१. अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन - https://www.misalpav.com/node/44374
२. श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन - https://www.misalpav.com/node/44416
३. श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार - https://www.misalpav.com/node/46057
४. श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन - https://www.misalpav.com/node/48807
५.श्री अमृतानुभव अध्याय पाचवां - सच्चिदानंदपदत्रयविवरण - https://www.misalpav.com/node/48797
_________________________________________
श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन
अज्ञानखंडन - अमृतानुभवातील सर्वात प्रदीर्घ अध्याय ! चौथ्या अध्याया पर्यंत कळतं गेलं तसं लिहित गेलो. ऐकत मात्र पुढे गेलो होतो , पण सातव्या अध्यायावर गाडी अडखळली . ह्या अध्यायातील पहिला श्लोक वाचल्यावरच मौन झालो. काही लिहावेसेच वाटेना ! पण कुठं तरी काहीतरी वाचुन , ऐकुन स्फुर्ती होते , अन झरझर लिहुन काढलं जातं !
_______________
कसं आहे की माणसाने ऐकत रहावं. आपण ऐकतो म्हणजे नक्की काय करत असतो ? आपल्या कानातील तीन सुक्ष्म हाडे त्यावर पडणार्या ध्वनी लहरींनी कंपित होत असतात आणि आप्ला मेंदु ती कंपने "अॅनालाईझ" करत असतो . आणि आपण ऐकत असतो. आता हे सगळं जागृत अवस्थेत होत असतं , पण मग झोपेच्या प्रगाढ अवस्थेत होत नसतं का ? कानातील ती हाडे झोपेच्या अवस्थेत कंपित होत नसतात का ? नक्कीच होत असावीत , कारण तशी ती होत नसती तर अलार्मचा आवाज ऐकुन तुम्ही खडबडुन जागे झाले नसता ! अर्थात तुमचा मेंदु बस ती माहीती कंपनांद्वारे ऐकत आहे , बस तो डेटा "फिल्टर ऑऊट" करत आहे .
पण मग ती फिल्टर केलेली माहीती जाते कुठे ? शिफ्ट + डीलीट ?
असो. तर तात्पर्य काय तर माणसानं ऐकत रहावे. कधी कुठे ऐकलेली कोणती गोष्ट कुठे "क्लिक" होइल काय सांगता !
__________________
हां तर तेही असो :
कल्पना करा की काळाची एक रेषा आहे , त्यावर असा कोणता क्षण आहे कि त्याक्षणा आधी पर्यंत अज्ञान होते, काळोख होता , गुडुप अंधार होता , अन त्या क्षणात काहीतरी स्पार्क पडला अन् तुम्हाला ज्ञान झाले , अन सगळीकडे प्रकाशच प्रकाश झाला ?
माऊलीं अज्ञान खंडन ह्या सातव्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत हा प्रश्नच मार्गी लावतात !
येहवीं तरी अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभणा ।
तैं तरि काना । खालींच दडे ॥
अज्ञान असं काही नाहीयेच ! तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कोठेतरी, कोणत्या तरी क्षणी ज्ञान झालं , त्याच्या आधी अज्ञान होतें , तर तसे वाटण्यापुरते देखील अज्ञान नाही!
अग्नी पेटवला, प्रकाश पसरला म्हणुन अंधाराचा नाश झाला असं आपण म्हणतो पण मुळात अंधार म्हणजेच प्रकाशाचा अभाव आहे. अर्थात अवस्तु आहे. अंधाराला प्रकाशाच्या अभावाव्यतिरिक्त दुसरे अस्तित्वच नाही. अज्ञान हा ज्ञानाचा विरुध्द शब्द नसुन ज्ञानाचा अभाव दर्शक शब्द आहे .
सुर्य आहे म्हणुन प्रकाश , सुर्य नाही म्हणुन अंधार . सुर्य उगवुन रात्रीचा नाश करतो हे म्हणणे तोवरच योग्य आहे जोवर आपल्या हे लक्षात येत नाही की सुर्याच्या ठायी रात्र असे काही नाहीयेच .
