गोत्र, जनुकीय दोष इ० इ०

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
18 Jan 2025 - 11:18 am

सध्या माझ्या युट्यूब फीडमध्ये अचानक "गोत्र" या निरर्थक कल्पनेवर काही व्हिडीओ दिसू लागले आहेत. सर्व व्हिडीओंमध्ये वैज्ञानिक सत्याचे शक्य तेव्हढे विकृतीकरण करून या गोत्र कल्पनेचे पुनरुज्जीवन करायचा हास्यास्पद खटाटोप केलेला दिसतो.

समाजाची रचना झाली तेव्हा तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे केवळ काही सोईस्कर कल्पनांच्या उथळ साधर्म्यामुळे गोत्र संकल्पनेला शास्त्रीय बैठक आहे असे दाखविण्याचा आटापीटा करणे हे अतिशय हास्यास्पद आहे. त्याच बरोबर वैज्ञानिक सत्याची लहरीनुसार किंवा सोईस्करपणे केलेली मोडतोड पण मला मान्य नाही!

सध्याच्या काळात धार्मिक विधीमध्ये मी अमुकतमुक गोत्राचा अमुकतमुक संकल्प करतो, या घोषणे पलिकडे गोत्र-प्रवराला काही स्थान असल्याचे मला आढळले नाही. सध्याचे माहित नाही पण कदाचित पुरातनकाली काही गोत्रांमध्ये वेदांच्या वेगवेगळ्या शाखांचे अध्ययन, तसेच विधीवैविध्यामुळे वेगवेगळे मंत्र, प्रार्थना यात फरक असायची शक्यता आहे. सध्या पाठशाळेत पौरोहित्याचे शिक्षण घेणारे यांच्या पुरतेच गोत्राचे महत्त्व असावे असा माझा अंदाज आहे. विधींच्या तपशीलात फरक झाल्याने इष्ट्देवता रागवत असतील असे मला वाटत नाही...

या क्लिपा बघत असताना क्लिप-निर्मात्यांच्या शास्त्रीय ज्ञानाच्या अभावामुळे असंख्य तार्किक विसंगती निर्माण झाल्या आहेत त्याची क्लिप-निर्मात्यांना अजिबात जाणीव नाही, ही सर्वात मजेशीर गोष्ट आहे.

० उदा० गोत्राचे समर्थन करणार्‍या यच्चयावत् क्लिपा "सगोत्र विवाहनिषेध" यावर ठाम भूमिका घेतात. पण स्त्रीने विवाह करताना पतीच्या गोत्रात प्रवेश केल्यानंतर हा विवाह सगोत्रच ठरतो. समजा या स्त्रीने घटस्फोटामुळे किंवा पतीनिधनामुळे दुसरा विवाह करायचा ठरवला तर "सगोत्र" टाळण्यासाठी तिचे कोणते गोत्र आधार मानायचे? माहेरचे की लग्नानंतरचे? तिचे लग्नानंतरचे गोत्र आधार मानले तर ती माहेरच्या गोत्रातील व्यक्तीशी पुनर्विवाह करू शकेल का?

अपत्यप्राप्तीसाठी आय०व्हि०एफ० तंत्रज्ञान एखाद्या जोडप्याने वापरायचे ठरवले, तर "सगोत्र" कसे टाळायचे? जेव्हा गर्भ वाढविण्यासाठी भाडोत्री गर्भाशय वापरण्यात येते किंवा जन्मानंतर मातेला स्तनपान करण्यासाठी अडचण येते तेव्हा काही स्त्रिया आपले स्तन्य उपलब्ध करून देतात, तेव्हा गोत्राची आडकाठी असते किंवा नाही, याबद्दल हे गोत्रपुरस्कर्ते काहीच बोलत नाहीत.

