"फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणीएवढे दिसणारे निळे फूल, शालीनपणे उमलले. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचे मन मोहरले.काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेले एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आले व त्यावर स्थिरावले. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला,रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळाले. "हे तुझं आयुष्य! क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन!" तेथून उडून जाताना फुलपाखरू म्हणाले.
झळाळणाऱ्या आभाळाखाली वाऱ्याच्या लहरीवर ते आर्त स्मृतीप्रमाणे तरंगू लागले. आनंद चाखायला खाली फुलांचा गालीचा, उडायला वर स्फटिकाप्रमाणे आभाळ ! तोच निळ्या रंगाचा लाल चोचीचा एक पक्षी आला. त्याचे फुलपाखराच्या मखमलीसारख्या पंखाकडे लक्ष गेले. विजेप्रमाणे त्याच्या शरीरात भुकेची रेषा उजळली. त्याची लाल चोच उघडली व ती काळ्या पाखरावर मिटताच त्याचे तांबडे ठिपके रक्ताच्या थेंबासारखे वाटले. "हे तुझं आयुष्य! क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन!" निळ्या रंगाचा, लाल रंगाचा पक्षी जाताजाता म्हणाला.
-जि ए कुलकर्णी,मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड,अटळ,अचल आणी मार्गदर्शक.
जि. ए. नी पारवा या कथासंग्रहात, "चाहूल", या लघुकथेत क्षणभंगुर जीवनाचे तत्वज्ञान साध्या सोप्या शब्दात सुंदर खुलवले आहे. ही कथा आठवण्याचे कारण की पक्षीदर्शन करताना असे प्रसंग नेहमीच दिसतात. आयुष्य किती आहे हा विचार न जगता,"हे जीवन सुंदर आहे", असे म्हणून मिळालेल्या क्षणांचा आनंद घेणे हेच महत्वाचे.
"हे जीवन सुंदर आहे", माझे अतिशय आवडते शब्द चित्रकार श्री सुधीर मोघे यांनी ही रचना "चौकट राजा", या चित्रपटा साठी लिहीली, आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केली. १९९९ चा अप्रतिम हृदयस्पर्शी मराठी चित्रपट. ते लिहतात,
हे जीवन सुंदर आहे.
नितळ निळाई आकाशाची अन् क्षितिजाची लाली
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी
पुढे,शहरातील निसर्गाचे बदलते रूप आणी जगण्यासाठीची धडपड पंक्तीबद्ध केली आहे. इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा कविवर्य जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात व शेवटी लिहीतात,
जगण्यावरचे प्रेम जणू, धुंद बरसते आहे.
हे जीवन सुंदर आहे.
या चित्रपटात, दिलीप प्रभावळकर, स्मिता तळवलकर,सुलभा देशपांडे दिलीप कुलकर्णी आणी सर्वांचे लाडके मामा,आशोक सराफ या कसलेल्या कलाकारांनी काम केले आहे. चित्रपट गृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले व मन भारावलेले असतेच.अर्थात विषयाला अनुषंगाने ही माहीती. सर्वच मराठी माणसांनी हा चित्रपट बघीतला असेल,नसेल तर जरूर बघा. आपण विषयाकडे वळू.
सवयीनुसार सकाळचा फेरफटका सुरू होता. इंग्रज म्हणतात,"Bad habits dye hard", अगदी तसेच.सकाळचा निसर्ग माझ्यासाठी जीवनरेखा आहे. वातावरण कुंद,धुंद ,सौम्य, सुखद सोनेरी रंगाची सुर्यकिरणे पिवळ्या फुलांच्या रंगाची पिवळाई अधिक गडद करत होती. पक्षांचे आवाज, विवीध रंगी नाकतोडे फुलपाखरं, भुंगे, मधमाशांचे गुंजारव यांनी वातावरण संगीतमय झाले होते. एक वेगळीच बंदीश संगीतबद्ध होत होती.जर "निळावंती", भेटली असती तर नक्कीच तीने ती बंदिश माय मराठीत समजावली असती.