जसं एखादा काजवा अंधाराचा आश्रय करुन चमकतो "मी आहे मी आहे " म्हणतो तसं हे अज्ञान ह्या ज्ञानाच्या अभावाचा आश्रय करुन "मी आहे मी आहे " म्हणत आहे .
पण सुर्याला "मी आहे मी आहे " म्हणयाची सोयच नाही ! कारण त्याने अंधार पाहिलाच नाही ! तसं विशुध्द ज्ञानावस्थेत अज्ञान असं काही नाहीच आहे !
अडसोनि अंधारीं । खद्योत दीप्ति शिरी ।
तैसें लटिकेंवरी । अनादि होय ॥
आणि जर अज्ञान हा ज्ञानाचा अभाव , आणि अज्ञान असं काही नाहीच असं लक्षात आल्यावर बस ज्ञानच आहे , असं म्हणणं हेही अज्ञानच झाले की ! कारण ज्ञान आहे हे तरी कळणार कसं अन कोणाला ?
आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें ।
येक लपऊनि दाविजे । येक नव्हे ? ॥
सूर्याला रात्र म्हणजे काय हेच माहीत नाही मग त्याला दिवस म्हणजे काय हे तरी कसे कळणार ? तसं सच्चिदानंद वगैरे शब्दांनी स्मरण करुन दिलं काय कि नाही दिलं काय ? काय फरक पडतो ? ब्रह्म , वस्तु , राम , आदित्य , ॐ , काहीही म्हणा - "ते " त्याच्या जागी आहेच आहे !
सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? ।
तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥
सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा ।
मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥
समजा तुमच्या समोर साप आहे , अन तुम्ही मरणांतिक भीतीने ओरडत आहात "साप साप" म्हणुन . अन दुसर्या क्षणी तुम्ही ठरवता कि दोरीने हा साप बांधु, तुम्ही दोरीचे एक टोक हाती पकडुन त्याने साप पकडायला जाता अन तत्क्षंणीं तुमच्या लक्षात येतं - अरे ही तर , अरे ही तर नुसती दोरी आहे , साप असं काही नाहीच ! नव्हताच साप ! होती ती दोरीच होती !
दोरीं सर्पाभास होये । तो तेणें दोरें बांधों ये ? ।
ना दवडणें न साहे । जयापरी ॥
स्वरुपाच्या ठायी "मी आहे" हे ज्ञान, ही जाणीवदेखील नाही , तिथं अज्ञानाची जाणीव तरी कोठुन होणार ?
तैसें आत्मयाच्या ठाई । जैं आत्मपणा ठवो नाहीं ।
तैं अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥ ७-६४ ॥
आम्हीं येऊनि जाऊनि पुढती । अज्ञान आणावें निरुती ।
तें नाहीं तरी किती । वतवतूं पां ॥ ७-८४ ॥
कितीही वेळा विचार केला कि कुठं तरी असेल , थोडं तरी असेल , पण अज्ञान असेल , पण फिरुन फिरुन हेच लक्षात येतं की ते नाहीच्चेय ! आता तेच तेच किती वेळा "नाही नाही" म्हणायचं !
कुठं ? ज्ञान कुठं झालं ? अज्ञान कुठं संपलं ?
अमृतानुभव ऐकला तिथं ? का ? त्या आधी आत्माराम ऐकला त्याच्या आधी अज्ञान होतं का ?
का त्याच्या आधी बाबामहाराजांच्या सुरेल आवाजातील हरिपाठ ऐकायचो , त्याआधी अज्ञान होतं का ?
बरं मग त्याच्याही आधी , अगदी फार फार पुर्वी उपनयनाच्या वेळेस बाबांनी कानात मंत्र सांगितला ... तिथं ज्ञान झालं का ? पण मग त्याच्या आधी तरी अज्ञान होतं का ?
बरं मग देहाचा जन्म झाला तिथं ज्ञान झालं का ? का ? त्या आधी अज्ञान होतं का ?
