंब, सातपर्णी,साग सदाहरीत झाडे आणी पाणी उपलब्ध असलायाने शिंपी,नाचण(White breasted Fantail),दयाळ (Oriental Magpie Robin) सातभाई,सुर्यपक्षी,लाल बुड्या व लाल गाल्या बुलबुल, चश्मेवाला, राखी वटवट्या,भारद्वाज प्रामुख्याने दिसत आहेत.सकाळी सकाळी या पक्षांचा रोमान्स बघतच रहावासा वाटतो. साळुंक्या,कोकीळ कावळे,कबुतर,घारी पोपट आहेत पण माळ मुनिया,चिमण्या,बया मात्र दिसत नाहीत. एक हळद्या रोज संध्याकाळी इमारतीच्या मागील उंच नारळ,पिंपळ,अशोकाच्या झाडांवर बसलेला दिसतो. ठक ठक आवाज करणारा तांबट पण सकाळी सकाळी हजेरी लावतो. राखाडी धनेशची जोडी निलगीरीच्या उंच फांदीवर शेपूट हलवत बसलेली दिसते.मधेच उडुन दुसर्‍या टोकाला असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे जातो लगेचंच दुसरा त्याचा पाठलाग करतो.क्वचित एकटे दिसतात.हे सर्व पक्षीधन खरेतर टेकडीवर दिसायचे पण सध्याच्या उन्हाळ्या सदृश्य वातावरणा मुळे सोसायटीत दिसत आहेत.

चातक (Jacobin Pied Cuckoo) पक्षी भारतात मान्सूनच्या प्रारंभाची घोषणा करतो . कृषी अर्थव्यवस्था असल्याने पावसाळा हा देशातील सर्वात शुभ ऋतूंपैकी एक मानला जातो. मागच्या वर्षिच्या माझ्या पक्षी निरिक्षण नोंदीनुसार १८ मे २०२४ रोजी सकाळी साडे सात वाजता याला महादेववाडीच्या अरक्षित जंगलात बघीतला होता.

chaatak
------
पावश्या (Common Hawk Cuckoo) इंद्र देवाचा संदेश वाहक त्याच सुमारास,म्हणजे एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात "पेरते व्हा, पेरते व्हा"' अशी शेतकऱ्यांना साद घालत गर्द पानांच्या आड लपून बसून त्याने आपले अस्तित्व दाखवले होते. जवळच कुठून तरी आवाज यायचा पण दिसायचा नाही. गेले दोन वर्ष त्याला कॅमेऱ्यात टिपण्याचा माझे सर्व प्रयत्न फुकट गेले.

पारंपारिक पावसाचा अंदाज देणारी खुण म्हणजे टिटवीची अंडी. गेल्या वर्षी टिटव्यांनी चार चार अंडी दिली होती.पाच सहा वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रकार निरीक्षणात आला होता. टिटवी कधीच खाली बसत नाही फक्त प्रजनन काळातच अंडी उबवण्यासाठी खाली बसते. खालील चित्रात दिसतंय बघा.आपल्या अंड्यांचे रक्षण करताना टिटवी एखाद्या खंद्या सैनिका प्रमाणे जागरूक पहारा देताना दिसत आहे.

titvee--------titvee1

या वर्षी मात्र चित्र पालटले आहे. एप्रिल मे मधे आपली हजेरी नोंदवणारा पावश्या या वर्षी आमच्या सोसायटीत रहायला आलाय. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीशेवटी पासून सूर्योदयापासून ते सुर्यास्ता पर्यंत "पेरते व्हा, पेरते व्हा", सोसायटीत (मार्गोसा हाईटस) ऐकू येत आहे.

pavashyaa
-----
या वेळेस मात्र त्याच्या मनमोहक हालचाली,फुलवलेला पिसारा व "पेरते व्हा", गाणे सहज कॅमेर्‍यात टिपता आले.पर्यावरणातील बदलामुळे पावश्या लवकर आलाय का? या वर्षी कडक उन्हाळा तर आताच भेडसावत आहे. उष्माघाताचे बळी या बातमीने वर्तमानपत्रात पहिल्या पानावर जागा घेतली आहे. मग पावसाळाही लवकर येणार का? आला तर मुसळधार की दुष्काळ ? असे अनेक प्रश्न माझ्या सारख्या निसर्गप्रेमीच्या मनात थैमान घालत आहेत.मी काही तज्ञ नाही फक्त हे सर्व निरीक्षणात आले ते आपल्यापर्यंत पोहचवणे हा उद्देश.