सगोत्र विवाह म्ह० सदोष संतती, हे अजब तर्कशास्त्र माथी मारायचा आटोकाट प्रयत्न या क्लिपांमध्ये दिसला. वास्तविक "सदोष संतती"ची कारणे अनेक देता येतात. माझ्या माहितीमध्ये "कुपोषण, प्रदूषण आणि ताण" हे सदोष संततीला निमंत्रण देणारे महत्त्वाचे घटक "सगोत्रापेक्षा" जास्त धोकादायक आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगोत्र विवाह निषिद्ध ठरवायला माझ्या माहितीमध्ये कोणत्याही शास्त्रीय चाचण्या केल्या गेलेल्या नाहीत. केल्या असल्यास त्यांचे निष्कर्ष मान्यताप्राप्त नियतकालिकातच प्रसिद्ध व्हायला हवेत. अशा चाचणीचे साधारण, ढोबळ स्वरूप असे असेल-

सगोत्र विवाह केलेल्याचा एक गट आणि एक रॅण्डमली निवडलेल्या विवाहितांचा एक गट. सगोत्र विवाहात सदोष संततीचा दावा "जनुकीय दोषा"मुळे केला जातो. एकाच पूर्वजाकडून जेव्हा नवरा आणि बायको मध्ये जेव्हा एखादा दोष संबंधी समान जनुक संक्रमित होतो त्याला वैज्ञानिक परिभाषेत "रिसेसिव्ह जीन" असे म्हणतात. नवरा आणि बायको दोघांमध्ये एकाच जनुकाच्या उपस्थितीमुळे तो व्यक्त होण्याची शक्यता खूप वाढते आणि ते दोष संबंधी जनुक पुढील पिढीत संक्रमित होतात. सांगायचे तात्पर्य सगोत्र विवाहात "रिसेसिव्ह जीन्स" चे प्रमाण जास्त असते, हे निर्विवाद दाखवले गेले पाहिजे. याशिवाय भिन्नगोत्र विवाहांमध्ये दोषांचे प्रमाण कमी असते हे पण "बियॉण्ड डाऊट" सिद्ध व्हायला हवे.

सर्व गोत्रातील पुरुष अपत्ये जर एकाच ऋषीचे वंशज असतील तर प्रत्येक गोत्रात वाय डीएनए हॅप्लोग्रुप एकच असतो, हे गोत्र समर्थकांनी सिद्ध करायला हवे. तसेच पुरुषवंशाप्रमाणे स्त्रीवंश पण असतो आणि तो mtDNA ने निश्चित होतो हे बर्‍याच गोत्रसमर्थाकांच्या गावी ही नसते. त्यामुळे वास्तविक पुरुष गोत्रांप्रमाणे वेगळी गोत्रे पण असायला हवीत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे कदापि होणे शक्य नाही.

याशिवाय एका क्लिपमध्ये एक अगदी शेवटी एक मजेशीर गोष्ट सांगितली गेली आहे. ती अशी की जर तुम्हाला तुमचे गोत्र ठाऊक नसेल तर तुम्ही तुमच्या मूळ गावी जाऊन शोधाशोधा करू शकता किंवा जेव्हा धार्मिक कार्य करायचे असेल त्या वेळेस भटजीला दक्षिणा देऊन भटजीचे गोत्र धारण करता येते.

अशा रितीने "दक्षिणादत्त गोत्रामुळे" जे सागोत्र्य निर्माण होते ते किती विश्वासार्ह मानायचे? आणखी एक मुद्दा असा की तुम्ही जेव्हा म्हणता की माझे गोत्र अमुक-तमुक तेव्हा हे तुमचे गोत्र असायची शक्यता फक्त ५०% माना्वी लागते. कारण तुमच्या कुण्या पूर्वजाने भटजीला दक्षिणा देऊन गोत्र घेतले नाही, असे निश्चितपणे सांगता येत नाही.

तेव्हा जनुकीय दोषच टाळायचे असतील तर जनुकीय चाचण्या करणार्‍या लॅबला दक्षिणा देणे केव्हा ही श्रेयकर होय!

गोत्र या संकल्पनेची गणितीय चिकीत्सा करणारा एक लेख दोन वर्षांपूर्वी लिहीला होता. त्यात आजतागायत कुणीही चूक काढू शकलेले नाही. तो लेख इथे परत देत आहे-

गोत्र या संकल्पनेचा संबंध अनेक लोकांना जनुकशास्त्राशी लावायला फार आवडतो. "सापिण्ड्य", शुद्धवंश या कल्पनांमुळे लोक असं करायला प्रवृत्त होतात. पण ही कल्पना साध्यासोप्या गणिती तर्कावर तपासायची ठरवली तर पत्त्यांच्या मनो-यासारखी कोसळून पडते. हे कसे ते आता बघू या!