अरे अज्ञान असं काही नव्हतंच इथं कधी ! आत्ताही नाही आणि ज्ञानही नाही ! "ज्ञान झालं "असं वाटण्यामुळे "अज्ञान होतं " असं भासत आहे , एरव्ही वस्तुस्थिती अशी आहे की दोन्ही पैकी काहीही नाही ! आरश्यात पाहिलं म्हणुन आपल्याला आपला चेहरा प्रत्ययास आला, मग पाहिलं नव्हतं तेव्हा चेहरा नव्हता का ? की पाहिलं म्हणुन चेहर्याला चेहरेपण आलं ? पाहिलं काय अन न पाहिलं काय ! चेहरा आहेच आहे!
जें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावणें कां साहे ? ।
न दाविजे तरी नोहे । तया तो काई ? ॥ ७-२१३ ॥
आरिसा पां न पाहे । तरी मुखचि वाया जाये ? ।
तेणेंवीण आहे । आपणपें कीं ॥ ७-२१४ ॥
तस्मात अज्ञान नाहीच , कधी नव्हतेच !
पण मग जर अज्ञानच नव्हते , नाही तर मग "ज्ञान " आहे म्हणाण्यालाही स्कोपच नाही !
अंधार कसा असतो हे पहायला सूर्य रात्रीच्या घरी गेला तर त्याला काळोख म्हणजे काय कळते का ? आणि मग ज्याला अंधार म्हणजे काय हे माहीतच नाही त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे कळनार ! तसं ज्ञानाच्या आधाराने अज्ञानाचा शोध घ्यायला गेला तर अज्ञान असं काही नाहीच , पण मग ज्याला अज्ञान म्हणजे काय हे माहीतच नाही त्याला ज्ञान झाले ज्ञान आहे हे असलं काही ही तरी कसे कळणार ! असली काही भानगडच नाही तिथं !
परी तमाचा विसुरा । न जोडेचि दिनकरा ।
रात्रीचिया घरा । गेलियाही ॥ ७-२९४ ॥
झोप झोप म्हणजे काय असते हे बघतोच आज असे म्हणुन कोणी जागत बसला तर त्याला झोप म्हणजे काही कळणारच नाही , आणि जो कधी झोपलाच नाही त्याला जागं होणं म्हणजे काय हे तरी कसं कळणार ! तिथं बस टळटळीत जागेपण आहे तेही जागेपणाच्या जाणीवेशिवाय !
तसेच अज्ञान अज्ञान म्हणुन शोधायला गेला तर अज्ञान असं नाहीच हे कळतं, पण मग अज्ञान नाहीच तर मग ज्ञान होणार कोणाला !
अज्ञान नाही, अन ज्ञानही नाही !
कां नीद खोळे भरिता । जागणें ही न ये हाता ।
येकलिया टळटळिता । ठाकिजे जेवीं ॥ ७-२९५ ॥
बस्स "आहे."
ते सुध्दा "अस्ति" वालं "आहे" नव्हे - "अस्मि"वालं आहे !
छ्या , तेही नाही ...
:|
||ॐ||
पण तुर्तास इतके पुरे ! आता ह्या "अस्ति" "अस्मि" चे खंडन पुढच्या आठव्या अध्यायात - "ज्ञान खंडन"
__________________________________
अरे अरे ज्ञाना झालासि पावन । तुझें तुज ध्यान कळों आलें ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फ़िटला संदेह अन्यतत्त्वीं ॥२॥
||श्रीकृष्णार्पणमस्तु||
प्रतिक्रिया
26 Feb 2025 - 2:09 am | प्रसाद गोडबोले
विशेष आभार - श्री. किसनदेव
संदर्भ -
१. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. विष्णुबुवा जोग
२. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. दत्तराज देशपांडे
३. अमृतानुभव - सत्संगधारा - https://satsangdhara.net/dn/amrut.htm
४. श्री. राजेश वैशंपायन ह्यांच्या सुरेल आवाजातील अमृतानुभव - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8&t=4911s
५. आणि मी.