आषाढ सरींचे कोसळणे थांबले होते.जसे एखादे लहान मुल आईच्या मागे हट्ट पुरवण्या साठी भुणभुण करत असते, तशीच पावसाची बुरबुर चालू होती. गवताची पाती पावसाच्या थेंबानी नटली होती.मेघवाही श्रावणातला उन पावसाचा खेळ, क्षिताजावर स्थिरावलेले सप्तरंगी इंधनुष्य एखाद्या तटस्थ, व्रतस्थ ऋषी प्रमाणे निश्चल होऊन बघत होते. जमीन ओली होती पण चिखल नव्हता. एकंदरित सकाळ सुहानी,मस्तानी वाटत होती.पर्ज्यन्य आणी वसुंधरेच्या मिलनाचे असंख्य पुरावे दिसत होते. यौवनाचे अनेक रंग,माळराना बरोबरच अगदी दगड, खडकांवर सुद्धा पसरले होते. काळा कभिन्न ओबडधोबड खडक नवरदेवा सारखा रंगीबेरंगी फुलांनी नटला होता. दगडांवर फुलं उगवली होती. "सत्यानाशी", सारख्या काटेरी झुडपावर डुलणारी नाजुक गर्द पिवळी फुले, सुंदर तरूण युवतीच्या कानातल्या डुलणार्या झुमक्या सारखी कानी कुंडंलाचा भास निर्माण करत होती. "सोनकीच्या", फुलांचा पिवळा रंग वेगळा तर "लोखंडीचे", डोलणारे तुरे वेगळीच पिवळी छटा माळरानावर पसरवत होते. कुठे कुठे "खुळखुळ्याचे (Rattle pods)", तुरे उंच मान करून माळरानाची शोभा वाढवत होते. जणू माळरानावरील सुरक्षारक्षक.हिरवट "चिकट्याची",भरलेली कणसं बालपणीची आठवण करून देत होती. बहिणी,त्यांच्या मैत्रिणी याच चिकट्याच्या कणसाची दुरडी बनवायच्या तर नतद्रष्ट मित्र चिकट्याचेकणीस एकमेकाच्या अंगावर फेकून मारायचे. उघड्या त्वचेवर चिटकताच खाज सुटायची आणी मग कधी कधी एकमेकाच्या आई माईचा उद्धार करत मारामारीत बदलणारे शत्रुत्व थोड्या वेळात पुन्हा पूर्ववत मैत्रीत रूपांतरित व्हायचे. हिरव्याकंच "टणटणीच्या", झाडावर लाल पिवळ्या,पांढर्या छोट्या, छोट्या फुलांचे गुच्छ आपले रूप बदलत होते. आता फुलांच्या जागी हिरव्या,जांभळ्या रंगाची फळे दिसू लागली होती. मला तर ते फळांचे गुच्छ बघून आईच्या कानातल्या मोत्याच्या कुड्याचीं आठवण करून देत होते.लाल,गुलाबी, हिरव्या, पिवळ्या, पांढर्या, जांभळ्या व अनेक इतर न सांगता येणाऱ्या विवीध रंगाची प्रकृतीने केलेली पखरण रंगपंचमीची आठवण करून देत होती....निसर्गकवी ना. धो महानोर असते तर आणखीन एक छान कवितेची मराठी साहित्यात भर पडली असती.
चालता,चालता एका जागेवर थबकलो. लहान मोठी रंगबिरंगी फुलपाखरे बागडत होती.अंडे, लारव्हा,प्युपा (Egg, Larva and Pupa), या सर्व कठीण पायर्या पार करून त्यांनी इतके सारे विवीध रंग आणी स्वतंत्रता मिळवली होती.त्यांचा तो तीतली डान्स बघून मला "सुरज", या चित्रपटातील वैजयंतीमाला यांच्या नृत्याची आठवण झाली.गायिका शारदा यांचा स्वर्गीय आवाज.आठवल्यावर लगेच गाणे तू नळीवर लावले.
तितली उड़ी, उड़ जो चली
फूल ने कहा, आजा मेरे पास
तितली कहे, मैं चली आकाश
चित्रपट-सूरज (1966)
संगीतकार-शंकर जयकिशन
गीतकार-शैलेन्द्र
गायीका-शारदा
नृत्यांगना-वैजयंतीमाला
हे सगळे वाचताना जेष्ठांच्या कानात,डोळ्यात आणी मनात अनुक्रमे आवाज, चित्र आणी आनंद असे संमिश्र प्रकटीकरण सुरू झाले असेल याची मला खात्री आहे.नव्या पिढीतील वाचक तू नळीवर बघू शकतात.
डोक्यात विचार चालू होते,नजर तितली नृत्यावर असताना एक वेडा राघू (Asian Green Bee Eater) फायटर जेट सारखा सूर मारून एका फुलपाखराचा चट्टामट्टा करून पापणी लवण्याच्या आत निघून पण गेला. बाकीच्या फुलपाखरांना,किटकांना काय घडले याचे काही सोयरसुतक नव्हते ते स्वमग्न जीव आपल्याच नादात होते....
फुलपाखरांची,भ्रमरांची प्रकाशचित्रे टिपणे हे सुद्धा छायाचित्रकाराला आव्हानात्मक वाटते.कविवर्य सुधीर मोघे व कविवर्य ग्रेस यांनी मनाचे सुंदर वर्णन केले आहे. मोघे लिहीतात,
मन गरगरते आवर्त,मन रानभूल मन चकवा
तसेच हे रंगीबेरंगी जीव, सहजा सहजी एका जागेवर न बसणारे. मानवी मना इतकेच चपळ,चंचल.छायाचित्रकात पकडताना आगदी कस लागतो. काही छायाचित्रे टिपली आहेत ती इथे डकवतो.