या लेखा द्वारे ज्या पक्षीमित्रांनी लहान मुला प्रमाणे पक्षीदर्शन कसे करावे याचे धडे शिकवले त्या तीन मित्रांचे व "पुणे बर्ड ॲटलस ", या स्वैच्छिक समुहातील सदस्य ज्यांनी पक्षी निरिक्षणाची प्रेरणा व मार्गदर्शन केले त्यांचे मनापासून आभार मानतो.

पावश्या लवकर आलाय का......!!!!

Put some water and put some grain,
Keep them out of your window panes,

Sparrow, Fantail surely make a trips,
To visit us, with their cheerful chirps.

The Robin's song, a melodic treat,
Echoes through, our morning's sweet,

The Finch's chirp, a lively delight,
As they flit, in the sun's warm light.

Offer them crumbs, and seeds so fine,
A token of friendship, that's truly divine,


The birds respond, with trust so true,
A bond between us, forever anew.

Birds may ask why you so kind to us
Repainting for that we created ruckus

Your presence reminds us, of life's simple bliss,
A treasure shared, between humen and birds in kiss.

We want to restore ours lost golden days
Conversation of nature is the only way

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Mar 2025 - 8:21 am | प्रचेतस

चातक, पावश्या दिसणे तसे दुर्मिळ. मी तर कधीही ते पाहिले नाहीत किंवा पाहिले असल्यास ओळखता आले नसावेत. आपण मात्र ते सहजी टिपलेत.

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2025 - 9:05 am | श्रीगुरुजी

सुंदर चित्रे!

काही वर्षांपूर्वी पावश्या अंगणातील वृक्षावर आला होता. बराच वेळ बसून आवाज काढत होता. मी तात्काळ काही प्रकाशचित्रे घेतली होती.

गुढी पाडव्याची सुरुवात चांगली केली आहे.
पावशा अजून पाहिला नाही कधी. तो काळा पांढरा चातक मात्र पाहिला आहे अलिबागमध्ये. टिटवीची अंडी लहानपणी सांगली जिल्ह्यात पाहिली आहेत. ही टिटवी लाल लोळीची आहे.
एकूण तुमच्या परिसरात पक्षीगण भरपूर आहेत. असेच राहोत.

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2025 - 9:43 am | कर्नलतपस्वी

पावश्या बघायचा असेल तर आमच्या सोसायटीत या. पुढील महिना दोन इथेच मुक्काम असणार आहे.

मिसळपाव's picture

30 Mar 2025 - 9:06 pm | मिसळपाव

पावश्याचा "पेरते व्हा" पुकारा ऐकवू शकाल का?

मिसळपाव's picture

30 Mar 2025 - 9:07 pm | मिसळपाव

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2025 - 9:25 pm | कर्नलतपस्वी

ऑडिओ, व्हिडिओ दोन्ही घेतले आहेत. पण मिपावर कसे डकवायचे माहीत नाही. व्य. नि करतो.

Bhakti's picture

30 Mar 2025 - 9:31 pm | Bhakti

https://youtu.be/yC9aoq5xj18?si=L9lA2S38UnrdR5eG
हे मी ऐकलंय आधी पण,आता लक्ष ठेवून पाहते दिसतो का ते :)

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2025 - 9:40 pm | कर्नलतपस्वी

व्य नि केला आहे. माहिती सह लाईव्ह चित्रफित .

मिसळपाव's picture

1 Apr 2025 - 1:41 am | मिसळपाव

ओह, हा पावश्या होय? थँक्यू. एका जुन्या हिंदी गाण्यात हा बॅकग्राउंडला गातोय!!

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Mar 2025 - 9:55 am | अमरेंद्र बाहुबली

छान निरीक्षणे कर्नल साहेब! फोटोही छान! आणखी लिहा!

बहावा सुद्धा ब-याचदा एप्रिलच्या शेवटी फुलताना दिसतो
तोही पंधरा दिवसांपूर्वीच फुलला आहे

कवडीपाट जागेलाही मागे टाकलं आहे मार्गोस हाइटसने.

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2025 - 12:35 pm | कर्नलतपस्वी

होय, बहाव्याचा बहर सुद्धा अतिशय कमी होता.
या सर्व खुणांमुळे पाऊस किती व केंव्हा हा एक प्रश्न मनात थैमान घालत आहेत.

टिटवीची अंडी बघून अंदाज बांधता येईल असे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2025 - 12:42 pm | कर्नलतपस्वी

शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक अजूनही पारंपरिक भविष्यवाण्यांवर आणि पंचांगांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.

