समुद्रपुष्प

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जनातलं, मनातलं
26 Dec 2024 - 7:46 pm

भल्या सकाळी, जवळपास निर्मनुष्य अशा समुद्रकिनाऱ्यावर, ओलेत्या वाळुवर हळुवार पावलं उमटवताना, रात्रीच्या उधाण लाटांनी पुळणीवर दूरपर्यंत रेखाटलेल्या धुकट काळ्या - पांढऱ्या छटांच्या नागमोडी रांगोळीच्या पार्श्वभुमीवर ऐकू येणारी सिंधुसागराची धीरगंभीर गाज मनावर गारुड करते. इटूकल्या नखाएवढ्या खेकड्यांच्या पिटुकल्या बिळांबाहेरची कलाकुसर व त्यांच्या तिरक्या चालीने भोवताली आपसुकचं रेखाटली गेलेली नक्षी पाहताना नजर एका ठिकाणी मुळी ठरतचं नाही. रात्री लाटांबरोबर वाहुन आलेल्या ओंडक्यावर वसलेली नानाविध, अनोळखी व विचित्र शंखवर्गीय समुद्रजीवांची जिवंत वसाहत निरखून पाहताना तर डोळेचं विस्फारले जातात.

मग पहाटेपासूनचं लाटांशी लगट करीत वाळू वाहणारी बैलगाडी तिच्या घुंगररवाने लक्ष वेधून घेते, खाऱ्या पाण्याने घट्टावलेल्या मऊसूत वाळुवर, लाकडी चाकांवर चढवलेल्या लोखंडी धावांच्या जोरावर नकट्या अंगकाठीची ती दुडक्या चालीने मागे कुठल्याही पाऊलखुणा न सोडता पुढे निघून जाते. ती नजरेआड होते न होते तोचं आत समुद्रात रात्रभर मासेमारी करून सकाळी परतीच्या मार्गावर एका लयीत बंदराकडे निघालेला नाखवांच्या नावांचा काफीला, धुरकट धुक्याच्या चादरीमागुन समुद्र-क्षितीजाच्या रेषेवर अवतीर्ण होतो, त्यांची वेगवेगळ्या रंगांची निशाणं लावलेली, नजरबंदी करणारी संथ चालीची रांग हळूहळू पुढे सरकत-सरकत एका कोपऱ्यात नजरेआड होते. त्या कोपऱ्यातून नजर पुन्हा उलट क्रमाने मागे फिरवत विरुध्द कोपऱ्यावर स्थिरावते न स्थिरावते तोच तिथुन डोक्यावर वेगवेगळ्या आकाराच्या पाट्या घेऊन झप-झप पावलं टाकणारा कोळीणींचा एक छोटासा समुह दूरवरून चालत येत असताना दिसतो. गुडघ्यापर्यंत नेसलेली लुगडी, एका हातात वहाणा, दुसरा हात अधेमध्ये डोक्यावरील पाटीला आधाराला लावीत, पायातील जाड चांदीच्या पैंजणांच्या नादलयीत मुकपणाने नाकासमोर चालत बघता-बघता तो आपल्यासमोरून पुढे निघूनही जातो.

सकाळी-सकाळी स्वतःच्या धुंदीत, एकमेकांशी खेळत, मस्ती करीत निघालेल्या कुत्र्यांच्या घोळक्याला लाटांबरोबर वाहून आलेलं पाकट माशाचं अगदी रबराचं वाटावं असं दिसणारं कलेवर सापडलेलं असतं, त्याचं नक्की काय करावं या विचारात गोंधळून ते तिथं उगाचंच भुंकून गोंगाट करत बसलेले असतात.

त्यांना तिथेचं सोडून मग मी समुद्र डाव्या हाताला ठेवत लांबवर पसरलेल्या पुळणीवर चालू लागतो. मागे, किनाऱ्यावर पसरलेल्या माडा-पोफळीच्या बागांमधून निघणाऱ्या धुरांच्या रेघा आभाळात विरघळत असतात. शांत पहुडलेल्या गावाला एका संथ लयीत जाग येत असते. नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यात, समुद्राने पुढे येत झिजवलेल्या पायामुळे उन्मळून एक भला मोठा माड कडेच्या थोडया उंचावरील वाडीतून उन्मळुन पुळणीवर पडलेला असतो, त्याच्यावर तोल सांभाळत चालून पाहण्याचा मोह मला आवरत नाही.

पुन्हा पुढे चालत उजव्या हाताला सुरूचं एक दाट बन दिसू लागतं. पडलेल्या वाऱ्यात सर्वच झाडे अगदी निश्चल गाडून उभी असतात. उंचचं उंच वाढलेल्या ह्या काटकुळ्या लवचिक झाडांच्या लांब उभट पानांमधून एव्हाना कोवळी सूर्यकिरणे झिरपायला सुरुवात झालेली असते. डाव्या हाताला आता खडकाळ समुद्र किनारा असतो, तिथल्या खडकात सतत आदळणाऱ्या लाटांबरोबर आदळून खडकाचाचं भाग झालेले नानाविधप्रकारचे, आकाराचे असंख्य शिंपले स्पष्ट दिसतात. लाटांच्या माऱ्याने तासलेला खडक चांगलाच बोचरा टोकदार झालेला असतो. दूरवर, गडद हिरव्या आणि लाल रंगात रंगवलेला उभा दीपस्तंभ कोवळ्या उन्हात त्याचं अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करतो.