अ ही एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचे गोत्र क्ष आहे, असं आपण मानू या!

अ१ अ२ अ३ अ४ अ५ अ६ अ७ अ८ अ९ अ१० अशी अ ला पुढील प्रत्येक पिढीत त्याच्या/तिच्याच लिंगाची मुले झाली असे मानू (म्हणजे अ पुरुष असेल तर अ१, अ२, अ३ ... पण पुरुषच आहेत). प्रत्यक्षात असे वंशसातत्य राहाण्यासाठी, पुढील प्रत्येक पिढीतील वंशजाचे लग्न होऊन त्यांना त्याच लिंगाचे एक तरी मूल होणे अपेक्षित आहे. पण ही शक्यता अनेक कारणांनी प्रत्यक्षात कमी होते, हे सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला कळायची अडचण नको. असो.
आता अ ही व्यक्ती मूळपुरूष किंवा मूळस्त्री मानली तर पुढच्या पिढीमध्ये "अ"चे जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार (गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आई कडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो. प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो). म्हणजेच अ१ मध्ये "अ"चे ५०% जनुक येणार, तर पुढे अ२ मध्ये "अ"चे २५% जनुक येणार तर पुढील पिढ्यामध्ये अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४), ३.१२५% (अ५), १.५६२५% (अ६), ०.७८१२५% (अ७), ०.३९०६२५%(अ८), ०.१९५% (अ९), ०.०९७% (अ१०) असा कमी कमी होत जातो.

या साध्या गणितावरून असे दिसते की साधारणपणे क्ष या गोत्राचा जनुकीय अंश दहाव्या पिढीत फक्त ०.०९७% इतकाच असतो. आता अ ही व्यक्ती आणि तिचे वंशज जर युद्ध, व्यापार किंवा व्यवसाय यासाठी स्थानांतर करत राहीली तर "अ"च्या वंशजांमध्ये इतर ठिकाणचे जनुक मिसळत जातात. हे मिसळलेल्या जनुकांचे एकूण प्रमाण १० व्या पिढीमध्ये १०० - ०.०९७ म्हणजे ९९.९०३% इतके असते.

आता धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये (मूळ पुरुषाचा जनुकीय अंश ०.७८% असताना) आणि स्त्रिच्या ५ व्या पिढीत (मूळ स्त्रिचा जनुकीय अंश ३.१२५% असताना) सापिण्ड्य संपते किंवा मूळ गोत्राचा रक्तसंबंध संपतो.

आता इथे काही विचित्र विसंगती डोके वर काढतात - मातेकडील सापिण्ड्य संपते तेव्हा मातेकडील जनुकीय वारसा पुरुषाकडील सापिण्ड्य संपताना असणा-या जनुकीय वारशाच्या जवळजवळ चौपट असतो. जनुकशास्त्र शास्त्रात dominant genes कल्पना आहे. आता बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे पण धर्मशास्त्राला हे विज्ञान कळत नाही. तसेच प्रत्येक पिढी वयाच्या २० ते ३० व्या वयादरम्यान प्रजोत्पादन करते असे मानले तर साधारण २५० वर्षांनी म्हणजे साधारण आठव्या ते दहाव्या पिढीतील व्यक्ती स्थानांतरामुळे तसेच सामाजिक स्थित्यंतरांमुळे पूर्णपणे वेगळी असते!

आता आणखी काही मजेशीर गोष्टी ...

१. माणसाच्या एका पेशीच्या केंद्रकातील (nucleus) मधले डि०एन०ए पूर्ण उलगडले तर त्याची लांबी २ मी० इतकी भरते. एका व्यक्तीच्या शरीरातील सर्व पेशीमधील सर्व डि०एन०ए पूर्ण उलगडले तर सूर्य ते पृथ्वी हे अंतर ३०० वेळा कापता येईल! (https://www.nature.com/.../dna-packaging-nucleosomes-and.../)
पण एका पेशीत १० पिढीतील पूर्वजाचा अंश शोधायचा झाला तर त्याची लांबी २मी गुणिले ०.०९७ म्हणजे १९.४ सेमी इतकी भरते. ही २३ गुणसूत्रांच्या जोड्यामध्ये विभागल्यावर ८.४३ मि.मि. इतका १० व्या पिढीतील पूर्वजाचा वाटा एका पेशीमध्ये प्रत्येक गुणसूत्रात असतो.
आता दहाव्या पिढीतील पूर्वजांची एकूण संख्या किती हे शोधू या! प्रत्येक व्यक्तीला दोन जन्मदाते असतात. एकएक पिढी मागे गेले त्याची संख्या पिढीगणिक दूप्पट होत जाते.