महाराष्ट्रातील भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारे येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे अधिकृत भाकीत जाहीर होणार आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविली आहे, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

अता अर्थात हे सर्व अंदाज आहेत.

काही जरी असले तरी जल ही जीवन आहे तेव्हां भविष्यात निसर्ग संवर्धन आणी संरक्षण हे महत्वाचे ठरते.

सस्नेह's picture

30 Mar 2025 - 12:54 pm | सस्नेह

इथेही भरपूर पक्षी आहेत पण नावे माहीत नाहीत, अभ्यास नाही पक्ष्यांचा. पहाटे कोकिळा , खंड्या आणि बरेच पक्षी जोरदार किलकिलाट करून सहाला उठायला भाग पाडतात.
दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का.

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2025 - 2:30 pm | कर्नलतपस्वी

दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का.

माळ मुनीया,बुलबुल , सुर्यपक्षी रारखे छोटे जीव त्याच घरट्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. तेव्हां घरटे सुरक्षित असल्यामुळेच ते परत परत येतात.

बाकी कावळा,घार, शिक्रा,कोतवाल सारखे दबंग पक्षी जीवावर आल्या सारखे एकावर एक काड्या रचून ओबडधोबड घरटे बनवतात ते पावसाळ्यात वाहून जाते. ते पुढील मोसमात नवीन बनवतात.

म्हणूनच, कदाचित "चिमणे चिमणे दार उघड", अशी कावळ्या चिमणीची गोष्ट बनली असावी.

सस्नेह's picture

30 Mar 2025 - 6:16 pm | सस्नेह

छान राहतात मुनिया. कबुतरांसारखं घाण करत नाहीत.
काहीच त्रास नसतो त्यांचा. करमणूक होते चांगली त्यांना पाहताना :)

मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात.
..

तेव्हा गवताची लांब पाती मिळतात. पिलं झाल्यावर सप्टेंबरमध्ये किडेही भरपूर असतात पण मुनिया किडे खात नसावेत. त्यांना लागते गवताचे कोवळे बी ते मात्र भरपूर असते. म्हणून मुनिया जूनमध्ये घर बांधत नाहीत. आमच्या बाल्कनीत आहे एक. तीन वर्षं एक जोडी येते. नंतर घरट्याचे तोंड बंद करून जातात.

घरटे जुलै ऑगस्टमध्ये तयार होते. पण आधी महिना दीड महिना टेहळणी आणि साहित्य जमवाजमवी चालू असते त्यांची.
बाकी, मुनिया जुनेच घरटे वापरतात हे नव्हते माहिती. मी आपलं जुनं घरटं वाळून काड्या पडू लागल्या की काढून टाकते.
यावर्षी नाही काढत आता :)

सस्नेह's picture

30 Mar 2025 - 6:17 pm | सस्नेह

धन्यवाद :)
जरुर वाचते.

बहाव्याचा आजचा फोटो. जवळच रस्त्यावर फुलला आहे. केरळचा राज्य वृक्ष . त्यांच्या नवीन वर्षाला(विशू) फुललेला असतो. १४एप्रिल २०२५
...........

हे पक्षी खुप सुंदर आहेत.

अनन्त्_यात्री's picture

31 Mar 2025 - 1:50 pm | अनन्त्_यात्री

कविता आवडली

स्वधर्म's picture

31 Mar 2025 - 4:19 pm | स्वधर्म

धन्यवाद. आणि हो, पाऊस लवकर येवो ही सदिच्छाही.

सौन्दर्य's picture

31 Mar 2025 - 11:29 pm | सौन्दर्य

१९९३ ला मी बडोद्याला राहत होतो. त्यावर्षीच्या जुलै महिन्यात टिटवीच्या एका जोड्याने आमच्या घराच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर अंडी दिली होती. यथावकाश त्यातून दोन पिल्ले बाहेर येऊन ती टेरेसभर फिरायची. ती जणूकाही कोंबडीची लहान पिल्ले पायांना उंच काठ्या बांधून चालतात तशी दिसायची. कधीकधी त्यातले एखाद चुकार पिल्लू टेरेसवरून खाली अंगणात पडायचे, अश्यावेळी टिटवीची जोडी सतत 'टीटीव, टीटीव' ओरडत आमच्यासमोरून उडायची. त्यांचे ते ओरडणे ऐकून आम्हाला जाणवायचे की त्यांना काहीतरी हवे आहे. नीट बघितल्यावर कळायचे की तिचे पिल्लू खाली पडले आहे. जवळजवळ वीस फूट उंचीवरून पडून देखील त्यांना फारशी इजा झालेली नसायची. मग त्यांना मी सुपात उचलून परत टेरेसवर नेऊन ठेवायचो. सुपात अशासाठी की काही पक्षांत माणसाचा स्पर्श झाला तर पिल्लाना मारून टाकतात असे ऐकले होते म्हणून. असे बऱ्याच वेळा घडायचे व त्या पिल्लाना परत टेरेसवर नेऊन ठेवण्याचे काम करायला लागायचे.

