त्या पोराचे वडील तसे नामी सरदार होते बरं. आज आपण उपहासाने जो जहागीरदार शब्द वापरतो तसा त्या मुलाचा बाप खरंच खूप मोठा जहागीरदार होता. पैशापाण्याची, सेवेकऱ्यांची कमी नव्हती. त्या तरुणाने सगळी हयात मजा मारण्यात घालवली असती तरीसुद्धा तो काही चुकला असं कुणीही म्हणू शकलं नसतं. परंतु गर्व आजपर्यंत कुणाला चुकला? तुम्ही पुराणे उचकून पहा, परमेश्वरी अवतारांना सुद्धा गर्वाची बाधा झाल्याचे क्षण तुम्हाला सापडतील. असाच गर्व या विश्वाची निर्मिती करणाऱ्या आदियोगी-आदिशक्तीला झाला. आणि अनंत विश्वातल्या अनंत चुका अनंत चाचण्यांनी सुद्धा ज्याच्यात सापडणार नाहीत असा युगपुरुष निर्माण करण्याची नियतीला इच्छा झाली. श्रीमंत शहाजीराजे आणि राजमाता श्री जिजाऊच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला.
ज्या माणसांमध्ये हे बाळ जन्माला आलं ती माणसंही मोठी नामी असली पाहिजेत. जणू त्यांना कळून चुकले होते की या पोराच्या रूपाने साक्षात स्वातंत्र्यदेवता प्रकट झाली आहे. मुघल! संपूर्ण हिंदुस्थान ज्या भयानक राक्षसाच्या जबड्यात घट्ट रुतून बसला आहे त्या अक्राळविक्राळ संकटाशी लढण्याची प्रतिज्ञा हा सोळा वर्षाचा पोरगा करतो आणि त्याच्या भोवताली असणारी सगळी लहान मोठी माणसं त्याच सुरात सूर मिसळून जीव द्यायला आयुष्यभरासाठी कटिबद्ध होतात. लोक एक वेळ पैसे देतील, तुमचा मार्ग अडविण्यासाठी नाना क्लृप्त्या लढवतील परंतु ती तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहतील ही साध्य करायला महाकठीण गोष्ट आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करायला निघालेल्या मुलामागे सबंध समाज उभा राहतो त्या मुलाचे व्यक्तिमत्त्व किती प्रभावी असेल. त्याच्या चेहऱ्यावर तळपत्या सूर्याचे तेज, हृदयात शीतल चांदण्यांचे मार्दव, वाणीत तलवारी सारखी धार आणि चारित्र्यात अग्नीसारखी पवित्रता असली पाहिजे. पोटच्या पोराचं लग्न मागे सारून तान्हाजी तुमचे संकल्प पुढे नेण्यासाठी सिंहाच्या काळजाने शत्रूवर झडप घालतो तो उगाच नाही. आपण गेलो तरी राजा कुटुंबाला एकटा सोडणार नाही हा प्रगाढ विश्वास मावळ्यांच्या हृदयात होता.