२ आईवडील २‌**१ (दोनाचा १ला घात)
(२ x २) आजीआजोबा २‌**२ (दोनाचा २रा घात)
(२ x २) x २ पणजी-पणजोबा २‌**३ (दोनाचा ३रा घात)
((२ x २) x २) x २ खापर पणजी-पणजोबा २‌**४ (दोनाचा ४था घात)

ही शृंखला दहा पिढ्या मागे नेल्यास २ चा १० वा घात म्हणजे १०व्या पिढीतील १०२४ व्यक्ती (५१२ स्त्रिया आणि ५१२ पुरुष) आपल्या जन्मास कारणीभूत ठरतात. म्हणजे ख-या अर्थाने सापिंड्य टाळायचे असेल तर या १०२४ जणांची गोत्रे तपासून ती गोत्रे टाळायला हवीत. आता काही उपजातींमध्ये गोत्र संख्या ही मर्यादित आहे. उदा० चित्पावनांची मूळ गोत्रे १४ आहेत, तर क-हाड्यांची गोत्रे २४ आहेत (देशस्थांच्या एकूण गोत्र संख्येविषयी मला माहिती नाही कारण त्यांची गोत्रावळी कुणी प्रसिद्ध केलेली माझ्या पहाण्यात नाही. एखाद्या देशस्थाने माझे गोत्र अमूक असे सांगितले तर कशाशी तपासून बघायचे, ही समस्या निर्माण होते). म्हणजे जाती प्रेमाच्या हट्टापायी १०व्या पिढीतील या १०२४ व्यक्तीनी जर जातीमध्येच लग्न करायचे ठरवले तर "सापिंड्य" (आणि तदानुषंगिक संततीदोष) काही झाले तरी टाळता येणार नाही. तसेच १०२४ व्यक्ती मध्ये ज्या गोत्राची frequency सर्वात जास्त येईल ते गोत्र सर्वात जास्त dominant आणि प्रभावी ठरेल. पण धर्मशास्त्राला हे विज्ञान कळत नाही.

कोणत्याही भटजीबुवाना हे वंशसात्यताचे गणित कळणे केवळ अशक्य आहे. शिवाय प्रश्न विचारणे, चिकीत्सा करणे परंपरेला फारसे रूचत नाही कारण परंपरेचे अस्तित्व धोक्यात येते.

हे सर्व करताना असे लक्षात येते जाती सारख्या संकल्पना जनुकीय वारशापेक्षा आचार-विचार, संस्कार, चालीरीती या आधारांवर उभ्या राहील्या आहेत आणि तग धरून आहेत.

हे सर्व विश्लेषण केल्यावर शुद्धवंश ही कल्पना आणि त्यावर निर्माण केलेले डोलारे किती तकलादू आणि मूर्खपणाचे आहे, हे कळले तरी या हा उद्योग सत्कारणी लागला असे मी म्हणेन.

समाजविचार

प्रतिक्रिया

गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आईकडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो."

हा दावा पूर्णतः अचूक नाही. जरी आई-वडिलांकडून समान प्रमाणात अणु (alleles) येत असले तरी माइटोकॉन्ड्रिया DNA फक्त आईकडून येतो, त्यामुळे मातृवंशीय वारसा थोडा अधिक असतो.

"जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार."
येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही.

"अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४)..."
हा हिशोब गोत्रासंदर्भात नाही. Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते, जर पुरुष वंश टिकून राहिला, तर. त्यामुळे गोत्राशी सरळ संलग्न वारसा याप्रमाणे घटत नाही.

धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये सापिण्ड्य संपते..."
धर्मशास्त्रात सापिंड्याची व्याख्या रक्तसंबंधावर आधारित नाही, तर सामाजिक संबंधांवर आधारित आहे. यामध्ये जनुकशास्त्राचा थेट समावेश होत नाही.