टिटवी बहुधा अंडी जमिनीवरच देते, परंतु जर तिने अंडी उंचावर दिली तर त्यावर्षी पाऊस जास्त पडणार असे स्थानिक लोकं बोलायची. आणि खरंच त्यावर्षी खूप पाऊस पडला होता. पक्ष्यांना हे कसे कळत असावे ?

हीच टिटवीची जोडी, उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर मच्छरदाणी लावून झोपायचो त्यावेळी सूर्योदय झाला रे झाला, मच्छरदाणीवर उडत त्यांच्या टीटीव, टीटीव भाषेत आम्हाला जागे करायची. एखाद्या रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी आम्ही जर नाही उठलो तर चोचीने आमची पांघरुणे ओढायची. इतक्या जवळून टिटवी तेव्हा पहिल्यांदा व शेवटची पाहिली .

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Apr 2025 - 12:05 am | अमरेंद्र बाहुबली

छान अनुभव!

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2025 - 11:55 pm | श्रीगुरुजी

आमच्या सज्जात एका कोपऱ्यात अगदी वरच्या बाजूस लालगाल्या बुलबुलने अगदी लहान घरटे केले आहे. नुकतीच पिल्ले झाली आहेत. खरं तर बुलबुल साधारणपणे पावसाळा सुरू झाला की घरटे करतात व साधारणपणे ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मार्च महिन्यात पहिल्यांदाच बुलबुलांना पिल्ले झालेली पाहिली.

आज त्या लहानश्या घरट्यातून एक पिल्लू खाली पडले. सज्जात गवताचा आभास निर्माण करणारे हिरव्या रंगाचे जाजम असल्याने पिल्लास फार लागले नसावे. जवळपास दोन तास पिल्लू चोच वासून आवाज काढत होते. त्याचे आईबाबा आलटून पालटून घरट्यावर बसून उर्वरीत पिल्लांना पकडून आणलेले फुलपाखरू किंवा नाकतोडा वगैरे भरवत होते, परंतु खाली पडलेल्या पिल्लाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत होते. मी बराच वेळ प्रतीक्षा करीत होतो की एकदा तेथून बुलबुल दांपत्य उडून गेले की पिल्लास उचलून घरट्यात ठेवावे.

परंतु बराच वेळ दोघांपैकी एक तरी बुलबुल घरट्यावर असायचाच/चीच. मागील वर्षी अंगणात जास्वंदीच्या रोपावर असेच घरटे होते व फुले काढण्यास जवळ जायला लागलो की बुलबुल अत्यंत वेगाने तोंडासमोर येऊन जवळपास तोंडास स्पर्श होईल इतपत जवळ येऊन उडायचा. त्यामुळे बुलबुल घरट्यावर बसलेला असताना पिल्लू उचलून घरट्यात ठेवणे शक्य नव्हते.

शेवटी एकदाचे दोन्ही बुलबुल खाद्य आणण्यासाठी उडून गेल्यानंतर मी घाईघाईने लहानशी शिडी घरट्याजवळ लावून एका कागद ओंजळीसारखा करून पिल्लू कागदात घेऊन शिडीवरून अगदी सावकाश घरट्यात सोडले. सायंकाळी पाहिले तर त्या पिल्लास बुलबुल दांपत्याने स्वीकारले होते व सर्व पिल्लांना खाद्य भरविणे सुरू होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Apr 2025 - 12:05 am | अमरेंद्र बाहुबली

छान अनुभव!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Apr 2025 - 12:07 am | अमरेंद्र बाहुबली

मी एकदा पवनचक्कीवर कमिशनिंग साठी गेलो होतो, बरेच दिवस पडून असल्याने त्या पवनचक्कीवर कबुतरानी प्रचंड घाण केली होती, कमीत कमी ३०० अंडी तरी असावीत, सर्व अंडी वरून खाली फेकायला माणसे पाठवली, ती लोक पाप करायला तयार होईनात, शेवटी कसेतरी एक दोन लोक तयार केले नी त्यांनी ते काम केले.