पुरंदरच्या वेढ्यात दिलेरखान मुरारबाजीला म्हणतो, "पंडित मुघलांच्या बाजूला ये तुला सोन्याचांदीच्या राशींनी न्हाऊ घालतो" आणि हा मराठ्यांचा शूर किल्लेदार कडाडतो, "थू तुझ्या बादशहावर..! मी रक्ताने न्हानं स्वीकारील पण स्वराज्याशी बेईमानी नाही. लढायला तय्यार हो". शिवाजी महाराजांनी स्वराज्य म्हणजे काय दिलं होतं मुरारबाजीला? कोणत्या दौलतीसाठी बाजीप्रभूंचा प्राण नसलेला देह घोडखिंडीत विशाळगडावरील तोफेचा आवाज ऐकेपर्यंत शत्रूची वाट अडवत होता? का वाटलं असेल मदारी मेहतरला औरंगजेबाच्या कैदेत महाराजांच्या जागेवर मी पांघरून घेऊन झोपतो म्हणजे महाराजांना सुटकेसाठी प्रयत्न करता येतील? का? का? शिवा काशिद मृत्यूच्या पालखीत बसण्याआधी स्वतःला राजांच्या वेशात पाहून स्वतःलाच मुजऱ्यासाठी वाकला असेल? शेवटी राज्याभिषेक शिवाजी भोसले या मनुष्याचा झाला. या मावळ्यांना काय मिळालं? नाही. प्रश्न हा विचारायला हवा की मावळ्यांना काय मिळालं नाही? राज्याभिषेक श्री शिवरायांचा झाला पण स्वतः छत्रपती झाल्याचा आनंद प्रत्येक मावळ्याला झाला. स्वतःच्या शेतात पिकवलेले दोन दाणे आपल्या पोटात जातील की नाही याची भ्रांत असणारा कुणबी अवघ्या राज्याचा मालक झाल्याप्रमाणे स्वतःला ताठ मानेने मिरवू लागला. इथल्या माऊलीच्या डोईवरचा पदर कायम झाला आणि घरच्या लक्ष्मीची गेलेली रया परत आली. माणसांना माणूसपण मिळालं, शतकांची गुलामगिरी गाडली गेली. मने जिवंत झाली. मराठी माणसांच्या मनात स्वाभिमानाचं पोलाद ओतलं गेलं. मग इथला एक एक माणूस सह्याद्रीच्या गडकोटांसारखा कणखर झाला. अजिंक्य! अभेद्य!
त्यानंतर औरंगजेबाला शिवाजीची भीती वाटत नव्हती कारण त्या नावाचा विचार करण्याचीसुद्धा उसंत त्याला मराठ्यांनी मिळू दिली नाही. सबब आधी छत्रपती संभाजी आणि त्यानंतर मराठ्यांचे सेनापती संताजी, धनाजी यांच्याच धसक्याने मुघलांचा बादशहा एवढा हवालदिल झाला की त्यानंतर केवळ 'मराठा' ही एकच ओळख मुघलांना धडकी भरवायला पुरेशी होती. ही माझ्या राजाची कमाई! त्यापुढे मराठी मुलखाकडे वाकड्या नजरेने पाहायची कुणाची हिम्मत झाली नाही. मराठ्यांचे पुढचे सारे पराभव फक्त मराठी माणसांनीच केले. कारण आम्ही स्वतःला शिवरायांचे सार्थ वारसदार सिद्ध करू शकलो नाही. शिवाजी म्हणजे हाडा माणसांचा मनुष्य नव्हे, केवळ छत्रपती, राजकार्य धुरंधर, सेनानी ही नव्हे. शिवाजी म्हणजे फक्त विचार सुद्धा नाही. शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत! मनुष्य ज्या प्रेरणेने जगतो ती प्रेरणा म्हणजे शिवाजी. तीच स्वातंत्र्य प्रेरणा जी मनुष्यांना इतर प्राण्यांहून वेगळी ठरवते. येथे लाचारीही नाही आणि माजही नाही. येथे फक्त समाधानाचा शांत सुस्वर प्रवाह वाहतो. जो कधी कुणाच्या वाटेला जात नाही आणि आपल्या वाटेला जाणाऱ्यांची वाट शाबूत ठेवत नाही.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
जय भवानी
जय शिवराय
हर हर महादेव
प्रतिक्रिया
19 Feb 2025 - 7:32 pm | Bhakti
सुंदर!
20 Feb 2025 - 11:57 am | किसन शिंदे
हे आवडलंय!
20 Feb 2025 - 4:04 pm | अदित्य सिंग
खूपच सुंदर लिहिले आहे...
21 Feb 2025 - 8:51 am | मनिम्याऊ
खूपच सुंदर लिहिलं आहे
21 Feb 2025 - 6:48 pm | रीडर
छान लेख
23 Feb 2025 - 10:24 am | विवेकपटाईत
युपीएच्या एकाही मुख्यमंत्र्याने छत्रपति शिवजयंतीच्या दिल्याअसतील का?