-------------
--------------
हे छायाचित्र मिपाकर भक्ती यांनी टिपले आहे.त्यांचे मनापासून धन्यवाद.
---------------
----------------
-----------------
-----------------
-----------------
------------------
विवीध प्रकारची फुलपाखरं बघताना आणखीन एक कविवर्य आठवतात ते म्हणजे,कवीवर्य ग.ह. पाटील, आमच्या खेड मंचर जवळच्या पिंपळवंडी या छोट्याश्या खेडेगावात १९०६ मधे जन्मले.यांची सार्वकालिक कवीता बहुतेक सर्व जेष्ठांनी प्राथमिक शाळेत तोंडपाठ केली असणार.
छान किती दिसते ! फुलपाखरू
या वेलींवर ! फुलांबरोबर
गोड किती हसते ! फुलपाखरू
पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते ! फुलपाखरू
डोळे बारीक ! करिती लुकलुक
गोल मणी जणु ते ! फुलपाखरू
मी धरू जाता ! येई न हाता
दूरच ते उडते ! फुलपाखरू
माझी माय मराठी अन्य माझ्या मावश्या असे जर मी विधान केले तर आलोचक म्हणतील की यांना "माय मरो अन् मावशी उरो", असे म्हणायचेय. आता आलोचकांचे काय....असो,सकाळी धरणीवर उतरलेला स्वर्ग पाहून आंग्ल भाषेत काही ओळी सुचल्या....
Live like a butterfly, dance, and play
Soak in the sunshine, every single day
God has given us colorful life
Spread the colors, spread the + vibes
Live in the moment, let go of the fear
And let your beauty shine, year after year
Don't worry about tomorrow, or what's past
Just live, and let your spirit fly at last.
माझी आई तर सर्वात सुंदर आणी तीच्यावर जीवापाड प्रेम आहेच तशीच मावशी पण आवडते. विल्यम वर्ड्सवर्थ यांची "डॅफोडील्स" कितीतरी वेळा वाचली आहे. खुप काही आठवतंय पण पुन्हा कधीतरी....माय मराठीचा गौरव गगनात पोहचवण्यात सहभागी असलेल्या लाडक्या शब्द कलाकारांचे या दिवशी स्मरण करावे या साठी हा प्रपंच. सर्वांनाच आठवणे व इथे त्याबद्दल लिहीणे याला मर्यादा,त्यामुळेच विषयाच्या अनुषंगाने काही दिग्गज शब्द गारूड्यांचा उल्लेख केला आहे. तसे सर्वांनाच सादर अभिवादन.
मराठी भाषा गौरव दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छां देत आजचे लिखाण इथेच थांबवतो.
प्रतिक्रिया
28 Feb 2025 - 7:19 am | कंजूस
सकाळीच हा पहिला लेख वाचला आणि मन प्रसन्न झाले.
फुलपाखरांचे फोटोही सुंदर.
28 Feb 2025 - 10:18 am | अमरेंद्र बाहुबली
मस्त लेखन. फोटोही सुंदर आलेत.
28 Feb 2025 - 12:59 pm | Bhakti
वाह! खुपच सुंदर,अगदी बागेत फेरफटका मारत आहे.ते तिसऱ्या क्रमांकाचे फुलपाखरू( Lime butterfly)मी क्लिक केलेले आहे ना :) धन्यवाद.
एक झोका गाणंही खुप सुंदर आहे,अगदी ओठांवर हसू आणि डोळ्यात असू आणते.
28 Feb 2025 - 2:09 pm | कर्नलतपस्वी
होय. धन्यवाद लिहायला विसरलो होतो.
प्रतिसाद व छायाचित्र दोन्ही साठी मनापासून धन्यवाद.
4 Mar 2025 - 9:05 am | चित्रगुप्त
कर्नल सायेब, तुमच्या प्रतिभेचे फुलपाखरु, जी ए - सुधीर मोघे - आनंद मोडक - शारदा - वैजयंतीमाला - शैलेन्द्र - शंकर जयकिशन - विल्यम वर्ड्सवर्थ .. कवीवर्य ग.ह. पाटील ... आणि प्रातः भ्रमंतीत अनुभवाला येणारे निसर्गवैभव ... अश्या नानाविध कुसुमांतल्या सौदर्यरसाचा आस्वाद घेत आम्हा वाचक - रसिकांनाही त्याची अनुभूती करून देण्यात कमालीचे रमले आणि यशस्वी झालेले आहे.
" मै यूंहीं मस्त नगमे लुटाता रहूं" हा तुमचा उद्योग कायम सुरु ठेवा. अनेक आभार.
10 Mar 2025 - 8:15 pm | चौथा कोनाडा
मन प्रसन्न करणारा टवटवीत लेख !
सुंदर काव्यमय ओळी आनि सुंदर प्रचिंनी सुंदर अनुभव दिला.
भन्नाट व्यासंग आहे आपला कर्नलसाहेब !