आदरणीय, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे सर, यांचे वृद्धापकाळाने काल सकाळी निधन झाले. सर, ब-याच दिवसांपासून आजारी होते. मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार सरांना जाहीर झाला होता, मसापच्या वतीने तो पुरस्कार साहित्य परिषदेच्या पदाधिका-यांनी घरी जाऊन सरांना तो पुरस्कार दिला तेव्हा, सरांची खालावलेली तब्येत, थकलेपणा, आणि वृद्धापकाळ स्पष्ट दिसत होता.
सरांची 'पाचोळा' कादंबरी प्रचंड गाजली होती. पन्नास वर्षानंतरही साहित्य रसिकात त्याची चर्चा होते. ‘आमदार सौभाग्यवतील ही कादंबरीही त्यांनी लिहिली आणि गाजली. आम्ही एम.ए.ला होतो तेव्हा अभ्यासक्रमात कादंबरीचं रुपांतर नाटक म्हणून झालं आणि ते नाटक आम्हाला अभ्यासालाही होतं. अभ्यासासाठी नाटकही पाहिलं होतं. सरांच्या 'चारापाणी' या कादंबरीला मराठवाडा साहित्य परिषदेचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार जसा मिळाला, तसे महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार सरांच्या लेखनाला मिळाले.
मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकारिणीत असल्यामुळे अनेक थोरा-मोठ्यांची व्याख्याने आणि भेटी होतात. वक्त्यांची भाषणं ऐकायला मिळतात, सरांची तब्येत ठीक होती तोपर्यंत सर कायम साहित्य परिषदेत विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असायचे. ग्रामीण माणूस, त्याचं जगणं, त्याची भाषा, समस्या, आधुनिकीकरणाचे परिणाम, असं सर्व लेखन सरांचे वैशिष्ट्ये होतं.
कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा आदी कथासंग्रहासह सरांच्या लेखणीतून उतरले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सर सदस्य ते अध्यक्षही राहिले. साहित्य प्रवाहातील ग्रामीण साहित्य संमेलनाचे सर अध्यक्षही राहीले. सरांचे शेवटपर्यंत लेखन सुरु होतं. विविध साहित्यिक त्यांना भेटायला जात असत त्यांनी कधी भेटी नाकारल्याचे आठवत नाही.
साहित्य प्रवाहातील ग्रामीण साहित्याचे सर आधारस्तंभ राहीले. सरांचं साधं राहणीमान ही सरांची ओळख. विनायकराव महाविद्यालय, वैजापूर आणि देवगिरी महाविद्यालय, संभाजीनगर येथे सर प्राचार्य म्हणून राहिले. सर, साहित्यिक कार्यक्रमात अध्यक्ष असतील, वक्ते असतील, किंवा कधी श्रोते असतील सर, डोळे मिटवून ते शांतपणे ऐकत आहेत असे चित्र कायम दिसायचे. एखाद्या मुद्याला सरांची डोळ्यांची उघडझाप झाली की तेवढीच हालचाल. आता त्यातलं काहीच नाही. केवळ आठवणी.
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
12 Feb 2025 - 12:05 pm | प्रचेतस
बोरांडे सरांना आदरांजली
सरांविषयी खूप काही ऐकलेले आहे. पण त्यांचे लेखन अजून वाचलेले नाही. आपल्या श्रद्धांजलीपर लेकामुळे अल्पसा का होईना त्यांच्या लेखनाविषयी परिचय झाला. त्यांचे साहित्य वाचायला हवे आता.
12 Feb 2025 - 4:35 pm | मुक्त विहारि
+१
बिरुटे सर यांना, मनापासून धन्यवाद...
12 Feb 2025 - 3:00 pm | विजुभाऊ
बोराडेंचे विहीर ही कथा १२ वीला अभ्यासाला होती.
त्यांच्या कथेतील पात्रे रोज च्या जगण्यातली असायची.
12 Feb 2025 - 3:32 pm | चावटमेला
भावपूर्ण श्रद्धांजली.
13 Feb 2025 - 3:55 am | चित्रगुप्त
सरांना भावपूर्ण आदरांजली. त्यांचे कोणते पुस्तक सर्वात आधी वाचावे ?
13 Feb 2025 - 8:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रा.रं.बोराडे सरांची ओळखच 'पाचोळा' कादंबरीपासून होते मला विचाराल तर, पाचोळाच वाचा असे म्हणेन. 'पाचोळा' 'सावट' आणि 'आमदार सौभाग्यवती' या तिन्ही कादंब-यामधून स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत्या समाजाचे चित्रण येते. स्वातंत्र्यानंतर पहिली पिढी शिकली आणि लिहिती झाली. साठोत्तरी काळातील कादंबरीकार म्हणूनच सरांना ओळखले जाते. पाचोळा (१९७१) पहिल्याच कादंबरीने त्यांना प्रतिष्ठा मिळाली, नाव झालं. तत्पूर्वी आनंद यादवांचा ग्रामीण समकालीन लेखकाचा काळ होता. आनंद यादवांच्या लेखनात ग्रामीण बोलीतलं निवेदन होतं तर, पाचोळातलं ग्रामीण स्त्रीच्या बोलीतलं निवेदन आलं ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की एक अशिशिक्षीत स्त्रीची बोली वाचकांचं लक्ष वेधून घेते.
गंगाराम शिंपी हा त्या स्त्रीचा नवरा आपला परंपरागत शिंप्याचा व्यवसाय करतो; आधुनिक जगाचे जे चटके बसायचे ते बसायला सुरुवात होते. नव्या फॅशन्स येतात आणि त्याच्या आपत्तीची ही कथा रंगत जाते. संघर्ष सुरु होतो. गंगाराम शिंपी आणि भाना या बापमुलांच्या संघर्षाची बाजू त्यात दिसते. जगणं आणि जिद्द बघायला मिळते. पाचोळा ही पारंपरिक ग्रामव्यवस्था उध्वस्त होणा-या संक्रमणकाळातील समाजजीवन रेखाटणारी कादंबरी आहे. खेडेगावातील ग्रामीण कारागीर आपापल्या व्यवसायात स्थिर होते, चांगलं चाललं होतं. आणि आधुनिक जगाचा जो काही फटका बसायचा तो या कारागीरांना बसायला लागला. जे चांगलं असतं, नवं असतं, सुबक असेल त्याचं आकर्षण हा मानवी स्वभाव. यामुळे सामान्य माणसांनी या कारागिरांकडे पाठ फिरवली. आणि यांच्या व्यवसायावर परिणाम व्हायला सुरुवात झाली. सुतार, चांभार, लोहार, शिंपी, यांच्या व्यवसायांची वाताहात झाली.
नव्या बदलांना गंगाराम सामोरं जातो का ? मुलं काय करतात ? पारबती काय विचार करते ? गावाच्या मागणीनुसार तो नव्या फॅशनचे कपडे शिवतो का ? की खेड्यातील स्त्रीयांच्या चोळ्या व गोरगरिबांचे कपडे शिवतो की जुन्यापुराण्या कपड्यांना ठाकठीक करतो या सर्व प्रश्नांची उत्तरे पाचोळात मिळतील. नक्की वाचा आणि कळवा.
-दिलीप बिरुटे
( शिक्षक )
13 Feb 2025 - 12:38 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...