"

बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे

गोत्र ही केवळ पितृवंशाशी निगडित सामाजिक संकल्पना आहे, जी जनुकांच्या dominant किंवा recessive स्वरूपावर अवलंबून नसते.

युयुत्सु's picture

18 Jan 2025 - 12:55 pm | युयुत्सु

प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो

हे मी स्पष्ट लिहीलेले असताना आपण त्याकडे दूर्लक्ष का केले?

येथे 'गोत्र' ही सामाजिक वंशपरंपरेशी निगडित संकल्पना आहे, जी Y गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही.

याचा प्रतिवादही केलेला आहे. उदा० - "सर्व गोत्रातील पुरुष अपत्ये जर एकाच ऋषीचे वंशज असतील तर प्रत्येक गोत्रात वाय डीएनए हॅप्लोग्रुप एकच असतो, हे गोत्र समर्थकांनी सिद्ध करायला हवे. तसेच पुरुषवंशाप्रमाणे स्त्रीवंश पण असतो आणि तो mtDNA ने निश्चित होतो हे बर्‍याच गोत्रसमर्थाकांच्या गावी ही नसते. त्यामुळे वास्तविक पुरुष गोत्रांप्रमाणे वेगळी गोत्रे पण असायला हवीत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे कदापि होणे शक्य नाही."

Y गुणसूत्राच्या बाबतीत १००% Y गुणसूत्र पुढील पिढीत जात असते.

अर्धसत्य! Y गुणसूत्र उत्कांत होते आणि त्यामु़ळे वेगवेगळे हॅप्लोग्रुप तयार झाले आहेत. तसेच भविष्यात ते पूर्ण नाहिसे होणार अशी पण शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोत्राचा सरळ परिणाम संपूर्ण जनुकांवर होत नाही.

मग गोत्राचा आणि गुण्सूत्रांचा संबंध लावायचा अट्टाहास कशासाठी

कॉमी's picture

18 Jan 2025 - 4:23 pm | कॉमी

चांगला लेख.

माझ्या मर्यदित माहितीप्रमाणे ज्या गुरुकुलात मुले आणि मुली शिकायला जात असत त्यांचे गोत्र त्या ऋषींचे नाव म्हणून लावले जात आणि शिक्षण करत असताना त्यांच्या प्रेमविवाह होऊ नये म्हणून सगोत्र विवाह निषिद्ध मानला गेला होता.

हि माहिती जर खरी असेल तर गोत्र आणि गुणसूत्रे यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे पुढचा काथ्याकूट मुळातच निरर्थक ठरतो.

अर्थात माझी माहिती बिनचूक आहे असा माझा दावा नाही.

पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

अनन्त अवधुत's picture

31 Jan 2025 - 2:00 am | अनन्त अवधुत

पण काही व्यक्ती प्रत्येक आधुनिक गोष्ट भारतात अस्तित्वात होतीच किंवा आम्हाला त्याचे ज्ञान होतेच हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

+१

प्रसाद गोडबोले's picture

19 Jan 2025 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले

युट्यूब फीडमध्ये

असे युट्युब फीड मध्ये दिसणार्‍या प्रत्येक विषयावर लेख पाडायचे ठरवले तर मिपा लवकरच सुगीचे दिवस येतील. =))))

बाकी तुम्हाला जे कळले ते आणि फक्त तेच इतरांना कळावे , किंवा इतरांना काही कळातच नाही , त्यांचे सर्व आकलन ते तकलादु आणि मुर्खपणाचे आहे असा जो सुर तुमच्या लेखात आहे तो आवडला ! तुम्ही त्यांची पुस्तके ग्रंथ ह्यांचे सार्वजनिक दहन करा ! स्वतंत्र देश आहे, तुम्हाला जे पटत नाही त्याची जाळपोळ करायला तुम्ही स्वतंत्र आहात !!

हाकानाका.

क्याट्यागरी '२' लेखावरील तुमचा भारी प्रतिसाद वाचून लईच कर्मणूक झाली.

आंद्रे वडापाव's picture

31 Jan 2025 - 11:26 am | आंद्रे वडापाव

एक वेगळा छान लेख ..

कपिलमुनी's picture

31 Jan 2025 - 12:14 pm | कपिलमुनी

राजकीय लेखांपेक्षा वेगळा.लेख , विषय वाचल्याचे समाधान