मग तिथंच एखादी जागा शोधून खडकावर बसून, क्षितीजापर्यंत अथांग पसरलेल्या सिंधू-सागराकडे एकटक पाहताना वेगळीचं भावसमाधी लागते. पाण्याने व्यापलेल्या क्षितीजाच्या धुरकट पडद्यावर अनेक हरवलेल्या, पुसुन टाकलेल्या आकृत्या प्रकाशमान होऊ लागतात. बुजलेल्या आठवणी अगदी लख्ख दिसू लागतात, शब्दांच्या पलीकडले काहीतरी ऐकू येऊ लागते अन मग पडलेल्या अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे मिळतात, न सुटलेली काही कोडी अलगद सुटतात. अनेक कधीचं होऊ न शकलेले संवाद साधले जातात. न पाळलेल्या शब्दांची भरपाई केली जाते. जाणिवांच्या पातळीवरचा हा आत्मीय खेळ पुढे कितीतरी वेळ असाचं सुरू राहतो.

जसा मानेवर उन्हाचा चटका बसू लागतो तसा मी भानावर येतो, खडकावरून पुन्हा पुळणीवर येत, आता समुद्र उजव्या हाताला ठेवत पुन्हा, पुढे-पुढे झेपावणाऱ्या लाटांचा खेळ पाहत हळुहळू चालत सुरुचं बन मागे टाकतो. माडा-पोफळीच्या बागा पुन्हा दिसू लागतात. किनाऱ्यावर एव्हाना लोकांची वर्दळ सुरू झालेली असते. लाटांनी रात्रभर खपून रेखलेली रांगोळी त्यात बुजून गेलेली असते. इकडून तिकडे पळणाऱ्या अवजड ATV बाईक्स पिटुकल्या खेकड्यांची बिळे तुडवत फिरत असतात. खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा कुत्र्यांना हाडतुड करून हाकलून लावायचा प्रयत्न सुरू असतो. लाकडी ओंडक्याला लाथा मारून, त्याच्यावरील जीवांचा जीव घेण्याचं काम इमाने-इतबारे सुरू असत. पाकट माशाचं कलेवर त्याची दोरीसारखी शेपटी धरून इकडून-तिकडे उडवण्याचा खेळ सुरू असतो. केविलवाण्या चेहऱ्याचे, म्हातारे मरतुकडे घोडे जुंपलेल्या गाडीत ढिगाने गाढवं बसलेली दिसतात.

हे सर्व अगदीचं अलिप्तपणे पाहत, सहन करीत, अखेर, एका वाडीच्या कुंपणामधील पायवाटेने किनारा सोडून मी अरूंद रस्त्यावर येतो. भल्या सकाळचा आत्मीय आनंद देणारा माझा समुद्र आता दिवसभरासाठी हरवून जाणार असतो आणि परतीच्या वाटेवर जड झालेल्या पावलांना ओढत नेण्यावाचून दुसरा पर्यायही माझ्याकडे नसतो.

ता.क. - याचे प्रचि नाहीत, याचं शब्दचित्रावर मदार आहे.

प्रवासविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Dec 2024 - 8:53 pm | मुक्त विहारि

सकाळचा समुद्र, दिवसभराचा उत्साह देतो..

संध्याकाळचा समुद्र, कौटुंबिक आनंद...

आणि रात्रीचा,फक्त आणि फक्त, समुद्र आणि मी... त्यातही पौर्णिमेची रात्र असेल तर, फारच उत्तम.... त्या क्षणी मला तरी कुणीच नको असते....

कंजूस's picture

27 Dec 2024 - 10:56 am | कंजूस

छान.सहज लेखन.

अगदी रिलेट करता येईल असे वर्णन. आवडले.

खुपच सुंदर, खरोखरच हे शब्दचित्र आहे.डोळ्यासमोर उभे राहिले.

बुजलेल्या आठवणी अगदी लख्ख दिसू लागतात, शब्दांच्या पलीकडले काहीतरी ऐकू येऊ लागते अन मग पडलेल्या अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे मिळतात, न सुटलेली काही कोडी अलगद सुटतात. अनेक कधीचं होऊ न शकलेले संवाद साधले जातात. न पाळलेल्या शब्दांची भरपाई केली जाते. जाणिवांच्या पातळीवरचा हा आत्मीय खेळ पुढे कितीतरी वेळ असाचं सुरू राहतो.

मस्त!

कर्नलतपस्वी's picture

27 Dec 2024 - 9:30 pm | कर्नलतपस्वी

देवबाग,मालगुंड, गणपती पुळे सारख्या अनेक कोकणी किनारे डोळ्यासमोर आले.
मुक्तक आवडले.

वामन देशमुख's picture

27 Dec 2024 - 10:17 pm | वामन देशमुख

चित्रदर्शी लेखन आवडले. लिहीत रहा.

बुजलेल्या आठवणी अगदी लख्ख दिसू लागतात, शब्दांच्या पलीकडले काहीतरी ऐकू येऊ लागते अन मग पडलेल्या अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे मिळतात, न सुटलेली काही कोडी अलगद सुटतात. अनेक कधीचं होऊ न शकलेले संवाद साधले जातात.

हे विशेष आवडले.

अर्थात, कुणाला समुद्रावर, कुणाला शेतात, कुणाला डोंगरावर तर कुणाला अजून कुठे असा अनुभव येईल. दैनंदिन धकाधकीच्या जीवनापासून दूर कुठेतरी माणूस आपला भावबंध जोडू पाहतो. तिथे असा अनुभव येतो.

चक्कर_बंडा's picture

15 Jan 2025 - 8:19 pm | चक्कर_बंडा

सर्वांचे मनापासून आभार !!!